एमएसपी लागू न करण्यामागे मोदींचा मित्र अदानी : सत्यपाल मलिक

एमएसपी लागू न करण्यामागे मोदींचा मित्र अदानी : सत्यपाल मलिक

किमान आधारभूत किंमत (एमएसपी) लागू करण्याच्या शेतकऱ्यांच्या मागणीला पाठिंबा देताना मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, की तुम्ही देशातील शेतकऱ्यांना पराभूत करू शकत नाही. त्याच्याकडे ईडी, इन्कम टॅक्सचे लोक पाठवू शकत नाही. शेतकरी लढेल आणि एमएसपी घेईल.

‘द ग्रेट सायलन्स’: सत्तेच्या निर्घृण दमनतंत्राची कहाणी
महाराष्ट्राला अ‍ॅथलेटिक्स, जलतरणात ५ सुवर्णपदके
लॉकडाऊनच्या काळात आत्महत्येच्या संख्येत वाढ

नवी दिल्ली: मेघालयाचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी हरियाणातील नूहच्या किरा गावात एका कार्यक्रमात किमान आधारभूत किंमत (एमएसपी) लागू करण्याच्या शेतकऱ्यांच्या मागणीचे समर्थन करताना केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

नवभारत टाईम्सच्या वृत्तानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मित्र अदानी एमएसपी लागू न करण्यामागे असल्याचे त्यांनी सांगितले.

केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांच्या पिकांना एमएसपीची कायदेशीर हमी आणि त्याच्या अंमलबजावणीबाबत राज्यपाल मलिक म्हणाले, “एमएसपी लागू होईपर्यंत, कायदेशीर दर्जा मिळत नाही तोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाहीत. जर आता एमएसपी लागू केली नाही, तर पुन्हा लढा होईल, जोरदार लढाई होईल.”

ते पुढे म्हणाले, ‘तुम्ही देशातील शेतकऱ्यांना पराभूत करू शकत नाही. त्यांच्याकडे ईडी आणि इन्कम टॅक्सचे लोक पाठवू शकत नाही, मग त्यांना घाबरवणार कसे? शेतकरी लदहेल आणि एमएसपी घेईल.

उद्योगपती गौतम अदानी यांच्याशी असलेल्या संबंधांवरून मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. ते म्हणाले, ‘एमएसपी लागू न होण्यामागचे कारण पंतप्रधानांचे मित्र आहे, ज्याचे नाव अदानी आहे. पाच वर्षांत तो आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनला आहे.”

ते म्हणाले, “मला मेघालयाहून येण्यासाठी गुवाहाटी विमानतळावर यावे लागते. मला तिथे एक मुलगी दिसली. तिच्या हातात पुष्पगुच्छ होता. मी तिला विचारले, तेव्हा तिने सांगितले की ती अदानींच्या कडून आली आहे. मी याचा अर्थ विचारल्यावर तिने सांगितले की हे विमानतळ अदानी यांना देण्यात आले आहे. …अदानींना विमानतळ, बंदरे, मोठमोठ्या योजना दिल्या आहेत… एकप्रकारे देश विकण्याची तयारी आहे, पण आम्ही तसे होऊ देणार नाही.”

दैनिक जागरणच्या वृत्तानुसार, मलिक म्हणाले, “अदानी यांनी पानिपतमध्ये गव्हाचे एक मोठे गोदाम बांधले आहे, जे स्वस्तात घेतलेल्या गव्हाने भरले आहे. महागाई वाढली की तो गहू बाहेर काढला जाईल. म्हणजे हे पंतप्रधानांचे मित्र नफा कमावतात आणि शेतकरी देशोधडीला लागतो. ही बाब खपवून घेतली जाणार नाही, याविरोधात लढा दिला जाईल.”

शेतकरी आणि त्यांच्या मागण्यांवरून मलिक यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर हल्ला करण्याची ही पहिलीच वेळ नाही.

या वर्षी जानेवारीमध्ये त्यांनी पंतप्रधानांवर ‘अहंकारी’ असल्याचा आरोप केला होता.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0