फिलिपिन्समध्ये पुन्हा एकदा मार्कोस !

फिलिपिन्समध्ये पुन्हा एकदा मार्कोस !

१९८६ साली फर्डिनंड मार्कोस, त्या वेळेचे फिलिपिन्सचे अध्यक्ष, देश सोडून हवाई बेटांत पळून गेले. कारण त्यांनी केलेला घोर भ्रष्टाचार उघड झाला होता, जनता र

‘स्विंग स्टेट्स’वर ट्रम्प/बायडनची मदार?
अमेरिका भेटीतून इम्रानने बरंच कमावलं
पंतप्रधान तुरुंगाच्या वाटेवर…

१९८६ साली फर्डिनंड मार्कोस, त्या वेळेचे फिलिपिन्सचे अध्यक्ष, देश सोडून हवाई बेटांत पळून गेले. कारण त्यांनी केलेला घोर भ्रष्टाचार उघड झाला होता, जनता रस्त्यावर उतरली होती, पोलिसही  त्यांचं लोकांच्या रागापासून संरक्षण करू शकत नव्हते. पळून जाताना मार्कोस यांनी पंचवीस रांजण भरून सोनं आणि पंचवीस खोके भरून रोख रक्कम बरोबर नेली होती. पळून जाताना त्यांचा मुलगा बाँगबाँग मार्कोस त्यांच्या सोबत होता.

बाँगबाँग

बाँगबाँग

मार्कोसनी सत्ता सोडल्यावर त्यांचा रहाता राजवाडा लोकाना पहायला मिळाला. घरातल्या नळाच्या तोट्या, दिव्याची बटणं, दरवाजांच्या कड्या, बाथ टब इत्यादी साऱ्या गोष्टी सोन्याच्या होत्या. इमेल्डा,  फर्डिनंड मार्कोस यांची पत्नी, पादत्राणांची शौकीन होती. हज्जारो पादत्राणं. सोनं, हिरे अशांनी मढवलेली. बेश कीमती. आज त्या पादत्राणांचं एक म्युझियम फिलीपिन्समधे आहे आणि लोक कौतुकानं ते पहायला जातात.

मार्कोसनी सुमारे १० अब्ज डॉलरची लूट केली होती. वाच्यता झाली, आंदोलन झालं तेव्हा मार्कोसनी हज्जारोना जेलमधे घातलं, हज्जारोंना छळलं, हज्जारोंना ठार मारलं.

८९ साली मार्कोस वारले. ९१ साली श्रीमती मार्कोस आणि मुलगा बाँगबाँग, फिलिपिन्समधे परतले. परतल्या परतल्या श्रीमती मार्कोसनी राष्ट्रपतीपदाची निवडणुक लढवली. हरल्या. नंतर मुलगा बाँगबाँगनं सेनेटची निवडणुक लढवली आणि निवडून आला. हळूहळू बाँगबाँगनं जम बसवला.

२०२२ च्या मे महिन्यात बाँगबाँग फिलिपिन्सचा अध्यक्ष झालाय.

बाँगबाँग इंग्लंडमधे शिकला आणि त्याची जीवनशैली अमेरिकन आहे. खुशालचेंडू, चैनी. चार माणसं समजा त्याला भेटली तर शेवटच्या माणसानं जे सांगितलं तेच त्याच्या लक्षात रहातं. त्याला राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यकारभार यातलं काहीही कळत नाही. वडिलांना ज्यांनी सल्ला दिला ते त्याचे सल्लागार. ब्युरोक्रॅट सांगणार ते तो ऐकणार आणि ब्युरोक्रॅट राज्य करणार. पोलिस आणि सैन्य हा त्याचा मुख्य आधार.

निवडणुकीत त्यानं भाषणं केली नाहीत, जाहीरनामा मांडला नाही. एकच आश्वासन दिलं, फिलिपिन्स पुन्हा ग्रेट करेन; भाताचा भाव आज आहे त्याच्या अर्ध्यावर आणेन. भाव कमी आणणं हे अर्थव्यवस्थेत कसं बसतं याचं उत्तर त्याच्याकडं नाही. त्याला या बद्दल विचारताही येत नाही. कारण हा माणूस पत्रकार परिषद घेत नाही, विचारवंत किंवा पत्रकारांना भेटत नाही. त्याची प्रचारकांची एक टीम आहे. ही टीम मुख्यतः मार्केटिंग टीम आहे. या टीमला अर्थव्यवस्था वगैरे कळत नाही, त्यांना प्रचाराचा धुरळा कसा उडवावा एव्हढंच कळतं.

प्रचार टीमचा भर घोषणांवर होता. चमकदार घोषणा. पुन्हा एकदा फिलिपिन्सचा विकास ही त्यांची घोषणा. नेमकी हीच घोषणा डोनल्ड ट्रंपनंही दिली होती.

प्रचाराचा भर खोटी माहिती लोकाना भरवण्यावर होता. टीव्ही, सोशल मिडिया, सभा, वर्तमानपत्रातल्या बातम्या, मुलाखती (बाँगबाँगच्या नव्हे) यातून धादांत असत्य लोकांवर कोसळवलं जात होतं. फर्डिनंट मार्कोस यांच्या काळात म्हणजे १९८६ पूर्वी फिलिपिन्स हा जगातला सर्वात समृद्ध देश होता हे प्रचाराचं मुख्य सूत्र. जर देश एव्हढा समृद्ध होता तर लोकं रस्त्यावर का उतरले, त्यांनी मार्कोसला का घालवलं, मार्कोस देश सोडून का पळून गेले इत्यादी गोष्टी या प्रचारात नसत. ही दुसरी बाजू लोकांच्या कानावर येणारच नाही, असा बंदोबस्त बाँगबाँगनी करून ठेवला होता, माध्यमं ताब्यात ठेवली होती.

रॉडरिगो ड्युटेर्टे

रॉडरिगो ड्युटेर्टे

मतदान करणाऱ्यांत बहुतांश लोकं १९८० नंतर जन्मलेले आहेत. त्यांना फर्डिनंड मार्कोस हा माणूस काय होता ते माहित नाही. त्यामुळं खोटा इतिहास जोरात मांडल्यावर त्यांना तो इतिहास खराच वाटला.

बाँगबाँग प्रचाराच्या काळातही आरामात घरात बसून असे. हज्जारो लोकांना पैसे वाटले होते. ते सभा भरवत. सभांसाठी गर्दीचं आयोजन करत असत. ते मिरवणुका आणि शोभा यात्रा काढत असत.

बाँगबाँगला दणादण मतं मिळाली याचं एक कारण आहे त्याची उपाध्यक्षपदाची सहकारी सारा ड्युटेर्टे.

सारा ड्यूटेर्टे म्हणजे माजी अध्यक्ष रॉडरिगो ड्युटेर्टे यांची मुलगी. रॉडरिगो निवडणुक लढवू शकत नाहीत कारण फिलिपिन्सच्या राज्यघटनेत एक तरतूद आहे, अध्यक्षाला सहा वर्षाची एकच टर्म मिळेल, दुसरी टर्म मिळणार नाही. ही तरतूद १९८६ मधे झाली कारण फर्डिनंड मार्कोस आयुष्यभर प्रेसिडेंट राहून लूट करू इच्छीत होते.

हे ड्युटेर्टे हे फारच थोर गृहस्थ आहेत. फिलिपिन्समधल्या ड्रग व्यवसायाला आळा घालण्याच्या नादात त्यांनी माणसं मारली. पोलिस कुठल्याही वस्तीत घुसत, माणसाला पकडत, त्याचा छळ करत, त्याला गोळ्या घालून रस्त्यावर आणून टाकत. लोकं, माध्यमं, न्यायालयं प्रश्न विचारीत की मेलेला माणूस कोण आहे. त्यावर पोलिस म्हणत की ड्रगवाला आहे. न्यायालय आणि मेलेल्या माणसाचे नातेवाईक म्हणत की पुरावे दाखवा. ड्युटेर्टे म्हणे पुरावे द्यायला आपण बांधील नाही. पुरावे कशाला? मी म्हणतो ना की तो ड्रगवाला होता, बस, तोच पुरावा.

लोक विचारत की नेमकी ड्युटेर्टे यांना विरोध करणारीच माणसं कां ड्रगवाली ठरतात आणि तीच कां मरतात?

मार्कोस आणि ड्युटेर्टे यांच्यातला समान धागा म्हणजे कायदा न पाळणं. त्यांच्या लेखी कायदा नव्हे तर नीतीमत्ता महत्वाची होती. माणूस अनीतीमान आहे असं ड्युटेर्टे म्हणणार आणि पोलिस त्या माणसाचा खातमा करणार.

एकदा जाहीर सभेत ड्युटेर्टे म्हणाले ” स्त्री सुंदर असेल तर तिच्यावर बलात्कार होणं अपरिहार्य आहे.”

एकदा ते म्हणाले ” हिटलर हा माझा आदर्श आहे.”

आपल्या प्रत्येक विधानावर ड्युटेर्टे ठाम होते.

तर अशा ड्युटेर्टेना स्वतः निवडणुक लढवता येत नाही म्हणून त्यांनी मुलीला उभं केलं आहे.

बाँगबाँग आणि सारा. दोघं स्वतंत्रपणे उभे राहिले तर मतांची विभागणी होईल आणि रोब्रेडो हा प्रतिस्पर्धी विजयी होईल. हे लक्षात घेऊन सारा आणि बाँगबाँग यांनी मांडवळ केली. बाँगबाँग अध्यक्ष आणि सारा उपाध्यक्ष.

आता ही जोडी काय करेल? फिलिपिन्सची कोसळलेली अर्थव्यवस्था ही जोडी सुधारेल? गरीबी, विषमता, बेरोजगारी आणि महागाई बेलगाम झालीय. यावर या जोडीचं काय म्हणणं आहे?

कळायला मार्ग नाही कारण भाषणं, जाहीरनामा, जाणकारांचे विचार इत्यादी गोष्टी अभावानं आढळतात.

बाँगबाँग म्हणतात की माझ्या घराण्याच्या इतिहासावर जाऊ नका, मला स्वतंत्रपणे संधी द्या. पण प्रचार तर सांगतो की त्यांच्या घराण्याचा काळ हा फिलिपिन्सचा सुवर्णकाळ होता. आपला बाप आणि आई लुटारू होते हे आडून आडून कबूलही करायचं आणि नाकबूलही करायचं.  लोच्या आहे.

एक शक्यता अशी. निवडून आल्यावर राज्यघटनेत राष्ट्रपतीला एकपेक्षा अधिक टर्म किंवा तहहयात राज्य करता येईल अशी तरतूद करणं.

फर्डिनंड मार्कोस तर मेलेत. त्यामुळं पुन्हा राष्ट्रपती होण्याची संधी ड्युटेर्टे याना मिळेल. म्हणजे ते राष्ट्रपती होतील आणि बाँगबाँग त्यांचा हनुमान होईल.

मतांची विभागणी टाळून बहुमत मिळालंय. परंतू लोकांमधे असंतोष तर आहेच. तो मार्कोस यांच्या काळात होता आणि ड्युटेर्टो यांच्याही काळात होता. त्यामुळं लोक बंड करतील, राज्य करू देणार नाहीत.

लंकेत काय चाललंय ते पहा.

जनतेला खोटं बोलणारी माणसं आवडतात. आपले आर्थिक तीन तेरा वाजवले तरी चालतील पण राज्यकर्त्यानं आपल्याला अध्यात्मिक सुख द्यायला हवं असं जनतेला वाटतं. असा निष्कर्ष काढायचा?

निळू दामले लेखक आणि पत्रकार आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0