पंजाबमध्ये कॉंग्रेसचा मास्टरस्ट्रोक

पंजाबमध्ये कॉंग्रेसचा मास्टरस्ट्रोक

चरणजीत सिंह चन्नी यांना पंजाबचे नवे मुख्यमंत्री करून, पंजाबच्या अस्वस्थ राजकारणाला कॉंग्रेसने निर्णायक कलाटणी दिली आहे. पतियाळाच्या महाराजा असलेल्या क

रेड लाइट एरियातला हुंदका
व्यापक जीवनदर्शनाची ‘हकिकत’
आरक्षण आणि नरेंद्र मोदी: श्रीयुत दहा टक्के!

चरणजीत सिंह चन्नी यांना पंजाबचे नवे मुख्यमंत्री करून, पंजाबच्या अस्वस्थ राजकारणाला कॉंग्रेसने निर्णायक कलाटणी दिली आहे. पतियाळाच्या महाराजा असलेल्या कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या ऐवजी थेट रामदासिया सिख या दलित समाजातील चरणजीत सिंह चन्नी यांची मुख्यमंत्री म्हणून निवड करून केवळ पंजाबच नव्हे तर कॉंग्रेसने देशव्यापी एक आपला स्पष्ट संदेश दिला आहे.

सामंती आणि राजेशाही घराण्यापासून एका मागासवर्गीय समुदायाच्या नेत्याला पंजाब काँग्रेसचा विधायक दल नेता आणि मुख्यमंत्री घोषित करणे ही सहज सोपी घडलेली बाब निश्चितच नाही. पंजाब मध्ये ३२ टक्के दलित लोकसंख्या आहे. तरीसुद्धा १९६६ पासून आजपर्यंत दलित समुदायाला सत्तेचे सर्वोच्च पद पंजाबमध्ये कधीही मिळाले नव्हते. ११७ पैकी ३४ जागा आरक्षित आहेत. सर्वसाधारण जागांवरही दलितांचे मतदान निर्णायक आहे. पंजाबमधील दोआब विभागात दलितांचे विशेष प्राबल्य आहे. थोडक्यात पंजाबमध्ये दलित मतदार हे नेहमी किंगमेकरच्या भूमिकेत राहिले आहेत. आता काँग्रेस हा पहिला पक्ष बनला आहे, ज्याने पंजाबात पहिल्यांदा दलित व्यक्तिला मुख्यमंत्री बनवले आहे. जरी ते फक्त साडेपाच महिन्यांसाठी असले, तरी  स्वातंत्र्यानंतर पंजाबमधील १५ मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यांपैकी दलित चेहऱ्याला नेतृत्व करण्याची संधी मिळाली नाही. मागणी नेहमी होत राहिली. कॉंग्रेसने यावेळी संधी मिळताच हा योग साधला आहे.

कॉंग्रेसला असाच चेहरा हवा होता. कॉंग्रेस पक्षश्रेष्टी सुद्धा या संधीच्या शोधात असावेत. चन्नी मंत्री झाले असले, तरी पण इतकी मोठी जबाबदारी घेण्याची त्यांची तयारी किंवा अपेक्षा नव्हती. काल दुपारपर्यंत चन्नी मुख्यमंत्री होतील किंवा त्यांचे नाव चर्चेत कोठेच नव्हते. काँग्रेस हायकमांडने मुख्यमंत्री पदावर एकमत होत नाही हे पाहून चरणजीत सिंह चन्नी यांचे नाव पुढे केले. समोर असलेल्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन काँग्रेसने हे दलित कार्ड खेळले. प्रशांत किशोर सारख्या रणनीतिकारांचे मत पक्षाने स्वीकारले असावे. पंजाबच्या राजकारणात दलित समाजाचे असलेले प्राबल्य पाहून कोणत्याही कॉंग्रेसच्या वजनदार नेत्याला किंवा दावेदाराला यास विरोध करणे शक्य नव्हते. मात्र कोणीही दलित मुख्यमंत्री करा अशी जोरदारपणे मागणी करित नव्हते फार तर दलित समुदायातील व्यक्तिला उपमुख्यमंत्री किवा प्रदेशाध्यक्ष करावे अशी मागणी होत होती, पण सत्तेची सर्वोच्च खुर्ची देण्याची मानसिकता दिसत नव्हती.

बहुजन समाज पक्षाचे संस्थापक नेते काशीराम हे पंजाबचे होते. ते जीवंत असेपर्यंत पंजाबात बसपा मजबूत होती. त्यांनी दलित मुख्यमंत्री असावा या मुद्ध्यावरच पंजाब मध्ये बसपा चा पाया विस्तारला होता. कॉंग्रेसने दलित मुख्यमंत्री देत काशीराम यांचे एक स्वप्न पूर्ण केले आहे. याचा उत्तरप्रदेशात सुद्धा कॉंग्रेसला चांगला फायदा होऊ शकतो. हाथरस कांड आणि अन्य दलित अत्याचारच्या घटनानंतर मायावतींच्या भूमिकांवरून उत्तरप्रदेशात दलित वर्ग बसपावर नाराज आहे सोबत मुस्लिम समुदाय सुद्धा पर्यायाच्या शोधात असताना कॉंग्रेसने दलित मुख्यमंत्री दिल्याने उत्तरप्रदेशात दलित – मुस्लिम मतावर लक्ष ठेऊन राजकीय वाटचाल करणाऱ्या कॉंग्रेसला याचा लाभ होऊ शकतो. प्रियंका गांधी या सध्या या प्रश्नावर सर्वाधिक प्रखरपणे योगी सरकारवर टीका करित आहेत. देशात एकमेव दलित मुख्यमंत्री देत कॉंग्रेसने सामाजिक न्याय देण्याची आपल्या वचनबद्धता सिद्ध केली आहे असे म्हणावे लागेल. शिरोमणी अकाली दलाने बसपा सोबत युतीची घोषणा करताना दलित समुदायाला उपमुख्यमंत्री पदाचे आश्वासन दिले होते. आम आदमी पक्ष आणि भाजपने थेठ मुख्यमंत्री पद दलित समुदायाला देण्याचे आश्वासन देण्यास सुरवात केली होती. यावेळी नेमके कॉंग्रेसने मुख्यमंत्री पदी दलित समुदायातील चरणजीत सिंह चन्नी यांना बसवत सर्व राजकीय डावपेच आपल्या अनुकूल बनविताना राज्यातील राजकीय गटबाजीवरही नियंत्रण प्राप्त केले आहे. हा बदल होत असतानाच कॉंग्रेसने चन्नी यांची डमी मुख्यमंत्री म्हणून प्रतिमा बनू नये याची काळजी घ्यायला हवी नाही तर त्याचे उलट परिणाम सुद्धा होऊ शकतात.

पंजाब हे किसान आंदोलनाचे गेली १० महिने प्रमुख केंद्र राहिले आहे. मोदी सरकारच्या तीन कृषि कायद्याला पंजाब मधील शेतकऱ्यांनी सर्वात तीव्र विरोध दर्शविला आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग हे मोदी यांना अनुकूल आहेत अशी पंजाबच्या शेतकऱ्यांमध्ये प्रतिमा बनत चाललेली होती. कॉंग्रेस पक्षश्रेष्टींबरोबरही त्यांचे संबंध फारसे चांगले नसत. याच वेळी आमदारांमध्ये त्यांच्या बद्दल विश्वास राहिला नव्हता. त्यांचे वय सुद्धा ८० वर्षे होते. त्यामुळे ते कार्यक्षम राहिलेले नाहीत अशी धारणा पक्षामध्ये झाली होती. त्यामुळे अमरिंदरसिंग यांना बदलणे कॉंग्रेसला क्रमप्राप्त झाले होते. पंजाबचे राजकारण शीख, हिंदू आणि दलित जातीच्या आधारावर वेगवेगळ्या समीकरणांमध्ये दिसते. शीख मतदार अकाली दल आणि काँग्रेसकडे आहेत. अनेक शहरी भागात हिंदू मतदाराची निवड भाजप आहे. काँग्रेसलाही हिंदू मतदान करतात. दलित मतांचे मात्र विभाजन होत आले आहे. एक मोठा वर्ग काँग्रेससोबत आणि बाकी बसपा, अकाली दल आणि भाजपसोबत जात आहे. गेल्या वेळी आम आदमी पक्षालाही लक्षणीय मते मिळाली. यावेळी पंजाबमधील सर्व पक्षांच्या नजरा दलित व्होट बँकेवर होत्या. कॉंग्रेसने मोक्याच्या वेळी अत्यंत सावध खेळी करित सामाजिक आणि राजकीय मास्टरस्ट्रोक खेळत शिख – दलित समुदायातील चरणजीत सिंह चन्नी यांना मुख्यमंत्री बनवून राजकीय बाजी पालटली आहे. यानिमित्ताने कॉंग्रेस पक्षश्रेष्टींचे क्लासिकल हायकमान ऑपरेशन सक्सेसफुल झाले आहे.

प्रा. डॉ. प्रमोदकुमार ओलेकर, हे आर्टस् अंड  कॉमर्स कॉलेज, आष्टा येथे सहाय्यक प्राध्यापक आणि इतिहास विभागप्रमुख आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0