भारतात सिनेमाचं आगमन झालं मराठी माणसामुळे! 1913 साली दादासाहेब फाळके यांनी "राजा हरिश्चंद्र" हा पहिला मूकपट निर्माण केला आणि भारतीय सिनेमाचा आरंभ झाला
भारतात सिनेमाचं आगमन झालं मराठी माणसामुळे! 1913 साली दादासाहेब फाळके यांनी “राजा हरिश्चंद्र” हा पहिला मूकपट निर्माण केला आणि भारतीय सिनेमाचा आरंभ झाला. “राजा हरिश्चंद्र”च्याच कथेवरून निर्माण झोलेला “प्रभात”चा “अयोध्येचा राजा” हा बोलपट 1932 साली आला आणि इथूनच मराठी सिनेमाच्या वाटचालीस सुरुवात झाली. 2013 साली “सिनेमा शताब्दी” निमित्ताने “भारतीय चित्रपटाचे जनक” दादासाहेब फाळके यांच्या कर्तृत्वाची उचित दखल घेणारा “हरिश्चंद्राची फॅक्टरी” हा चित्रपट आला. हा अगदी काव्यात्म न्याय होता! त्यांच्या काळात बोलका सिनेमा अस्तित्वात असता तर फाळके यांनी तो मराठी भाषेतच निर्माण केला असता, हे नक्की!
2032 साली येणाया शताब्दीकडे मराठी सिनेमा वाटचाल करत आहे. त्यामुळे त्याचा लेखा-जोखा मांडणे क्रमप्राप्त आहे. गेल्या 90 वर्षांतील मराठी सिनेमातील प्रमुख टप्पे… पहिला टप्पा स्वातंत्र्यपूर्व काळातील दुसया महायुद्धापूर्वीचा चित्रपट, त्याने मराठी चित्रपटाची पायाभरणी केली. दुसरा, स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या दशकातील सिनेमा, ज्याने व्यवसायाच्या शक्यता आजमावल्या. तिसरा, महाराष्ट्र राज्य स्थापनेनंतरचा विसाव्या शतकाच्या अखेरपर्यंतचा सिनेमा, जो कायम भवितव्याच्या चिंतेत राहिला आणि चौथा टप्पा एकविसाव्या शतकातील “श्वास” नंतरचा सिनेमा, ज्याने मराठी सिनेमाच्या आशा पल्लवित केल्या. प्रस्तुत लेखात 1960 नंतरच्या मराठी सिनेमाचा विचार करण्यात आला आहे.
1932 ते 2020 या कालावधीत आतापर्यंत अंदाजे पंचवीसशे-सव्वीसशे मराठी चित्रपट निर्माण झाले. त्यातील स्वातंत्र्यापूर्वी सव्वाशे, तर स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या दशकात दोनशे मराठी चित्रपट निर्माण झाले. 1960 ते 2000 या कालावधीत दरवर्षी साधारणत: 15-20 या गतीने 750 चित्रपट, तर 21 व्या शतकातील पहिल्या दोन दशकात 1500 हून अधिक चित्रपट निर्माण झाले. देशातील मनोरंजन उद्योगाची राजधानी असलेल्या मुंबईतून तयार होणाया हिंदी सिनेमाच्या तुलनेत ही संख्या फारच तोकडी आहे, तर इतर भाषेतील, विशेषत: “दक्षिणेतील” सिनेमांच्या प्रमाणात अगदी अल्प आहे.
शतक महोत्सवी मराठी चित्रसंपदा या मराठी चित्रपट सूचीवर धावती नजर फिरवली तर लक्षात येते की, मराठी सिनेमावर “फॉर्म्युलां”चा प्रभाव अधिक आहे. त्यात दोन-अडीचशे सामाजिक वा संतपट आहेत; तर तितकेच रामायण-महाभारतकालीन पौराणिक कथा सांगणारे किंवा “शिवाजी महाराज” व त्या काळातील मर्द मराठ्यांच्या शौर्य हकिकती सांगणारे चित्रपट आहेत. उर्वरित ग्रामीण – तमाशाप्रधान किंवा कौटुंबिक अथवा विनोदी चित्रपट आहेत. प्रयोगशील असे चित्रपट तुलनेने फारच कमी आहेत. त्यांचा उदय काही प्रमाणात 21 व्या शतकात झाला.
वर उल्लेखलेल्या सात “फॉर्म्युलां”चा (प्रारुपांचा) प्रभाव मराठी सिनेमांवर प्रथमपासून आहे. दादासाहेब फाळकेकृत पौराणिक चित्रपट व कलामहर्षी बाबुराव पेंटर यांचे सामाजिक व ऐतिहासिक चित्रपट यांतून प्रेरणा घेऊनच स्वातंत्र्यापूर्वी तीन दिग्दर्शकांनी ही परंपरा अधिक उठावदार केली. व्ही. शांताराम, भाजली पेंढारकर व मा. विनायक या तिघा दिग्दर्शकांनी आपल्या प्रतिभेने मराठी बोलपटाचा पाया रचना.
व्ही. शांताराम यांनी “प्रभात”द्वारा पौराणिक व सामाजिक चित्रपट निर्माण करून चित्रपटतंत्राचा अभ्यासपूर्ण विकास केला. भालजी पेंढारकरांनी ऐतिहासिक चित्रपटांद्वारे ध्येयवादाची जोपासना केली, तर मा. विनायकांनी मराठी साहित्यातील विनोदी कथा बहारीने सादर केल्या.
या सावलीतच स्वातंत्र्यानंतरच्या मराठी सिनेमाचे संगोपन व संवर्धन झाले. मुंबईतूनच निर्माण होणाया हिंदी चित्रपटांशी प्रतिकूल स्पर्धा करत मराठी चित्रपटांची याआधीची परंपरा कायम ठेवणारे तीन दिग्दर्शक म्हणजे राजा परांजपे, दत्ता धर्माधिकारी आणि अनंत माने. तिघेही “प्रभात”चे शागीर्द!
नर्मविनोदी व कारुण्याची झालर असलेले सामाजिक चित्रपट राजा परांजपे यांनी दिले. नायिकाप्रधान “कौटुंबिक” चित्रपटांचा “फॉर्म्युला” दत्ता धर्माधिकारी यांनी प्रस्थापित केला, तर ग्रामीण-तमाशाप्रधान चित्रपटांची लोकप्रियता अनंत माने यांनी सिद्ध केली. 1960 नंतरची दोन दशके याच त्रिमूर्तींचे किंवा त्यांनी प्रेरित चित्रपटच येत राहिल्याने याच “ट्रेंड”चा गाजावाजा होत राहिला.
1 मे 1960 रोजी मुंबईसह महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. त्यावेळी मराठी सिनेमा सर्व प्रकारच्या अडचणींना तोंड देत होता. हिंदीशी जीवघेणी स्पर्धा, मराठीसाठी चित्रपटगृहांची अनुपलब्धता, निर्मिती मूल्यांतील घसरण, निर्मात्यांची उदासीनता आणि नव्या कथानकांचा अभाव व या सायांमुळे दुरावलेला प्रेक्षक! त्यातच नव्याने स्थापन झालेल्या राज्य सरकारने नाटकांवरील करमणूक कर माफ केला. यामुळे नाट्यव्यवसाय पुन्हा उभारीने उभा राहिला. “तो मी नव्हेच” या नाटकाने याचा प्रारंभ केला. प्रेक्षक नाटकांना गर्दी क डिग्री लागला. त्यामुळे मध्यमवर्गीय प्रेक्षक रंगभूमीकडे वळला, तर तरूण पिढी हिंदी चित्रपटाकडे!
मराठी सिनेमाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारने केंद्राच्या धर्तीवर “राज्य पुरस्कार” देण्यास प्रारंभ केला. मराठी चित्रपटांना “राजाश्रय” मिळाला, मात्र आर्थिक व्यवहार बेतासबेत राहिला. काळ बिकट असूनही 60 नंतरच्या दशकात पंधरा-सोळा चित्रपट निघत होते.
1960-70च्या पहिल्या दशकात राजाभाऊंसह अनेक जुन्या-जाणत्या व याआधी यशस्वी ठरलेल्या दिग्दर्शकांचे चित्रपट येत होतेच; शिवाय आता त्यांच्या हाताखाली उमेदवारी करणाया सहायक दिग्दर्शकांची पलटणच उदयाला आली. मधुकर पाठक, राजदत्त, माधव शिंदे, कमलाकर तोरणे, दत्ता माने, राजा ठाकूर, राजा बारगीर, राम गबाले अशा अनेक आधी सहायक व नंतर स्वतंत्रपणे दिग्दर्शन करणाया दिग्दर्शकांनी हा डोलारा सांभाळला. स्टुडिओ सिस्टीम स्वातंत्र्यापूर्वीच कोसळली होती. त्यामुळे नवे दिग्दर्शक जुन्या दिग्दर्शकांच्या हाताखाली उमेदवारी करूनच निर्माण होत होते. चित्रपट प्रशिक्षणाची शाळा नव्हती.
अर्थात याच काळात पुण्यात प्रभात स्टुडिओच्या जागी केंद्र सरकारने 1960 मध्ये “फिल्म इन्स्टिट्यूट”ची स्थापना केली. मात्र एखाद-दुसरा अपवाद वगळता या संस्थेतील प्रशिक्षणाचा लाभ घेतलेला मराठी दिग्दर्शक या शतकाअखेरपर्यंत मराठी सिनेमात दिसला नाही. उलट देशातील हिंदीसह प्रादेशिक भाषेतील (बंगाली, मल्याळम, तमिळ, कन्नड, ओरिसा, आसामी) चित्रपटांना आकार देणाया दिग्दर्शकांमागे याच संस्थेचे प्रशिक्षण कारणीभूत होते. ते भाग्य मराठीला लाभले नाही. 21 व्या शतकात “श्वास”मुळे मराठीत चैतन्य आले. त्यानंतर संदिप सावंत, सुनील सुकथनकर, उमेश कुलकर्णी, सचिन कुंडलकर यांनी या संस्थेचा मराठी झेंडा देशात फडकवला!
1962 सालच्या पहिल्या पुरस्कार सोहळ्यात प्रथम पारितोषिक मिळवणाया मधुकर पाठक यांच्या “प्रपंच”ने संतती नियमनाचा विषय मांडला. विषयाचे औचित्य लक्षात घेऊन तो बेचाळीस भाषांत “डब्” करून जगभर दाखवला गेला. याशिवाय हुंड्याविरोधी समस्या मांडणारा “वरदक्षिणा”, शेतीवर निस्सीम प्रेम करणारा “पवनाकाठचा धोंडी”, हरिजन मुलीची समस्या कथन करणारा “माणसाला पंख असतात”. कौटुंबिक कथानक असलेले “मोलकरीण”, “एकटी” व “मानिनी”. 1962 साली भारत-चीन युद्धाच्या पार्श्वभूमीवर त्याची सावली पडलेले “सुवासिनी”, “पाहू रे किती वाट” व “छोटा जवान” हे तीन चित्रपट याच दशकात आले. वसंत जोगळेकर (शेवटचा मालुसरा) आणि व्ही. शांताराम (इथे मराठीचिये नगरी) या हिंदीत कार्यरत दिग्दर्शकांनी या दशकात मराठीत पुन्हा पाऊल ठेवले. जुन्याजाणत्यांमध्ये भालजी पेंढारकरांचे “मराठा तितुका मेळवावा” व “मोहित्यांची मंजुळा” हे ऐतिहासिकपट आले तर राजा परांजपे यांचे “हा मझा मार्ग एकला”, “सुवासिनी”, “गुरुकिल्ली” आणि “पाठलाग” असे चार चित्रपट आले. मात्र या दशकावर वरचष्मा होता अनंत माने यांचा. त्यांच्या तमाशापटांनी भरघोस यश संपादन केलं.
“गुरुकिल्ली” चित्रपटानंतर राजा परांजपे यांनी चित्रसंन्यास घेतला तर त्यांच्या “पाठलाग”ने मराठीतला पहिला रहस्यपट सादर केला. याच चित्रपटावरून हिंदीत “मेरा साया” करण्यात आला, तो गाजला. “पाठलाग”च्या यशामुळे “पडछाया”, “धनंजय” असे रहस्यपट मराठीत निर्माण झाले. पण रहस्यपटांचा घाट (ढ़ड्ढदद्धड्ढ) या शताकाच्या अखेरपर्यंत निर्माण होऊ शकला नाही.
या दशकातील दोन लक्षवेधी चित्रपट म्हणजे “साधी माणस” आणि राजा ठाकूर यांचा “मुंबईचा जावई.” व. पु. काळे यांच्या कथेवरील या चित्रपटात प्रथमच मुंबईचे दर्शन घडले. “मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे” असा अभूतपूर्व लढा लढलेल्या त्या काळात मराठी सिनेमात ना मुंबईच्या समस्या दिसल्या, ना 105 हुतात्म्यांचे हौतात्म्य दिसले. समकालीन सामाजिक-राजकीय प्रश्नांपासून मराठी सिनेमा कायमच दूर राहिला. तो या प्रश्नांच्या जवळ गेला 1975 नंतर “सामना” आणि “सिंहासन”च्या वेळी.
मराठी सिनेमात प्रारंभापासून ठसा उमटविणारे दिग्दर्शक म्हणजे भालजी पेंढारकर. त्यांनी प्रारंभीच्या काळात पौराणिक चित्रपट दिग्दर्शित केले. मात्र त्याहूनही त्यांनी त्यांना भावलेले जीवनविषयक विचार चित्रपट कथेतून मांडले. मात्र मराठी चित्रपटाच्या पसायात त्यांचे वेगळेपण त्यांनी सिद्ध केले ते शिवकाळावरील चित्रपटांतून. “छत्रपती शिवाजी”, “मराठा तितुका मिळवावा”, “मोहित्यांची मंजुळा” अशा त्यांच्या अनेक चित्रपटांनी शिवाजी आणि त्याकाळातल्या मर्द मराठ्यांच्या शौर्य हकिकती सांगितल्या. या साहसपटांनी मराठी मनाचा ऊर भरून आला. या अभिमानाचा सूर नव्या शतकातही “मी शिवाजीराजे भोसले बोलतोय” यासारख्या चित्रपटात ऐकू येतो. सध्या मराठ्यांचा इतिहास “छोट्या पडद्यावर” व हिंदी सिनेमात (पानीपत, बाजीराव-मस्तानी, तानाजी व मनकर्णिका) लोकप्रिय होत असला तरी नव्या शतकात “फर्जंद”, “फत्तेशिकस्त”, “पावनखिंड” व “हिरकणी” अशा चित्रपटांमुळे पुन्हा एकदा या ऐतिहासिक पटांच्या “ट्रेंड” ची उजळणी होत आहे.
भालजी पेंढारकरांनीच 60च्या दशकात “साधी माणसं” हा चित्रपट निर्माण करून मराठीला वास्तवाचा स्पर्श केला. “रंगभूषे”चा वापर न करता अभिव्यक्ती केली. कथानकाच्या आशयात आमूलाग्र बदल केला. भालजींच्याच 1948 मध्ये आलेल्या “मीठभाकर” या चित्रपटातील नायक भल्या-बुया मार्गाने मिळणाया शहरातील श्रीमंतीकडे पाठ फिरवून खेड्यांकडे परततो, तर 65 सालच्या “साधी माणसं”मध्ये तो शहरातील लांड्या-लबाड्यांना तोंड देऊन प्रामाणिकपणे आधुनिकतेला सामोरा जातो. लोहाराच्या कुटुंबाची ही हृद्य हकिकत भालजींनी वास्तवाला जवळ करत सांगितली. अर्थात त्याला गीत-संगीताची डूब होती.
खरंतर 1952 साली मुंबईत भरविण्यात आलेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय चित्रमहोत्सवातील “बायसिकल थीव्ह्ज” हा “नववास्तववादी” परंपरेतील पहिला चित्रपट पाहूनच बिमल रॉयनी “दो बिघा जमीन” व राज कपूरने “बूट पॉलिश” हिंदीत निर्माण केली. “बायसिकल..” चित्रपटापासूनच प्रेरणा घेऊन सत्यजीत राय यांनी “पथेर-पांचाली”ची निर्मिती करून शुद्ध सिनेमाचे बीज रोवले आणि देशात नवसिनेमाचे वारे वाहू लागले. पण 60 नंतरच्या मराठी सिनेमावर या नव्या जाणिवांचा काहीच प्रभाव पडला नाही. पुढेही आंतरराष्ट्रीय चित्रपटांबद्दल मराठी लोकांना आस्था व औत्सुक्य वाटण्यासाठी 21 वे शतक उजाडावे लागले.
1970च्या आरंभी रंगांचं युग आणणारा “पिंजरा” आणि दादा कोंडकेंचा “सोंगाड्या” या विक्रमी यश मिळविणाया चित्रपटांच्या पार्श्वभूमीवर समांतर प्रयोग उभा राहिला. 1971 मध्येच विजय तेंडुलकरांची पटकथा असलेला “शांतता कोर्ट चालू आहे” हा प्रयोगशील चित्रपट सत्यदेव दुबेंनी आणला. नवसिनेमाची ही पाऊलवाट होती. ती अधिक रुंद केली 1975 मध्ये तेंडुलकर आणि डॉ. जब्बार पटेल यांनी “सामना” चित्रपटाद्वारे! या चित्रपटातून तेंडुलकरांनी मराठी सिनेमात हरघडी भेटणारे मास्तर आणि गावचा पुढारी या दोन्ही व्यक्तिंना असे काही एकमेकांसमोर आणले की मराठी सिनेमाचा चेहरा-मोहराच बदलला. 60च्या दशकात उभ्या राहिलेल्या सहकारी चळवळींच्या आर्थिक भरभराटीतून आलेली मस्ती आणि स्वातंत्र्य चळवळीतून निर्माण झालेला गांधीविचारांचा नैतिक पेच यांची परस्परांची गाठ पडली आणि यातून उभं राहिलं एक हास्य-संवाद-नाट्य. “सामना” ही मराठीतली उत्कृष्ट पटकथा. “सामना” बर्लिन चित्रमहोत्सवात दाखवला गेलेला पहिला मराठी चित्रपट.
व्यावसायिक सिनेमाशी फारकत घेणाया या समांतर प्रयोगात या दशकातील अनेक चित्रपटांचा उल्लेख अटळ आहे. चाफेकर बंधंूचा समकालीन इतिहास थेट मांडणारा नचिकेत-जयू पटवर्धनचा “22 जून 1897”, मानवत हत्याकांडाची भेदक पार्श्वभूमी कथन करणारा अमोल पालेकरांचा “आक्रीत”. स्त्रीमुक्ती चळवळीची दिशा दाखविणारा “उंबरठा”, मणी कौलचा “घाशीराम कोतवाल” आणि मुंबई हे महाराष्ट्राचे राजकीय सत्ताकेंद्र कसे आहे याची प्रचिती देणारा “सिंहासन” या सायाच चित्रपटांचे पटकथाकार तेंडुलकर होते. गदिमांनंतर एक समर्थ पटकथाकार मराठीला लाभला आणि एक प्रयोग सफल झाला. “सिंहासन” हा मराठीतील बांधेसूद पटकथेचा नमुना. “पोलिटिकल थ्रीलर” म्हणून “सिंहासन”चे महत्त्व वादातीत आहे. त्यानंतर मराठीत राजकीय विषयावर “सरकारनामा”, “वजीर”, “सूत्रधार”, “रावसाहेब”, “घराबाहेर”, “आजचा दिवस माझा” व “झेंडा” असे अनेक चित्रपट आले; पण “सिंहासन”ची सर त्यांना नव्हती. “मारुती कांबळेचं काय झालं?” याची चौकशी करणारे “सामना”तील मास्तर आणि “या मुख्यमंत्र्याला मी जोड्याने मारेन” असं म्हणणारा “सिंहासन”मधील डीकास्टा या दोन्हींचा संदर्भ आजही लागू पडतो, इतके हे सिनेमे कालातीत आहेत.
याच दशकात “कलावंत विकणे आहे” व “दोन्ही घरचा पाहुणा” असे गीतविरहित चित्रपट आले. ठाकर जमातीची व्यथा मांडणारा “जैत रे जैत”, दलितांवरील अत्याचारांचं कथन करणारा “अत्याचार” वेठबिगारीची समस्या जोखणारा “शापित”, सीमाप्रश्नाची नर्मविनोदी शैलीत मांडणी करणारा “वहाडी आणि वाजंत्री” अंधश्रद्धाविरोधी प्रबोधन करणारा “देवकीनंदन गोपाला” असे अनेक प्रयोग या दशकात झाले.
महाराष्ट्र स्थापने नंतरच्या या दुसया दशकात म्हणजे 1970-80 च्या काळात देशासह महाराष्ट्रात सामाजिक-राजकीय अस्वस्थपणा शिगेला पोचला होता. देशात एकीकडे बांगलादेश मुक्तिसंग्राम, बँकांचे राष्ट्रीयीकरण, नवनिर्माण आंदोलन, रेल्वे संप, अणीबाणी, जनता राजवटीचा उदय आणि अस्त – अशा घटनांनी देश त्रस्त होता. महाराष्ट्रात गोवा मुक्ती संग्राम, 72 चा दुष्काळ, कामगार व शेतकरी आंदोलन, स्त्री-मुक्तीसह अनेक सामाजिक चळवळी यांनी पोखरलेल्या या काळातील सामाजिक व राजकीय प्रश्नांपासून मराठी सिनेमा दूरच राहिला. तरी या समांतर प्रयोगात त्याचे काहीसे प्रतिबिंब उमटले. त्यामुळे राष्ट्रीय स्तरावर व जगभर लक्षवेधी ठरलेल्या या सिनेमाने समकालीनत्व जागविले. मात्र तिकीट-खिडकीवर त्याला अपयशच मिळाले. “सामना… सिंहासन”ने प्रेक्षक मिळवला. पण तेवढेच; या दशकातील सिनेमाने नवतेची चाहूल दिली, इतकेच! 21 व्या शतकातील अनेक सिनेमांनी मात्र ही उणीव भरून काढली.
मराठी सिनेमात ग्रामीण, तमाशा, कौटुंबिक असे विविध प्रवाह असले तरी विनोद हा मराठी सिनेमाचा स्थायीभाव! मा. विनायकांच्या “प्रेमवीर”मुळे (1937) विनोदी चित्रपटांची अखंड परंपरा सु डिग्री झाली. मराठी चित्रसृष्टी ज्या ज्या वेळी धोक्यात आली, त्या त्या वेळी विनोदी चित्रपटांनीच तिला तारले. अगदी 1957चा “दोन घडीचा डाव” असो की 1971चा “सोंगाड्या” किंवा 1988चा “अशी ही बनवाबनवी” अथवा अगदी अलीकडचा 2007चा “दे धक्का” – या विनोदी चित्रपटांनी मराठीचा चित्रव्यवसाय सावरला.
मा. विनायक व राजा परांजपे यांनी निखळ विनोदी चित्रपरंपरा सादर केली. अव्वल दर्जाच्या अनेक विनोदवीरांनी ती गाजविली. पण ती गोष्ट 1960 च्या आधीची. त्याचाच कित्ता गिरविणारे अनेक विनोदी चित्रपट 1960 नंतर आले. बेतास बात गाजले. आधीच्या विनोदाची सर त्याला नव्हती.
या पार्श्वभूमीवर दादा कोंडके या अवलियाचा 1971 ला “सोंगाड्या”द्वारे प्रवेश झाला आणि आधीच्या परंपरेपेक्षा रांगड्या, पण बेधडक विनोदाचं योगदान देणाया दशकाचा आरंभ झाला. “सोंगाड्या” (1971) ते “वाजवू का?” (1996) अशी 25 वर्षांची दादांची यशस्वी कारकीर्द. याआधीच्या पांढरपेशी नायकाची रवानगी करणारा हा गबाळ्या, खेडवळ, प्रसंगी चुरचुरीत बोलणारा तर कधी आगऊपणा करणारा खास ग्रामीण विनोदी नायक दादांनी चित्रपटातून सादर केला. याआधीच्या चित्रपटातील नायक कारकून, मास्तर, ड्रायव्हर, कंडक्टर किंवा फोटोग्राफर, गॅरेज मेकॅनिक अथवा विमा एंजट होते. मात्र दादांनी धोबी, शिंपी, न्हावी, गुराखी, खाटिक, सोंगाड्या, हवालदार अशा, समाजातील दुय्यम दर्जाच्या व्यावसायिकांना नायकपदी विराजमान केलं. शहरी-ग्रामीण अशा दोन्ही “पब्लिकला” त्यांचं हे रूप बेहद्द आवडलं. लागोपाठ विक्रमी यश मिळविणारे चित्रपट त्यांनी निर्माण केले.
महाराष्ट्रभर सर्वदूर खेड्या-पाड्यात पसरलेल्या व सुप्त आंकांक्षांनी प्रेरित ओबीसी समाजाने दादांना मन:पूतपणे स्वीकारलं. यापूर्वी या समाजाचं अल्पसं दर्शन ग्रामीण-तमाशाप्रधान चित्रपटात घडत असे. सदासर्वकाळ सर्वच सिनेमात दुय्यम भूमिकेत हमखास दिसणाया वसंत शिंदे यांनी तोपर्यंत सिनेमातलं हे “बलुतं” निगुतीने सांभाळलं होतं. त्याला नायकपद बहाल करण्याची दादांची कल्पना त्यांना यशस्वी करून गेली.
कल्पक विनोद, द्व्यर्थी संवाद व उडत्या चालींची मधाळ गाणी ही दादांच्या चित्रपटांची वैशिष्ट्ये! आपली “यडीगबाळी” प्रतिमा त्यांनी हरएक चित्रपटामधून फिरवली. त्यामुळे त्याला तोचतोचपणा आला. समकालीन राजकारणाची मासलेवाईक टिंगल करणाया “विच्छा…”च्या सोंगाड्याप्रमाणे त्यांनी त्यांच्या चित्रपटांना सामाजिक विडंबनाची फारशी डूब दिली नाही. दादा कोंडके यांनी भारावलेल्या काळात व त्यापुढील दोन दशके विनोदी चित्रपटांचीच चलती होती. इतर “फॉर्म्युले” अधून-मधून डोकावत असले तरी ही दोन्ही-तिन्ही दशके विनोदी चित्रपटांचीच!
1980 च्या दशकाच्या प्रारंभी “गोंधळात गोंधळ”, “दीड शहाणे” व “एक डाव भुताचा” अशा काही नर्मविनोदी चित्रपटांच्या वातावरणात सचिन आणि महेश कोठारे यांनी हिंदी चित्रपटाचे अनुकरण मराठीत केले. निर्भेळ करमणूक व तांत्रिक सफाई ही त्यांची वैशिष्ट्ये! सचिनचे “नवरी मिळे नवयाला”, “गंमत जंमत” व “अशी ही बनवाबनवी” तुफान यशस्वी ठरले. “बनवाबनवी…”त “नोकरी….जागा….छोकरी…” यासाठी करावा लागणारा “गडबड घोटाळा” हेच मराठी विनोदी चित्रपटाचे न सुटलेले समीकरण मांडलेले होते. त्यातला वेष नवा होता. ताजातवाना होता! महेश कोठारे यांचे “धुमधडाका”, “दे दणादण”, “थरथराट”, “झपाटलेला” असे अनेक चित्रपट लोकप्रिय ठरले. सचिन, महेश, लक्ष्मीकांत बेर्डे व अशोक सराफ या चौघांनीच दादा कोंडकेंनंतरचा व्यावसायिक मराठी सिनेमा सावरला. मात्र कसदार कथेअभावी त्यांचे चित्रपट बरेचसे सपक वाटतात. त्यानंतरचे विनोदी चित्रपट मकरंद अनास्पुरे, भरत जाधव, संजय नार्वेकर व सिद्धार्थ जाधव या विनोदी नटांच्या नावावरच गाजले. त्यात कथेपेक्षा सुमार प्रहसनांची “मॅड कॉमेडी”च अधिक होती.
“मराठी चित्रसृष्टीत मी होतो, यापेक्षा मी नव्हतो, हेच महत्त्वाचे” असे म्हणून 1960 पूर्वीच चित्रसंन्यास घेतलेल्या पु. ल. देशपांडे यांची पटकथा असलेल्या “एक होता विदुषक” (1992) या विनोदी नटाच्या आयुष्याची तगमग सांगणाया चित्रपटानेच मराठी सिनेमातील निखळ विनोदी चित्रपरंपरेची अखेर झाली. एका अर्थाने विनोदी सिनेमाची वाटचाल थांबली.
21 व्या शतकातील सिनेमाने नवे वळण घेतले. त्यात विनोदाला फारसा वाव नव्हता. केदार शिंदेंचे “जत्रा”, “अगं बाई अरेच्च्या”सारखे चित्रपट चंद्रकांत कुलकर्णींचा “कायद्याचं बोला” किंवा “पोस्टर बॉईज”सारख्या चित्रपटांनी थोडी गंमत आणली इतकेच! बाकी विनोदाची “हवा” चित्रवाहिनीच्या स्टुडिओतून वाहू लागली आणि नव्या शतकात सिनेमातील विनोदाचा वावर संपला!
अमाप यश मिळविणारा “सोंगाड्या” हा विनोदी ढंगाचा तमाशापटच होता; मात्र तमाशापटांची ही यशस्विता अनंत माने यांनी 1960 पूर्वीच जोखली होती. “लोकशाहीर रामजोशी” व “अमर भूपाळी” ही व्ही. शांताराम यांची चित्रकाव्यं, तर बाबुराव पेंढारकरांचा “जयमल्हार” हा गाजलेला पहिला ग्रामीण चित्रपट. स्वातंत्र्यानंतर मराठीत ग्रामीण-तमाशापटांचा “ट्रेंड” या तीन चित्रपटांनी प्रस्थापित केला आणि पुढे अनंत माने यांनी आपल्या संपूर्ण चित्रकारकिर्दीत तो मानाने सांभाळला. त्याला डफ व तुणतुण्याची साथ दिली वसंत पवार व राम कदम या संगीतकारांनी. 1960 ते 1990 अशी सलग तीस वर्षे या संगीतकारांच्या लावण्यांनी व लोकसंगीताने मराठी सिनेमाचा “साऊंड ट्रॅक” काबीज केला होता.
1960 च्या आधी “प्रभात स्टुडिओ” बंद होण्यापूर्वी तेथे चित्रित झालेला अखेरचा चित्रपट “सांगत्ये ऐका” 1959 साली प्रदर्शित झाला. त्याला विक्रमी प्रतिसाद मिळाला. पुण्यात तो सलग 131 आठवडे चालला होता. “सांगत्ये ऐका”चे कथानक व शिरोबिंदू धाडसी होता. पण तरीही तो यशस्वी ठरला. ही किमया साधली होती अनंत माने यांनी! या चित्रपटामुळे तमाशापटांना हमखास यश मिळू लागले. पुढे मान्यांनीच “सवाल माझा एैका”, “रंगपंचमी”, “केला इशारा जाता जाता” व “एक गाव बारा भानगडी” असे चित्रपट सादर करून हे दालन यशस्वी केले.
“ब्ल्यू एंजल” या जर्मन चित्रपटावरून प्रेरणा घेतलेल्या व मराठीत रंगाचं युग आणणाया व्ही. शांताराम यांच्या विक्रमी “पिंजरा” या चित्रपटाची कथा अनंत माने यांचीच होती. जर्मन चित्रपटातील ही नक्कल अस्सल मराठी मातीतली होती. एका सत्शील शाळा मास्तरचे अध:पतन या कथा विषयाला मराठमोळा साज होता.
या काळात आलेल्या या साया तमाशापटांनी मराठी माणसाच्या अवती-भवती असलेल्या व त्याच्या नसानसात घुमलेल्या लोककला आणि लोकसंगीताचा जागर मराठी चित्रपटातून केला. शाहिरी परंपरा सिनेमांनी अचूकपणे पकडली आणि जाताजाता ग्रामीण परिसरातील पाटील-सरपंचाच्या राजकीय टर्रेबाजीकडे अंगुलीनिर्देश केला या “फॉर्म्युला”ने खेड्यात राहणारा ग्रामीण प्रेक्षक आणि शहरातील कामगारवर्ग सिनेमाकडे आकर्षित केला. “लावणी”ची लोकप्रियता अगदी अलीकडच्या “नटरंग”पर्यंत टिकून आहे. 21 व्या शतकात फारसे तमाशापट येत नसले तरी “लावणी”ने हमखास “आयटेम साँग” म्हणून आपले स्थान पक्के केले आहे.
लोकनाट्य-तमाशाप्रमाणेच मराठी मातीतील शाहिरी परंपरेला मोठा इतिहास आहे. राजसत्तेविरुद्धचा त्वेष व तडफ आपल्या शाहिरी कवनातून व्यक्त करणारे अनेक शाहिर मराठी मातीत निर्माण झाले. रामजोशी, होनाजी बाळा, पठ्ठे बापूराव, अनंत फंदी, शाहीर प्रभाकर आणि शाहीर परशुराम यांतील सर्वांवर मराठीत सिनेमे निघाले.
पण शाहिरी परंपरेतील तडफ व त्यातील त्वेषपूर्ण सूर ओळखणारा नव्या शतकातील आगळा-वेगळा चित्रपट म्हणजे चैतन्य ताम्हाणेंचा “कोर्ट”. इथे एक शाहीर आहे. त्याच्या काव्याने एक सफाई कामगार मरण पावल्याची तक्रार करून सरकार त्याच्यावर देशद्रोहाचा खटला भरते. त्याची न्यायप्रविष्ट हकिकत सांगत हा चित्रपट सद्यकालातील न्यायव्यवस्थेचे वाभाडे अत्यंत सूचक व सखोलपणे काढतो. “कोर्ट” हा मराठीतील महत्त्वाचा चित्रपट आहे. तो मराठी बोलपट नसून चित्रभाषेत गोष्ट कथन करणारा सिनेमा आहे.
1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. त्या वर्षी राजा परांजपे, ग. दि. माडगूळकर व सुधीर फडके या त्रयींचा “जगाच्या पाठीवर” प्रदर्शित झाला. या त्रयीने 1947 ते 1960 मराठी मनावर राज्य केलं. मराठी सांस्कृतिक जीवनात मोलाची भर घातली, ज्याची स्मरणरममाणता आजही मराठी माणसाने कानात साठवली आहे.
राजा परांजपे यांच्याआधीचा सिनेमा शब्दांच्या मोहात अडकला होता. गदिमांच्या सहकार्याने राजाभाऊंनी या शब्दांना चित्रचौकटीत त्यांची जागा दाखवून दिली. अर्थात आधीच्या कालासंदर्भात! या काळातील राजा परांजपे, दत्ता धर्माधिकारी व अनंत माने या तिघांच्याही गाजलेल्या चित्रपटांचे लेखक गदिमाच होते. गदिमांनी आपलं “साहित्यिक” कर्तृत्व शेकडो चित्रपटांसाठी पणाला लावलं; कधी गीतकार, कधी पटकथाकार तर कधी संवाद लेखक म्हणून! गदिमांनी मराठी सिनेमाला “साहित्यिक मूल्य” बहाल केलं.
शतकभरच्या या मराठी चित्रपट पसायात गदिमांसह आचार्य अत्रे, वि. स. खांडेकर व विजय तेंडुलकर या चौघांचा अपवाद वगळता मराठी साहित्यिक खया अर्थाने चित्रपटात रमले नाहीत. आपले साहित्यिक कर्तृत्व बाजूला ठेवून डाव्या हातानेच इतर साहित्यिकांनी चित्रपटातून मुशाफिरी केली. “चित्रपट हा कलाप्रकार आहे” हे मनापासून अनेक साहित्यिकांनी स्वीकारलेच नाही. चित्रपट कलेवरील निष्ठेपेक्षा त्यांची साहित्यावर श्रद्धा अधिक होती. त्यामुळे त्यांचा सहभाग असलेले चित्रपट चित्रभाषेपेक्षा संवादातूनच बोलके झाले. त्यामुळे ते सहभागी असलेल्या चित्रपटांपेक्षा त्यांचे कथासाहित्य अधिक उजवे ठरले!
1960 नंतर साहित्यिकांच्या सहभागापेक्षा अगोदरच प्रसिद्ध असलेल्या कथा-कादंबयांवर काही चित्रपट आले. त्यातले काही जमले, काही फसले! मात्र या साहित्याने उजागर केलेल्या मराठी समाजाचा स्पर्श सिनेमाला झाला, इतकेच. अण्णाभाऊ साठे (फकिरा, वारणेचा वाघ), व्यंकटेश माडगूळकर (ठाकरवाडी), गो. नी. दांडेकर (पवनाकाठचा धोंडी, ठाकरवाडी), शंकर पाटील (टारफुला), श्री. ना. पेंडसे (गारंबीचा बापू) ही काही नावे याचीच साक्ष देतात.
21 व्या शतकात माधवी घारपुरे यांच्या कथेवर आधारित “श्वास”ला मान्यता मिळाल्यानंतर साहित्यकृतींची चित्रपटात रूपांतरं करण्याचं प्रमाण लक्षवेधी आहे. रूपांतर करणारे अनेकजण नव्या पिढीचे आहेत. त्यांचे हे प्रयत्न पारंपरिक कथनाच्या मर्यादा ओलांडणारे आहेत. रवी जाधव (नटरंग), राजीव पाटील (जोगवा), रेणुका शहाणे (रीटा), सुजय डहाके (शाळा), याबरोबरच सुमित्रा भावे (दिठी), रत्नाकर मतकरी (इन्व्हेस्टमेंट) हे सारे उल्लेखनीय प्रयत्न आहेत. यातील अनेक चित्रपटांचा राष्ट्रीय पातळीवर गौरवही झाला आहे. याशिवाय “दुनियादारी” (सुहास शिरवळकर) व “फास्टर फेणे” (भा. रा. भागवत) या चित्रपटांनी लोकप्रियता मिळविली आहे. थोडक्यात साहित्य आणि चित्रपट यातील दुवा सांधणारा काळ पुन्हा एकदा नव्या शतकात येत आहे, याचे भान या रूपांतरांनी दिले आहे.
“संत तुकाराम”, “संत ज्ञानेश्वर” व “धर्मात्मा” हे “प्रभात”चे संतपट म्हणजे मराठीचा मनबिंदू! स्वातंत्र्यापूर्वी निर्माण झालेली ही संतपटांची परंपरा नंतरच्या काळात आपोआपच आक्रसली. 1960 नंतर फारसे संतपट आलेच नाहीत. आले ते फारसे गाजले नाहीत.
आचार्य अत्रे यांच्या “महात्मा फुले” (1954) या चित्रपटाने संतपटांऐवजी चरित्रपटांचा घाट (ढ़ड्ढदद्धड्ढ) मराठीत सु डिग्री करण्याचा प्रयत्न केला. पण “स्मृतिचित्रे” या लक्ष्मीबाई टिळकांवरच्या चित्रपटाचा अपवाद वगळता विसाव्या शतकाच्या अखेरपर्यंत चरित्रपट निर्माण करण्याचे धाडस कुणी दाखवले नाही.
1982 साली रिचर्ड अॅटनबरा यांनी “गांधी” बनवून देशाला डुलकी घेताना पकडले आणि जगातील एक अत्युत्कृष्ट चरित्रपट सादर केला. भारतासह जगभर त्याची वाहवा झाली आणि चरित्रपटांच्या निर्मितीची हवा हिंदी सिनेसृष्टीत पसरली, तशी त्याची झुळूक मराठीतही डोकावली. मराठीतला पहिला प्रयत्न म्हणजे अमोल पालेकरांचा “ध्यासपर्व” (1990). “संततीनियमना”च्या ध्यासात आपलं आयुष्य व्यतीत करणारे रं. धों. कर्वे व तो काळ उलगडणारा हा उत्तम चरित्रपट आहे. सुधीर फडके यांनी जिद्दीने निर्माण केलेला “वीर सावरकर” मराठी मनाला स्पर्श करणारा ठरला. डॉ. जब्बार पटेल यांनी “डॉ. बाबासाहेब आंबेडकर” यांच्यावर हिंदीसह अनेक भाषांत चरित्रपट निर्माण केला, तसा तो मराठीतही केला. आपलं सारं कसब पणाला लावून पटेलांनी फारसा वादग्रस्त ठरणार नाही असा, सर्वांना रुचेल असा चित्रपट तयार केला. त्यांचा “यशवंतराव चव्हाण” हा चरित्रपट मात्र पूर्णत: फसला.
या पार्श्वभूमीवर नव्या शतकात या चित्रपटप्रकाराने उभारी धरली. त्यातूनच “साने गुरूजी”, “व्हय मी सावित्रीबाई फुले” आणि लो. टिळकांच्या जीवनावरील “लोकमान्य” हे चरित्रपट आले. सुबोध भावेची भूमिका असलेला “लोकमान्य” यशस्वी ठरला. याशिवाय “मी सिंधुताई सपकाळ” व “डॉ. प्रकाश बाबा आमटे” या समकालीन चरित्रपटांनाही प्रेक्षकांची दाद मिळाली. या सर्वात गाजले ते “बालगंधर्व” व “आणि डॉ. काशिनाथ घाणेकर” हे चरित्रपट. मराठी रसिकांवर मोहिनी असणाया व्यक्तिमत्त्वांवरील हे नजीकच्या काळातील चित्रपट औत्सुक्याने बघितले गेले. वादग्रस्तही ठरले. पण यामुळे चरित्रपटांना हुकमी प्रेक्षक तयार झाला.
महेश मांजरेकरांचा “भाई” हा पु. लं. वरील चरित्रपट चित्रपटगृहांपेक्षा वृत्तपत्रांतूनच गाजला. जुन्या-जाणत्यांना तो खुपला, तर नव्या प्रेक्षकांना तो भावला. गतवर्षी आलेल्या “आनंदी गोपाळ” या आनंदीबाई जोशींवरील चरित्रपटाला भरपूर प्रशंसा लाभली.
चरित्रपटांचे हे मराठीतील दालन म्हणावं तितकं समृद्ध नसलं, तरी त्याचा चंचुप्रवेश झाला आहे. मराठीत चरित्रपट करावेत अशी थोर व्यक्तिमत्त्वं अनेक आहेत. त्यांना पडद्यावर आणणारे अॅटनबरा निर्माण होण्याची गरज आहे.
राजा परांजपे व अनंत माने यांच्याप्रमाणे दत्ता धर्माधिकारी यांनी नायिकाप्रधान चित्रपटांची निर्मिती करून “कौटुंबिक” सिनेमाचा फॉर्म्युला स्थापित केला. त्या काळातील निम्न मध्यमवर्गातील “स्त्री”ची अनेक रूपे… माता, भगिनी, सून, सासू व पत्नी आणि तिची दु:खी मनोगते बयाचशा “मेलोड्रॅमॅटिक” पद्धतीने मांडणारा हा “फॉर्म्युला” प्रेक्षकांच्या हृदयास भिडला. त्यामुळे मराठी सिनेमाला स्त्री प्रेक्षकवर्ग लाभला!
“बाळा जो जो रे”, “चिमणी पाखरं”, “स्त्री जन्मा ही तुझी कहाणी”, “पतिव्रता”… अशा त्यांच्या चित्रपटांनी गहिवर निर्माण केला आणि प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. बदलत्या काळानुसार या “फॉर्म्युल्या”त दुरूस्ती होत राहिली. विषय “कुटुंबा”भोवतीच राहिले, मात्र त्याचा “फोकस” बदलला. आईचे वात्सल्य, वडिलांचा दरारा, एकत्र कुटुंबाचे विघटन, भाऊबंदकी, सासरचा छळ, माहेरची आठवण, बहिणीची माया व वृद्धांचे एकटेपण अशा अनेक विषयांभोवती गुंफलेले अनेक चित्रपट आले नि गेले. काही यशस्वी ठरले आणि बरेच विस्मरणात गेले. मात्रा नायिकाप्रधान चित्रपटांचा भाव वधारला.
1960 ते 2000 या काळात विशेष लक्षवेधी ठरले; स्मिता तळवळकरचे “कळत नकळत”, “सवत माझी लाडकी” व “तू तिथं मी”, महेश मांजरेकरांचा “अस्तित्व”, सचिनचा “आत्मविश्वास”, राजा ठाकुरांचा “एकटी” व राजदत्त यांचा “पुढचं पाऊल.” या चित्रपटांव्यतिरिक्त कधी कुमारी मातेची समस्या, विधवेची कुचंबणा किंवा घटस्फोटितेची कैफियत अशा सामाजिक विषयांना स्पर्श करणारे काही चित्रपट आले, इतकेच! मात्र आधुनिकतेकडे सरकणाया मराठी कुटुंबाचे सम्यक दर्शन किंवा कुटुंबाच्या विघटनाचे सखोल दर्शन अथवा स्त्री-समानतेची भावना प्रकट करणारे सिनेमे विसाव्या शतकाच्या अखेरपर्यंत अभावानेच आढळले. अर्थात जब्बार पटेल यांचे “उंबरठा” व “मुक्ता” किंवा सुमित्रा भावे यांचा “दोघी” यांसारख्या चित्रपटांचा अपवाद वगळता!
या कौटुंबिक पटात सर्वात यशस्वी व अभूतपूर्व ठरला विजय कोंडके यांचा “माहेरची साडी.” ही नेहमीसारखी सरळसोट कौटुंबिक कथाच होती. पण ती ब्राह्मण समाजातली नव्हती, तर ती बहुजनसमाजाची कौटुंबिक भावना होती. साहजिकच शहरी-ग्रामीण भागातील तळागाळातील बहुजन समाजाने या चित्रपटाला भरघोस दाद दिली. या चित्रपटाने त्या काळच्या अनेक हिंदी चित्रपटांपेक्षा अधिक उत्पन्न मिळवून विक्रम केला. विजय कोंडके हे दादांच्या चित्रपटाचे वितरक होते. त्यांना मार्केटिंगची नस सापडली होती आणि त्यातून मराठी चित्रपट घवघवीत यशही मिळवू शकतो याची ग्वाही त्यांनी दिली. तो काळ 1991चा होता. 1992 साली मराठी सिनेमा 60 वर्षांचा होणार होता पण व्यवसाय म्हणून गर्तेत गेला होता!
खरंतर त्याआधीच्या दशकात “करपरती”च्या योजनेमुळे मराठी सिनेमाला स्थैर्य प्राप्त होईल, असे शासनाला वाटत होते. नाटकांची स्पर्धा कमी झाली होती. 1984 साली रंगीत दूरदर्शनने सारा महाराष्ट्र जोडला गेला होता. त्यावरून पौराणिक व ऐतिहासिक कथांच्या मालिका प्रसारित होत होत्या. त्याच वेळी सचिन व महेश “हिंदी”चं ग्लॅमर घेऊन मराठीत कार्यरत होते. स्वाभाविकच शहरासह ग्रामीण प्रेक्षक त्यांच्या चित्रपटांना दाद देत होते. इतर मराठी चित्रपटांचा आर्थिक व्यवहार बिकटच होता.
1991 साली केंद्र सरकारने “उदारीकरण” व “जागतिकीकरण” याचे नवे धोरण राबविले. त्यामुळे तंत्रज्ञान प्रगतीने झपाट्याने वेग घेतला. मनोरंजन व्यवसायात आमूलाग्र बदल झाला. नवी चॅनल्स आली. पाठोपाठ केबल टी.व्ही. आला. घरबसल्या प्रेक्षकांना असंख्य चित्रपट पाहावयास मिळू लागले. देशात उपग्रह वाहिन्यांचे आगमन झाले. “चोवीस तास” बातम्या-मालिकांपासून क्रिकेटचे दर्शन घडू लागले. नवे-जुने चित्रपट “मोफत” पाहता येऊ लागले. त्यात इंटरनेटची भर पडली. मोबाईलने एकूणच जगण्याची गती आणि शैली बदलली.
1995 ला चित्रपट निर्मितीत “डिजिटल” तंत्रज्ञान आले. “व्हिडिओ” कालबाह्य होऊन “डिव्हिडी” आली. मराठी चित्रपटांना प्रेक्षकच येत नाहीत तर करमणूक कर कसा गोळा होणार? तेव्हा करपरतीची योजना रद्द करून “अनुदाना”ची मागणी करण्यात आली. शेवटी 1997 मध्ये शासनाने अनुदान देण्याचा व करमणूककर माफीचा निर्णय घोषित केला.
मराठी चित्रपटांचे भवितव्य धोक्यात असतानाच 1999 साली चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित “बिनधास्त” या पुरुषपात्रविरहीत फक्त स्त्री व्यक्तिरेखा असलेल्या धाडसी चित्रपटाने वातावरण बदलले. मार्केटिंगचा नवा “फंडा” राबवत या चित्रपटाने नव्या पिढीचा प्रेक्षक आकर्षित केला. शतकाअखेरीस चित्र व्यवसायात धुगधुगी आली. पण एकुणात मराठी चित्रसृष्टी मरणासन्न अवस्थेत होती.
मराठी चित्रसृष्टीत अखेरीस चैतन्य आले ते 21 व्या शतकाच्या प्रारंभी संदिप सावंत यांच्या “श्वास” (2003) चित्रपटामुळे. मराठी सिनेमा कोणते वळण घेणार याची झलकच या चित्रपटाने दाखविली. “श्यामची आई” नंतर तब्बल पन्नास वर्षानंतर “श्वास”ला राष्ट्रीय पारितोषिक मिळाले. अवघा महाराष्ट्र शहारला. “श्वास” ऑस्करपर्यंत धडकला आणि हे कौतुक द्विगुणित झाले.
“श्वास”मध्ये कुठलीही साचेबद्ध कथा नव्हती, की श्रवणीय गाणी नव्हती. होती आजोबा-नातवाच्या अतूट प्रेमाची एक “डोळस” गोष्ट! या सहजपणे फुलणाया गोष्टीनी मराठी प्रेक्षकांची आणि निर्मात्यांची “नजर” बदलली. “श्वास”ला अमाप यश मिळाले आणि मराठी सिनेमा व्यवसाय आणि कलात्मकता या दोन्ही आघाड्यांवर घोडदौड क डिग्री लागला. दर वर्षी 25-30 चित्रपट निर्माण करणारा व्यवसाय आता शंभरांवर चित्रपट निर्माण क डिग्री लागला. संख्यात्मक व गुणात्मक प्रगती झाली.
“श्वास” ते “सैराट” असा 21 व्या शतकातला मराठी सिनेमाचा वेगवान प्रवास अनेक वैशिष्ट्यांमुळे समृद्ध करणारा ठरला. त्यात काही त्रुटी आहेत; पण वैशिष्ट्ये अधिक आहेत.
विसाव्या शतकाच्या पार्श्वभूमीवर “फॉर्म्युला” पासून फारकत घेणारा हा सिनेमा. पौराणिक, तमाशा प्रधान व ठोकळेबाज ग्रामीण व विनोद चित्रपटांना या सिनेमाने संपूर्णत: फाटा दिला. अर्थात याचं ओझं नव्याने सु डिग्री झालेल्या “चित्रवाहिन्यां”नी मालिकेच्या रूपात उचललं.
नव्या दमाच्या तरूण दिग्दर्शकांनी हा सिनेमा बहरलेला आहे. यातील अनेक तरुणांनी अगोदरच चित्रपट प्रशिक्षण घेतलेले आहे तर काही चित्रवाहिन्या, विद्यापीठांमधील “ललितकला केंद्रे” वा हौशी प्रायोगिक नाटकांतून आले आहेत. काही “जाहिरात एजन्सी”मधून आलेले आहेत. ते दृक्-श्राव्य माध्यमांच्या क्षमता व शक्यता ओळखणारे आहेत. उमेश कुलकर्णी, सचिन कुंडलकर, मंगेश हाडवळे, परेश मोकाशी, नागराज मंजुळे व चैतन्य ताम्हाणे हे कलात्मकदृष्ट्या विशेष झेप घेणारे आहेत. यांचे चित्रपट जगभर लक्षवेधी ठरले आहेत. त्यांना पारितोषिके आणि सन्मानही अनेक ठिकाणी मिळाले आहेत.
सिनेमातील बहुविध प्रवाहांना सामावून घेणारे व त्याची दखल घेणारे हे दशक आहे. एकीकडे सुमित्रा भावे व सुनील सुकथनकर यांचा विधायक सिनेमा आहे. “दोघी” या चित्रपटाद्वारे पाऊल ठेवणाया या दिग्दर्शकद्वयाने एक नव्या “डॉक्यूड्रामा”चा प्रवाह जन्माला घातला. एखाद्या समस्येभोवती अथवा वैद्यकीय आजाराभोवती चर्चा-नाट्य उभारून त्यातून निर्माण होणाया प्रश्नांची चौफेर मांडणी करणारे “देवराई”, “10 वी फ”, “नितळ”, “कासव”, “अस्तू” असे अनेक चित्रपट सादर केले. त्यांचे “वास्तुपुरुष”, “संहिता” आणि “दिठी” त्यांच्या ठराविक सूत्राला छेद देणारे वेगळे चित्रपट आहेत. त्यांचं सातत्य वाखाणण्यासारखं आहे. गजेंद्र अहिरेने 25 वर्षांत पन्नास चित्रपट सादर करण्याचा विक्रम केला आहे. त्यातील विषय आजचे “मथळ्या”चे आहेत.
रवि जाधव, महेश मांजरेकर, राजीव पाटील, संजय जाधव, समीर विद्वांस व सतीश राजवाडे यांनी विषयातील नाविन्य राखून उत्तम व्यावसायिक सिनेमा निर्माण करता येतो आणि तो उत्पन्नही मिळवू शकतो हे सिद्ध केले आहे. “नटरंग”, “मी शिवाजीराजे भोसले बोलतोय”, “जोगवा”, “दुनियादारी”, “आनंदी गोपाळ” व “मुंबई-पुणे-मंुबई” हे त्यांचे चित्रपट याचीच साक्ष देतात.
एकाच पार्श्वभूमीवर कलात्मक व व्यावसायिक चित्रपट जोखणारे दिग्दर्शक या काळात आहेत. पंढरपूरच्या पार्श्वभूमीवरील “लयभारी” आणि “एलिझाबेथ एकादशी”, तर कोकणच्या पार्श्वभूमीवरील “व्हेन्टिलेटर” आणि “नारबाची वाडी” असा तोल सांभाळणारा हा काळ आहे.
मराठीत यापूर्वी कधीही न दिसलेले पण जागतिक सिनेमात सुप्रतिष्ठित असलेले प्रकार (ढ़ड्ढदद्धड्ढ) या दशकाने सादर केले. वास्तववादी (एक हजाराची नोट, टिंग्या, फॅन्ड्री), हॉरर (तुंबाड), “फिल्म-न्नॉर” शैली (पुणे 52, रेगे), सुपर हिरो (बाजी), प्रयोगजीवी (कोर्ट, कौल), फार्सिकल (हरिश्चंद्राची फॅक्टरी), अॅक्शन (मुळशी पॅटर्न) अशा अनेकविध चित्रपटप्रकारांना या दशकाने जन्म दिला.
समकालीन समस्या मांडणारे कथाविषय भावपूर्ण सादर करणारे हे दशक आहे. शेतकयांच्या आत्महत्या हा आजचा कळीचा प्रश्न. त्या अनुषंगाने शेतकयांची दैन्याव्यस्था आणि व्यथा संयतपणे व्यक्त करणारे “गाभ्रीचा पाऊस”, “रंगा पतंगा”, “कापुसकोंड्याची गोष्ट”, “तहान”, “पाणी”, “टिंग्या” असे अनेक चित्रपट या दशकात आले, तर शिक्षण क्षेत्रातील औदासीन्य व भ्रष्टाचार यांची थेट मांडणी करणारे “शिक्षणाच्या आयचा घो” आणि “निशाणी डावा अंगठा” असे चित्रपटही लक्षवेधी ठरले. मुंबईतील महानगरीय समस्येचे दर्शनही या दशकात घडले. मुंबई बॉम्बस्फोटाची प्रतिक्रिया “नॉट ओन्ली मिसेस राऊत”मध्ये, चाकरमान्याचा संतप्त उद्रेक “डोबिंवली फास्ट”मध्ये, तर गिरणी कामगारांच्या लढ्याची शोकांतिका “लालबाग परळ” या चित्रपटात पहावयास मिळाली.
अपरिचित विषयांना प्राधान्य देणारे “रिंगण”, “म्होरक्या”, “धग”, “किल्ला”, “थांग”, “धूसर”, “गंध”, “गुलाबजाम” व “झिपया” असे विषयही या दशकाने हाताळले. तीन-चार लघुपटांचा गुच्छ असलेला एकच चित्रपट असा जगभर परिचित असलेला प्रयोग “गंध” व “बायोस्कोप”च्या निमित्ताने याच दशकात घडला.
त्याचमुळे उत्तम साहित्यकृतींची रूपांतरे करणारा, चित्रपट माध्यमाची समज दाखविणारा, जागतिक सिनेमाचं भान ठेवणारा, निर्मिती-मुल्यात काटकसर न करता सफाईने हाताळणारा, गीत-संगीताची भरताड न करता चित्रपटांतील ध्वनीचा संयमित वापर करणारा, मार्केटिंग व वितरणाचे सूत्र गोवून उत्तम व्यवसाय साधणारा, तरूण प्रेक्षकांना आकर्षित करणारा व चित्रमहोत्सवांमध्ये हिरिरीने उपस्थिती दर्शविणारा या दशकातील सिनेमा विसाव्या शतकातील सिनेमांच्या तुलनेत आमूलाग्र बदलला आहे. प्रश्न आहे, मराठी सिनेमाचा प्रेक्षक किती बदलला?
या दशकातील सर्वात सुपरहिट सिनेमा म्हणजे “सैराट”. बहुजनांचा “बॉबी”! आजच्या काळातलं ग्रामीण भागातलं जात वास्तव थेटपणे एका लयीत मांडणारा निडर चित्रपट. मराठा समाजाच्या मूक मोर्चांसमोर सडेतोड वास्तव उभं करणाया या चित्रपटाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. त्यातील बेफाट संगिताची नशा अजूनही उतरत नाही. हिंदी चित्रपटकर्त्यांनाही तोंडात बोट घालायला लावणाया या सिनेमाने शंभर कोटींचा धंदा मराठीत केला. अशा प्रकारे लोकप्रियता कमावणारा मराठीतील हा एकमेव चित्रपट. “श्वास”ने दृष्टी दिली, पण “सैराट”ने दृष्टीही दिली आणि पैसाही दिला. मराठी सिनेमा अशाच सिनेमाच्या शोधात होता. मात्र हा एकच आणि एकमेव!
आता मराठी सिनेमा शताब्दीकडे वाटचाल करत आहे. मात्र “करोना”नंतरच्या जगात मराठी सिनेमा पुन्हा एकदा अंधारात जातो की उजेडात भक्कमपणे उभा राहतो, हे काळच ठरवेल!
सतीश जकातदार, चित्रपटाचे आस्वादक, अभ्यासक आणि समीक्षक आहेत. ‘आशय’ फिल्म क्लबचे ते संस्थापक सचिव आहेत.
(मूळ लेख ‘नवभारत’च्या जून २०२१ च्या अंकामध्ये प्रसिद्ध झाला आहे. हा लेख पुन्हा प्रसिद्ध करण्यासाठी परवानगी दिल्याबद्दल संपादक राजा दीक्षित आणि ‘प्राज्ञपाठशाळामंडळ’ यांचे आभार.)
(लेखाचे छायाचित्र – कंटेम्पररी मराठी सिनेमा फेसबुक पेजवरून साभार)
COMMENTS