अखेर संजय राठोड यांचा राजीनामा

अखेर संजय राठोड यांचा राजीनामा

पूजा चव्हाण प्रकरणामुळे अडचणीत आलेल्या वनमंत्री संजय राठोड यांनी आज अखेर राजीनामा दिला. ‘वर्षा’ या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी राठोड यांनी मंत्रिपद

शासन बदललं, प्रशासन बदला!
‘फडणवीसांनी आनंदाने उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं नाही’
महापूर येणार आहे हे माहिती होतं !

पूजा चव्हाण प्रकरणामुळे अडचणीत आलेल्या वनमंत्री संजय राठोड यांनी आज अखेर राजीनामा दिला. ‘वर्षा’ या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी राठोड यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी त्यांना भेट नाकारल्याचे वृत्त आले होते. सेना नेतृत्त्वाने त्यांना राजीनामा देण्यास सांगितल्याने त्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.

संध्याकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये राठोड यांचा राजीनामा वाचून दाखवला आणि मंजूर केल्याचे सांगितले. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाचा तपास सुरू असून, दोषींना सोडले जाणार नाही, असे ठाकरे यांनी सांगितले. त्यापूर्वी पूजा चव्हाण हिचे कुटुंबीय मुख्यमंत्री ठाकरे यांना भेटले आणि आमच्या कुटुंबाची आणि पूजा चव्हाण हिची बदनामी थांबवावी, अशी त्यांनी विनंती केली.

भाजपाने संजय राठोड यांचा राजीनामा घेण्यासाठी मोर्चेबांधणी केली होती. त्यांचा राजीनामा न घेतल्यास  अधिवेशनात कामकाज चालू न देण्याचा इशारा भाजपने दिला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही राठोड यांना निर्णय घेण्यास सांगितले होते. त्यामुळे राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच राठोड यांनी राजीनामा दिला आहे.

बीड जिल्ह्यातील पूजा चव्हाण या तरुणीचा पुण्यामध्ये एका इमारतीमधून पडून मृत्यू झाला होता. हा अपघाती मृत्यू आहे, की आत्महत्या हे अजून निष्पन्न झालेले नाही, मात्र त्यावरून राजकीय गोंधळ सुरू आहे. या मृत्यू प्रकरणात वनमंत्री संजय राठोड अडचणीत आले आहेत. ७ फेब्रुवारी रोजी पूजा चव्हाण हिचा मृत्यू झाल्यानंतर आणि पूजा चव्हाणसोबतचे फोटो आणि या प्रकरणाशी संबंधित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर राठोड गायब झाले होते.

भाजपाकडून थेट संजय राठोड यांच्यावर आरोप केला होता. तर राठोड यांनी १५ दिवसानंतर पोहरादेवी या बनजारा समाजाच्या संबंधीत देवस्थानच्या ठिकाणी येऊन गर्दी जमवून मोठे शक्ती प्रदर्शन केले होते. तेथे माध्यमांशी बोलताना चौकशीतून सगळं समोर येईल. आपली बदनामी केली जात असल्याचे त्यांनी सांगितले होते.

मात्र, भाजपच्या आमदार चित्रा वाघ यांनी हा विषय प्रतिष्ठेचा केला होता. त्यांनी पुण्यात येऊन पोलिसांना जाब विचारला होता. महाविकास आघाडीतील इतर पक्षांच्या नेत्यांचाही राठोड यांचा राजीनामा घेण्यासाठी कल होता. त्यामुळे सरकारवर दबाव वाढला होता. त्यानंतर काल संजय राठोड पत्नी शीतल आणि मेहुणे सचिन नाईक यांच्यासह वर्षा बंगल्यावर गेले आणि पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाच्या चौकशीनंतरच राजीनामा स्वीकारण्याची विनंती राठोड यांनी केली. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री एकनाथ शिंदे यांची स्वतंत्र दालनात चर्चा झाली. त्यानंतर संजय राठोड यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सोपवला.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0