टेनिसमधील लढवय्ये व त्यांच्या गाजलेल्या झुंजी

टेनिसमधील लढवय्ये व त्यांच्या गाजलेल्या झुंजी

कोविड-१९मुळे विंबल्डन टेनिस स्पर्धा रद्द झाली. फ्रेंच ओपन या महिन्याच्या अखेरीस होत आहे, तर यूएस ओपन प्रेक्षकाविना सुरू झाली आहे. हे वर्ष टेनिसविना असे वाटू लागले आहे. पण या पूर्वीच्या टेनिस स्पर्धांच्या आठवणी अजूनही रसिकांच्या मनात असतील. त्यांना उजाळा देणारा हा लेख..

कर्नाटक सेक्स टेप प्रकरणः ६ मंत्र्यांची कोर्टात धाव
‘द ग्रेट हॅक’ – माहितीकांडाचा असाही वेध
‘मलाही जातीय शक्तींना गोळ्या घालायच्या आहेत’

टेनिस हा खेळ सगळ्या जगातील क्रीडा रसिकांचा एक आवडता खेळ गेली अनेक दशके आहे. कोरोनाचे सावट त्यावरही पडले आणि मार्चपासून विविध स्पर्धा रद्द करण्यात आल्या. त्यातही खेळाडू आणि प्रेक्षकांची अति आवडती विंबल्डन देखील रहित करण्यात आली.

जूनमध्ये होणारी फ्रेंच ओपन पुढे पुढे ढकलली गेली आणि आता या महिन्याच्या शेवटास सुरू होणार आहे. तीच गत यूएस ओपनची झाली. मात्र ती आयोजित करण्याचा ठाम निर्धार अमेरिकन टेनिस असोसिएशनने केला होता आणि त्याबर हुकूम त्यांनी ती स्पर्धा आता घेण्यास सुरुवात केली आहे. गेल्या आठवड्यात प्रेक्षकांविना यूएस ओपन सुरू झाली आहे.

विशेष म्हणजे त्यात रॉजर फेडरर आणि राफएल नदाल सारखे सुपर स्टार्स खेळत नाही आहेत. तसेच बरेच प्रसिद्ध पुरुष आणि स्त्री महिला खेळाडू देखील खेळत नाही आहेत. जवळजवळ ३० ते ४० खेळाडूंनी खेळण्यास नकार दिला. त्यामुळे अनेक नवोदित खेळाडूंना संधी मिळाली आहे.

जोकोविच सोडून इतर सुपर स्टार्सच्या चुरशीविना यूएस ओपन

टेनिस मधील अतिप्रसिद्ध चौकडी म्हणजेच रॉजर फेडरर, राफएल नदाल, नोव्हाक जोकोविच आणि अँडी मरी यांची टेनिसवरील हुकूमत आणि ग्रँड स्लॅमवरील पकड यावेळी दिसणारच नाही. फक्त जोकोविचच खेळतो आहे आणि मरी हरला आहे. तेव्हा टेनिसमधील तरुण तुर्क म्हणजेच डॉमिनिक टिम, अलेक्झांडर झेरेव, दानील मेद्वेदेव आणि स्टिफॅनोस त्सित्सिपास यांना त्यांचे पहिले ग्रँड स्लॅम चषक जिंकण्याची उत्तम संधी आहे.

तीच गत महिला टेनिसची आहे. सेरेना विलियम्स आणि ओसाका, क्विटोव्हा, कर्बरसारख्या  ग्रँड स्लॅम विजेत्या खेळत असल्या तरी या सगळ्यांना हरवून कुणी नवी खेळाडू नक्कीच यावेळी चषकावर आपली मोहर उठवू शकते.

टेनिसचे व्यावसायिक आणि अत्यंत चढाओढीचे जगत

आधुनिक टेनिस या व्यावसायिक खेळाचा उदय होऊन आता पन्नासपेक्षा अधिक वर्षं झाली. टेनिस हा खेळ आता व्यावसायिकता, तंत्रशुद्धता, अति उत्तम फिटनेस व शारीरिक क्षमता आवश्यक असणारा तसेच पैसा, यश, प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळवून देणारा एक नितांत सुंदर खेळ, व्यवसाय आणि क्रीडा क्षेत्र म्हणून उदयास आलेला आहे. या प्रचंड मोठ्या एंटरप्राइजमध्ये आता अब्जावधी डॉलर्सची निर्मिती आणि उलाढाल होते.

त्यात अनेक जगप्रसिद्ध खेळाडू होऊन गेले. त्यातील अनेक आहेत जे नुसते सुपर स्टार्स नाहीत तर ते या खेळाचे राजदूत मानले जातात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या अनेक लढती, ज्या खूप रंगल्या आणि अत्यंत चुरशीच्या झाल्या, त्या मॅचेसची आठवण टेनिस जगतात अजूनही काढली जाते.

यूएस ओपनच्या निमित्ताने त्यातील लढवय्ये खेळाडू, त्यांच्यातील पराकोटीची स्पर्धा आणि त्यांचे जय-पराजय यांचा आढावा घेतांना अतिशय रंजक माहिती तर मिळतेच. आणि हे लक्षात येते की टेनिस या एका क्रीडा प्रकाराला, खेळाला गेल्या अनेक दशकात अनेक निष्णात खेळाडूंनी वेगवेगळे आयाम, लुभावणारे शॉट्स, वेगवेगळी तंत्रे आणून प्रचंड वैविध्य, रंजकता आणि निर्भेळ आनंद प्रेक्षकांना दिला आहे.

टेनिसमधील जगप्रसिद्ध लढवय्ये, त्यांच्यातील विलक्षण स्पर्धा, चुरस आणि जुगलबंदी  

खेळ लोकप्रिय जसा स्टार्स, प्रायोजक आणि माध्यमांच्या साहाय्याने होतो तसाच खेळातील स्पर्धा, चढाओढ आणि अहमहमिकेमुळेही होतो. टेनिसची अफाट लोकप्रियता ही त्याच्यातील काही अव्वल दर्जाच्या खेळाडूंच्या पराकोटीच्या चढाओढीमुळे आहे.

आपल्या अभिजात संगीतात जुगलबंदी नामक एक विलक्षण ताकदीचा आणि कौशल्याचा एक सादरीकरण्याचा प्रकार आहे. अगदी त्याप्रकारची जुगलबंदी, चढाओढ आणि तीव्र स्पर्धा टेनिसमध्ये दिसून येते. किंबहुना तिला जाणीवपूर्वक तयार केले जाते, त्याच्यावर खूप लिहिले-बोलले जाते आणि खतपाणी घातले जाते.

जॉर्ज ओर्वेल म्हणाले होते की खेळ म्हणजे असे युद्धं आहे ज्यात कुणी मारले जात नाही इतकेच. बाकी त्यात तोच कडवेपणा, तीच विजिगीषु वृत्ती, तोच लढाऊ बाणा, तोच सामर्थ्याचा आविष्कार आणि जिंकण्याची तीच दुर्दम्य इच्छाशक्ती!

गेल्या ५० वर्षातील अशा तीव्र चुरस आणि स्पर्धा असणार्‍या जगप्रसिद्ध जोडगोळ्या टेनिसमध्ये होऊन गेल्या आणि आहेत. त्यांचा हा धावता आढावा.

टेनिसमधील काही चुरशीच्या चढाओढी ज्यांना रसिकांनी उचलून धरले

प्रथम आपण काही प्रसिद्ध खेळाडूंच्या जोडीतील चुरशीचा आढावा घेऊ आणि मग पहिल्या दहा जोडगोळ्यांच्या अतिप्रसिद्ध लढतींचे गारुड समजून घेऊ.

१५ क्रमांकावर आहे मार्गरेट कोर्ट आणि बिली जीन किंग या दोघी खेळाडूंची चुरस. त्या दोघी १९६२ ते १९७२ या काळात खेळल्या. दोघी ३२ वेळा एकमेकींविरुद्ध खेळल्या. त्यात कोर्ट यांनी २२-१० अशी आघाडी घेतली आहे. कोर्ट यांनी २४ ग्रँड स्लॅम स्पर्धा तर किंग यांनी १२ ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत.

१४ क्रमांकावर आहे दोघा सख्ख्या बहिणींची जोडगोळी. १९९८ पासून ते आजतागायत सेरेना आणि व्हीनस विलियम्स यांनी अतिशय ताकदीचा तसेच सुंदर टेनिस खेळ खेळत प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले आहे. व्हीनस अप्रतिम ग्रास टेनिस खेळते तर सेरेना ही तीनही प्रकारच्या कोर्टांवर उत्तम खेळते. दोघी आता ३५च्या पुढे आहेत तरीही खेळतात आहेत. सेरेनाची कन्या आता २ वर्षाची होईल. मातृत्वानंतर काही महिन्यातच तिने पुन्हा खेळणे सुरू केले आणि आता ती यूएस ओपन जिंकण्याची आकांक्षा ठेवून आहे.

दोघी ३२ वेळा वेळा एकमेकींविरुद्ध खेळल्या असून सेरेनाने २२-१० अशी आघाडी घेतली आहे. तर ग्रँड स्लॅम अंतिम मॅचमध्ये सेरेनाने ६-२ अशी आघाडी घेतली आहे.

१३ क्रमांकावर आहे गॅब्रिएला सबॅटिनी आणि स्टेफी ग्राफच्या अनेक चुरशीच्या लढती झाल्या. १९८५ ते १९९५ या काळात त्या खेळल्या. दोघी ४० वेळा एकमेकींविरुद्ध खेळल्या. त्यात स्टेफीने २९-११ अशी आघाडी घेतली आहे. स्टेफीने ११ वेळा सबॅटिनीला हरवत ग्रँड स्लॅम चषक जिंकले तर सबॅटिनीने तिला हरवत १९९०मध्ये तिचे एकुलते एक ग्रँड स्लॅम जिंकले.

दिसायला आकर्षक आणि उंचीपुरी गॅब्रिएला सबॅटिनी जितकी तिच्या दिसण्यामुळे लोकप्रिय होती तितकीच तिच्या खेळासाठी प्रसिद्ध नव्हती असे काही विश्लेषक म्हणत असले तरी १२ वेळा ती स्टेफी विरुद्ध ग्रँड स्लॅम अंतिम फेरीत खेळत होती यातच तिचे कर्तृत्व आणि टेनिसवरील पकड दिसून येते.

१२व्या क्रमांकावर येते ती नोव्हाक जोकोविच आणि अँडी मरी ही जोडी. २००६ पासून दोघेही अजून खेळत आहेत. दुखापतींमुळे मरीने निवृत्ती घेतली होती मात्र आता तो परत खेळू लागला आहे. जोकोविच आणि मरी हे दोघेही बचावात्मक खेळ खेळणारे खेळाडू आहेत.

दोघे ३६ वेळा एकमेकांविरुद्ध खेळले आहेत त्यात जोकोविचने २५-११ अशी आघाडी घेतली आहे. ग्रँड स्लॅम स्पर्धेतही जोकोविच ८-२ असा पुढे आहे. दोघे अजूनही खेळतात आहेत म्हणजे त्यांच्या उत्तम टेनिसच्या मॅचेस नक्की होणार.

११व्या क्रमांकावर येते ती जॉन मॅकॅन्रो आणि जिमी कॉनर्स हे दोघे अमेरिकी खेळाडू. तीन दशके खेळणारे हे खेळाडू त्यांच्या रंगतदार मॅचेससाठी प्रसिद्ध होते. हे दोघे ३३ वेळा एकमेकांविरुद्ध खेळले त्यात मॅकॅन्रोने २०-१३ अशी आघाडी घेतली आहे. ग्रँड स्लॅम स्पर्धेतही मॅकॅन्रोने ६-३ अशी आघाडी घेतली आहे.

कॉनर्स जवळजवळ चाळीशीपर्यंत खेळले. पुढे त्यांनी अनेक विजेत्यांना कोचिंग दिले आहे. तर मॅकॅन्रो हे ग्रँड स्लॅम समालोचन करतात.

१० रॉड लेव्हर आणि केन रोझवॉल (१९६३-१९७६)

रॉड लेव्हर हे ओपन टेनिस आधी खेळणारे आणि केन रोझवॉल देखील. पुढे दोघेही मोठे स्टार्स झाले. दोनवेळा कॅलेंडर ग्रँड स्लॅम जिंकण्याचा विश्वविक्रम लेव्हर यांच्या नावावर आहे आणि तो अबाधित राहण्याची शक्यता अधिक आहे.

साठीच्या दशकात ही दोघे १६० पेक्षा अधिक वेळा खेळले असावेत असे काही विश्लेषक म्हणतात. एकमेकांविरुद्ध खेळताना लेव्हर यांनी ८९ – ७५ अशी आघाडी घेतली आहे. त्यात दोघांनी १-१ ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकली असून लेव्हर यांनी एकूण ११ तर रोझवॉल यांनी ८ वेळा ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत.

९- रॉजर फेडरर आणि नोव्हाक जोकोविच (२००६- आजतागायत)

रॉजर फेडरर आणि नोव्हाक जोकोविच यांच्यातील चुरस अजूनही संपली नाही हेच विशेष आहे. दोघेही अव्वल दर्जाचे खेळाडू आहेत. दोघेही टेनिसचे सुपर स्टार्स आहेत. आत्तापर्यंत दोघे एकमेकांविरुद्ध ५० वेळा खेळले. त्यात जोकोविच ने २७-२३ अशी आघाडी घेतली आहे. तर ग्रँड स्लॅम स्पर्धातही तोच ११-६ असा आघाडीवर आहे. तरी एकंदरीत ग्रँड स्लॅम चषकांच्या बाबतीत रॉजर २०-१७ असा पुढे आहे.

असे असले तरी रॉजरची लोकप्रियता आणि त्याला असणारी प्रेक्षकांची पसंती आणि प्रेम हे जोकोविचपेक्षा कैक पटीने अधिक आहे. रॉजर फेडरर याने त्यांच्या कलात्मक, परिपूर्ण अशा अभिजात खेळाने टेनिस तसेच सम्यक आणि खिलाडूवृत्तीने क्रीडा रसिकांवर गारुड केले आहे. रॉजर सध्या खेळत नसला तरी २०२१ मध्ये तो पुन्हा खेळायला लागणार आहे. पुन्हा ग्रँड स्लॅम तो जिंकू शकेल असा त्याला विश्वास आहे. तेव्हा या दोघातील चुरस अजून सुरूच असल्याने प्रेक्षकही खुश आहेत कारण दोघांची मॅच बघणे हा एक वेगळाच अनुभव असतो.

८- इव्हान लेंडल आणि जॉन मॅकॅन्रो (१९८०-१९९२)

जॉन मॅकॅन्रोसारख्या परिपूर्ण खेळाडूला हरवणारा एक खेळाडू होता तो म्हणजे इव्हान लेंडल. दोघे एकमेकांविरुद्ध ३६ वेळा खेळले. त्यात लेंडलने २१-१५ अशी आघाडी घेतली. लेंडल या खेळाडूने अत्यंत उच्च दर्जाचा फिटनेस कसा मिळवायचा आणि नियमित सराव करून सातत्य कसे टिकवायचे याचा धडा तर दिलाच आणि पायंडाही घातला. त्यामुळे अगदी रॉजर फेडरर, नदालसारखे खेळाडू मॅचेस खेळण्यापेक्षा सरावाकडे अधिक लक्ष देतात.

शांत, चिवट जरा नर्व्हस वाटणारा असा लेंडल जेव्हा रागीट मॅकॅन्रोशी खेळत असे तेव्हा प्रेक्षकांना मजा वाटे. ८४च्या यूएस ओपनचा विजय हा मॅकॅन्रोच ग्रँड स्लॅममधील शेवटचा विजय. त्या आधीच फ्रेंच ओपनमध्ये लेंडलने पहिले दोन सेट गमावून पुढले तीनही जिंकून पहिले ग्रँड स्लॅम जिंकले होते. ग्रँड स्लॅममध्येही ७-३ असा लेंडलच पुढे आहे.

 

बोरिस बेकर आणि स्टीफन एडबर्ग (१९८४ -१९९६)

जॉन मॅकॅन्रो आणि बियॉन बोर्ग यांच्या चुरशीनंतर बोरिस बेकर आणि स्टीफन एडबर्ग या जोडगोळीच्या लढती प्रेक्षकांना आवडू लागल्या होत्या. एडबर्ग अतिशय नेमस्त आणि अतिशय नेटका, ग्रेसफुल खेळ खेळणारा अगदी टिपिकल सर्व्ह आणि व्हॉली खेळणारा एक अभिजात खेळाडू. बेकर मात्र बेसलायनर. अतिशय जोरकस आणि ताकदीची सर्व्ह करणारा, जोरात फटके मारणारा आणि अतिशय धुसमुसळ्या असा होता.

दोघे ३५ वेळा एकमेकांविरुद्ध खेळले. त्यात बेकर २५-१०असा पुढे आहे. मात्र ग्रँड स्लॅम स्पर्धात एडबर्ग ३-१ ने पुढे आहे. या दोघांच्या मॅचेस देखील प्रेक्षक तन्मय होऊन बघत.

६. स्टेफी ग्राफ आणि मार्टिना नवरातिलोव्हा (१९८५ – १९९४) तसेच स्टेफी ग्राफ आणि मोनिका सेलिस (१९८८ – १९८९)

महिलांच्या टेनिसमध्ये दुसरी जोडगोळी प्रेक्षकांना खिळवून ठेवत होती. ती म्हणजे स्टेफी ग्राफ आणि मार्टिना नवरातिलोव्हा यांची. स्टेफी आली तेव्हा मार्टिना ही एक फार मोठी, लोकप्रिय खेळाडू होती तसेच स्टार होती. तसेच मार्टिनाचे करियरचा उत्तरार्ध सुरू झाला होता.

स्टेफीचा सुंदर आणि निर्दोष खेळावर टेनिस जगत लुब्ध झाले होते. मार्टिना आणि स्टेफीच्या सलग तीन विंबल्डन मॅचेस झाल्या. त्यातील पहिली मार्टिनाने जिंकली तर सगळं दोन्ही स्टेफीने जिंकल्या.

दोघींनीही एकमेकींविरुद्ध ९-९ मॅचेस जिंकल्या आहेत. ग्रँड स्लॅम स्पर्धात मात्र नवरातिलोव्हा ५-४ अशी पुढे आहे तर स्टेफीने कॅलेंडर ग्रँड स्लॅम बरोबरच ऑलिंपिक स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवण्याचा विक्रम केला आहे. बाकी एकंदरीत ग्रँड स्लॅम विजयात स्टेफी मार्टिनाच्या तुलनेत २२-१८ अशी वरचढ ठरते. त्यामुळेच अजूनही स्टेफी ग्राफची मोहिनी प्रेक्षकांवर कायम आहे.

स्टेफी ग्राफ आणि मोनिका सेलिस (१९८८ – १९८९)

स्टेफी ग्राफचा विजयी घौडदौड रोखली ती मोनिका सेलिस नावाच्या अत्यंत चिवट खेळाडूने. दोघी अनेक वर्ष खेळत होत्या तरीही एक वर्ष त्यांच्यातील चुरशीने कळस गाठला होता. ग्रँड स्लॅम विजयात दोघीही एकमेकींच्या बरोबरीत आहेत. दोघींनी एकमेकींविरुद्ध ३-३ ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकल्या. दोघींच्या एकमेकींशी १५ वेळा अत्यंत चुरशीच्या मॅचेस झाल्या. त्यात ग्राफ १०-५ अशी पुढे आहे. तसेच ग्रँड स्लॅम विजयात देखील स्टेफी २२-९ अशी पुढे आहे. दोघींनाही प्रचंड फॅन्स होते. ग्राफच्या एका माथेफिरू फॅनने संतापून सेलिसच्या पाठीत मॅच सुरू असताना सुरा भोसकला आणि सगळे टेनिस जगत हादरले. पुढे सुरक्षा व्यवस्था अतिशय कडक करण्यात आली. मात्र पुढची दोन वर्षं सेलिस खेळू शकली नाही आणि परत आल्यानंतर पुन्हा तिचा खेळ बहरला नाही.

५. आंद्रे अगासी आणि पीट सॅम्प्रस (१९८९२००२)

नव्वदीच्या दशकाच्या सुरूवातीला आंद्रे अगासी आणि पीट सॅम्प्रस या दोन अमेरिकी खेळाडूंनी मॅकॅन्रो आणि कॉनर्स यांची गादी चालवत टेनिसवर आपली पकड मजबूत केली.

अगासी आणि सॅम्प्रस हे देखील अगदी भिन्न प्रकृती आणि व्यक्तिमत्वाचे खेळाडू. अगासी अगदी स्टाईल भाई म्हणतात तसा. नव्या केशरचना करणे, प्रसिद्ध मैत्रिणी वगैरे यावरून तो स्वत:ला कायम चर्चेत ठेवत असे. तर सॅम्प्रस हा फक्त खेळावर लक्ष केन्द्रित करणारा खेळाडू. असे असले तरी दोघेही महान खेळाडू म्हणून गणले गेलेले आहेत.

दोघांच्या ३४ लढती झाल्या. त्यात २० सॅम्प्रसने तर अगासीने १४ जिंकल्या. ग्रँड स्लॅम स्पर्धेतही सॅम्प्रस ६-३ असा आघाडीवर आहे.

सॅम्प्रसने १४ ग्रँड स्लॅमस जिंकले तर अगासीने ८. सॅम्प्रस फ्रेंच ओपन कधी जिंकू शकला नाही तर कॅलेंडर ग्रँड स्लॅम म्हणजे एका वर्षी चारही ग्रँड स्लॅम अगासीने जिंकले आहेत.

सॅम्प्रसची सर्व्ह बंदुकीतून निघणार्‍या गोळीसारखी असे. टेनिसमधील सगळे शॉट्स तो कुशलतेने खेळत असे. अगासी देखील अतिशय प्रवाही आणि चमकदार खेळ खेळणारा खेळाडू. त्यामुळे या दोघांच्या मॅचेस म्हणजे दोन अगदी वेगळ्या शैलीची लढत असे. प्रेक्षक त्यामुळे या दोघांच्या लढती अतिशय रसिकतेने बघत.

४- जॉन मॅकॅन्रो आणि बियॉन बोर्ग (१९७८ -१९८१)

सत्तरीच्या उत्तरार्धात आणि ऐंशीच्या सुरूवातीला म्हणजेच टीव्ही जेव्हा सगळ्या जगभर पोचत होता त्या सुमारास जॉन मॅकॅन्रो आणि बियॉन बोर्ग या दोन टेनिसपटूंनी मोहिनी घातली होती. डोक्यात बर्फाची लादी असावी असा अत्यंत शांत बोर्ग आणि क्षणाक्षणाला चिडणारा, संतापणारा, रॅकेट आपटणारा संतापी मॅकॅन्रो अशी ही दोन ध्रुवे. दोघेही अतिशय लोकप्रिय खेळाडू. त्या काळातले खूप मोठे स्टार्स. त्यातला बोर्ग हा अतिशय लोकप्रिय सुपर स्टार.

दोघे १४ मॅचेस एकमेकांशी खेळले. दोघांनी प्रत्येकी ७-७ मॅचेस जिंकल्या. ग्रँड स्लॅम स्पर्धेत एकमेकांविरुद्ध ३-१ अशी आघाडी मॅकॅन्रोने घेतली असली तरीही बोर्गने ११ ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत तर मॅकॅन्रोने ७ जिंकल्या आहेत.

या दोघांच्या मॅचेसनी टेनिस रसिकांना लुभावून टाकले होते. कोण जिंकणार याची उत्कंठा प्रेक्षकांना असे. या दोघांच्या मॅचेसबद्दल टेनिस जगतात अजूनही बोलले जाते इतकी त्यांची मोहिनी अजूनही आहे.

३- नोव्हाक जोकोविच आणि राफाएल नदाल (२००६ – आजतागायत)

तिसर्‍या क्रमांकाची चढाओढ दिसून येते ती नोव्हाक जोकोविच आणि राफाएल नदाल यांच्यात. हे दोघेही अजून सर्वोत्तम खेळ खेळतात आहेत हे विशेष.

आजपावेतो दोघांनी ५५ वेळा एकमेकांशी लढत दिली आहे.  जोकोविच-नदाल २९-२६ अशी आकडेवारी सध्या आहे. १५ ग्रँड स्लॅम स्पर्धात नदालने १० तर जोकोविचने ६ स्पर्धा एकमेकांविरुद्ध जिंकल्या आहेत. नदालने ८५ स्पर्धा जिंकल्या आहेत तर जोकोविचने ६६ स्पर्धा जिंकल्या आहेत.

दोघेही उच्च कोटीचा बचावात्मक आणि चिवट खेळ खेळतात. दोघेही प्रथितयश व्यावसायिक खेळाडू म्हणून खूपच लोकप्रिय आहेत. टेनिस प्रेमी आणि क्रीडा रसिक या दोघांच्या मॅचेसची तिकिटे अगदी रांगा लावून खरेदी करतात. टेनिसचे हे दोन सुपर स्टार्स अजूनही अनेक रेकॉर्ड करणार तसेच मोडणार आहेत.

२- रॉजर फेडरर आणि राफाएल नदाल (२००४आजतागायत)

दुसर्‍या क्रमांकाची अतिशय प्रसिद्ध चुरस आहे जी अजूनही संपलेली नाही ती म्हणजे रॉजर फेडरर आणि राफाएल नदाल यांच्यातली. रॉजर हा ग्रास कोर्टचा (King Of Grass) सम्राट तर राफा हा क्ले कोर्टाचा शहेनशहा आहे असे मानले जाते. रॉजरने विंबल्डन ८ वेळा तर राफाने ११ वेळा फ्रेंच ओपन जिंकली आहे. दोघांनी प्रत्येक ग्रँड स्लॅम प्रत्येकी कमीतकमीत दोनदा तर जिंकली आहेच.

दोघांची खेळाची शैली प्रेक्षकांना लुभावणारी असली तरी पूर्णत: भिन्न आहे. फेडरर हा अतिशय आक्रमक खेळणारा खेळाडू आहे तर नदाल हा अतिशय बचावात्मक खेळणारा आहे. रॉजरचा खेळ अतिशय कलात्मक, नजाकतीचा आणि सगळ्या नव्या तंत्रांना जोडून घेतलेला अभिजात असा जवळजवळ परिपूर्ण खेळ आहे. तर राफाएल प्रचंड शारीरिक स्टॅमिना लागणारा, जोरकस टॉप स्पिन (heavy top spin) असणारा, बचावात्मक आणि जबरदस्त विजिगीषु वृत्ती असणारा डावखुरा असा खेळ करणारा आहे.

दोघांनी आत्तापर्यंत ४० वेळा लढती केल्या आहेत. त्यात राफा- रॉजर यांचा २४- १६ असा रेकॉर्ड आहे. अंतिम मॅचेसमध्ये १४-१० असा त्यांचा रेकॉर्ड आहे. एकंदरीत नदालने जास्त मॅचेस जिंकल्या असल्या तरी फेडररने २० ग्रँड स्लॅम्स तर नदालने १९ ग्रँड स्लॅम्स जिंकल्या आहेत. फेडररने १०३ तर नदालने ८५ स्पर्धा जिंकल्या आहेत.

या दोघांच्या अंतिम किंवा उपांत्य मॅचेस असतात तेव्हा सगळी तिकिटे खपतात. आयोजकही चढ्या भावात तिकिटे विकतात. त्यांची मॅच म्हणजे टेनिस प्रेक्षकांच्या डोळ्याचं पारणं फेडणार्या असतात. दोन वेगळ्या शैली आणि दोघांचाही सर्वोत्तम शारीरिक फिटनेस. दोघेही खेळतात अगदी योद्ध्यासारखे. दोघेही अतिप्रसिद्ध सुपर स्टार्स. दोघांची वागणूक नेमस्त. त्यात फेडरर तर अगदी दैवी वरदहस्त असल्यासारखा खेळतो आणि वागतो. नदाल जरा आक्रमक वागतो पण बचावात्मक खेळतो. दोघांनीही उच्च कोटीची क्षमता, टेनिसमधील प्रत्येक शॉट अत्यंत सफाईदारपणे खेळण्याचं कसब आणि परिपूर्ण व्यावसायिकता याचा अपूर्व संगम म्हणजे हे दोघे महान खेळाडू टेनिस आणि क्रीडा रसिकांच्या गळ्यातील ताईत नसतील तर त्यात काय नवल? प्रत्येकवेळी ते रॅकेट उचलतात तेव्हा ते नवीन रेकॉर्ड करतात किंवा मोडतात. समाधानाची गोष्ट म्हणजे ही दोघे अजूनही तितकाच उत्तम, लुभावणारा खेळ खेळतात आहेत आणि स्पर्धा जिंकण्याची त्यांची आकांक्षा तसूभरही कमी झालेली नाही.

१- ख्रिस एव्हर्ट आणि मार्टिना नवरातिलोव्हा (१९७३- १९८८)

टेनिसमधील सगळ्यात प्रसिद्ध चुरस आणि अनेक वर्षे चाललेली चढाओढ कोणात असेल तर ती ख्रिस एव्हर्ट आणि मार्टिना नवरातिलोव्हा यांच्यात. त्या जेव्हा खेळत असत तेव्हा फक्त टीव्ही होता. सोशल मीडिया नव्हता नाहीतर दोघींच्या चढाओढीच्या प्रचंड कथा, बातम्या तसे मीम्स आले असते.

दोघी ८० वेळा एकमेकींशी खेळल्या आणि त्यातील ६० मॅचेस कुठल्या ना कुठल्या तरी टूर्नामेंट मधील अंतिम मॅच त्या खेळल्या आहेत. दोघींनीही प्रत्येकी १८ ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत.

७०च्या दशकात ख्रिस सर्वोत्तम होती तर ८०च्या दशकात मार्टिना सर्वोत्तम होती. मार्टिना विरुद्ध ख्रिसने चार ग्रँड स्लॅम जिंकले तर दहा मार्टिनाने ख्रिस विरुद्ध जिंकले. एकंदरीत मार्टिना-ख्रिस यांनी एकमेकींविरुद्ध ४३ – ३७ असे विजय मिळवले आहेत. ख्रिसने ७ वेळा फ्रेंच ओपन जिंकली असून ती खरी क्ले कोर्टची राणी समजली जाते. मार्टिनाने हार्ड आणि ग्रास कोर्टवर ख्रिसला अनेकदा पराभूत केले आहे.

दोघींच्या मॅचेस म्हणजे प्रेक्षकांसाठी पर्वणीच असे. दोघींही अतिशय लोकप्रिय होत्या आणि दोघींही अतिशय चिवटपणे खेळत त्यात मार्टिना तर जास्तच चेवाने खेळे. त्या दोघी इतक्या लोकप्रिय होत्या की युरोप अमेरिकेतील अनेक पालक त्यांच्या मुलींची नवे ख्रिस किंवा मार्टिना ठेवत.

एकंदरीत टेनिस हा लहान आणि मोठ्यांना आवडणारा सुंदरसा खेळ. त्याची मोहिनी अजूनही कायम आहे ती या खेळाच्या स्वरूपामुळे आणि पिढ्यानपिढ्या तयार झालेल्या सुपर स्टार्स खेळाडू आणि त्यांच्या लुभावणार्‍या खेळामुळे. ती मोहिनी तशीच कायम राहणार यात शंका नाही.

गायत्री चंदावरकर,या इन्स्ट्रक्शनल डिझाइन कन्सल्टंट असून पुणे विद्यापीठात अभ्यागत प्राध्यापिका आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0