काही दिवस स्वत:ला कोंडून घेऊया

काही दिवस स्वत:ला कोंडून घेऊया

चीनने संपूर्ण नाकाबंदी केली नसती तर काही दिवसातच चीनची सुमारे अर्धी लोकसंख्या कोरोनामुळे आजारी पडली असती. पण नाकाबंदीमुळे संक्रमणाचा वेग कमालीचा मंदावला व आता तिथे नवीन रुग्णांची संख्या फारच रोडावली आहे.

लॉकडाऊनमुळे मेटाकुटीला आलेला शेतकरी
इराणमध्ये अडकलेल्या २५४ भारतीयांना कोरोनाची लागण?
कोरोना – उपाय एकसूत्र हवेत

कोरोना विषाणूने साऱ्या जगाला सळो की पळो करून सोडले आहे. हा विषाणू मानवात इतक्या तत्परतेने संक्रमित होऊन त्याच्या प्रकृतीवर प्राणघातक घाला घालतो की त्याच्याशी दोन हात करण्यासाठीही वेळ मिळत नाही. कोरोना साथीचा प्रादुर्भाव जेव्हा चीनच्या वुहान प्रांतात झाला तेव्हा तिथले प्रशासनिक मंडळ दबून गेले, त्यांना अक्षरशः फेफरे आले. हा कोणता काळदूत आपल्यामागे हात धुऊन लागला आहे याचा अंदाज बांधणं त्यांच्या आवाक्याबाहेरचे होऊन गेले होते. दोन महिन्यापूर्वी जेव्हा ही साथ सुरू झाली तेव्हा वुहान व त्याच्या आजूबाजूच्या प्रांतातील लोक आपापल्या देशात व गावात परतू लागले. त्यांच्याबरोबर ही साथ पसरू लागली. ती जगभर वाढत गेली. जगात आजच्या घडीला सुमारे दोन लाख लोकांना या रोगाची लागण झालेली आहे. ६ हजार लोकांनी आपले प्राण गमावलेले आहेत. ही एव्हढी हानी एका छोट्याशा विषाणूने केली आहे.

मानवाच्या माध्यमातून हा विषाणू मानवातच का व कसा पसरतो?
या विषाणूची मारक क्षमता फार मोठी आहे व याचा शिरकाव एका मानवी शरीरातून दुसऱ्या शरीरात अगदी अलगद व विनासायास होतो. हे का व कसं होतं याचा छडा लावण्यात शास्त्रज्ञ व वैद्यकीय क्षेत्रातील मातब्बर मंडळी अनेक ठिकाणी प्रयत्नशील आहेत. त्यांनी काही प्रयोग पार पाडलेले आहेत व त्यातून त्यांना फार मोलाची माहिती मिळाली आहे. या विषाणूचे सूक्ष्म निरीक्षण केल्यानंतर शास्त्रज्ञांना त्याच्या शरीरावर एका प्रकारचे प्रोटीन किंवा प्रथिन आढळले. या प्रथिनांच्या मदतीने कोरोना मानवाच्या पेशींमध्ये मोठ्या सहजतेने व शिताफीने शिरकाव करतो.

अन्य काही वैज्ञानिक हा विषाणू मानवाच्या ऊतीमध्ये कसा प्रवेश करतो याच्यावर संशोधन करत आहेत. एका प्राथमिक अंदाजानुसार काही इंद्रियांच्या पापुद्रयातून आपल्या शरीरात हा विषाणू घुसतो. ही गोष्ट जर खरी ठरली तर या विषाणूला मारण्यासाठी याच प्रवेशद्वाराचा उपयोग करणे रास्त ठरणार आहे.

मानवी शरीरातील पेशी संक्रमित करण्यासाठी कोरोना आपल्या शरीरावर अस्तित्वात असणाऱ्या खिळ्याच्या आकाराच्या प्रथिनांचा उपयोग करून मानवाच्या पेशीतील पापुद्र्यावर चिकटतो. ही सारी प्रक्रिया एंझ्याइम किंवा विकरांच्या साहाय्याने होते. या विषाणूचा जनुकीय अभ्यास केल्यानंतर वैज्ञानिकांना माहिती झाले आहे की जो खिळा-सदृश्य प्रथिन आहे तो इतर विषाणूत आढळणाऱ्या प्रथिनांपेक्षा थोडा वेगळा आहे. कोरोनात फुरीन नावाचा एक घटक आहे जो इतर विषाणूत अस्तित्वात नसतो. हा एंझ्याइम किंवा विकर अनेक घडामोडींचा प्रणेता असतो.

मानवासाठी कोरोनातील फुरीन फारच घातक ठरतो कारण आपल्या शरीरात सुद्धा फुरीन अनेक अवयवात आढळतो. तो आपल्या फुफ्फुस, यकृत व लहान आतडीत सामावलेला असतो. त्यामुळेच कोरोनाचा शिरकाव मानवी शरीरात झाला तर हे अवयव पूर्णतः निकामी ठरतात. सार्स विषाणू, ज्याने काही वर्षांपूर्वी हाहाकार माजवला होता, तो याच कोरोनाचा भाऊबंद आहे. पण त्यात फुरीन नसल्या कारणाने त्याचे संक्रमण कोरोना इतके जलद गतीने झाले नाही. इन्फ्लुएंझा विषाणूत फुरीन आहे त्यामुळे त्याचीही लागण मानवात जलदगतीने होते. पण त्याच्यावरची लस शोधून काढण्यात यश मिळाल्यानंतर त्या विषाणूची दाहकता कैकपटीने कमी झाली आहे.

पण सध्यातरी संशोधनातून नवनवीन व वेगवेगळी माहिती हाती येऊ लागली आहे. कोरोना विषाणूंवर संशोधन काही वर्षांपासून सुरू आहे. पण सध्याच्या आणीबाणीच्या जंजाळात या संशोधनावर एक अपरिहार्यता व अगतिकतेचा दबाव आहे. सर्वजण घाईत आहेत. सर्वजण विविध चष्म्यातून या समस्येकडे पाहत आहेत त्यामुळे वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी काढलेल्या निष्कर्षात त्यांची एकवाक्यता आढळत नाही. फुरीनमुळे जर कोरोना इतका घातक झाला असेल तर १९१८चा स्पॅनिश फ्लू इतका धोकादायक ठरला नसता, कारण त्याच्या शरीरात फुरीन नव्हताच मुळी. पण इतरही काही वैज्ञानिकांना फुरीन व त्याच्या कार्याची माहिती झालेली आहे. कोरोना विषाणूला आळा घालण्यासाठी सर्वजण सज्ज झालेले आहेत, औषध, लस तयार होत आहे.

पण कोणतेही औषध किंवा लस बाजारात आणण्याआधी त्याची चाचणी घावी लागते. पहिल्यांदा प्राण्यांवर व नंतर मानवावर. सध्या माकडांवर व उंदरांवर जगभरात कोरोनासंबंधी प्रयोग सुरू आहेत. सार्सची जेव्हा साथ पसरली होती तेव्हाही काही प्राण्यांवर प्रयोग सुरू होते. पण त्यावेळचा धोका टळल्यानंतर या प्राण्यांवरचे प्रयोग थांबवण्यात आले होते. आज या प्राण्यांची मागणी वाढलेली आहे. त्यांच्यावर आधीच काही प्रयोग झाले होते व त्यासंबंधीची आकडेवारी जतन करून ठेवण्यात आलेली आहे. हे प्राणी व आकडेवारी जर आज वापरली तर लस शोधण्यासाठी थोडा कमी काळ खर्च करावा लागेल. पण काही संशोधकांना मानवासाठी कोरोना विरुद्ध लस तयार करण्यासाठी काही सकारात्मक संकेत मिळाले आहेत.

कोरोनाचे संक्रमण कुठपर्यंत वाढेल?
चीन, इटली, अमेरिका सारख्या देशात या साथीच्या रोगाने फार मोठी खळबळ माजवलेली आहे. इथे हजारो, लाखो लोकं या आजाराने बाधित झाली आहेत. हा रोग संक्रमणाचा उच्चांक केव्हा गाठेल याच्याबद्दल सांख्यिकी शास्त्रानुसार अनुमान काढले जात आहेत. एका अभ्यासानुसार चीनमध्ये हे शिखर काही दिवसांपूर्वीच गाठले गेलेले आहे. खरेतर दोन दिवसांपूर्वी तिथल्या अधिकाऱ्यांनी कोरोनाचा कोणताही नवीन रुग्ण आढळला नाही याची जगासमोर ग्वाही दिलेली आहे. इतरही काही देश संक्रमणाची सीमा कधी गाठली जाईल याचे आडाखे बांधत आहेत. त्यायोगे कोणत्या प्रकारची खबरदारी घ्यायची व किती नवीन रुग्णांसाठी वैद्यकीय मदतीची व्यवस्था करावी लागेल याचे ठोकताळे बांधणं शक्य होऊन जाईल.

चीनपासून काय शिकता येईल?
कोरोनाचा प्रसार चीनच्या वुहान प्रांतातून साऱ्या जगभर पसरला हे निर्विवाद सत्य आहे. या साथीचा धसका घेऊन तेथील रहिवाशी साऱ्या जगभर ही साथ घेऊन गेले. त्यामुळे एक वैश्विक संकट आपल्या समोर उभे ठाकले आहे. पण जेव्हा चिनी अधिकाऱ्यांना या रोगाची तीव्रता जाणवली व किती वेगाने ही साथ पसरते याचा अंदाज आला तेव्हा त्यांनी संपूर्ण शहराची नाकाबंदी करून टाकली. साऱ्या वुहान शहराला त्यांनी घरात व इस्पितळात बंदिस्त केले. त्यांची तपासणी सुरू ठेवली व नवीन संक्रमण टाळण्यासाठी बस, ट्रेन व विमान सेवा पूर्णपणे बंद केली. एका अंदाजानुसार वुहान व हुबाई प्रांतात चीनची सुमारे अर्धी लोकसंख्या वास्तव्य करते. एव्हढ्या मोठ्या लोकसंख्येला त्यांनी काबूत ठेवले होते. व त्याचा परिणाम म्हणून कोरोनाला त्यांना आळा घालता आला.

शास्त्रज्ञांच्या मते एक कोरोना बाधित व्यक्ती २ व्यक्तींना बाधित करू शकतो. ते दोघे ६ व्यक्तींना, आणि असे करत करत हजारो व्यक्ती हा विषाणू आपल्या शरीरात घेऊन फिरत राहतात. जर चीनने संपूर्ण नाकाबंदी केली नसती तर काही दिवसातच चीनची सुमारे अर्धी लोकसंख्या आजारी पडली असती. पण नाकाबंदीमुळे संक्रमणाचा वेग कमालीचा मंदावला व आता तिथे नवीन रुग्णांची संख्या फारच रोडावली आहे. इतर देशांनी सुद्धा चीनकडून हा धडा घेतला पाहिजे व संपूर्ण बाधित शहर किंवा राज्य गतिहीन बनवावे लागेल. तरच बाकीची राज्ये किंवा शहरं सुरक्षित राहतील.

पुढे काय?

साऱ्या जगभर, विविध देशात,कोरोनावर मात करण्यासाठी अथक प्रयत्न करण्यात येत आहेत. काही दिवसांनंतर काहींची नैसर्गिक प्रतिकारशक्ती कोरोनाला पराभूत करेल. मानवाचे शरीर लवचिक असते व त्याची संयोगक्षमता किंवा आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीशी जुळवून घेण्याची शक्ती त्याच्या ठायी असते. काही लोक कोरोना विरुद्ध प्रतिकारशक्ती उत्पन्न करू शकतात. सार्सच्या बाबतीत असे झालेले आहे. डासांच्या विरुद्ध सुद्धा आपण आपली प्रतिकारशक्ती वाढवलेली आहे. नाहीतर आपल्या पूर्वजांप्रमाणे आपणही डासांच्या चाव्यानं मरून गेलो असतो.

त्याचबरोबर कोरोना विरुद्ध लस तयार होऊ शकते. त्यामुळे आपण गाफील राहू शकतो व ही साथ पुन्हा डोकं वर काढू शकते. त्याचबरोबर आज जे या विषाणूपासून स्वत:चा बचाव करू शकले आहेत त्यांना अधिकची काळजी घेणे जरुरीचे आहे. त्यांना या रोगाची नंतर लागण होऊ शकते.हे वादळ शमल्यानंतर सर्वजण आपापल्या कामाच्या ठिकाणी निघून जातील.चीनची लोकही जगभरात स्वतःच्या कामाच्या ठिकाणी निघून जातील. संयुक्त राष्ट्र संघाला रास्त भीती आहे की चीनची किंवा अन्य देशांच्या बाधित व्यक्ती आफ्रिकेत गेली तर तिथे या रोगाची लागण होईल. या ठिकाणी इबोला विषाणूने केवढा हाहाकार माजवला होता हे विसरता येणार नाही.

आपण भारतीयांनी व मराठी जनतेने काही मूलभूत गोष्टी पाळल्या तर कोरोनाचा फारसा त्रास जाणवणार नाही. स्वच्छता राखणे, प्रवास टाळणे, हात धुणे, एकमेकांपासून कमीतकमी २ हात दूर राहून बोलणे जेणेकरून थुंकी किंवा घाम एकमेकांच्या अंगावर पडणार नाही, या साऱ्या छोटी गोष्टी केल्यातर आपल्याला फारसा त्रास होणार नाही. बाकीची गैरसोय किंवा त्रास होईल पण तो असह्य नसणार आहे.

काही जाणकारांच्या मते भारतात या विषाणूचा प्रसार फारसा होणार नाही. इथले तापमान कोरोनाला मारक ठरेल. जर तसे झाले तर ठीकच आहे, पण आपल्याला गाफील राहून चालणार नाही. चीन, इटली व अमेरिकेप्रमाणे आपणही स्वतःला काही दिवस घरात कोंडून घेऊया !!!

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0