कथित ऑडिओ टेपमुळे शिवराज सिंह अडचणीत

कथित ऑडिओ टेपमुळे शिवराज सिंह अडचणीत

काँग्रेसच्या बंडखोर आमदारांना पुन्हा निवडून द्यावे, असे सांगणारी म. प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या आवाजातील एक कथित ऑडिओ टेप बाहेर आल्यानंतर काँग्रेसने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी व शिवराज सिंह चौहान यांना कमलनाथ सरकार पाडल्याबाबत जबाबदार धरले आहे.

दैनिक भास्करने दिलेल्या वृत्तानुसार ही कथित ऑडिओ टेप इंदूरनजीक सांवेर येथील असून शिवराज सिंह आपल्या पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करताना काँग्रेसच्या सरकारमध्ये आरोग्यमंत्री असलेले पण सध्या भाजपच्या सरकारमध्ये मंत्रीपदावर असलेल्या तुलसी सिलावट यांना निवडून आणणे किती महत्त्वाचे आहे, हे सांगत होते.

या टेपची विश्वासार्हता द वायरने तपासलेली नाही.

या ऑडिओ टेपमध्ये शिवराज सिंह आपल्या कार्यकर्त्यांना आवाहन करताना म्हणतात, की “केंद्रीय नेतृत्वाने हे सरकार पाडण्याचे ठरवले होते, बरबाद, उध्वस्त करायचे ठरवले होते. तुम्हीच सांगा, ज्योतिरादित्य सिंदिया व तुलसी भाई यांच्यामदतीशिवाय हे सरकार पडले असते का? आपल्या समोर कोणताही पर्याय नव्हता. ते तेथेही मंत्री होते. मुख्यमंत्री होण्याचा विचारही केला नव्हता. आता काँग्रेसवाले म्हणताहेत, गडबड झाली, घोटाळा झाला.”

“पण आज या मंचावरून पूर्ण आत्मविश्वास व ईमानदारीत सांगतो की, धोका काँग्रेसने दिला आहे, धोका सिंदिया व तुलसी सिलावट यांनी दिलेला नाही. त्यांनी अत्यंत वेदनेतून आपले पद सोडले आहे नाहीतर सरपंच सुद्धा आपले पद सोडत नाही. आज सिंदिया व तुलसी भाईंचे मी अभिनंदन करतो की त्यांनी भाजपाचे सरकार बनवण्यासाठी स्वतःचे मंत्रिपद सोडले, आता निवडणुका होणार आहेत. मला कोणी ईमानदारीने सांगा जर तुलसी आमदार झाले नाहीत तर मी मुख्यमंत्री झालो असतो का? भाजपाचे सरकार वाचले असते का? प्रत्येक भाजप कार्यकर्त्याची ड्यूटी व कर्तव्य आहे की तुलसी सिलावट निवडणूक लढवत नसून तुम्ही निवडणूक लढत आहात. आपण सर्व उमेदवार आहोत.”

शिवराज सिंह यांच्या या ऑडिओ टेपमुळे ज्योतिरादित्य सिंदिया गटाचे तुलसी सिलावटही चर्चेत आले आहेत.

तुलसी सिलावट कोण आहेत?

कमलनाथ सरकारमध्ये तुलसी सिलावट हे आरोग्यमंत्री होते. पूर्वी ते लोकसभेचे खासदारही होते. काँग्रेसचा राजीनामा देऊन जेव्हा ज्योतिरादित्य सिंदिया भाजपमध्ये आले तेव्हा सिलावट यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. सध्या ते शिवराज सिंह चौहान यांच्या सरकारमध्ये जलसंधारण मंत्री आहेत. सांवेर येथे होणार्या पोटनिवडणुकांत ते भाजपचे उमेदवार म्हणून उभे आहेत.

काँग्रेस आक्रमक

शिवराज सिंह चौहान यांच्या आवाजातील ही कथित ऑडिओ टेप बाहेर आल्यानंतर म. प्रदेशच्या राजकारणात भूकंप झाला. काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी भाजपने कसे कटकारस्थान करून कमलनाथ सरकार पाडले याचे ट्विटरवरून आरोप केले.

माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी ही ऑडिओ टेप भाजपचा खरा चेहरा सांगणारी असल्याचे सांगून माझे सरकार पाडण्यासाठी कसे कारस्थान या पक्षाने केले व यात कोणकोण सामील होते, हे जनतेला समजून आले असल्याचे ट्विट केले आहे. काँग्रेसचे सरकार अंतर्गत असंतोषामुळे, गटबाजीने पडलेले नाही तर ते भाजपने पाडले आहे, सरकारकडे पूर्ण बहुमत होते, आता भाजपचे खोटे दावे जनतेपुढे आल्याचेही वेगळे ट्विट त्यांनी केले आहे.

राज्यातले काँग्रेसचे प्रवक्ते नरेंद्र सलुजा यांनीही भाजपचे केंद्रीय नेतृत्व कमलनाथ सरकार पाडण्याच्या कट कारस्थानात सामील होते, असा आरोप केला आहे. काँग्रेसचे सरकार पाडण्यासाठी ज्योतिरादित्य सिंदिया यांच्या मदतीचा भाजपने वापर केला. काँग्रेसकडे पूर्ण बहुमत होते पण सिंदियांच्या मदतीने भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी षडयंत्र रचून सरकार पाडल्याचा आरोप त्यांनी केला.

काँग्रेसचे माजी मंत्री जीतू पटवारी यांनी तर या संदर्भात पक्ष सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार असून राष्ट्रपतींना या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती करणार असल्याचे सांगितले.

पोटनिवडणुका सप्टेंबरमध्ये?

गेल्या मार्चमध्ये काँग्रेसचा राजीनामा देऊन ज्योतिरादित्य सिंदिया भाजपमध्ये गेले आणि त्यांच्यासोबत २२ काँग्रेसचे आमदार पक्षातून फुटून गेले. त्यामुळे कमलनाथ सरकार संकटात आले. या सरकारने विधानसभेत बहुमत सिद्ध न करता राजीनामा दिला.

२३० विधानसभा सदस्य असलेल्या म. प्रदेशात काँग्रेसकडे ११६ आमदार होते. पण २२ आमदारांनी बंडखोरी गेल्याने त्यांचे संख्याबळ ९२ वर आले. त्यानंतर बहुमताचा आकडा घसरून १०४ झाला व भाजपकडे १०७ आमदार असल्याने भाजपच्या शिवराज सिंह चौहान यांनी २३ मार्चला मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

आता येत्या सप्टेंबरमध्ये २४ जागांवर पोटनिवडणुका होण्याची शक्यता आहे.

मूळ बातमी

COMMENTS