मुंबई : भाजपच्या पाठिंब्यावर राजस्थानमधून राज्यसभेच्या जागेसाठी लढत असणारे झी समूहाचे सुभाष चंद्रा यांचा पराभव झाला आहे. राजस्थानमधील राज्यसभेच्या
मुंबई : भाजपच्या पाठिंब्यावर राजस्थानमधून राज्यसभेच्या जागेसाठी लढत असणारे झी समूहाचे सुभाष चंद्रा यांचा पराभव झाला आहे.
राजस्थानमधील राज्यसभेच्या जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. येथे तीन जागा काँग्रेसच्या वाट्याला गेल्या. यामध्ये रणदीप सुरजेवाला, प्रमोद तिवारी आणि मुकुल वासनिक विजयी झाले. भाजपला केवळ एक जागा मिळाली. पक्षाचे घनश्याम तिवारी यांना विजय मिळाला. मात्र, अपक्ष उमेदवार सुभाष चंद्रा यांना पराभवाला सामोरे जावे लागले.
राजस्थानात काँग्रेसचे रणदीप सुरजेवाला यांना ४३, मुकुल वासनिक यांना ४२ आणि प्रमोद तिवारी यांना ४१ मते मिळाली. तर भाजपचे घनश्याम तिवारी यांना ४३ मते मिळाली. तर अपक्ष सुभाष चंद्रा यांना अवघी ३० मते मिळाली. चंद्रा गेल्यावेळी हरियाणातून राज्यसभेवर निवडून गेले होते.
कर्नाटकामध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन, अभिनेते-राजकारणी जगेश आणि लहरसिंग सिरोया हे भाजपच्या तिकिटावर विजयी झाले आहेत. तर कॉँग्रेसचे जयराम रमेश विजयी झाले आहेत.
हरियाणामध्ये भाजपच्या पाठिंब्यावर निवडणूक लढवत असलेले उमेदवार कार्तिकेय शर्मा यांनी कॉँग्रेसचे आमदार किरण चौधरी आणि बी. बी. बत्रा यांचे मतदान रद्द करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली. त्यामुळे मतमोजणी थांबली आणि रात्री उशिरापर्यंत त्यावर निर्णय झाला नाही.
राजस्थान आणि हरियाणामध्ये भाजपच्या छावणीत गडबड झाली आहे. पक्षाच्या दोन आमदारांचे क्रॉस व्होटिंग झाल्याची बातमी आहे. राजस्थानमध्ये भाजपच्या आमदार शोभा राणी आणि सिद्धी कुमारी यांनी काँग्रेस उमेदवाराच्या बाजूने मतदान केले. भाजपचे आणखी एक आमदार कैलास मीणा यांच्या मतावरून वाद निर्माण झाला आहे.
कर्नाटकातही जेडीएसच्या दोन आमदारांनी काँग्रेस समर्थित उमेदवाराला मतदान केल्याची बातमी आहे.
११ राज्यांमध्ये, रिक्त झालेल्या राज्यसभेच्या ५७ जागांपैकी ४१ बिनविरोध निवडून आले. त्यामुळे शुक्रवारी राजस्थान, हरियाणा, महाराष्ट्र आणि कर्नाटक या ४ राज्यांमधील १६ जागांसाठी मतदान झाले.. यामध्ये राजस्थानमधून काँग्रेसला तीन तर भाजपला एक जागा मिळाली. तर कर्नाटकात याच्या उलट स्थिती होती. कर्नाटकात भाजपला ३ तर काँग्रेसला एक जागा मिळाली आहे. महाराष्ट्र आणि हरियाणातील मतमोजणी अद्याप सुरू झालेली नाही.
COMMENTS