कला आणि कलाकार यांचा सांस्कृतिक दहशतवाद्यांशी संघर्ष मागच्या काळात प्रचंड वाढलाय. ‘मी रक्सम’ अशाच सांस्कृतिक संघर्षाला चित्रीत तर करतोच शिवाय चित्रपट ही कला म्हणून या संघर्षाचा भाग सुद्धा ठरतो.
‘कतरा कतरो से मिलके रहता है तो दर्या बनता है | अकेली बूँद धूप सह नहीं सकती, भाँप बनकर फना हो जाती हैं|’ ,
हाशिम सेठची सलीमला ही धमकीवजा सूचना. आम्ही नेमून दिलेल्या चौकटी तुम्ही ओलांडाल तर वेगळे पडाल; बहिष्कृत केले जाल असा इशारा देणारी.
‘मी रक्सम’ या झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर नुकताच रिलीज झालेल्या बाबा आझमींच्या सिनेमात नसरुद्दीन शाह यांच्या तोंडी हे वाक्य आहे. या एका वाक्यात धर्मसंस्थेचं चारित्र्य सामावलं आहे. धर्माची स्थापना माणसानं स्वतःच्या आत्मिक सुखासाठी केली. पण धर्माने माणसाला चहूबाजूंनी वेढून टाकलं. धर्म माणसाला नियंत्रित करायला लागला. त्याच्या आयुष्यातील निर्णय धर्मच घेऊ लागला. रेशमी किड्याने आपल्या भोवती कोसला तयार करावा आणि त्यातच गुदमरून जावं तसं माणूस या धर्माच्या कोसल्यात गुदमरून गेलाय कारण धर्माच्या ठेकेदारांनी धर्माची जरब कायम ठेवली. कारण धार्मिक असली तरी सत्ता, शक्ती आणि संपत्तीचं ते केंद्र आहे. ‘मी रक्सम’ माणसाच्या आयुष्यातील धर्माच्या नियंत्रणाची गोष्ट सांगतो. धर्म आणि संस्कृती यातील संघर्ष दाखवतो. माणसाला उपजतच असणारी कलेची आस दाखवतो. आणि कलेतून येणार्या स्वातंत्र्याचं दर्शन घडवतो.
‘मी रक्सम’ म्हणजे उर्दूत मी नाचते /नाचतो. नृत्य माणसाच्या आतील ऊर्जेचा निचरा करतं. शरीर, मनाला मोकळं करतं. स्वतंत्र झाल्याची जाणीव देतं. चित्रपटाच्या नावापासूनच स्वातंत्र्याची आस प्रकट होते. स्वतंत्र होण्याची व्यक्तीची नैसर्गिक उर्मी आणि त्या उर्मीला दडपून टाकणारी व्यवस्था यातील संघर्ष हे चित्रपटाचं आशयसूत्र आहे.
बाबा आझमींचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच चित्रपट आहे. बाबा आझमी हे नाव सर्वसामान्यांना तितकसं परिचित नाही. ख्यातनाम शायर कैफी आझमी यांचे पुत्र आणि अभिनेत्री शबाना आझमी यांचा भाऊ अशी एक बाबा आझमींची ओळख. पण, बाबा आझमी हे उत्तम सिनेमॅटोग्राफर आहेत. ‘तेजाब’, ‘दिल’, ‘मिस्टर इंडिया’ अशा प्रसिद्ध चित्रपटांची सिनेमेटोग्राफी त्यांनी केली आहे. दिग्दर्शनातील आपल्या पहिल्याच चित्रपटात त्यांनी सार्वकालिन प्रासंगिक विषय निवडलाय. २०२० मध्ये ‘मी रक्सम’ बनवणं याला मोठा अर्थ आहे. ज्या काळात धर्म आणि शासनव्यवस्था मानवी जगण्यावर अनिर्बंध नियंत्रण मिळवू पाहतायत, व्यक्तीचं स्वतंत्र व्यक्तिमत्व गिळंकृत करू बघतायत, अशा काळात ‘मी रक्सम’ प्रेक्षकांच्या भेटीला आलाय.
दुसरीकडे देशातील मुस्लिम समुदायाला दुय्यम नागरिकाच्या भूमिकेत ढकलण्याचं काम जोरात सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर ‘मी रक्सम’चं महत्त्व आहेच. बाबा आझमींचे वडील ख्यातनाम शायर कैफी आझमी यांच्या मिझवां या गावात चित्रपटाचं चित्रीकरण झालय. कैफी आझमींनी आपल्या पूर्ण हयातीत प्रगतीशील विचारांचा पुरस्कार केला. त्यांच्या गावात चित्रीत झालेला आणि त्यांनाच समर्पित असलेला हा चित्रपट प्रगतीशीलतेचा ठासून उच्चार करतो यात शंका नाही.
उत्तर प्रदेशातील आजमगढ़ जिल्ह्यातील मिझवां हे गाव. या गावात सलीम (दानिश हुसैन) आपली बायको सकीना आणि मुलगी मरयमसोबत (आदिती सुबेदी) राहतो. कपडे शिवून गुजराण करणाऱ्या सलीमच्या कुटुंबाचं आयुष्य ठीक सुरू असतं. पण सकीनाचा दुर्धर आजारानं मृत्यू ओढवतो. बाप लेक दुःख बाजूला सारून जगण्याचा प्रयत्न करतात. आईच्या मृत्यूने कोमेजून गेलेल्या मरयमला खुलवण्याचा प्रयत्न सलीम करतो. अशातच मरयमला भरतनाट्यम या नृत्याची खूप आवड आहे, हे त्याला जाणवतं. आणि तो तिला भरतनाट्यमचा क्लास लावतो. बायको आणि आई गमावल्याच्या दुःखातून सलीम आणि मरयम सावरायला लागतात. पण, मरयमच्या नृत्याने धर्म बुडाल्याचा साक्षात्कार धर्ममार्तंडांना होतो. त्यांच्या दृष्टीने हे बाप लेक अधार्मिक ठरतात. सलीम आणि मरयमच्या संघर्षाला इथूनच सुरुवात होते.
सलीम म्हणतो त्याप्रमाणे, ‘सवाल जिंदगी अपने शर्तों पर जिने का है..’ पण हे आपल्या तत्वावर, मर्जीनुसार जगणं इतकं सोपं नसतं. यासाठी किंमत चुकवावी लागते. व्यवस्था हरप्रकारे तुम्हाला नाडते. तुमच्या जीवनवाहिन्या तुंबवून टाकते. तुम्हाला हतबल करते. तुम्हाला पूर्ण लाचार करून झुकायला लावते. आणि नंतर उदारतेचा आव आणून क्षमाशील असल्याचा दिखावा करते. “जिने की तमन्ना के हाथो जिने के सामान बिक रहे हैं”, या शब्दात सलीम आपली हतबलता प्रकट करतो. ‘मी रक्सम’ धर्म संस्थेच्या आणि तिच्या रखवालदारांच्या कावेबाजपणाची कहाणी आहे. या परिस्थितीतून सलीम आणि मरयम कसा मार्ग काढतात, व्यवस्थेला कशी प्रतिक्रिया देतात, हे चित्रपट पाहिल्यावरच समजेल.
‘कला की रुह उसकी आझादी है l’ असं मरयमची शिक्षिका उमा म्हणते. माणसाच्या स्वतंत्र होण्याच्या इच्छेतूनच कलेचा जन्म झाला असावा. कलेची उपासना करणारा व्यापक होत जातो. भौतिक जगातल्या सर्व मर्यादा लांघून जाण्याचा प्रयत्न करतो. भारतीय संस्कृती अशा नानाविध कलांनी समृद्ध आहे. शिल्प, चित्र, संगीत, साहित्य यांच्या सहाय्याने इथल्या माणसाने मुक्ततेची आस धरली.
भारताच्या इतिहास भूगोलात या मुक्ततेच्या खुणा विखुरलेल्या दिसतात. सर्व धर्म आणि पंथांच्या वर जाऊन भारतीय संस्कृतीची दशांगुळे उरलीय. पण, आज आपली अधोगती सुरू आहे. या कलेचा वारसा नेस्तनाबूत करण्याची मोहीम आपण चालवली आहे. आपल्या संकुचित चौकटी अधिकाधिक घट्ट होत आहेत. त्यामुळे कलेतून निपजणारी व्यापकता समजून घेण्याची कुवत आक्रसत चालली आहे. यातून निर्माण होत आहे फक्त उथळपणा. या उथळपणाचे आणि थिल्लरतेचे वारसदार कलेचा गर्भ ठेचण्याचं काम करत आहेत. कलेचा झरा कुठे पाझरलाच तर त्याचा उगम तिथल्या तिथे दडपून टाकायला ते तत्पर आहेत कारण कलेतून प्रसवणाऱ्या स्वातंत्र्याची ताकद त्यांना माहीत आहे. म्हणून ते संस्कृतीसमोर भीती आणि दहशत उभी करतायत. एम. एफ. हुसैन, मुरुगसेन, अनंतमूर्ती ते मराठीतील कवी दिनकर मनवर यांच्यापर्यंत हे दिसून येईल. कित्येक कवी, लेखक, चित्रकारांना या दहशतीचा सामना करावा लागला. कुणाला हतबल होऊन माफी मागावी लागली, कुणी कलेचा त्याग केला, कुणाला परागंदा व्हावं लागलं, तर कुणाची हत्या झाली. कला आणि कलाकार यांचा या सांस्कृतिक दहशतवाद्यांशी संघर्ष मागच्या काळात प्रचंड वाढलाय. ‘मी रक्सम’ अशाच सांस्कृतिक संघर्षाला चित्रीत तर करतोच शिवाय चित्रपट ही कला म्हणून या संघर्षाचा भाग सुद्धा ठरतो.
धर्म आणि संस्कृती हे या चित्रपटातील मुख्य पात्र आणि त्यांच्यातील संघर्ष या चित्रपटाचा गाभा. धर्म संस्थांपेक्षा संस्कृतीचं स्थान नक्कीच वरचं आहे. भाषा, खाद्य, पेहराव, कला, चालीरीती यातून संस्कृती बनते. धर्माला विशिष्ट साचा असतो, नियम असतात. संस्कृती नित्यनूतन असते. ती एक जैविक प्रक्रिया आहे. तिचा विकास होत असतो. धर्म संस्कृतीला नेहमीच एका चौकटीत बंदिस्त करू पाहतो. पण, संस्कृती हे बंधन झुगारून लावते. तिला व्यापकतेची आस असते. जेव्हा जेव्हा धर्म आणि संस्कृतीचा झगडा झालाय तेव्हा माणसाने संस्कृती निवडली. बांगलादेशची निर्मिती हे अलिकडचं ठळक उदाहरण.
‘मी रक्सम’मध्ये सलीम आणि मरयम भारतीय संस्कृतीचे शिलेदार आहेत. धर्माच्या मुजोरपणाला ते जुमानत नाहीत. उच्चशिक्षित नसला तरी सलीमला भारतीय संस्कृतीची जाण आहे. ही जाण त्याने त्याच्या मुलीत रुजवली आहे. चित्रपटाच्या शेवटी मरयम सुफी गाण्यावर भरतनाट्यम करते. तेव्हा परीक्षक तिला विचारतात की तू हे कसं केलस? तेव्हा मरयम सांगते, “मेरे अम्मी आब्बुने मुझे सिखाया है, की गंगाजमनी तहजीब में ही हमारे देश की शान है”l हे वाक्य संकुचित प्रवृत्तीला सणसणीत चपराक आहे. त्याचबरोबर भारतीय म्हणून असणाऱ्या आपल्या ओळखीची परत एकदा जाणीव करून देणारं आहे. जिथं गणपतीच्या आणि ताबूतच्या मिरवणुका सारख्याच उत्साहात पार पडतात तिथं रंगांनाही धर्माचं आवरण आज चढवलं जात आहे. ‘मी रक्सम’ याविरुद्ध हुंकार भरतो. गंगाजमनी तहजीबची नव्याने ओळख करून देतो.
आजच्या बहुसंख्याकवादावरही ‘मी रक्सम’ भाष्य करतो. यातील जयप्रकाश हा बहुसंख्याकवादाचं प्रतिनिधित्व करतो. मुस्लिम मुलगी भरतनाट्यम करते हे त्याच्या पचनी पडत नाही. आपल्याच देशातील एका मोठ्या समुहाबद्दल तो पूर्वग्रह बाळगून आहे. मुस्लिमांचं भारतीयत्व मान्य नसणार्या प्रवृत्तीचा तो प्रतिनिधी. जयप्रकाश जेव्हा मरयमचं नृत्य बघतो, तेव्हा त्याच्या मुलीला तो म्हणतो, “ये मुस्लिम लडकी अगर इंडियन डान्स सिख सकती है, तो तुम क्यों नहीं?” तेव्हा त्याचीच मुलगी त्याला विचारते, “वो इंडियन नहीं है?” बहुसंख्यावाद्यांच्या जाणीव नेणीवेत वसलेला असा आपपर भाव प्रत्येक वेळी बाहेर येतच असतो. त्याला उत्तर एकच आहे, ते म्हणजे गंगाजमनी तहजीब. ज्या तहजीबने सर्व भारत आपल्या कवेत घेतला आहे. सर्व धर्म, पंथांच्या नद्यांना सामावून घेणारा जो समुद्र आहे.
धर्म, संस्कृती, कला याविषयी ‘मी रक्सम’ बोलतोच. पण, ही बाप लेकीच्या नात्याची सुद्धा गोष्ट आहे. आई गमावलेल्या मरयमला सलीम आईची माया देतो. तो तिचा मित्र आणि मार्गदर्शक आहे. त्याला आकलन झालेल्या गोष्टी मुलीपर्यंत पोहोचवायला तो कमी पडत नाही. आपल्या मनाचं ऐकण्याची आणि त्यावर ठाम राहण्याची शिकवण तो आपल्या मुलीला देतो. तिच्यासोबत उभा राहतो. माणूस म्हणून त्याच्या ज्या धारणा आहेत. तशा बाप म्हणूनही त्याच्या काही धारणा आहेत. मरयमच्या सुख दुःखाची त्याला फिकीर आहे. पण तो तिच्यावर कुठली गोष्ट लादत नाही. मुलगी म्हणून अधिकार गाजवत नाही. अगदी छोट्या छोट्या प्रसंगातून त्याचं हे वेगळेपण दिसतं. मरयमवर रागावल्यानंतर तिला सॉरी म्हणणारा, मरयमने स्पर्धेसाठी जायचं नाही असं म्हटल्यावर शांत बसणारा हा बाप आहे.
मरयम सुद्धा त्याच्याच संस्कारात तयार झालेली मुलगी आहे. आपल्या बापाच्या जीवननिष्ठेला पुढे नेणारी. त्याच्यासोबत उभी राहणारी. दानिश हुसैन यांनी सलीम सुंदर साकारलाय. मायाळूपणा, हतबलता, निग्रह अशा सगळ्याच छटा दाखवताना दानिश यांच्या चेहऱ्यावरील भाव पाहण्यासारखे आहेत. मरयमच्या भूमिकेत आदिती सुबेदी उठून दिसली आहे. तर हाशिम सेठचा खोटा दिलदारपणा, धर्माचा रखवालदार असण्यातला अहंपणा नसरुद्दीन शाहंनी लिलया साकारला आहे.
‘मी रक्सम’ हा या वर्षातील महत्त्वाच्या सिनेमांपैकी एक नक्कीच आहे. गंगाजमनी संस्कृती जगणाऱ्या कवीच्या गावात साकारलेला हा सिनेमा पुन्हा एकदा आपल्याला या संस्कृतीची ओळख करून देतोय.
COMMENTS