मार्क्सवादी विचारवंत सुधीर बेडेकर यांचे निधन

मार्क्सवादी विचारवंत सुधीर बेडेकर यांचे निधन

प्रख्यात मार्क्सवादी विचारवंत आणि लेखक सुधीर बेडेकर यांचे आज पहाटे पुण्यामध्ये अल्पशा आजाराने निधन झाले. ते ७६ वर्षांचे होते. पुण्यातील ‘समाज विज्ञान

एसपी-डीआयजी पदांना केंद्रात प्रतिनियुक्ती सक्तीची
कोरोना आणि राजकारण
सरकार पाडण्याचा भाजपचा डाव – कॉँग्रेस

प्रख्यात मार्क्सवादी विचारवंत आणि लेखक सुधीर बेडेकर यांचे आज पहाटे पुण्यामध्ये अल्पशा आजाराने निधन झाले. ते ७६ वर्षांचे होते. पुण्यातील ‘समाज विज्ञान अकादमी’चे ते विश्वस्त अध्यक्ष होते.

मुंबई ‘आय.आय.टी.चे बीटेक पदवीधर असलेल्या सुधीर बेडेकर यांनी अत्यल्प काळ नोकरी केली मात्र त्यानंतर त्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य सामाजिक प्रबोधन कार्य व डावी चळवळ यासाठी वाहिले होते. मार्क्सवादी विचारांशी त्यांचा पहिला परिचय त्यांचे वडील आणि प्रसिद्ध विचारवंत-समीक्षक दि. के. बेडेकर यांच्यामुळे झाला होता.

सुधीर बेडेकर यांच्यासारख्याच अनेक अस्वस्थ इंजिनिअर, शास्त्रज्ञ, लेखक, चित्रकार आणि अनेक कनिष्ठ व मध्यमवर्गीय युवक-युवती व विद्यार्थी यांना बरोबर घेऊन त्यांनी महाराष्ट्रात मार्क्सवादाचा नव्या पद्धतीने विचार करणारा ‘मागोवा’ हा राजकीय वैचारिक गट स्थापन केला.

१९७० च्या दशकात जगभरात आणि भारतात अस्वस्थ व बंडखोर युवकांचे उठाव होत असताना महाराष्ट्रात सत्तरीच्या दशकामधील ‘मागोवा’ गटाचे एक प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते पुढे आले.

एक नवी वाट चोखाळणारे आणि अधिक सांस्कृतिक व सर्जनशील-मानुष अशा पद्धतीने मार्क्सवादाची मांडणी करणारे विचारवंत म्हणून सुधीर बेडेकर सत्तरीच्या दशकात महाराष्ट्राला परिचित झाले.

याच काळात शहादा [धुळे] येथे ‘श्रमिक संघटने’च्या माध्यमातून उभ्या झालेल्या आदिवासी शेतकरी-शेतमजुरांच्या चळवळीशी ‘मागोवा’ व सुधीर बेडेकर हे अत्यंत क्रियाशील व जैव रीतीने जोडले गेले.

‘हजार हातांचा ऑक्टोपस’, ‘विज्ञान कला आणि क्रांती’ या पुस्तकांचे तसेच डाव्या विचाराचे प्रबोधन करणाऱ्या अनेक पुस्तिकांचे त्यांनी लेखन केले. ‘मागोवा प्रकाशना’च्या माध्यमातून अनेक महत्त्वपूर्ण पुस्तके व पुस्तिका त्यांनी प्रकाशित केल्या. प्रचलित सामाजिक-आर्थिक व्यवस्थेचे मार्क्सवादी  दृष्टिकोनातून परखड विश्लेषण करणारे आणि क्रांतीकारी राजकीय वैचारिक मांडणी करणारे शेकडो लेख त्यांनी लिहिले. महाराष्ट्रातील हजारो तरुणांना ते प्रेरक आणि मार्गदर्शक ठरले.

अगदी तरूण वयात त्यांनी ‘समाज प्रबोधन पत्रिके’मध्ये संपादकीय काम केले. त्यानंतर ते १९७० आणि १९८० च्या दशकातील ‘मागोवा’ आणि नंतर ‘तात्पर्य’ मासिकाचे संस्थापक संपादक होते. सत्तरीच्या दशकामध्ये साहित्यिक आणि सांस्कृतिक चळवळी, तसेच युक्रांद-दलित पॅंथर पासून ते विविध एम एल गटांसह डावे पक्ष आणि डाव्या चळवळी यातील सर्व संघटना आणि कार्यकर्त्यांना एका वैचारिक-सांस्कृतिक धाग्यामध्ये गुंफण्याचे प्रयत्न त्यांनी सातत्याने केले. महाराष्ट्रातील ‘लोकविज्ञान चळवळ’ तसेच ‘अखिल भारतीय जनविज्ञान आंदोलन’ यांना त्यांनी नेहमीच मार्गदर्शन आणि सहकार्य केले.

आधी ‘मागोवा’ आणि नंतर ‘समाज विज्ञान अकादमी’च्या माध्यमातून महाराष्ट्रातील विविध डाव्या-पुरोगामी संस्था-संघटनांच्या कार्यकर्त्यांना मदत आणि वैचारिक साहित्य उपलब्ध करून देणे, तसेच त्यांची शिबिरे आणि अभ्यास वर्ग घेणे हे अतिशय मोलाचे काम त्यांनी केले. सोबत व्याख्याने, चर्चासत्रे आणि परिसंवाद यातून देशासमोरील कळीच्या प्रश्नांवर मंथन घडवण्यात त्यांनी पुढाकार घेतला. पुण्यातील समाजविज्ञान अकादमीचे ‘भगतसिंह सभागृह आणि वाचनालय’ उभारण्यात त्यांचा मोठा सहभाग होता.

सुधीर बेडेकर यांच्या निधनाने डाव्या पुरोगामी चळवळीने एक सर्जनशील विचारवंत गमावला आहे. त्यांच्या कार्याला आणि स्मृतीला समाजविज्ञान अकादमी आणि सर्व सहयोगी कार्यकर्त्यांच्या वतीने विनम्र अभिवादन, अशा शब्दात समाजविज्ञान अकादमीचे अजित अभ्यंकर आणि दत्ता देसाई यांनी आदरांजली व्यक्त केली आहे.

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे केंद्रीय समितीचे सदस्य कॉ. अशोक ढवळे म्हणाले, की “कॉ. सुधीर बेडेकर यांनी ‘मागोवा’ आणि ‘तात्पर्य’ मासिकांद्वारे आणि ‘मागोवा’ गटाद्वारे सत्तरीच्या दशकातील महाराष्ट्रातील तरुण पिढीला मार्क्सवादी विचारांकडे वळवण्याचे अत्यंत महत्त्वाचे कार्य केले. त्यांच्या जाण्याने डाव्या वैचारिक चळवळीचे फार मोठे नुकसान झाले आहे.”

लेखक मिलिंद चंपानेरकर म्हणाले, “मी त्यांना गुरु मानतो. आमच्या युवा अवस्थेत आम्हाला वैचारीकदृष्ट्या  उभे करण्याचे काम त्यांच्या मार्गदर्शनाने झाले. त्यांनी आणि ‘मागोवा’ने पुरोगामी विचारांचा पाया रचला. केवळ राजकीय विचारच नव्हे, तर कला, साहित्य याकडे कसे पहावे, यांची एक दृष्टी ‘मागोवा’ने दिली. बेडेकरांनी लिहिलेले ‘एक हजारांचा ऑक्टोपस’ हे पुस्तक अत्यंत महत्त्वाचे आणि ग्रेट आहे. आजही ते लागू होते.”

कार्यकर्ते राजन क्षीरसागर म्हणाले, “सुधीर बेडेकर हा मला मार्क्सवाद शिकविणारा शिक्षक होता. शेकडो तरुणांना अगदी नामदेव ढसाळ, अच्युत गोडबोले याच्यापासून माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्यापर्यंतच्या नव्या पिढीला मार्क्सवादी विचारांची शिकवण आणि प्रेरणा देणाऱ्या,  लेखक विचारवंत, मार्गदर्शक कॉम्रेड सुधीर बेडेकर यांचे जाणे जीवाला चटका लावणारे आहे. “

अभ्यासक लेखक केशव वाघमारे यांनी लिहिले आहे, “हजार हातांचा आक्टोपस” समजावणारे ,कॉम्रेड सुधीर बेडेकर गेले. नवमार्क्सवादी विचारप्रवाहाचे प्रणेते कॉम्रेड सुधीर बेडेकर ह्यांचा आज पहाटे पुणे मृत्यू झाला. महिनाभरापूर्वी किरण मोघे यांच्या घरी, सुभाष थोरात,  कुमार शिराळकर, प्रबोधन पोळ यांच्या सोबत खूप गप्पा झाल्या होत्या. मागोवा, तात्पर्य, दलित पँथर, शहादा चळवळ, जाती अंत चळवळ, मार्क्सवादी राजकारण, आंबेडकरी चळवळ, चित्रकला अशा कितीतरी विषयांवर सुधीर बेडेकर बोलत होते. तुझं पुस्तक मला हवं आहे म्हणाले. मला ते पोहचवता आले नाही.”

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0