ज्यांच्या जमिनी मुळशी धरणात गेल्या आहेत, त्या मुळशी धरणग्रस्तांना अधिकृत घरे मिळावीत, गावठाण दर्जा मिळावा, मुळशी धरणग्रस्त वेळोवेळी करत असलेल्या विविध
ज्यांच्या जमिनी मुळशी धरणात गेल्या आहेत, त्या मुळशी धरणग्रस्तांना अधिकृत घरे मिळावीत, गावठाण दर्जा मिळावा, मुळशी धरणग्रस्त वेळोवेळी करत असलेल्या विविध मागण्या आणि धरणग्रस्त भागाच्या पायाभूत विकासासाठी आणि धरणग्रस्तांच्या रोजगार निर्मितीसाठी शासनाने ५०० कोटी रुपये निधी द्यावा, या मागणीसाठी धरणग्रस्त गावकऱ्यांनी आज गांधी जयंतीनिमित्त एक दिवसाचा सत्याग्रह केला.
आंदोलनाचे आयोजक अनिल पवार म्हणाले की १०० वर्षांपूर्वी मुळा आणि निळा नदीच्या संगमावर मुळशीला टाटा कंपनीने एका मोठ्या धरणाची निर्मिती केली. या धरणात तालुक्यांतील तब्बल ५२ गावे बुडाली होती. त्यांना त्यावेळी नये मिळाला नाही. त्यांचे सर्वस्व बुडाले होते. अशा अवस्थेत ते मिळेल त्या ठिकाणी आजपर्यंत राहिले आहेत. ज्या ज्या ठिकाणी हे सर्व लोक गेली १०० वर्षे राहत आहेत, “ती घरे आमच्या नावावर करून द्या आणि त्या सर्व घरांचे मिळून बनलेल्या गावाला गावठाणाचा दर्जा द्या” ही मागणी गेले १०० वर्षे हे सर्व ग्रामस्थ करत आहेत. मुळशी तालुक्याला त्यागाची मोठी परंपरा लाभली आहे. या त्यागाचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे मुळशी धरणाची निर्मिती होय. मात्र या त्यागानंतरही १०० वर्षे मुळशी धरणग्रस्त बांधव न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत.
“आम्ही १०० वर्षे विविध मागण्या करत आजही न्यायाच्या प्रतिक्षेत आहोत. न्याय्य मागण्यांसाठी २ ऑक्टोबर २०२१ या गांधी जयंतीला सेनापती बापट स्मारक माले तालुका मुळशी येथे मुळशीतील धरणग्रस्तांनी एक दिवसीय उपोषण केले व सत्याग्रह पुकारला” असे पवार यांनी सांगितले.
मुळशी धरणातील पाण्यावर टाटा कंपनी मुंबईला वीज पुरवते. काही गावांना शेतीसाठी या पाण्याचा उपयोग होतोय, काही गावांना मुळशी प्रादेशिक योजनेतून पिण्यासाठी पाणी मिळत आहे, काही गावांसाठी ही योजना प्रस्तावित आहे, तर पुणे शहराला ५ टी एम सी पाणी देण्यासाठी नुकतीच राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. मात्र ज्यांनी आपल्या जमिनी दिल्या त्यांना न्याय मिळालेला नाही, असे गावकऱ्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना अनेक वक्ते म्हणाले, “पक्षीय राजकारण आणि जात, धर्म असे सर्व मतभेद विसरून सर्वांनी या समस्येवर मार्ग काढण्यासाठी एकत्र आले पाहिजे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, मुळशीच्या खासदार सुप्रिया ताई सुळे, आमदार संग्राम थोपटे यांनी या प्रश्नी विशेष लक्ष द्यावे आणि मुळशी सत्याग्रह शताब्दी वर्षातच हा प्रश्न मार्गी लावावा. अन्यथा मुळशीतील धरणग्रस्त संघर्षाची भूमिका घेतील.”
राष्ट्रीय पाणी विषयाचे अभ्यासक आणि मंथन अभ्यास केंद्राचे श्रीपाद धर्माधिकारी यांनी या उपोषण व सत्याग्रहास पाठींबा दिला. तसेच पाण्यावर आणि सर्व नैसर्गिक संसाधनांवर पहिला अधिकार विस्थापित घटकांचा आणि मगच इतरांचा असायला हवा अशी भूमिका मांडली.
या सत्याग्रहात महेश मालुसरे, राजेश सातपुते, गणपत वाशिवले, माजी सभापती बाबा कंधारे, सागर काटकर जि प सदस्य, अनिल मापारी, गोविंद सरुसे, स्वाती ढमाले, एकनाथ दिघे, दत्ता दिघे, सुभाष वाघ, सचिन पळसकर, विजय भुस्कुटे, नंदिनी ओझा, अनिल निवेकर, सचिन खैरे, सागर काटकर उपस्थित होते.
COMMENTS