मराठी कलाकारांसाठी विषय खोल आहे!

मराठी कलाकारांसाठी विषय खोल आहे!

जामिया, जेएनयुवरून बॉलीवूडमध्ये वादळ उठले असताना मराठी कलाकार मात्र अजूनही विषय समजून घेत आहेत.

बॉलीवूडमध्ये दिसणारे छोट्या शहरातील नायक नेहमी उच्च-वर्णीयच का असतात?
प्रकाशमय सणात रुपेरी पडदा अंधारातच
अनुराग ‘डिसेंट’ कश्यप

देशभरात नागरिकत्व दुरुस्ती कायदा, एनआरसी, जामिया मिलिया, जेएनयूवरून मोठ्या प्रमाणात अस्थिरता पसरली आहे. अशा परिस्थितीत मराठी चित्रपट-नाटक कलाकार, लेखक, पटकथा लेखक, दिग्दर्शक नेमके कुठे आहेत?म्हणजे ते इथल्या जमिनीच्या बरोबर आहेत, हवेत आहेत, भूमिगत झाले आहेत, मागे आहेत, की एकदम पुढे गेले आहेत? की अमेरिकेतील बृहन्महाराष्ट्रात परिषदेत जाण्यासाठी व्यस्त आहेत? की ही सर्व मंडळी अजूनही हाविषय समजून घेत आहेत!

५ जानेवारीला जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये चेहरे लपवून ५०-६० गुंडांनी विद्यार्थ्यांवर हल्ला केला. विद्यार्थी नेत्या आयेशी घोषच्या डोक्यात लाठ्या-काठ्या मारल्या. तिला रक्तबंबाळ केलं. भूगोल विषयांत ज्यांचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर आदराने घेतले जाते त्या प्रा. सुचारिता सेन यांच्याही डोक्यात लाठ्या मारून त्यांना रक्तबंबाळ केलं. अनेक विद्यार्थ्यांना जबर मारहाण केली गेली.

त्यापूर्वी जामिया मिलीया इस्लामिया विद्यापीठामध्ये पोलिसांनी विद्यापीठात घुसून सापडेल त्या विद्यार्थ्याला बुकलून काढलं. पोलिस ग्रंथालयामध्येही घुसले. तेथे पुस्तकांच्या कपाटांची तोडफोड केली. अभ्यास करणारी मुले पळून जाऊ नये म्हणून त्यांना घेरून मारलं. मुलांची पुस्तकं, त्यांचे डबे, पाण्याच्या बाटल्या इतस्तत: पसरलेल्या दिसल्या. मुलींना पकडून त्यांच्या अंगाला नको तिथे हात लावले. काही मुलींना पाकिस्तानात जाऊन राहा अशी तंबी दिली. तुमचा हा देश आहे, तुम्ही येथून चालत्या व्हा, असेही पोलिस सहजपणे सांगत होते. मुलींनाही मरेतोस्तोपर्यंत ते मारहाण करत होते. अलीगड मुस्लीम विद्यापीठामध्येही तो प्रकार झाला. जाधवपूरमध्येही हेच घडलं.  

या घटनेचा इतिवृत्तांत सगळ्या जगाने ‘आखो देखाँ हाल’ पाहिला. मुलांना शिक्षणासाठी पाठवलेल्या विद्यापीठात पोलिस घुसतात व मुलांना देशद्रोही ठरवून त्यांनाच अक्कल शिकवतात हे या जगाने पाहिले. ज्या विद्यापीठांमध्ये भारतातले सर्वोत्कृष्ट शिक्षण दिले जाते, ज्या विद्यापीठामध्ये शिकायला जावं अशी भारतातल्या प्रत्येक विद्यार्थ्याची इच्छा असते, ज्या विद्यापीठामध्ये अध्यापन करायची संधी मिळावी, संशोधन करायला मिळावं, देशाची एक बुद्धिवान पिढी घडावी असा आत्मसन्मान वाटावा म्हणून देशातला बुद्धिवान शिक्षक वर्ग आटापिटा करतो, त्या सर्वांनाच पोलिस सहज ठोकून काढतात. पुढचा माणूस कोण आहे, त्याची समाजातील, बौद्घिक क्षेत्रातील पत, इज्जत, वय, महिला वगैरे पोलिस काहीही पाहात नाही. वरून आदेशच असा आलेला असतो की दिसेल त्याला ठोकून काढा. त्यातल्या त्यात जो शहाणा असेल, कायदा सांगण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला पहिले शोधून ठोका, त्याच्या डोक्यात थेट काठी मारा. तो मरता कामा नये याची काळजी घ्या पण सरकारविरोधात बोलल्याबद्दल काय परिणाम होतात हे त्याला आयुष्यभर आठवेल अशी अद्दल घडवा. यातलाच एखादा पोलिस या प्राध्यापकांची पुस्तके वाचून सरकारी सेवेत आला असतो, तोही या झुंडीत सामील होतो.

हे कुणी पाहिले नाही असेही नाही. १५-२० दिवस सगळे हे चालले आहे. सामान्य माणूस रस्त्यावर उतरला आहे. लाखोंचे मोर्चे या महाराष्ट्रात निघाले आहेत. माध्यमांच्या हेडलाइन्स विद्यार्थ्यांची आंदोलने व नागरिकत्व कायद्याच्या बातम्या या परिघात सतत लोकांपुढे येत आहेत.

आणि हे असह्य झाल्याने बॉलीवूड स्टार दीपिका पदुकोन, आलिया भट, सोनम कपूर, अनुराग कश्यप, विशाल भारद्वाज असे हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार पुढे आले आहेतआणि त्यांनी विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला आहे. मात्र मराठी कलाकारांना हे अजून माहीत नाहीये, की देशात काय घडत आहे! आपलेच मोठे भाऊबंद कुठेतरी निदर्शने करायला जात आहेत, ते का जात आहेत याची उत्सुकताही या छोट्या भावामध्ये नाही. हे मराठी कलाकार आपल्या-आपल्या चित्रपटांच्या प्रमोशनमध्ये इतके व्यस्त आहेत, की त्यांना माहितीच नाही दिल्ली आणि मुंबईमध्ये रोज काय घडत आहे.

‘पुन्हा निवडणूक’सारखे ट्विट अकारणपणे आणि नको त्या वेळी कसे करायचे, हे आमच्या मराठी कलाकारांना चांगले माहीत आहे, पण देशातील घटनांबद्दल आम्ही काही मत व्यक्त करू शकतो, हे त्यांना माहीत नाही, कारण ते अजून विषय समजून घेत आहेत.

दीपिका प्रत्यक्ष जेएनयूमध्ये गेली. स्वरा भास्कर जामिया-जेएनयूमध्ये गेली. अनुराग कश्यप मुंबईत कार्टर रोडला जातो. तो दिल्लीत इंडिया गेटला मुलांसोबत निदर्शनाला बसतो. ट्विटवर तर तो आता मोदी-शहा दुकलीला देशाचे तुकडे-तुकडे करणारे गँग असेही जाहीरपण म्हणतो. सुशांतसिंग राजपूत मुंबईत गेट वे ऑफ इंडियाला जातो. तो त्याच्या एका विधानामुळे त्याच्या मालिकेचा कराराही गमावतो पण मराठी कलाकारांना मात्र घरापासून केवळ त्यांचे स्टुडिओ कुठे आहेत, हेच माहीत आहे. आझाद मैदान कुठे आहे, हे त्यांना माहीत नाही. पुण्यातले एफटीआय त्यांना माहिती नाही.

ही मंडळी सोशल मीडियावर नाहीत असेही म्हणता येत नाही. या देशातल्या फेसबुक, ट्विटरवर गेल्या महिन्याभरात सर्वात ट्रॅफिक आहे ते CAA, NRC, JNU, JAMIA या मुद्द्यांवर आणि हे ट्रॅफिक कुठल्याच सेलेब्रिटिला सहज चुकवता येणारे नाही. तुम्ही कुठलाही रस्ता पकडा हे ट्रॅफिक तुम्हाला अध्येमध्ये लागते. तो रोखूनच धरणारे असते. कारण या ट्रॅफिकमध्ये व्हायोलन्स आहे, अक्शन आहे. कदाचित एका मोठ्या संघर्षाची स्क्रीप्ट-पटकथा दडलेली आहे. पण आपले मराठी स्टार ट्विटरवर या ट्रॅफिकमध्ये आपण अडकलोच नाही अशा आनंदात राहतात. नाहीतर देशात काय रोज कमी दंगा घडत असतो! लोकशाही आहे येथे रोजच खून मारामाऱ्या, दंगे, पोलिसांची दडपशाही, नेत्यांची जहरी-विखारी वक्तव्ये घडत असतात. त्यात नवे ते काय? पण आपले जे व्यक्तिगत छानछौकी आयुष्य आहे त्याचे सेलिब्रेशन दिवसादिवसाला शेअर करून हजारो शेअर-लाइक्स कमवणे हे यांना अधिक योग्य वाटते. मनाला ऑर्ग्यझम मिळू नये असं कुणाला वाटत नाही? कुणी म्हणेल त्यात अयोग्य काय? त्यांची मुले थोडीच जेएनयूत, जामियात जातात? ते थोडेच जेएनयू, जामिया, अलिगड, आयआयटी मुंबईचे अल्युमनी आहेत? याचे उत्तर नाहीच असावे.

मग बॉलीवूडमधले जे कलाकार रस्त्यावर उतरले आहेत, ते कुठे जेएनयुमध्ये शिकलेत, त्यांची मुले थेट परदेशात शिकतात, ते या मराठी कलाकारांपेक्षा लब्धप्रतिष्ठित, अप्पर अप्पर क्लासमधील, हायसोसायटीमधील आहेत. त्यांच्या उतरण्याने मोदी-शहा दबतील असेही नाही. पण हे कलाकार रस्त्यावर उतरले आहेत. त्यांना पूर्वीपेक्षा अधिक टीकेला तोंड द्यावे लागत आहे. ते ती टीका झेलतही आहेत. मराठी कलाकारांना चिंता आहे, की त्यांचे चित्रपट कसे चालतील?त्यांच्या चित्रपटांवर बंदी घातली जाईल? ट्विटरवर Banअमूक तमूक असे फतवे काढले जातील. आमचे खूप ट्रोलिंग होईल. कोणत्या तरी पक्षाचे समर्थक बनवले जाईल. हा कुणाला खेळ खेळायचाय? हो तेही खरे आहे. पण मराठी कलाकारांना असे वाटले नाही, की किशोर कदम नावाचा एक कलाकार आझाद मैदानवर काय करतोय, ते जरा जाऊनही पाहावे. तो तिकडे जाऊन कविता का म्हणतोय, हे त्याला विचारावे. रसिका आगाशे तिकडे काय करतीये, हे तिला जाऊन विचारावे. पण ते अजूनही विषय समजून घेत आहेत.

सेटवर काय झाले, कशी मजा केली, आमची किती छान दोस्ती आहे, हे असले पाचकळ संवाद आम्ही किती दिवस ऐकायचे? एखाद्या टीव्ही चॅनेलवर जाऊन, आम्ही काही बोलत नाही, म्हणजे आमचे काही मत नाही, असे नाही, असे सांगून तुम्ही छान करमणूक करता, पण तुम्ही कोणाला फसवत आहात. हा तुमचा धुरळा कधी थांबणार आहे? की अजूनही विषय समजून घेत आहात? कलेला जातधर्म नसतो असली वाक्ये लोकांपुढे किती वर्षे फेकत राहाल?

तुमच्या ‘लोकल’ गोष्टी ‘ग्लोबल’ जाणीवांना भिडतात, असे तुम्हाला वाटत असते, पण त्यामध्ये ‘नॅशनल’ काहीच नाहीये का? आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींमध्ये तुम्हाला काहीच इंटरेस्टिंग वाटत नाही का? तुमच्या जाणीवा आहेत तरी नेमक्या कोणत्या?

मराठी समाजाचा हा स्थायीभाव आहे, का की अडचणीत येणाऱ्या विषयावर न बोलता केवळ विषय समजून घेत असल्याची बतावणी करायची? फुकट पु. ल. देशपांडे, आचार्य अत्रे आणि दुर्गाबाईंचे नाव घ्यायचे. काम मात्र सतत समजून घेण्याचेच!

गेल्या पावसाळ्यात काहीजण रस्त्यातील अदृश्य दहशतवाद्यांबद्दल- खड्ड्यांबद्दल बोलले म्हणे! काहीजण कचऱ्याबद्दलही बोलले म्हणे! ते खड्डे जिथे पडले आणि तो कचरा जिथे होता, त्या शहरातील सत्ताधारी पक्षांबद्दल ते बोलल्याचे ऐकिवात नाही. अदृश्य दहशतवादी नेहमी अदृश्यच राहणार आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल बोलणे सोपे आहे, पण अडचणीच्या विषयांचे काय, की अजूनही विषय समजूनच घेत आहात?

मेरिल स्ट्रीपपासून अनेक दिग्गज हॉलिवूड स्टार स्वत:च्या स्टारडमची तमा न बाळगता आपल्याच देशाचा अध्यक्ष ट्रम्पच्या विषारी राजकारणाविरोधात ठामपणे उभे राहतात आणि भूमिका मांडतात. बरं भूमिका कुठे मांडतात तर थेट ऑस्कर पुरस्कार घेताना.. पण आपण उगाच हॉलीवूडबद्दल बोलत राहायचे आणि काम साधे बॉलीवूडचेही नाही करायचे, कारण आपल्याला विषय अजून समजायचाय!

  • अर्थातच याला काही सन्माननीय अपवाद आहेत, पण ही अपवादाची संख्या बोटावर मोजण्याइतकीच आहे. एक मात्र खरं की मराठीतील अनेक कलाकार, पटकथा लेखक आणि दिग्दर्शकांसाठी अजून तरी हे विषय खोल आहेत. ते अजून विषय समजून घेत आहेत. 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0