ऋग्वेदातल्या मांसाहाराबद्दल टिप्पणी केल्याप्रकरणी वरिष्ठ अधिकारी निलंबित

ऋग्वेदातल्या मांसाहाराबद्दल टिप्पणी केल्याप्रकरणी वरिष्ठ अधिकारी निलंबित

नवी दिल्ली: ऋग्वेदात मांसाहाराची परवानगी दिली आहे असे विधान केल्याप्रकरणी एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. या अधिकाऱ्याचे वक्तव्

मुल्ला बरादरकडे अफगाणिस्तानची सूत्रे जाण्याची शक्यता
‘अग्निपथ’ योजनेच्या विरोधात तरुणांची निदर्शने
काश्मीरातल्या ४५० जणांची परदेशवारी रोखली

नवी दिल्ली: ऋग्वेदात मांसाहाराची परवानगी दिली आहे असे विधान केल्याप्रकरणी एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. या अधिकाऱ्याचे वक्तव्य कायदा व सुव्यवस्थेला धोका निर्माण करू शकते असे कारण देत, जम्मू-काश्मीर प्रशासनाने, अधिकाऱ्याला निलंबित केले आहे.

‘एका विशिष्ट धर्माबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याचे’ कारण देत सहाय्यक आयुक्त (पंचायत) अब्दुल रशीद कोहली यांना निलंबित करण्याचा निर्णय राजौरीचे जिल्हाधिकारी विकास कुंदाल यांनी मंगळवारी रात्री घेतला, असे टेलीग्राफने दिलेल्या बातमीत म्हटले आहे. या प्रकरणी चौकशी सुरू करण्यात आल्याचेही बातमीत नमूद करण्यात आले आहे.

वादग्रस्त विधान केल्याबद्दल कोहली यांच्यावर कारवाई करावी अशी मागणीही भारतीय जनता पार्टीच्या एका नेत्याने केली आहे.

“एसी पंचायत यांनी एका विशिष्ट धर्माबद्दल काही आक्षेपार्ह टिप्पणी केल्याची तक्रार जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाली,” असे कुंदाल यांनी जारी केलेल्या निलंबन आदेशात म्हटले आहे. कोहली यांच्या टिप्पणीमुळे कायदा व सुव्यवस्थेला धोका निर्माण होऊ शकतो आणि त्यांनी सेवा वर्तन नियमांचे उल्लंघन केले आहे, असा दावाही आदेशात करण्यात आला आहे.

कोहली यांनी त्यांच्या चार सहाय्यक कर्मचाऱ्यांपुढे हे वक्तव्य केले होते. त्यापैकीच एकाने प्रशासनाकडे तक्रार केल्याचे समजते.

कोहली चार ग्रामस्तरीय कार्यकर्त्यांसोबत (व्हीएलडब्ल्यू) राजौरीतील एका रेस्टोरंटमध्ये जेवण करत असताना मांसाहाराचा मुद्दा चर्चेला आला. या कार्यकर्त्यांपैकी दोन हिंदू, तर दोन मुस्लिम होते.

कोहली म्हणाले, “ऋग्वेदातही मांसाहाराला परवानगी दिली आहे असे मी इंटरनेटवर वाचले होते, तुमचे मत याहून वेगळे का आहे, असा प्रश्न मी त्यातील दोघांना (हिंदू कार्यकर्त्यांना) विचारला. त्यानंतर आम्ही शांतपणे एकमेकांचा निरोप घेतला. मी कोणाच्या भावना दुखावल्या असतील असे मला वाटलेच नाही. त्यांनी मला तसे सांगितले असते, तर मी लगेच क्षमा मागितली असती आणि मी त्यांना मांसाहारी पदार्थ खाण्यास अजिबात सांगितले नव्हते. मात्र, त्यांच्यातील एक जण तक्रार करणार आहे असे मला संध्याकाळी कळले,” असे कोहली म्हणाले.

मात्र, कोहली यांनी हिंदू कर्मचाऱ्यांना त्यांनी मांसाहारी जेवण का मागवले नाही असा प्रश्न विचारल्याचा आरोप भाजपाचे महासिचव विनोद गुप्ता यांनी केला आहे. “कोहली यांना केवळ निलंबित केलेले आम्हाला चालणार नाही. त्यांना बडतर्फच केले पाहिजे. पोलिसांनी कोहली यांच्यावर आयपीसीच्या १५३व्या कलमाखाली (दंगल घडवण्याच्या उद्देशाने चिथावणी देणे) फिर्याद गुदरावी, जेणेकरून, ज्या समुदायाबद्दल त्यांनी ही टिप्पणी केली, त्यांना ” काहीतरी कारवाई झाल्यासारखे वाटेल,” असे गुप्ता यांनी ‘द टेलिग्राफ’ला सांगितले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0