मोस्ट वाँटेड माओवादी प्रशांत बोसला अटक

मोस्ट वाँटेड माओवादी प्रशांत बोसला अटक

नवी दिल्लीः ७०च्या दशकातील नक्षलवादी चळवळीतील मोस्ट वाँटेड नेता प्रशांत बोस उर्फ किशन दा (७५) याला झारखंड पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. प्रशांत बोस या

गोव्यात ऑक्सिजन अभावी ४८ तासांत ४७ कोरोना रुग्णांचा मृत्यू
तालिबानकडून पाकिस्तान सीमा बंद, भारताच्या आयातीवर परिणाम
चिरस्थायी विकास आणि भाजप-काँग्रेसचे जाहीरनामे

नवी दिल्लीः ७०च्या दशकातील नक्षलवादी चळवळीतील मोस्ट वाँटेड नेता प्रशांत बोस उर्फ किशन दा (७५) याला झारखंड पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. प्रशांत बोस याच्यासोबत त्याची पत्नी शीला मरांडी (६०) यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गेले ४३ वर्षे प्रशांत बोस पोलिसांना चकवा देत होता. तर त्याची पत्नी शीला मरांडी उर्फ शोभा डी या सीपीआय (माओवादी) सेंट्रल कमिटीच्या पहिल्या महिला सदस्य आहेत. २०१६ पासून त्या जामीनावर आहेत. त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले.

प्रशांत बोस व शीला मरांडी यांच्यावर एल्गार परिषद कट रचल्याचा प्रमुख आरोप आरोप आहे. त्याच बरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचल्याचाही या दोघांवर आरोप आहे.

गेल्या काही वर्षांत नक्षलवादी चळवळीतील एखाद्या महत्त्वाच्या नेत्याला अटक करण्याची ही पहिलीच घटना आहे. पोलिसांच्या दृष्टीने प्रशांत बोस याला झालेली अटक हे गेल्या काही वर्षातले सर्वात मोठे यश म्हणावे लागेल.

प्रशांत बोस याच्याकडे बंदी असलेल्या सीपीआय (माओवादी) गटाचे इस्टर्न रिजनल ब्युरोचे सरचिटणीस म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. मोदी यांच्या हत्येचा कट रचल्याची कागदपत्रे रोना विल्सन याच्याकडे आढळून आल्याचा पोलिसांचा आरोप होता. या कागदपत्रात ‘कॉम किसान’ असे एक नाव आढळून आले होते. हे नाव प्रशांत बोस उर्फ ‘किशन दा’ याचे असल्याचा पोलिसांचा दावा होता. पोलिसांनी प्रशांत बोस याच्यावर १ कोटी रु.चे बक्षिसही लावले होते.

प्रशांत बोस कोण होता?

१९६७मध्ये नक्षलवादी संघटनेत फूट पडल्यानंतर बिहार, झारखंडमध्ये नक्षलवादी चळवळ वाढवण्याची जबाबदारी प्रशांत बोस याच्याकडे सोपवण्यात आली होती. एका अर्थाने भारतातल्या नक्षलवादी चळवळीतल्या पहिल्या पिढीचा तो सदस्य होता. भारतात नक्षलवादी संघटनांची वाढ करणे, नक्षलवादी चळवळीला राजकीय अंग देणे, चळवळीत सामील होणार्यांना कायमस्वरुपी प्रेरित करणे, तुरुंगातल्या कैद्यांपुढे नक्षलवादी चळवळ हा वर्गीय लढा असल्याचे सतत बिंबवत राहणे, या चळवळीला वैचारिक अधिष्ठान देत संघटनात्मक तिची वाढ करण्याचे काम बोस गेली चार दशके करत होता.

मूळचा दक्षिण कोलकाता येथील बिजॉयगड भागातला प्रशांत बोस याने ७० च्या दशकात नक्षलवादी चळवळीत प्रवेश केला. बोस हा कोलकात्यातील कामगार संघटनांत सक्रीय होता. सीपीआय (मार्क्सवादी गट) निलंबित नेता कनाई चटर्जी यांच्यासोबत तो पहिले काम करत होता. कनाई चटर्जी हे दक्षिण देश मासिक चालवत असत. चटर्जी यांच्या मदतीने बोस याने १९६७-६८मध्ये दक्षिण कोलकात्यातील उषा फॅक्टरी येथे कामगार आंदोलनात भाग घेतला. त्यानंतर १९६७-७० या काळात कनाई चटर्जी-अमुल्य सेन यांच्या माओइस्ट कम्युनिस्ट सेंटर ऑफ इंडिया (एमसीसी) सोबत बोस याने काम सुरू केले. या संघटनेच्या माध्यमातून बोस याने दक्षिण २४ परगणा जिल्हा, हावडा-हुगळी-मिदनापूर पट्टा, बर्धमान-बिरभूम प्रदेश अशा भागात संघटना वाढवण्याचे काम केले. संघटनेचे काम करत असताना बोस कित्येक वेळा पोलिसांना, निमलष्करी दलांना चकवा देण्यात यशस्वी ठरला होता.

७० च्या दशकात बिहारमध्ये नक्षलवादी चळवळ वाढवण्याच्या दृष्टीने एमसीसीने प्रशांत बोसला दक्षिण बिहारमध्ये पाठवले. बोस याने गिरीध-हजारीबाग, रांची, बोकारो, संथाल परगणा व धनबाद भागात संघटनेचा प्रसार केला. १९७४मध्ये बोसला अटक करण्यात आली. तो पाच वर्षे तुरूंगात होता. तुरुंगात त्याच्या उजव्या जबड्याला जबर दुखापत झाली. त्यामुळे त्याच्या चेहर्याच्या ठेवणीत बदल झाला होता. हीच ओळख त्याची पुढे कायम झाली.

१९७८मध्ये त्याने पुन्हा संघटनेत प्रवेश केला व सुशील रॉय यांच्यासोबत काम सुरू केले. झारखंडमधील लालखंड चळवळ उभी करण्यामागे बोस याचे प्रयत्न होते. १९९६मध्ये एमसीसीची सूत्रे बोस याच्याकडे आली. २००२मध्ये नेपाळमधून शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण घेतलेले शेकडो माओवादी बिहारच्या जंगलात येऊ लागले. त्या काळात बोस याने ईशान्येकडील राज्यातल्या बंडखोर संघटनांची मदत घेत तेथे  नक्षलवादी चळवळ वाढवण्याचे प्रयत्न सुरू केले होते.

२००३मध्ये एमसीसी संघटना रिव्होल्युशनरी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओइस्ट)मध्ये विलिन झाली व नंतर तिचे नाव माओइस्ट कम्युनिस्ट सेंटर ऑफ इंडिया (एमसीसीआय) असे झाले.

बोस कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओवादी गट) चा सदस्य होता. शिवाय तो पॉलिटब्युरो सदस्य, माओवादी गटाच्या केंद्रीय समितीचा सदस्य व नंतर २००४ पासून सेंट्रल मिलिटरी कमिशनचा सदस्य म्हणून काम पाहात होता. बोस याच्यावर सीपीआय (माओवादी गट)च्या सेंट्रल रिजनल ब्युरो (ईआरबी)ची जबाबदारी होती. यातून तो झारखंड, प. बंगाल, बिहार, छत्तीसगड-उ. प्रदेशातील काही भाग व ईशान्य राज्यांत संघटनेचा प्रसार करत होता.

सीपीआय (माओवादी)च्या स्थापनेनंतर सेंट्रल कमिटीमधील अनेक सदस्य नक्षलवादी चळवळीत सामील झाले. या सदस्यांमध्ये माओइस्ट कम्युनिस्ट सेंटर ऑफ इंडियाचे (एमसीसी) सुशील रॉय, अनुकूल चंद्रा नास्कर, पुर्णेंदू शेखर मुखर्जी असे सदस्य होते. त्याच बरोबर सीपीआयच्या मार्क्सवादी-लेनिनिस्ट गटाचे नारायण संन्याल, अमिताभ बाग हे नेते सामील झाले. त्यांच्या सोबत प्रशांत बोसही सामील झाला. हे सर्व सदस्य-नेते कोलकाता येथील राहणारे होते. पण नंतर संघटनेच्या कामासाठी ते इतस्ततः पांगले. या सदस्यांपैकी रॉय, संन्याल, मुखर्जी मरण पावले. बागची तुरुंगात आहे, नास्कर सध्या सक्रीय नाही.

प्रशांत बोसची पत्नी मरांडी ही सीपीआय (माओवादी)च्या नारी मुक्ती संघाची संस्थापक सदस्य आहे. २००६मध्ये तिला ओदिशातून अटक करण्यात आली होती व पुढे २०१६मध्ये जामीनावर तिची सुटका झाली होती.

सीपीआय (माओवादी) गटाचे नेतृत्व सध्या नम्बला केशव राव उर्फ वसवराज हा करत असून तो मूळचा सीपीआय (एमएल) (पीडब्लू) गटाचा आहे.

मूळ लेख

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0