दगड शोधू या…

दगड शोधू या…

सत्तरीच्या दशकात मागोवा गटाच्या माध्यमातून, त्याच्या आगेमागे मागोवा-तात्पर्य मासिकांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील मार्क्सवादी, पुरोगामी विचारविश्वात नवी जान ओतणारा माणूस गेला. प्रख्यात मार्क्सवादी विचारवंत म्हणून महाराष्ट्रात त्याची ओळख. माझ्यासाठी मात्र तो याहीपेक्षा काहीतरी अधिक होता.

सुधीर बेडेकर :  निस्पृह क्रांतिकारी विचारवंत
लेनिन आणि लंडन
‘लाल सलाम’, ‘कॉम्रेड’ म्हटल्यास गुन्हा
सुधीर बेडेकर गेल्याची बातमी सकाळी सकाळी कळाली आणि मन सुन्न झालं. सत्तरीच्या दशकात मागोवा गटाच्या माध्यमातून, त्याच्या आगेमागे मागोवा-तात्पर्य मासिकांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील मार्क्सवादी, पुरोगामी विचारविश्वात नवी जान ओतणारा माणूस गेला. प्रख्यात मार्क्सवादी विचारवंत म्हणून महाराष्ट्रात त्याची ओळख. माझ्यासाठी मात्र तो याहीपेक्षा काहीतरी अधिक होता. सुधीरकाका म्हणतो मी त्याला.
नव्वदीच्या दशकात विद्यार्थी चळवळीत पाऊल ठेवलं, तेव्हापासून हे नाव ऐकत होतो. कधीतरी शिबिरात कुठंतरी पाहिलं असेल. पण ओळख झाली ती नोव्हेंबर-डिसेंबर १९९५ मध्ये. मी बीएच्या शेवटच्या वर्षाला होतो. पुण्याच्या समाजविज्ञान अकादमीला त्यांच्या लायब्ररीमध्ये काही डॉक्युमेंटेशनचं काम करण्यासाठी कुणी हवं होतं. दत्ताकाका (दत्ता देसाई) कोल्हापूरला आमच्या घरी आला होता, तेव्हा त्यानं विचारलं होतं, असं काम करायला कुणी मिळेल का, म्हणून. मी हो म्हणालो. गेलो. दत्ताकाका आणि विनयामावशी (विनया मालती हरी) हे घरचेच होते. कुमारकाका (कुमार शिराळकर) हाही घरचाच. तो पुण्यात असला की त्याचा मुक्काम अकादमीत असायचा, तेव्हा अकादमीत वेगळं काही वाटलं नाही. पहिले एक-दोन दिवस असे सहज गेले. तिसऱ्या दिवशी सुधीर बेडेकर येणार आहेत, ते तुझ्याशी बोलतील कामाबाबत असं दत्ताकाका म्हणाला. सुधीर बेडेकर या नावाचा आदरयुक्त धाक वाटायचा. पहिल्या भेटीत सुधीर बेडेकरांनी काम समजावून सांगितलं. मासिकं, नियतकालिकांमधले महत्त्वाचे लेख कापून विषयानुसार लावून ठेवायचे होते. १००० रु. मानधन ठरलं. हे काम मी मला जमेल तसं महिना-दीड महिना केलं. त्या दरम्यान सुधीर बेडेकरांशी भेटी होत गेल्या, तो माझ्यासाठी दत्ताकाका-कुमारकाकासारखा सुधीरकाका झाला.
कट टू जून-जुलै १९९६. मी एमए करायला पुण्यात आलो. त्याच सुमाराला भारत ज्ञान विज्ञान समितीचं काम महाराष्ट्रात नव्याने सुरू करायचं होतं. त्याचं काम समाजविज्ञान अकादमीतून सुरू झालं. त्या कामाच्या निमित्ताने मी रोज अकादमीत पडीक असायचो. विद्यापीठातले वर्ग संपले, की जेवण करून दुपारच्या वेळेला अकादमीत, मग रात्री ८-९ पर्यंत तिथंच. तेव्हा सुधीरकाकाच्या वारंवार भेटी व्हायच्या. भारत ज्ञान विज्ञान समितीचं काम कसं असावं, याबाबत त्याची आग्रही मतं होती. तो स्वतः समितीच्या कामात सहभागी नव्हता, पण त्या कामात वैचारिक स्पष्टता देण्याचं महत्त्वाचं काम त्यानं केलं. त्याच सुमाराला चौकशा नावाचा एक गट पुण्यात स्थापन झाला होता. त्या गटाच्या वैचारिक जडणघडणीमध्ये सुधीरकाकाने खूप कष्ट घेतले होते.
त्याच्याशी भेटीगाठी होत असतानाच त्यानं लिहिलेलं काहीबाही वाचत होतो. हजार हातांचा ऑक्टोपस हा त्याचा लेखसंग्रह अत्यंत महत्त्वाचा वाटतो मला. भांडवली व्यवस्थेच्या व्यामिश्रतेचं, तिच्यातील गतिशीलतेचं आणि सर्वव्यापी होण्याच्या ताकदीचं समजेल अशा भाषेत विश्लेषण करतानाच, या व्यवस्थेशी भिडायचं तर काय काय केलं पाहिजे, याचीही मांडणी त्याने त्यात केली आहे. या पुस्तकातला समाजवादी शिव्यांवरचा लेख तर केवळ अप्रतिम.
त्याने लिहिलेला एक महालेख तेव्हा वाचनात आला. निशासूक्त की सूर्यगर्जना असं नाव होतं त्याचं. लघुअनियतकालिकांच्या चळवळीच्या काळात (किंवा त्या काळाच्या संदर्भाने, त्यानंतर काही काळाने) तो लिहिला होता. प्रगत साहित्यसभेनं प्रकाशित केला होता. त्यावेळच्या प्रस्थापितविरोधी साहित्यिकांच्या लिखाणातून डोकावणारा निराशेचा सूर टाकून देऊन परिवर्तनाच्या राजकारणासाठी साहित्य-साहित्यिकांची भूमिका काय असावी, याबाबत सडेतोड मांडणी करणारा हा महालेख होता. तो वाचून भारावून जायला होतं. हा आशावादी दृष्टिकोन त्याच्या लिखाणातून कायम दिसायचा.
सुधीरकाका अत्यंत शिस्तबद्ध होता. वाचन, लेखन, चिंतन यातल्या शिस्तीबरोबरच वैयक्तिक आयुष्यातही अत्यंत शिस्तीने वावरला. त्याच्या घरीच नाही, तर अकादमीमध्ये, किंवा चहा प्यायला रीगलमध्ये गेल्यावरही टेबलावरच्या वस्तू नीट शिस्तीत ठेवायच्या, हा त्याचा शिरस्ता. या शिस्तशीरपणामुळं दडपण यायचं अनेकांना. पण या शिस्तशीरपणामुळे गोष्टी कशा स्पष्ट व्हायच्या.
२००२ साली गुजरातच्या नरसंहारानंतर सुलभा ब्रह्मेंनी पुस्तिका लिहिली होती. तिचं नाव मी सुचवलं होतं – गुजरातकांड. या पुस्तिकेतला फॅसिझमवरचा मजकूर त्यांच्या मनासारखा उतरला नव्हता. मला म्हणाल्या, ‘हे फक्त सुधीरच नीट करू शकेल. पण मला त्याच्याशी फारसं मोकळेपणाने बोलता येत नाही. तू त्याला विचारशील का?’ मी त्याला विचारलं, तो तात्काळ हो म्हणाला. सुलभाताईंच्या लहान अक्षरातल्या मजकुरावर त्यानं संपादन केलं. संपादनाची त्याची पद्धत फारच भारी. सुलभाताई अनेक खाणाखुणा, कावळ्याचे पाय, या पानावरचं त्या पानावर पहा असं संपादन, पुनर्लेखन करायच्या. सुधीरकाकाचं एकदम उलट. तो संपादित केलेल्या वाक्यावर सुधारित वाक्याची पट्टी चिकटवायचा. काही ठिकाणी सुवाच्य अक्षरात टिपण्या, फारच दुरुस्त्या असतील, तर नव्या पानावार स्वच्छ अक्षरात एकही खाडाखोड न करता लिखाण. हे पाहून सुलभाताईंचा चेहरा खुलला होता. सुधीरने केलंय, आता काही चिंता नाही असं म्हणाल्या होत्या. तीच गोष्ट आम्ही केलेल्या अमेरिकेच्या इराकवरील हल्ल्यावरच्या फिल्मची. त्याच्या स्क्रिप्टमधल्या कविता (मूळ इंग्रजी किंवा इतर भाषांमधल्या मराठीत अनुवाद केलेल्या) सुधीरकाकाकडून एकदा तपासून घेतल्या होत्या. भाषेच्या बाबतीत त्याचा हात धरणारा मला माहीत नाही.
त्याच्या कामाच्या पद्धतीतून त्याचं व्यक्तित्व दाखवणाऱ्या अशा अनेक आठवणी आहेत. अनेकांच्या असतील. अनेकांना त्यानं मार्क्सवादाची दीक्षा दिली. अगदी साठ-सत्तरच्या दशकातल्या नामदेव ढसाळांपासून ते १९९५-२००० च्या काळातल्या चौकशाच्या तरूण मुलांपर्यंत, आणि त्यानंतरही अनेकांना त्याने मार्क्सवादी विचारांची प्रेरणा दिली. मार्क्सवादी विचारांनी काम करणाऱ्यांना वैचारिक स्पष्टता येण्यासाठी मदत केली.
गेली काही वर्षं मात्र तो हा आशावाद हरवून बसला होता, बहुधा. कायम बोलताना जे काही सुरू आहे, ते बरोबर नाही, पण हे बदलायचं कसं त्याचे मार्ग शोधायला हवेत, असं म्हणायचा. कोंडी कशी फोडायची, हा त्याच्या विचाराचा फेकस होता गेली काही वर्षं. त्याच्याशी बोलताना ते जाणवायचं.
माझ्यावर आणि अमृतावर त्याचा विशेष लोभ होता. त्याचा आणि चित्रामावशीचाही (चित्रा बेडेकर). आम्ही गोव्याला रहायला गेलो, तेव्हा आम्ही दोघं तुमच्याकडे रहायला येणार आहोत, असं म्हणाले होते. ते काही झालं नाही. आम्ही गोव्यातून पुण्याला परत आल्यावर एकदा आम्हाला दोघांना महाबळेश्वरला घेऊन चल, असं तो म्हणाला होता. निस्सीम (त्यांचा मुलगा) हैदराबादला असतो, तुम्ही आम्हाला निस्सीमसारखेच, म्हणून हक्काने तुम्हाला म्हणू शकतो, असं म्हणाली होती चित्रामावशी. तेही नाही झालं. आम्ही वसईला शिफ्ट झालो. ते कळवलं नाही. म्हणून अमृताला (माझ्या बायकोला) सुधीरकाका रागावला होता अगदी तीनच आठवड्यांपूर्वी. आम्ही पुणं सोडणं त्याला फारसं पसंत पडलं नाही कधी. ते तो बालूनही दाखवायचा. विशेषतः सुलभाताई गेल्यानंतर मी पुण्यात राहिलं पाहिजे, असं त्याचं आग्रही मत होतं. सुलभाताईंनंतर ब्रह्मे ग्रंथालयाला प्रत्येक टप्प्यावर त्यानं मदत केली. पुणे विद्यापीठातील एका विभागाच्या सहकार्याने त्याने मागोवा आणि तात्पर्यचे अंक डिजिटाईझ करून घेतले. ते ब्रह्मे ग्रंथालयाच्या वेबसाईटवरही उपलब्ध करून देण्यासाठी त्याने शेअर केले. ते देताना त्याने आम्हा विश्वस्तांना एक मेसेज पाठवला होता. तो त्याच्याच शब्दांत – ‘ब्रह्मे ग्रंथालयाच्या वेबसाईटवर मा व ता खंड टाकताय ही चांगलीच गोष्ट आहे। मात्र एक करा। सम्राटने ओळख म्हणून इमेलवर जे लिहिले आहे ते घेऊ नका। किंवा अन्य प्रकारेही माझ्या व्यक्तिगत स्तुतीपर काही टाकू नका।’ आम्हीही त्या कळवले – ‘जे काही लिहू ते तुझ्या प्रास्ताविकाशी सुसंगत असेल आणि अर्थात तुला आधी दाखवूच.’ ते त्याला दाखवणं आता शक्य नाही. पण त्याच्या प्रास्ताविकाशी सुसंगत मजकूरच आम्ही लिहू. हे खंड ग्रंथालयाच्या वेबसाईटवर लवकरच उपलब्ध होतील.
मी आणि अमृताने लग्न करायचं ठरवलं, तेव्हा त्याला आणि चित्रामावशीला सांगायला त्यांच्या घरी गेलो होतो. आम्हाला दोघांना मनातून हे व्हावं असं वाटत होतं, असं म्हणाले होते ते तेव्हा. डिसेंबर २००० मध्ये आमच्या दोघांच्या घरच्यांच्या पहिल्या भेटीच्या कार्यक्रमात कुटुंबातले नसलेले, बाहेरचे असे सुधीरकाका-चित्रामावशी होते.
त्याच्याही आधी, ८ एप्रिल १९९८ला त्याने मला दि. के. बेडेकरांचं ललितचिंतन हे पुस्तक भेट दिलं होतं. या ललितचिंतनमध्ये ‘दगड शोधू या’ हा लेख आहे. तो आम्हाला शाळेत असताना एक धडा म्हणून पण होता. वेगवेगळे दगड गोळा करून, ते साफसूफ करून त्यामध्ये आकार शोधणाऱ्या मुलाची ही गोष्ट आहे. या लेखातला दगड गोळा करणारा मुलगा म्हणजे लहान सुधीर बेडेकर. आमच्यासारखे दगड शेधायचं, त्यांना साफसूफ करायचं काम त्यानं आयुष्यभर केलं. आपणही दगड शोधून ते साफसूफ करत राहिलं पाहिजे. हीच त्याला आदरांजली ठरेल.
त्याला आदरांजलीसाठी सभा होईल. मी त्याला जाणार नाही. झेपणार नाही मला ते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0