मुनियाचं घरटं

मुनियाचं घरटं

छोट्या पक्ष्यांनी आपल्या घरात रात्रीचं मुक्कामाला यावं, वळचणीला बसावं, निजावं, जमल्यास एखादा विणीचा हंगाम आपल्याकडेच संसार थाटावा अशी एक सुप्त इच्छा अ

मोहाच्या फुलांवरील निर्बंध हटवण्याचा निर्णय
मी आणि गांधीजी – ३
एकटं असण्यासाठी एकत्र येऊ या!

छोट्या पक्ष्यांनी आपल्या घरात रात्रीचं मुक्कामाला यावं, वळचणीला बसावं, निजावं, जमल्यास एखादा विणीचा हंगाम आपल्याकडेच संसार थाटावा अशी एक सुप्त इच्छा अनेक पक्षीप्रेमींच्या मनात असते. याला कबुतरं हा पक्षी पूर्णपणे अपवाद आहे. माणसाबरोबर राहता राहता माणसासारखाच होऊन गेलाय तो! नुसता उच्छाद मांडतो. पोरं जन्माला घालण्याचा तर काही काळवेळच नसतो. कधीही बघा, घरटं चालूच. आणि घाण तर इतकी करतो की बास! असो. तर या सुप्त इच्छेला काही जण मानवनिर्मित घरट्याच्या रुपात मूर्त स्वरूपही देतात. लाकडाची तयार केलेली घरटी घरात आणून लावतात. काही जण घरी आलेल्या पार्सलच्या खोक्यांची घरटी करतात आणि ती खिडकीत, गॅलरीत लावून ठेवतात. अर्थातच, याची वाट पाहात की कधीतरी छोटे पक्षी या खोक्याच्या, लाकडी घरट्याच्या आत किंवा आडोशाने त्यांचं स्वतःचं, त्यांना आवडेल अशा इंटेरिअरचं घरटं बांधतील.

आमच्याही घरात कानाकोपर्‍यात अशी अनेक घरटी सापडतील, आम्ही लावलेली. न जाणो कुठल्या पक्षाला कसलं घरटं आवडावं, म्हणून मिळेल त्या सर्व छोट्याछोट्या मजबूत खोक्यांना इकडे तिकडे डकवून ठेवलंय. ऊन पाऊस आणि मोठ्या पक्ष्यांपासून संरक्षण आणि जरा त्यांचा त्यांना एकांत मिळेल एवढं पाहिलं की झालं. एवढं करूनही ते लगेच घरटं करतील असं अजिबात नाही. घर किंवा शेतजमीन विकत घेताना आपण काय सावधान असू त्याहून अधिक ते सतर्क असतात. मुनिया सारखे पक्षी तर ‘बनाबनाया खेल’ सोडून निघून जातात. त्यांनी घरटं बांधावं, आपल्या लक्षात यावं, आपण घरातल्या सगळ्यांना साधूसंत घरी आल्याच्या आनंदात सांगत सुटावं आणि दुसर्‍या दिवसापासून मुनियांनी तिथे येणंच बंद करावं हे तर माझ्या एकटीसोबतच गेल्या १५  वर्षांत तिनदा घडलंय.

त्यामुळे मुनियेच्या एकाही गोकुळाचा आनंद गाठीशी नसताना परत एकदा अगदी नजरेच्या टप्प्यात चोचीत गवताचं पातं घेऊन बसलेल्या मुनियाला बघून मला आकाश ठेंगणं झालं. पावसाने कहर केलेला. श्रावणातल्या ऊनपावसाच्या लपाछपीचा आनंद लुटण्याच्या काळात मुसळधार पाऊस हजेरी लावत होता. दर थोड्या दिवसांनी रेड अ‍ॅलर्ट येत होते. सकाळी साडेसात ते आठची वेळ. चहा प्यायची. जागा ठरलेली, खिडकीपासची (तोत्तोचान आठवली ना!). ज्या खिडकीत रोज बसते, एरव्हिही दिवसभरात दहा वेळा येते. तिथे एवढा मोठा काट्याकुट्यांचा गोळा तयार होईपर्यंत आपल्या लक्षात कसं आलं नाही, असा अचंबा करत मी त्यांचं गवताची हिरवीगार पाती आणणं पाहात राहिले. तेवढ्या कमी वेळात त्यांनी ७-८ चकरा मारल्या. काय तो कामाचा उरक! सक्काळीच कामाला लागले होते दोघं. निगुतीनं काम चाललं होतं त्यांचं!

मुनियेत मुलगा आणि मुलगी असा फरक करता येत नाही. लांबून तरी कळत नाही. दोघंही सारखेच दिसतात. त्यामुळे त्यातला मुनी कुठला आणि निया कुठली हे काही कळत नव्हतं. सतत बघत बसल्याशिवाय त्यातला कोण कुठला आणि कोण कुठला हे ही कळणं अवघडच. म्हणजे मुलगा मुलगी नाही जरी कळले तरी दोन वेगळ्या व्यक्ती म्हणजे मुनिया ओळखू येणं हे ही अवघड आहे. म्हणजे असं की गवताचं पातं आणण्याचं काम एकानंच केलं की दोघांनी आळीपाळीने? घरट्यात त्या काड्या खोचण्याच्या कामाचंही तेच. कामाची विभागणी कशी केली? पाय वर करून कोणी बसलं की त्या बसण्यालाच देखरेखीचं आणि म्हणून संरक्षणाचं नाव दिलं. ‘जेनू काम तेनू थाय, बिजा

मुनियाचं घरटं

मुनियाचं घरटं

करे सो गोता खाय’, असं त्यांच्यातही असेल का? कुठलं गवत न्यायचं, ते कुठून तोडायचं, घरातल्या कुठल्या भागासाठी कुठलं सामान आणायचं हे एकाला आणि आणलेलं सामान घरट्यात कुठे आणि कसं खोचायचं हे दुसर्‍या पक्ष्याला चांगलं कळत असेल का? की एकाला झाकलं आणि दुसर्‍याला काढलं, एवढी त्यांच्यात एकतानता असेल? या एवढुशा पक्षापायी असे अनेक प्रश्न माझ्या डोक्यात रुंजी घालू लागले. पण या सगळ्याला उत्तर एकच, पक्षाच्या अंगावर काही ओळखीची खूण करणे. पण मला त्या फंदातच पडायचं नव्हतं. एकवेळ माझे प्रश्न काही काळ अनुत्तरीत राहिले तरी चालतील, पण त्यांचा सुखी संसार पाहून माझ्या डोळ्यांचं पारणं फिटावं, एवढी एकच इच्छा मनात होती.

मुनिया हा काही धोक्यात आलेला पक्षी अजिबात नाही. पण अगदी आत्ता आत्ता म्हणजे १५-२० वर्षांपूर्वीपर्यंत चिमण्या तरी कुठे धोक्यात आलेल्या होत्या? आणि अचानक चिमण्या दिसेनाशा  झाल्याच ना? मग कुठल्याही जीवमात्राला गृहीत धरून चालणार नाहीच. त्याचं अस्तित्व आपल्यामुळे कधीही धोक्यात येऊच शकतं. त्यामुळे जमेल तेवढं, जमेल तसं त्याच्या वंशवृद्धीसाठी आपला हातभार लागेल असं पाहिलेलं बरं. याला काही अपवाद आहेत, ज्याला आपण घूसखोर जाती (invasive species) म्हणतो. त्याबद्दल परत कधी बोलू.

पहिल्या दिवसाच्या उत्साहात आमच्या निसर्ग अभ्यासक मित्रालाही हे कळवलं. तो साग्रसंगीत संशोधक असल्याने कॅमेरा ट्रॅप लावण्याचा विचार आम्ही करू लागलो. मनातून भीती होतीच की तेवढ्याने मुनिया घरटं सोडून गेल्या तर! दुसरा दिवसही तसा कोरडाच गेला. त्यांची विशेष लगबग दिसली नाही. झालं! तिसर्‍या दिवशी कॅमेरा ट्रॅप घेऊन मित्र आला. घरट्यात अंडी असतील तरच पक्षी रात्री वस्तीला घरट्यात येतात, नाहीतर घरटं बांधून झालं असलं तरी ते बाहेरच झोपतात, अशी आमच्या ज्ञानात भर पडली. त्यामुळे संध्याकाळ आणि रात्रीच्या उंबरठ्यावर आपण घरट्याजवळ जाऊन बघू आणि कॅमेरा ट्रॅप लावायचा की नाही, कसा लावायचा ते ठरवू, अशी चर्चा होऊन आम्ही कातरवेळेची वाट पाहात राहिलो.

घरट्याची आमच्याकडे पूर्णपणे पाठ होती. त्याचं फाटक बघायला आम्हाला समोरच्या इमारतीत जाऊन दुर्बीण लावून बघावं लागलं असतं अशी त्याची रचना होती. पहिल्या दिवशीची लगबग आणि नंतरचे दोन कोरडे दिवस या पार्श्वभूमीवर आम्ही घरटं जमेल तेवढं जवळून बघण्यासाठी शिडीवर चढलो. बाहेर अंधार डोकावू लागला होता. हेडटॉर्च लावून वर पोहोचलो. दिवसभरात या बाल्कनीत आम्ही अनेकदा येतो जातो. त्यामुळे मुनियांना माणसाच्या वावराची सवय होती. एवढंच काय रस्त्यावरच्या प्रत्येक कुत्र्याच्या भो ला भो-भो करून प्रतिसाद देणारी आमची कुहूसुद्धा त्यांच्या सवयीची होती. तरीही संध्याकाळची आमची नेहमीची नसलेली हालचाल मुनियाला आवडली नाही. भुर्रर्रर्र. मुनिया घरट्यातून उडून जाताना दिसली. याचा अर्थ अंडी घातलीत वाटतं! हुश्श! एक हुश्श होतंय तोवर पुढची रुखरुख लागली. आपल्या अशा हालचालींमुळे मुनियाला असुरक्षित वाटलं आणि ते परत आले नाही तर? चर्रर्रर्र… बाहेर पावसाची भुरभुर सुरू झाली होती. उद्या सकाळपर्यंत वाट बघण्याशिवाय पर्याय नव्हता.

परत एकदा चहा आणि तीच खिडकी. घरट्याजवळ चाललेलं खुसफूस पाहून जीव भांड्यात पडला. दोघंही होते. घरटं आतून शाकारणं चाललं होतं. म्हणजे ना, तसं ते चालू असलं की अगदी निरुपद्रवी भुताटकी असल्यासारखंच वाटतं. ते घरटं थोडंथोडं हलत असतं. किंचित किंचित आवाजही चालू असतात, पण दिसत तर कोणीच नसतं. मग अचानक एखादा हिरवा झेंडा फडकतो. आपण फक्त पंचाहत्तराव्या स्वातंत्र्य दिनी ‘हर घर तिरंगा’ करतो, मुनियांच्यात मात्र नेहेमीच ‘हर घर हरा’ असतं! हे असं घराचं नेपथ्य लावताना ही (बॉलि)वूडलॅंडची नटी धूंद होऊन नाचत, “दो दिवाने  शहरमें…” म्हणत असेल की “ये तेरा घर, ये मेरा घर” म्हणत असेल असा विचार करत, त्यांच्या गोकुळाची स्वप्नं रंगवत माझा चहा अमृत झाला आणि चांगल्या दिवसाची नांदी झाली. कॅमेरा ट्रॅप न लावताच घरी परत गेलेल्या अभ्यासक मित्राला ही गोड बातमी कळवल्यावर त्यालाही ‘हुश्श’ झालं. आता समोर वाढून ठेवलेली मेजवानी स्थितप्रज्ञाप्रमाणे खायची आणि तो आनंद सकळ जनांमध्ये वाटत राहायचा, असं आम्ही ठरवलं.

मुनिया पावसाळ्यात घरटं बांधते. वेळ थोडी पुढे मागे होते, तिथल्या भौगोलिक वैविध्यानुसार. खिडकी, बाल्कनीतून जरूर डोकावून पाहा आणि तुमच्या इथेही घरटं बांधत असतील तर तो अनुभव सगळ्यांबरोबर जरूर शेअर करा.

शेवटी ७ ऑगस्ट २०२२ ला मुनियाचं घरटं पहिल्यांदा बघितलं आणि पुढल्या दोन दिवसांत हा लेख तयार झाला. छापून येईपर्यंत सप्टेंबर अखेर उजाडलं. पण त्यामुळे आता आमच्याकडे पुढचीही बातमी तयार आहे. २४ सप्टेंबर २०२२ म्हणजे घरटं बांधल्यावर तब्बल दीड महिन्यांनी मला प्रथमच मुनी, निया आणि त्यांची कॉफी रंगाची चार पिलं असं अख्खं षटकोनी कुटुंब घरट्यातून उडून जाऊन समोरच्या तारेवर झोके घेताना दिसलं. मुनियाची पिल्लं प्रौढ मुनियांपेक्षा खूपच वेगळी दिसतात. अगदी वेगळेच पक्षी वाटावे इतकी वेगळी. पिलं उडायला शिकत होती. त्यामुळे जवळपासच छोट्या छोट्या अंतरावर उडून जाऊन बसत होती. ही पिलं बाहेर पडेपर्यंत आत किती अंडी आहेत, किती पिलं आहेत याचा काहीच अंदाज आम्हाला बांधता आला नव्हता. अंडी कधी घातली हे ही निश्चितपणे सांगता येणार नाही. फक्त घरटं बांधल्यावर ते खूप काळ कुटुंब नियोजन करत असतील अशी शक्यता कमीच. किंबहुना घरटं दोघंही मिळून बांधत असल्यामुळे त्यांचं मिलन घरटं बांधायला घेण्याआधी होतं की घरट्याच्या बांधकामादरम्यान की घरटं पूर्ण झाल्यावर हा प्रश्न गुलदस्त्यातच राहिलाय.

अधिक अभ्यासासाठी इथे क्लीक करा.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0