२६ सप्टेंबर रोजी, दररोज आढळणाऱ्या रुग्णांची सरासरी संख्या गेल्या महिन्यातील याच काळात आढळलेल्या रुग्णसंख्येच्या तुलनेत सुमारे दुप्पट होती, असे बृहन्मुंबई महानगरपालिकेने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीतून दिसून येते.
कोविड-१९ रुग्णांची संख्या देशभरात वाढत असताना, या साथीचा सर्वाधिक फटका बसलेल्या मुंबई शहरात, पुन्हा एकदा रुग्णांच्या दैनंदिन संख्येत मोठी वाढ दिसून आली.
२६ सप्टेंबर रोजी, दररोज आढळणाऱ्या रुग्णांची सरासरी संख्या गेल्या महिन्यातील याच काळात आढळलेल्या रुग्णसंख्येच्या तुलनेत सुमारे दुप्पट होती, असे बृहन्मुंबई महानगरपालिकेने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीतून दिसून येते.
मात्र, या वाढीला कोविडची दुसरी लाट म्हणता येणार नाही, असे महापालिका आयुक्त इक्बाल सिंग एका ऑनलाइन कार्यक्रमात म्हणाले. बीएमसीच्या डेटानुसार, आर मध्यवर्ती प्रभाग (बोरिवली, गोराई, चोगले नगर), एच पश्चिम प्रभाग (वांद्रे पश्चिम) आणि के पश्चिम प्रभाग (अंधेरी पश्चिम आणि ओशिवरा) या भागांमध्ये आत्तापर्यंत कोविड-१९चे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. या भागातील रुग्णवाढीचा दर शहराच्या सरासरीहून दुप्पट आहे.
“कोविडच्या रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ होत आहे आणि हा रिपोर्टेड केसेसचा आकडा आहे. प्रत्यक्षात कोविडची लागण झालेल्यांची संख्या याहूनही अधिक असू शकते,” असे व्यवसायाने डॉक्टर असलेले निदान ग्रुपचे संस्थापक डॉ. नितीन थोरवे म्हणाले. “मात्र, मृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे, कारण, लोकांमध्ये जागरूकता वाढली आहे आणि डॉक्टरांनाही उपचारांचे नियम पक्के माहीत झाले आहेत.”
अंधेरी पश्चिम येथील सिटीकेअर हॉस्पिटल आणि गोरेगाव पूर्व येथील नेस्को विलगीकरण केंद्रातील डॉ. आरती यादव म्हणाल्या की, कोविडच्या रुग्णसंख्येत पुन्हा वाढ झाली आहे. घरात अंथरुणाला खिळलेल्या ज्येष्ठ नागरिकांमध्ये कोविडची लागण होण्याचे प्रमाण खूप वाढले आहे.
गोरेगाव पश्चिम भागात एका अपार्टमेंट संकुलात राहणाऱ्या एका रहिवासी महिलेच्या मते जागरूकता वाढल्याच्या दाव्यात काही तथ्य नाही. या संकुलात दहाहून अधिक जणांना कोविडचा संसर्ग झालेला आहे. त्या म्हणाल्या, “लोक आता कोविड-१९ या प्रकाराला निर्ढावले आहे आणि काहीच गांभीर्याने घेत नाही आहेत. अनेक लोक मास्क नीट वापरत नाहीत, सार्वजनिक वाहतुकीमध्ये शारीरिक अंतराचा नियम पाळत नाहीत, कामाची ठिकाणे वेगाने सुरू केली जात आहेत, लोक विविध कारणांसाठी प्रतिबंधात्मक उपाय न करता एकत्र येऊ लागले आहेत, सार्वजनिक स्वच्छता पुरेशी नाही.” हे मत अन्य अनेक रहिवाशांनीही व्यक्त केले.
रुग्णसंख्येतील वाढीला गेल्या आठवड्यात मुंबईत झालेल्या जोरदार पावसाचीही पार्श्वभूमी होती. नायर हॉस्पिटल हे डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल पाण्याने भरले होते. गेल्या महिन्यात झालेल्या पावसामुळे जेजे हॉस्पिटल आणि बांद्रा कुर्ला संकुल कोविड केअर केंद्रातही पाणी साचले होते. दोन आठवड्यांपूर्वी नेस्को क्वारंटाइन सेंटरमध्येही पाणी भरले होते. व्यवस्थापनाला हे पाणी बाहेर काढावे लागले.
डॉ. यादव म्हणाले, “पावसामुळे वाहतूक कठीण झाल्याने काही रुग्णांना वेळेत वैद्यकीय मदतही मिळू शकली नाही. वैद्यकीय वस्तूंच्या पुरवठ्यावरही परिणाम झाला.”
गोरेगाव पश्चिमेकडील रहिवाशांच्या मते पाणी साचल्यामुळे वैद्यकीय सहाय्य घेणे कठीण झाले. पाणी भरल्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली आणि लोकांना अधिक वेळ घराबाहेर काढावा लागला, परिणामी विषाणूच्या संसर्गाचा धोका वाढला. गेल्या आठवड्यात मुसळधार पावसामुळे प्रशासनाला लोकलगाड्या रद्द कराव्या लागल्या व मोजक्या गाड्यांमध्ये गर्दी वाढली.
मुसळधार पावसामुळे सार्वजनिक स्वच्छतेवरही परिणाम झाला आहे आणि कंटेनमेंट झोन सील करण्याच्या अधिकाऱ्यांच्या क्षमतेवरही परिणाम झाला आहे. पूर्वी एखाद्या भागात कोविड-१९चे रुग्ण आढळल्यास बीएमसीतर्फे तातडीने आसपासचा परिसर निर्जंतुक केला जात होता व प्रभावित भाग सील केला जात होता. मात्र, पावसामुळे या प्रक्रियांचे पालन त्रासदायक झाले आहे.
याशिवाय, लोकांना अतिसारासारखे जीवाणूजन्य प्रादुर्भाव होण्याचा धोका पावसामुळे वाढलेला आहे. याचा ताण स्थानिक रुग्णालयांवर आला, तर कोविड-१९ रुग्णांवर त्याचा परिणाम होईलच. निवारा घरांमध्ये साथीचा प्रसार होण्याचा धोका अधिक आहे.
बेंगळुरूच्या वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट इंडियाचे संचालक अरिवुदाई नांबी अप्पादुराई म्हणाले, “मोसमासंदर्भातील घटनांचा संबंध हवामान बदलाशी जोडणे कठीण आहे पण हवामान बदलामुळे सध्याचे मोसमी नमुने बदलणार असे अपेक्षित आहे.”
अप्पादुराई यांच्या मते हवामान बदलामुळे धोका अनेक पटींनी वाढतो. कोरोनाच्या साथीसारख्या सध्याच्या समस्यांची तीव्रता यामुळे वाढणार आहे हे नक्की.
टीव्ही पद्मा यांनी यंदाच्या मे महिन्यात ‘द वायर सायन्स‘साठी दिलेल्या बातमीत म्हटले आहे, “विषुववृत्तीय वादळांसारख्या तीव्र मोसमी घटना हवामान बदलांमुळे अधिक तीव्र झाल्या आहेत. त्यामुळे अन्नाचा पुरवठा विस्कळित होतो, स्वच्छ पाणी व वीज पुरवठा खंडीत होतो आणि कोविडची साथ आटोक्यात आणण्यासाठी चाललेल्या प्रयत्नांना यामुळे धोका पोहोचू शकतो.”
जूनच्या सुरुवातीला मुंबईच्या दक्षिण किनाऱ्याला धडकलेले चक्रीवादळ निसर्ग हे या भागात १८९१ सालापासून झालेले सर्वांत तीव्र वादळ होते. हवामान बदलांचा परिणाम मॉन्सूनवरही झाला आहे. यामागील एक कारण म्हणजे मॉन्सूनचे वारे समुद्रावरून वाहतात आणि बाष्प गोळा करतात व नंतर पावसाच्या रूपाने जमिनीवर कोसळतात. अरबी समुद्राचे तापमान वाढत असल्याने त्यातील बाष्पाचे प्रमाणही वाढत आहे.
आणि जून महिन्यातही मुंबईत कोविड-१९च्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली होती.
“पावसाळ्याच्या दिवसात पावसाळी आजार होणारे रुग्ण कोविड-१९ रुग्णांच्या संपर्कात येण्याचा धोका वाढतो,” असे माजी नानावटी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील माजी निवासी वैद्यकीय अधिकारी सुगन्या आर म्हणाल्या. डॉ. यादव म्हणाले की, सातत्याने लक्षणे दिसणारे लोकच रुग्णालयात किंवा क्लिनिकमध्ये जात आहेत, कारण, रुग्णालयात गेल्यामुळे वाढणाऱ्या संपर्काची भीती सर्वांना आहे.
डॉ. थोरवे यांच्या मते, पावसामुळे प्रवासाचा वेळ वाढणे किंवा प्रवास कठीण होणे अशा समस्या येत असल्या, तरी याचा कोविडच्या प्रसारावर थेट परिणाम होण्याची फारशी शक्यता नाही. लोकांची वाढलेली हालचाल हेच रुग्णसंख्या वाढण्यामागील कारण आहे.
वेगळ्या शब्दांत सांगायचे तर, मुंबई पावसासाठी अधिक सज्ज असती, सांडपाणी वाहून नेणारी गटारे स्वच्छ केली गेली असती, औषधांचा पुरवठा पुरेसा झालेला असता, तर कोविड-१९ रुग्णसंख्येतील वाढ नियंत्रित करता आली असती.
मुसळधार पावसानंतर भारतातील अनेक शहरांवर आजारांची टांगती तलवार आहे. हैदराबाद आणि पटना शहरांतही तसेच आसामच्या अनेक भागांमध्ये हाच अनुभव आहे.
हुसैन इंदोरवाला आणि श्वेता वाघ यांनी एप्रिल महिन्यात ‘द वायर‘मध्ये लिहिल्यानुसार, “कोविड-१९ साथ हे शहरावरील संकट नाही, तर विशिष्ट प्रकारच्या शहरांवरील संकट आहे. अनेक वर्षांच्या बाजारकेंद्री धोरणांमुळे या शहरांच्या नागरी नियोजनावर परिणाम झाले आहेत. साथीला तोंड देण्याची क्षमता आरोग्यसेवा, अन्नवितरण, वाहतूक, सेवा आदी प्रणालींमध्ये नाही.” पावसामुळे या समस्या अधिक तीव्र झाल्या आहे.
मूळ लेख
COMMENTS