मॉसक्युरिक्स लसः मलेरियावर अंतिम घाव?

मॉसक्युरिक्स लसः मलेरियावर अंतिम घाव?

मलेरियावरची ऐतिहासिक अशी मॉसक्युरिक्स लस विकसित करण्यासाठी ३० वर्षांचा कालावधी लागला. ही लस विकसित करण्यामागे एकमेव उद्धेश म्हणजे उप-सहारा आफ्रिकेतील लहान मुलांचे या घातक आजारापासून संरक्षण करणे.

६ ऑक्टोबर २०२१, एक ऐतिहासिक क्षण..! या दिवशी जागतिक आरोग्य संघटनेने मॉसक्युरिक्स-Mosquirix (RTS,S/ASO1 (RTS.S)) या जगातील पहिल्या मलेरिया लसीच्या विस्तृत वापरासाठी परवानगी दिली. सध्या या लसीचा वापर फक्त आफ्रिका खंडापुरता मर्यादित आहे. या लसीमुळे मलेरियाला हरविण्यासाठी आणखीन एक नवीन अस्त्र आपणास सापडले आहे. मलेरियामुळे जगामध्ये दर दोन मिनिटाला एका बालकास जीव गमवावा लागतो. मलेरियामुळे होणारे बहुतांशी मृत्यू हे आफ्रिका खंडात नोंदवले जातात. आफ्रिका खंडामध्ये दरवर्षी सुमारे २,५०,००० पेक्षा जास्त मुले या आजाराने मृत्युमुखी पडतात. मलेरियाचा सर्वाधिक धोका हा पाच वर्षाखालील मुलांना आहे. जागतिक पातळीवर विचार केला तर वर्षाला सुमारे ४,३५,००० व्यक्ती मलेरियामुळे दगावतात आणि त्यातील बहुतांशी लहान मुले आहेत.

मलेरिया हा आजार प्रामुख्याने तापमान, आर्द्रता आणि पाऊस यासारख्या हवामान घटकांवर अवलंबून आहे. हे असे घटक आहेत की जे डासांच्या उत्पत्तीवर व मलेरिया परजीवींच्या जीवनचक्रावर परिणाम करतात.  त्यामुळे मलेरिया हा प्रामुख्याने जगातील उष्णकटिबंधीय आणि उपोष्णकटिबंधीय भागांमध्ये आढळतो. यामध्ये प्रामुख्याने आफ्रिका खंडाचा, आग्नेय आशिया व पूर्व भूमध्य प्रदेश यांचा समावेश होतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या २०१९मधील अहवालानुसार जगाच्या ९४ टक्के मलेरिया रुग्ण हे एकट्या आफ्रिका खंडातील उप-सहारा आफ्रिका या भौगोलिक क्षेत्रात आढळले.

मलेरिया हा प्लाझमोडियम परजीवींमुळे होतो. हे परजीवी ॲनाफिलीस डासांच्या मादींच्या माध्यमातून मलेरिया माणसांमध्ये पसरवतात. संक्रमित व्यक्तींना ज्यावेळी हे डास चावतात त्यावेळी प्लाझमोडियम परजीवी रक्तावाटे डासाच्या शरीरात प्रवेश करतात. डासांच्या शरीरामध्ये ते स्वतःच्या जीवनचक्राचा काही भाग पूर्ण करतात व ज्यावेळी  हे डास दुसऱ्या व्यक्तीला चावतात त्या वेळी हे परजीवी डासाच्या लाळेतून त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये शिरकाव करतात. या ठिकाणी ते त्यांच्या जीवनचक्राचा राहिलेला भाग यकृत व तांबड्या पेशींमध्ये पूर्ण करतात. जीवनचक्राचा हा भाग पूर्ण होत असताना ते यकृत पेशी व तांबड्या पेशींना नष्ट करतात आणि त्याचाच परिणाम म्हणून मलेरियाची लक्षणे दिसण्यास सुरवात होते. मलेरियाच्या लक्षणांमध्ये  ताप आणि फ्लूसारखा आजार, ज्यामध्ये थरथरून थंडी वाजणे, डोकेदुखी, स्नायू दुखणे आणि थकवा यांचा समावेश आहे. मळमळ, उलट्या आणि अतिसार देखील होऊ शकतो. लाल रक्तपेशी नष्ट झाल्यामुळे अशक्तपणा आणि कावीळ (त्वचा आणि डोळ्यांचा रंग पिवळा) होऊ शकते. जर तातडीने उपचार केले गेले नाहीत तर संक्रमण गंभीर होऊ शकते आणि मूत्रपिंड निकामी होणे, झटके, मानसिक गोंधळ, कोमा आणि मृत्यू देखील होऊ शकतो. ॲनाफिलीस डासांची मादी या परजीवींचे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे वहन करीत असल्यामुळे त्यांना मलेरिया वेक्टर असे संबोधले जाते.

मलेरिया परजीवींच्या एकूण पाच प्रजातीमुळे मानवांमध्ये मलेरिया होतो. या पैकी दोन प्रजाती-प्लाज्मोडियम फाल्सीप्यारम आणि प्लाज्मोडियम व्हायवॅक्स या अतिशय धोकादायक व जीवघेण्या आहेत. आफ्रिका खंडातील देशांमध्ये ९९.७ टक्के मलेरिया प्रकरणे, दक्षिण-पूर्व आशिया प्रदेशातील (बांगलादेश, भूतान, उत्तर कोरिया, भारत, इंडोनेशिया, मालदीव, म्यानमार, नेपाळ, श्रीलंका, थायलंड, तिमोर-लेस्ते) ५० % मलेरिया प्रकरणे पूर्व भूमध्य प्रदेशातील (अफगाणिस्तान, बहरिन, जिबूती, इजिप्त, इराण, इराक, जॉर्डन, कुवेत, लेबनॉन, लिबिया, मोरोक्को, ओमान, पाकिस्तान, पॅलेस्टाइन, कतार, सौदी अरेबिया, सोमालिया, सुदान, सीरियन अरब प्रजासत्ताक, ट्युनिशिया, संयुक्त अरब अमिराती व येमेन) ७१%  मलेरिया प्रकरणे व पश्चिम पॅसिफिक प्रदेशातील (ऑस्ट्रेलिया, ब्रुनेई, कंबोडिया, चीन, कुक बेटे, फिजी, जपान, किरीबाती, लाओस, मलेशिया, मार्शल बेटे, मायक्रोनेशिया, मंगोलिया, नारू, न्यूझीलंड, नीयू, पलाऊ, पापुआ न्यू गिनी, फिलिपिन्स, कोरिया प्रजासत्ताक, समोआ, सिंगापूर , सोलोमन बेटे, टोंगा, तुवालु, वानुअतु, व्हिएतनाम ) ६५% मलेरिया प्रकरणे ही एकट्या प्लाज्मोडियम फाल्सीप्यारममुळे होतात. अमेरिकेच्या डब्ल्यूएचओ प्रदेशांमध्ये आढळणाऱ्या एकूण मलेरिया प्रकरणांच्या ७५ टक्के प्रकरणे ही प्लाज्मोडियम व्हायवॅक्स या परजीवींमुळे होतात. त्यामुळे प्लाज्मोडियमच्या या दोन प्रजाती खूप घातक मानल्या जातात.

जागतिक मलेरिया प्रकरणांमध्ये आफ्रिका खंडातील उप-सहारा आफ्रिका अग्रस्थानी असल्याकारणाने या प्रदेशास जागतिक मलेरियाचा केंद्रबिंदू संबोधल्यास वावगे ठरणार नाही. यामुळेच जागतिक आरोग्य संघटनेचा मलेरिया विरुद्धचा लढा या प्रदेशामध्ये केंद्रित झाला आहे. आता मॉसक्युरिक्सच्या मदतीने हा लढा आणखीन मजबूत होणार आहे. मॉसक्युरिक्स ही लस ग्लॅक्सोस्मिथक्लाइन बायोलॉजिकल्सने (ग्लॅक्सोस्मिथक्लाइन), वॉल्टर रीड आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च (WRAIR), प्रोग्राम फोर अप्प्रोप्रिएट टेक्नोलॉजी इन हेंल्थ (PATH) आणि इतर अनेक भागीदारानी मिळून विकसित केली आहे. यासाठी बिल आणि मेलिंडा गेट्स फौंडेशन यांचे सहकार्य लाभले. रिकॉम्बिनांट( पुनःसंयोजक) किण्व (यीस्ट) – सॅक्रोमायसिस सेरेव्हिसी (Saccharomyces cerevisiae RIX4397) चा वापर करून या लसीची निर्मिती केली आहे. हे किण्व आपण बेकरी किंवा घरी पाव तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या बेकर्स यीस्ट सारखेच आहे. यामध्ये जनुकीय पातळीवर बदल केल्यामुळे त्यास रिकॉम्बिनांट( पुनःसंयोजक) किण्व (यीस्ट) असे संबोधले जाते. असे जनुकीय पातळीवर बदलेले किण्व मलेरिया परजीवीचे (प्लाज्मोडियम  फाल्सीप्यारमचे) प्रथिने (प्रोटीन) तयार करतात. अशा प्रथिनांचा वापर मॉसक्युरिक्स या लसीमध्ये केला आहे. ही ऐतिहासिक लस विकसित करण्यासाठी ३० वर्षांचा कालावधी लागला. ही लस विकसित करण्यामागे एकमेव उद्धेश म्हणजे उप-सहारा आफ्रिकेतील लहान मुलांचे या घातक आजारापासून संरक्षण करणे.

२००९-२००१४ यादरम्यान मॉसक्युरिक्सच्या फेज ३ मधील चाचण्या घेण्यात आल्या. यासाठी उप-सहारा आफ्रिकेमधील ७ देशांतील १५,४५९ जणांची नोंदणी करण्यात आली, यामध्ये ५-१७ महिन्याची ८,९२२ लहान मुले तर ६-१२ आठवड्याची ६,५३७ नवजात बालके होती. या सर्वांना मॉसक्युरिक्सचे वैज्ञानिक पद्धतीने ४ डोस देण्यात आले. मॉसक्युरिक्सचे ४ डोस घेणाऱ्या मुलांमध्ये मलेरिया आणि मलेरियाशी संबंधित गुंतागुंतीमध्ये लक्षणीय घट झाल्याचे आढळले. लसीच्या वापरामुळे १० पैकी ४ प्रकरणांमध्ये मलेरियाला अटकाव झाला. गंभीर मलेरियाच्या १० पैकी ३ प्रकरणामध्ये आजाराची गंभीरता कमी झाली तर अति गंभीर मलेरिया जिथे लाल रक्तपेशींची संख्या खूपच कमी होते व अशक्तपणा येतो आणि रुग्ण दगावण्याची शक्यता वाढते, अशा ठिकाणी १० पैकी ६ प्रकरणांमध्ये लक्षणीय घट झाल्याचे आढळले. या बरोबरच मलेरिया उपचारासाठी गरजेच्या असलेल्या रुग्णालयातील उपचार आणि बाहेरून रक्त देण्याची गरज यामध्येही लक्षणीय घट दिसून आली.

ही सर्व सकारात्मक निरीक्षणे ही मलेरियास प्रतिबंध करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या उपाय योजनांव्यतिरिक्त असल्याकारणाने लसीची उपयोगिता अधोरेखित झाली.

युरोपिअन मेडिसीन एजन्सीने २०१५ मध्ये आफ्रिकेतील नवजात बालके व लहान मुलांमध्ये या लसीच्या वापरासाठी मान्यता दिली. लसीच्या सुरक्षिततेची खात्री झाल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने प्रारंभिक अभ्यासाठी उप-सहारा आफ्रिकेतील देशांकडून त्यांची सहमती मागवली. देशांची निवड करीत असताना त्या ठिकाणी सक्रीय मलेरिया व लसीकरण कार्यक्रम आहेत का, व मध्यम ते उच्च मलेरिया संक्रमणाची क्षेत्रे समाविष्ट असल्याची खात्री करण्यात आली. १० देशांपैकी मलावी, घाना आणि केनिया यांची निवड या अभ्यासासाठी करण्यात आली. या अभ्यासाची सुरुवात मलावी देशातून झाली. या अभ्यासामध्ये ५ ते १७ महिन्याच्या बालकांचा समावेश करण्यात आला आणि त्यांना या लसीचे एकूण ४ डोस देण्यात आले. जवळपास ८,००,००० पेक्षा जास्त बालकांचे लसीकरण या अभ्यासाअंतर्गत करण्यात आले. सदरच्या अभ्यासाच्या निकालावरून लसीच्या परिणामकारकता व उपयोजितासंदर्भात खूप महत्त्वाचे निष्कर्ष मिळणार होते. या लसीने गंभीर मलेरियाच्या केसेसमध्ये ३०% परिणामकारकता दाखवली. वरवर पाहता ही परिणामकारकता जरी कमी वाटत असली तरी ती आफ्रिकेसारख्या खंडांमध्ये मलेरियाला अटकाव करून लहान मुलांचा मृत्यूदर कमी करण्यासाठी खूपच उपयुक्त आहे. वैज्ञानिकांच्या मते या लसीमुळे एकूण मलेरियाच्या प्रकरणांमध्ये व  त्यामुळे होणार्या मृत्यूमध्ये बऱ्यापैकी घट होईल.

गेले दोन वर्षे आपण करोना विषाणूशी लढत आहोत. कोरोनावरील लसीमुळे या लढ्याला आणखी बळकटी मिळाली. जरी आपण कोरोना विषानुचा प्रसार अधिक परिणामकारक्तेने रोखू शकत नसलो तरी लसीचा वापर करून नक्कीच आजाराला नियंत्रणात आणू शकलो आहे. असाच काहीसा दिलासा आपल्याला मलेरियाच्या बाबतीमध्ये मॉसक्युरिक्स या लसीमुळे मिळाला आहे. मलेरिया हा डासांमुळे पसरत असल्याकारणाने लसीकरणाबरोबर डास चावणार नाहीत यासाठीच्या नेहमीच्या उपाय योजना जसे पूर्ण बाहीचे संरक्षक कपडे वापरणे, मच्छरदाणी वापरणे, डासांची उत्पत्ती थांबवणे इ. करणे गरजेचे आहे. रोगांच्या नियंत्रणामध्ये लसींचे खूप मोठे योगदान आहे. मलेरिया प्रतिबंधात्मक उपायांबरोबर मॉसक्युरिक्स लसीचा प्रभावीपणे वापर केल्यास मलेरियाचे नियंत्रण करणे खूप सोपे होईल. यामुळे वैयक्तिक व आफ्रिका खंडातील गरीब देशांची सामाजिक व आर्थिकस्तर उंचावण्यास नक्कीच मदत होईल. सध्या मॉसक्युरिक्सची परिणामकारकता जरी कमी असली तरी ती  भविष्यामध्ये संशोधनाच्या व नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने वाढवता येईल. त्यामुळे संयुक्त राष्ट्रच्या शाश्वत विकास ध्येयानुसार २०३६पर्यंत मलेरियाचे प्रमाण आणि मृत्यूदर ९०% नी कमी करणे सहज शक्य होईल व जगातील मलेरियाप्रवण देशांमधील सर्व वयोगटातील नागरिकांना निरोगी व आनंदी जीवन जगता येईल.

विनायक पांडुरंग सुतार, हे देशभक्त आनंदराव बळवंतराव नाईक महाविद्यालय, चिखली येथे सूक्ष्मजीवशास्त्र विभागात सहाय्यक प्राध्यापक आहेत.

COMMENTS