पत्रकार खशोगींची हत्या सलमान यांच्या आदेशानुसार   

पत्रकार खशोगींची हत्या सलमान यांच्या आदेशानुसार  

वॉशिंग्टनः सौदी अरेबियाचे राजपुत्र मोहम्मद बिन सलमान यांच्या आदेशानंतर मूळ सौदी वंशाचे अमेरिकी पत्रकार जमाल खशोगी यांची हत्या झाल्याचा अहवाल अमेरिकेच्

अजित पवार म्हणतात, मी राष्ट्रवादीतच
जम्मू-काश्मीर, उ. प्रदेश, म. प्रदेशात पत्रकारांवर अधिक हल्ले
आता ‘एक देश, एक रेशन कार्ड’

वॉशिंग्टनः सौदी अरेबियाचे राजपुत्र मोहम्मद बिन सलमान यांच्या आदेशानंतर मूळ सौदी वंशाचे अमेरिकी पत्रकार जमाल खशोगी यांची हत्या झाल्याचा अहवाल अमेरिकेच्या गुप्तचर खात्याने शुक्रवारी प्रसिद्ध केला. २०१८मध्ये खशोगी यांच्या हत्येनंतर अमेरिकेने सौदीवर आर्थिक निर्बंध लागू केले होते. दरम्यान सौदीने अमेरिकेचे सर्व आरोप खोडून काढले आहेत. खशोगी यांची हत्या अन्य एका गटाने केल्याचा दावा सौदी सरकारने केला आहे.

खशोगी हे वॉशिंग्टन टाइम्स या वर्तमानपत्रातले स्तंभकार होते. आपल्या स्तंभातून खशोगी सौदीचे राजपुत्र सलमान यांच्या राजकीय व अन्य धोरणांवर सातत्याने टीका करत होते. पण एके काळी खशोगी हे सौदी राजवटीत अत्यंत महत्त्वाची सल्लागाराची भूमिका बजावत होते. पाश्चिमात्य माध्यमांमध्ये सौदी अरेबियाची राजकीय भूमिका मांडण्याचे ते काम करत होते. पण २०१७मध्ये सौदीची सूत्रे सलमान यांच्याकडे गेल्यानंतर खशोगी यांचे सौदीच्या सत्तावर्तुळातील महत्त्व कमी होत गेले.

शुक्रवारी अमेरिकेच्या गुप्तचर खात्याने खशोगी यांच्या हत्येमागे सलमान असल्याचे जाहीर केल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष बायडन यांनी मानवाधिकार उल्लंघनासंदर्भात आपण सौदी प्रमुखांशी बोलणार असल्याची प्रतिक्रिया दिली. खशोगी यांची हत्या ही मानवाधिकाराचे उल्लंघन समजली जात असून त्या द्वारे अमेरिकेने सौदीतील ७४ बड्या नेत्यांवर, उद्योजकांवर व्हिसा बंदी घातली होती. त्याच बरोबर अमेरिकेने सौदीसोबतचे शस्त्रास्त्र विक्रीचे करारही रोखून धरण्याचे ठरवले आहे.

खशोगी यांची तुर्कीमधील शहर इस्तंबूल येथे सौदी वकिलातीत हत्या झाली होती. त्यांच्या हत्येचे आदेश (ऑपरेशन इस्तंबूल- https://www.odni.gov/files/ODNI/documents/assessments/Assessment-Saudi-Gov-Role-in-JK-Death-20210226.pdf.) राजे सलमान यांनी दिल्याचे अमेरिकेचे म्हणणे आहे.

२ ऑक्टोबर २०१८मध्ये सौदी वकिलातीने खशोगी यांना त्यांच्या होणार्या तुर्की नागरिक असलेल्या पत्नीची काही कागदपत्रे घेण्यासाठी इस्तंबूलमधील आपल्या कार्यालयात बोलावले होते. पण नंतर ते तेथूनच बेपत्ता झाले होते. त्यांचा ठावठिकाणाही अनेक दिवस कळाला नव्हता. अखेर प्रसार माध्यमांनी हा विषय सातत्याने उपस्थित केल्यानंतर आणि खशोगी यांच्या बेपत्ता होण्यावरून तुर्की व अमेरिकेने सौदीवर दबाव आणल्यानंतर सलमान यांनी खशोगी यांची हत्या झाल्याचे मान्य केले होते. पण खशोगी यांची हत्या अन्य गटाने केल्याचा दावा केला होता. महत्त्वाचे म्हणजे खशोगी यांची हत्या झाली असल्याचे सौदीने स्पष्ट केल्यानंतरही खशोगी यांचा मृतदेह अद्याप मिळालेला नाही. खशोगी यांच्या मृतदेहाचे अनेक तुकडे केल्याची माहिती उघडकीस आली होती. सौदीने खशोगी यांच्या बेपत्ता होण्यावरून अनेक वेगवेगळे दावे केले होते पण हे सर्व दावे नंतर खोटे असल्याचे निष्पन्न झाल्याचे दिसून आले.

या संदर्भात सौदी सरकारने २१ जणांना अटक केली होती. नंतर सौदी सरकारने असिरी व सौद अल कहतानी या सलमान यांच्या निकटच्या अधिकार्यांना सेवेतून बरखास्त केले होते. जानेवारी २०१९मध्ये ११ जणांची चौकशी करून ५ जणांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली पण खशोगी यांच्या कुटुंबियांनी दोषींना माफी देण्याची विनंती केल्यानंतर ५ जणांना २० वर्षांचा तुरुंगवास ठोठावण्यात आला होता. असिरी या अधिकार्याला पुराव्याअभावी सोडून देण्यात आले तर कहतानी यांची चौकशी झाली असली तरी त्यांना अद्याप शिक्षा झालेली नाही.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0