मुंबई ते बेलापूर वॉटर टॅक्सी सेवा

मुंबई ते बेलापूर वॉटर टॅक्सी सेवा

मुंबई: रस्ते आणि रेल्वे वाहतूक व्यवस्थेवरील ताण कमी करून प्रवासी जलवाहतूक सेवा सुरू करण्यासाठी बेलापूर येथे बांधण्यात आलेल्या प्रवासी जेट्टीचे आज १७ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन होत आहे.

बेलापूर येथून प्रत्येकी १० ते ३० प्रवासी क्षमता असलेल्या ७ स्पीडबोटी आणि ५६ प्रवासी क्षमता असलेली एक कॅटामरान बोट अशा एकूण ८ बोटींद्वारे ही वॉटर टॅक्सी सेवा सुरू करण्यात येत आहे. बेलापूर येथून दक्षिण मुंबईत भाऊचा धक्का येथे पोहोचण्यास स्पीड बोटीने फक्त ३० मिनिटे तर कॅटामरान बोटीला ४५ ते ५० मिनिटांचा कालावधी लागणार आहे. स्पीडबोटीचे भाडे प्रतिप्रवासी ८०० ते  १२०० रुपये असून कॅटामरान बोटीकरीता प्रति प्रवासी २९० रुपये इतके भाडे ठेवण्यात आले आहे. बेलापूर येथून भाऊच्या धक्क्याबरोबरच एलिफंटा, जेएनपीटी या जलमार्गावर सुद्धा प्रवासी सेवा चालविण्यात येणार आहे.

महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील बंदरे व खाड्यांमधून दरवर्षी सुमारे दीड कोटी प्रवासी जलवाहतूकीद्वारे प्रवास करतात. जलवाहतूकीचा पर्याय हा किफायतशीर, इंधन व वेळेची बचत करणारा आणि पर्यावरणस्नेही आहे. मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे यासारख्या प्रचंड वाहतूक असलेल्या शहरांसाठी तसेच हळूहळू अलिबागपर्यंत विस्तारत जाणाऱ्या लोकवस्तीसाठी रस्ते व रेल्वे वाहतूकीला पर्याय म्हणून मुंबईच्या पूर्व किनारपट्टीवर जलवाहतूक सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

मुंबईच्या पूर्व किनारपट्टीवरील जलवाहतुकीचा पुढील टप्पा म्हणून नवी मुंबईपासून मुंबई, एलिफंटा, जेएनपीटी अशा विविध जलमार्गांवर प्रवासी वाहतूक सुरू करण्यासाठी बेलापूर, नवी मुंबई येथे सुमारे ८.३७ कोटी रु. खर्च करून प्रवासी जेट्टीचे बांधकाम करण्यात आले आहे. यासाठी  केंद्र आणि राज्य शासनाने प्रत्येकी ५० टक्के या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिल्याचेही बंदरे विकास मंत्री अस्लम शेख यांनी सांगितले. वॉटर टॅक्सी सेवेमुळे निर्माणाधीन असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी सुद्धा जोडणी मिळणार आहे तर नवी मुंबईमधून थेट एलिफंटा येथे जाण्यासाठी सुविधा उपलब्ध होणार असल्याने पर्यटनालादेखील चालना मिळणार आहे, असेही शेख यांनी सांगितले.

COMMENTS