मुंबईत कोरोनाचे दोन संशयित, चीनमध्ये २६ मृत्यू

मुंबईत कोरोनाचे दोन संशयित, चीनमध्ये २६ मृत्यू

बीजिंग/शांघाय/नवी दिल्ली/मुंबई/जिनिव्हा : कोरोना या विषाणूमुळे चीनमध्ये आजपर्यंत २६ जणांचा मृत्यू झाला असून मुंबईत दोन संशयित रुग्ण आढळल्याने खळबळ माजली आहे.

कोरोनाचे संकट येण्याची शक्यता पाहून मुंबई महापालिकेने कस्तुरबा गांधी इस्पितळात स्वतंत्र कक्ष सुरू केला असून तेथे चीनमधून आलेल्या दोन संशयित रुग्णांची तपासणी केली जात आहे. १९ जानेवारीला चीनमधून १,७८९ प्रवासी आले होते. या सर्वांची चाचणी केली आहे. या चाचणीत दोन प्रवाशांना लागण झाल्याचा संशय आहे, से महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांनी सांगितले.

दरम्यान कोरेनाची लागण ८३० जणांना झाल्याचे चीन सरकारने जाहीर केले असून याचे संक्रमण रोखण्यासाठी खबरदारी म्हणून चीनने वुहानसहित १३ अन्य शहरांमध्ये कोणालाही जाण्यास बंदी घातली आहे.

सध्या चिनी नववर्षाच्या धामधुमीमुळे चीनमध्ये मोठ्या प्रमाणात लोक खरेदीसाठी घराबाहेर पडले आहेत. तसेच या काळात पर्यटनालाही गती मिळत असल्याने चीनमधील सर्व वाहतूक सेवा विस्कळीत होत असते. या पार्श्वभूमीवर गुरुवारी चीनने १३ शहरांमध्ये येणाऱ्या सर्व कार, बस, ट्रेन व विमानांना बंदी घातली आहे.

चीनच्या आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार कोरोनाचे सर्वाधिक बळी-(२४) मध्य चीनस्थित हुबेई प्रांतात झाले असून २० प्रांतात १,०७२ संशयित केस आढळून आल्या आहेत.

१३ शहरे बंद, बीजिंगही बंद

चीनने जी १३ शहरे बंद केली आहेत, त्या शहरांमधील एकूण लोकसंख्या ४ कोटीच्या आसपास आहे. या शहरांमध्येही मनोरंजन ठिकाणे, चित्रपटगृह, इंटरनेट कॅफे, मॉल बंद करण्यात आले आहेत. चीनने बीजिंगलाही बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून शहरातील इम्पिरियल पॅलेस शनिवारपर्यंत बंद राहणार आहे.

वुहान सर्वाधिक प्रभावित

कोरोना विषाणूची लागण झालेली पहिला घटना हुबेईची राजधानी वुहानमध्ये आढळून आली. त्यानंतर या विषाणूची माहिती प्रसिद्ध झाली. काही वर्षांपूर्वी चीनमध्ये सार्स या विषाणूजन्य आजाराचे रुग्ण सापडले होते. तशी लक्षणे कोरोना लागण झालेल्या व्यक्तीत दिसल्याने चीनने खबरदारीचे उपाय योजले आहेत.

कोरोना साथीला अद्याप जागतिक आरोग्य संघटनेने आणीबाणी म्हणून जाहीर केलेले नाही.

वुहानमध्ये सध्या ७०० भारतीय विद्यार्थी राहात आहे. या विद्यार्थ्यांशी भारतीय दुतावास संपर्क ठेवून आहे.

प्रजासत्ताक दिन रद्द

कोरोना विषाणुमुळे बीजिंगमधील भारतीय दुतावासात होणारा प्रजासत्ताक दिन समारंभ रद्द करण्यात आला आहे.

कोरोनाची लागण झाल्यास ताप, खोकला, श्वासोच्छावासास अडचण येते व जोरदार धाप लागते.

COMMENTS