खंडित नदी

खंडित नदी

अमेरिकी पत्रकार पॉल सॅलोपेक एका अनोख्या जागतिक सफरीवर निघाला आहे. या प्रवासासाठी त्याने निवडलेला मार्गही तितकाच विलक्षण आहे. जगातील आद्य मानव ज्या मार्गाने आफ्रिकेतून जगभर पसरले त्याच मार्गाने तो विश्वभ्रमंती करतो आहे आणि तीही त्यांच्यासारखीच, अर्थात पायी. त्या-त्या प्रदेशातील समाज, संस्कृती आणि पर्यावरणीय समस्यांवर प्रकाश टाकत चाललेला त्याचा हा प्रवास सुमारे दशकभर लांबीचा असणार आहे. अशाच एका टप्प्यावर तो भारतातही आला. भारतातील अनेक प्रदेशांत फिरला, त्यावर लेख लिहले. त्याच लेखांपैकी एक, सिंधू नदीतील डॉल्फिन या माश्यावरील त्याचा हा लेख – ब्रिटीश राजवटीपासून ते फाळणीच्या कटू आठवणींपर्यंत अत्यंत व्यापक पैस असलेला, जागतिक वसुंधरा दिनानिमित्त.

शांघाई सहकार्य संघटना भारतासाठी महत्त्वाची का?
अफ़गाणिस्तानचा तिढा
रेल्वेच्या बोगद्याचे कंत्राट चिनी कंपनीला

संकटग्रस्त डॉल्फिनच्या शोधात, उत्तर भारतातील पायी प्रवास

ऐक, हे संगमाच्या देवता, उभे ते जमीनदोस्त होईल, प्रवाही ते वाहत राहील, सदैव.
– संत बसवेश्वर यांची भक्तीपर रचना

१९४७ मध्ये जेव्हा भारत आणि पाकिस्तान स्वतंत्र झाले तेव्हा पूर्वीच्या ब्रिटीश राजचे दोन तुकडे पडले, एक मुख्यत्वे हिंदू तर दुसरा प्रामुख्याने मुस्लीम. या फाळणीच्या ज्वाळांनी जवळपास १.५ कोटी लोकांना मुळासकट उपटून टाकले आणि लाखोंचा बळी घेतला.
याशिवायही बरंच काही तुटत गेलं.
वसाहतवाद्यांच्या सैन्य तुकड्यांची विभागणी धर्माच्या आधारावर झाली नी आधीचा सयुंक्त इतिहास संग्रहालये आणि कलादालनांतून वाटून घेतला गेला. वाहने, राखीव सुवर्णनिधी यांसारख्या सार्वजनिक संपत्तींच्या वाटण्यांबरोबरच लाहोर पोलीस बँडच्या वाद्यांचीही नाखुशी का होईना वाटणी झाली. (तुतारी कोण घेईल यावरून हातापायीही झाली). इतकंच काय पण मनोरुग्णालयांतील रुग्णांचीही अदलाबदल करण्यात आली. “फाळणीनंतर दोन-तीन वर्षांनी पाकिस्तान आणि भारताने त्याचप्रमाणे वेड्यांची अदलाबदल केली ज्याप्रमाणे त्यांनी नागरी कैद्यांची अदलाबदल केली होती,” भारत-पाकिस्तान फाळणीच्या कडवट आठवणींवरील ‘टोबा टेक सिंह’ या आपल्या लघुकथेची सुरुवात लेखक सआदत हसन मंटो वरील वाक्याने करतात. “हा निर्णय शहाणपणाचा होता की नाही हे मी सांगू शकत नाही. काहीही असो, दोन्हीकडे उच्चस्तरीय बैठका पार पाडल्या होत्या आणि वेड्यांच्या अदलाबदलीची तारीख ठरवण्यात आली होती.”
याच पद्धतीने, २,२०० मैल लांबीच्या सिंधू नदीचेही दोन तुकडे करण्यात आले होते.
पूर्वेच्या तीन उपनद्या – सतलज, बिआस आणि रावी भारताला देण्यात आल्या होत्या तर पश्चिमेच्या दोन शाखा आणि मुख्य नदी – झेलम, चिनाब आणि सिंधू – पाकिस्तानला. एकेकाळी सिंधूच्या सुपीक खोऱ्यात गुण्यागोविंदाने राहणाऱ्या मुस्लीम, सिख आणि हिंदू शेतकऱ्यांना हा मोठा वेडपटपणा वाटत होता. तब्बल पाच लाख चौरस किलोमीटर क्षेत्रावरवर पसरलेल्या या विशाल, चंचल आणि प्रवाही नदीला एखादं सरकार आपल्या मर्जीने वळवू शकेल? असं असेल तर मग हवा, पाऊस आणि देवालाही दोन हिश्यात वाटून घेता येईल.
मी जगभर पायी फिरत आहे.
कित्येक आठवडे मी सिंधू नदीच्या हिरव्यागार खोऱ्यातून, पाकिस्तानमधील गव्हाच्या शेतातून हळुवार बरसणाऱ्या पावसासारखा पायी फिरत होतो. लाहोरहून मी डावीकडे वळलो, सैन्यमय सीमा ओलांडून भारतात पोहोचलो. इमिग्रेशन बूथच्या पलीकडे, पार्किंग लॉटमध्ये आरती कुमार राव माझी वाट पाहत होत्या.
या आरती कुमार राव कोण आहेत?
माझ्या पायी प्रवासातील नव्या सोबती. आरती बायोफिजिक्स, इन्स्ट्र्क्शनल डिझाईन आणि बिझनेस एडमीनीस्ट्रेशन अशा तीन विषयांत पदव्युत्तर पदवी धारक आहेत. एकेकाळी कॉर्पोरेट क्षेत्रात प्रगतीपथावर असूनही त्यांनी आपल्या देशातील पाझरती वने, हिमाच्छादित शिखरे, तळपती वाळवंटे आणि खाऱ्या पाण्यातील दलदलींसाठी त्या जागतिक जीवनाला रामराम ठोकला. त्यांच्या देशातील संकटग्रस्त नद्यांची व्यथा मांडणाऱ्या त्या एक निपुण छायाचित्रकार आहेत. त्याचबरोबर त्या एक चित्रकार, कवियत्री आणि गिर्यारोहकही आहेत. खुनशी पंजाबी सुर्याखालून त्या ताशी ४ मैल इतक्या वेगाने चालत होत्या. आम्हाला रस्त्यात भेटलेला प्रत्येक पक्षी आणि बहुतेक झाडे त्यांच्या ओळखीची होती. बुलबुल, मिठ्ठू, तितर, कोतवाल, घुबड, बगळे अशा प्रत्येकाला त्या प्रेमाने हाक मारत होत्या. त्यांना नदीतला डॉल्फिन बघायचा होता.
गोड्या पाण्यातील डॉल्फिन हे समुद्री डॉल्फिनचे जवळचे नातेवाईक.
आम्हाला कुतूहल होतं ते संकटग्रस्त सिंधू नदी डॉल्फिन (Platanista gangetica minor) बघण्याचं. जवळपास ९० किलो वजनाचा हा प्राणी पाऱ्यासारखा निसरडा आहे, पन्नास लक्ष वर्ष जुन्या सिंधू नदीच्या प्रवाहासारखाच चंचल आणि अस्थिर. आदिम काळात याचे पूर्वज समुद्रातून बाहेर आले, चार-पायांच्या शिकाऱ्यात रुपांतरीत होऊन इओसीन कालखंडातील नद्यांच्या काठांवर फिरले आणि काही काळाने पुन्हा जलचर बनले. धरणे आणि प्रदूषणाने सिंधू डॉल्फिनला विलुप्तीच्या उंबरठ्यावर आणून ठेवले आहे. आज जगभरात २,००० पेक्षाही कमी मुक्त डॉल्फिन उरले आहेत. ते सगळेच पाकिस्तानी नद्यांमध्ये आहेत. भारतातल्या नद्यांत एखादातरी सिंधू डॉल्फिन सापडेल म्हणून शोध घ्यावा तर तो सापडतो कल्पनेतल्या एकशिंगी घोड्याप्रमाणे, फक्त लोकांच्या धूसर होत चाललेल्या आठवणीत.
……….
कुमार राव आणि मी पूर्वेला अमृतसरकडे चालायला लागलो.
अमृतसर म्हटलं की सर्वप्रथम डोळ्यांसमोर येतं ते सुवर्णमंदिर, शिखांचं सर्वांत पवित्र देवस्थान. शिवाय, याचा संबंध ब्रिटीश राजच्या इतिहासातील सर्वांत घृणास्पद अशा जलियनवाला बाग हत्याकांडाशीही आहे. १३ एप्रिल १९१९ रोजी, वसाहतवादी राजवटीचा निषेध करण्यासाठी हजारो

अमृतसरमधील शिखांचे सुवर्णमंदिर छायाचित्र : पॉल सॅलोपेक

अमृतसरमधील शिखांचे सुवर्णमंदिर छायाचित्र : पॉल सॅलोपेक

भारतीय जलियांवाला बागमध्ये जमले होते. जनरल रेजिनाल्ड डायर त्या ठिकाणी आला. बाहेर जाण्याचे सर्व दरवाजे बंद करून त्यांने आपल्या सैन्याला या निशस्त्र नागरिकांवर बेछूट गोळीबार करण्याचे आदेश दिले, शेकडोंचे प्राण घेतले. “ब्रिटिशांनी याबद्दल कधीच माफी मागितलेली नाही.” या स्मारकस्थळी गाईड असलेले तरुण दीपक सेठ सांगत होते. सेठ यांचे पणजोबा त्या दिवशी मारले गेले होते. “त्यांनी कुटुंबियांना भरपाई देऊ केली होती. माझ्या कुटुंबीयांनी ती कधीच घेतली नाही. नकोत आम्हाला, रक्ताळलेले पैसे”
शेवटी सर्वांचा हिशेब होतो. कर्मफळाचा नियम आहे तो. पुढच्या एकाच पिढीत दक्षिण एशियातून ब्रिटिशांना निघून नव्हे, पळून जावे लागले.
स्वातंत्र्यावेळी, लंडनचा वकील सिरिल रेडक्लिफ याने भारत-पाकिस्तान या नवनिर्मित देशांमधील १,२०० मैलांची सीमा आखली. ही वांशिक रेष पंजाब या अन्नदात्या राज्याचे दोन तुकडे करून येथील मिश्र लोकसंख्येला विभागणार होती. यापूर्वी दक्षिण आशियात कधीच पाय न ठेवलेल्या रेडक्लिफने आपले सर्वेक्षण फक्त ४० दिवसांत पूर्ण केले. (वसाहतवादी अधिकारी यावर – अज्ञान म्हणजे निःपक्षपातीपणाची हमी, हा तर्क देत होते). त्याच्या अविचारी सीमेने दोन्ही देशांत दंगली पेटल्या असून मोठ्या प्रमाणावर हत्याकांड घडवून आणले आहे हे समजल्यावर रेडक्लिफ पुरता हादरून गेला. त्याने या कामासाठी त्याला मिळणार असलेले ४०,००० रुपये नाकारले, आपली कागदपत्रे जाळून टाकली आणि भारत सोडून निघून गेला, कधीही परत न येण्यासाठी.
तेव्हापासून या दोन शेजाऱ्यांमध्ये अर्धा डझन लढाया झाल्या आहेत, ज्यातील बहुतांश या विवादास्पद सीमेवरून होत्या.
“दोन वर्षांपूर्वी पर्यंत आम्ही, कुंपणापलीकडील पाकिस्तानी शेतकऱ्यांशी बोलू शकत होतो.” गहू पिकवणारे एक सहृदयी भारतीय शेतकरी, रेशम सिंग सांगत होते. त्यांच्या शेतांमध्ये आता बंकर्स आणि लोखंडी तारांचे कुंपण घातलेली २२ फुट रुंद ‘नो मेन्स लँड आली आहे. “जेव्हा मी आणि पाकिस्तानी सोंगणी करत असतो तेव्हा दोन्हीकडून सैनिक आलेले असतात, आता आम्ही बोलू शकत नाही.”
………….
प्रत्येक सकाळ अधिकाधिक उष्ण होत चालली होती. तापमान १०० डिग्रीच्या (फेरनहाईट) वर पोहोचलं आणि मग त्याच्याही वर गेलं. कुमार राव आणि मी घाम गाळत दक्षिणेला चालायला लागलो.
हायब्रीड गव्हाच्या अंतहीन चौरासांमधून.
वाटसरूंना दाळ-भात वाढणाऱ्या स्वयंसेवकांनी भरलेल्या, पांढऱ्याशुभ्र घुमटाच्या कित्येक डझन शीख मंदिरांमधून.
कानठळ्या बसवणाऱ्या ट्रेक्टरच्या ताफ्यांमधून – ज्यांच्या ड्रायव्हर सीटच्या बाजूला बांधलेल्या डिस्को-साईज स्पीकरमधून गगनभेदी आवाजात पंजाबी पॉप म्युझिक वाजवलं जात होतं. का? सांगण कठीण आहे. पंजाबला भेट देणारे परग्रहवासी कानात बोटे घालून आणि आश्चर्यचकित होऊन हे दृश्य पाहत राहतील. त्यांना वाटेल बहिऱ्या माणसांच्या एखाद्या पंथाने एक शक्तिशाली चाकांची मशीन शोधून काढली आहे जी धान्य पिकवण्यासाठी नाही, शेत नांगरण्यासाठी नाही आणि कापणीसाठी तर नाहीच नाही. ती आहे उन्मादाने बोकाळत जमिनीवर वेड्यावाकड्या रेषा ओढण्यासाठी. त्यातून सारखी जोशपूर्ण भक्तीगीते उपसली, गायली, बडवली जात आहेत. जणू एखादे विचित्र कर्मकांड अखंडपणे सुरु असावे, एखाद्या अदृश्य देवतेसाठी, नव्हे संपूर्ण ब्रह्मांडासाठी. परंतु तसं नव्हतं, हे पंजाबी शेतकरी होते जे आपलं काम करत होते.
भारत हा हरितक्रांतीतील एक आघाडीचा आणि यशस्वी योद्धा होता.
हायब्रीड बियाणे, रासायनिक खते आणि कीटकनाशके, ट्रॅक्टर्स आणि पंपयुक्त विहिरींनी १९६० पासून देशाचं उत्पादन चौपटीने वाढवलं आहे. आज अन्नाच्या बाबतीत भारताचे १.२ अब्ज लोक स्वयंपूर्ण आहेत. येथल शेतकरी धान्य आणि फळांची निर्यात करतात. परंतु या लाभांची मोठी पर्यावरणीय किंमत चुकवावी लागत आहे जी चिंता वाढवणारी आहे. शेतीतील रासायनिक प्रदूषके सिंधू नदीच्या जलधारकांना (एक्विफर्स) प्रदूषित करत आहेत. औद्योगिक शेतीत प्रचंड पाण्याचा वापर होत आहे. दुसरीकडे सरकार म्हणते, भारताची जवळपास अर्धी लोकसंख्या अर्थात ६० कोटी लोक, “भयंकर ते महाभयंकर जल संकटाला तोंड देत आहेत.”
“भारावून जाणे स्वाभाविक आहे,” गव्हाच्या भूशाने ओसंडून वाहणाऱ्या ट्रॅक्टर्सच्या गोंगाटाने गाजत असलेल्या आणि चिखलाने माखलेल्या शेताच्या रस्त्यावरून चालतांना कुमार राव म्हणाल्या. भारतातील जलस्त्रोतांच्या नागवणूकीचे डॉक्युमेंटेशन करण्यात त्यांनी कित्येक वर्षे घालवली आहेत. “आपले अमान्य करणे म्हणजे सामुहिक आंधळेपणाचा प्रकार आहे.”
नदीतला डॉल्फिन शोधण्यासाठी आधी नदी शोधणे आवश्यक आहे.
पंजाबमध्ये हे काही सोपे काम नव्हते, विशेषतः पायी चालतांना. कुमार राव आणि मी कित्येक कॅनोल, बांध, पाईपलाईन्स आणि नहरींमधून नौकानयन करत फिरत होतो. पाण्याच्या या मानव निर्मित जाळ्याने सिंधूच्या उपनद्यांच्या प्राचीन हरित खोऱ्यांना कवडीमोल करून टाकले होते, एक भौगोलिक घटक म्हणून त्यांची किंमत शून्य झाली होती. आम्ही जेव्हा बिआस आणि सतलज नद्यांच्या संगमावर पोहोचलो तेव्हा एका काँक्रीटच्या भिंतीने आमचे स्वागत केले, ती भिंत होती हरिके धरणाची. ती अडवलेले सिंचनजल, तिबेटमधील सिंधूच्या उगमस्थानासारखे फेसाळते पांढरे पाणी, राजस्थानमधील थारच्या वाळवंटात ओतत होती.
……….
सिंधू नदी डॉल्फिन हा आंधळा शिकारी आहे.
सिंधूच्या गढूळ प्रवाहात लाखो वर्ष पोहल्यानंतर डॉल्फिन्सने आपले डोळे गमावले. आता त्यांना फक्त काळोख आणि प्रकाशातला फरक तेवढा ओळखता येतो. भक्ष्य माशांची शिकार करण्यासाठी ते इकोलोकेशनचा वापर करतात अर्थात प्रतिध्वनीद्वारे भक्ष्याची जागा ओळखून त्याची शिकार करतात. ते शरीराची एक बाजू तिरपी करून पोहतात आणि आपल्या परांचा वापर करून नदीच्या तळातील गोगलगायी, खेकडे यांसारख्या प्राण्यांना धुळीसह वर आणतात. आई सिंधू डॉल्फिन तिच्या पिल्लांना पाठीवर वाहते.
येथे आता एकही भूलन राहिलेली नाही!” स्वतःला मेजर हिंदुस्थान म्हणणाऱ्या, पिळदार शरीरयष्टीच्या एका पंजाबी माणसाने आम्हाला पूर्ण खात्रीनिशी सांगितले. हा आम्हाला भेटला तो हरिके धरणाच्या काही मैल वर बिआस नदीच्या काठावरील एका गावात. सिंधू नदी डॉल्फिनला स्थानिक भाषेत भूलन म्हणतात.
मेजर हिंदुस्थान एका छोट्या, फिरत्या सर्कसमध्ये काम करत होता. तेथे तो मोटारसायकलवर कालाबाजी करायचा. आपल्या दंडाची बेंडकुळी दाखवण्यासाठी त्याने आपल्या शर्टाची बाही वर केलेली होती. आम्ही, कुमार राव आणि मी, नदीच्या शांत, चिखलमय किनाऱ्यावर उभे असतांना त्याने आम्हाला – त्याच्या रॉयल एन्फिल्डवर एका पायावर उभा राहून काही कसरतीही करून दाखवल्या. भारतात फिरणे हे असे आहे. तुम्हाला सर्व प्रकारच्या वल्ली भेटतात, त्याही अगदी अनपेक्षित ठिकाणी. पण मेजर हिंदुस्थान आंधळाही होता. बिआसच्या त्याच पट्ट्यात आरती कुमार रावला डॉल्फिन दिसले.
मी तापाने फणफणत गेस्टहाऊस पडलेलो असतांना त्यांनी तीन दिवस त्यांना भेटी दिल्या. मी दोनदा अंथरुणातून कसेतरी उठून डॉल्फिन बघायला गेलो परंतु दोन्हीवेळेस अपयशी ठरतो. शेवटी मला ते दिसले.
ते एक डॉल्फिन माता आणि तिचे पिल्लू होते. चकाकत्या नदीच्या प्रवाहातून त्यांनी बाहेर उडी मारली आणि परत आत गेले, पृष्ठभागावर येतांना त्यांनी एक हळुवार चुंबन घेतल्यासारखा आवाज केला. मग ते पाण्यात गेले आणि गेलेच.
बिआस त्यांना कशी दिसत असेल याची मी कल्पना केली.
वितळलेल्या हिमनदीत पोहतांना, डॉल्फिन्सना ही नदी प्रवाही वाटतंच नसावी. ते एक स्थिर जग होते ज्याच्या समोरून माणसं, मोटारसायकली, सीमा आणि धरणांचा एक अक्खा भूप्रदेश संथगतीने वाहत चालला होता. शेवटी मला वाटलं, तुम्ही नदीला थांबवू शकत नाही त्याचप्रमाणे, ज्याप्रमाणे तुम्ही तुमच्या हृदयाची स्पंदने थांबवू शकत नाहीत. या जगात पूर्णपणे स्थिर, मृत असं काहीच नाही.
आताच झालेल्या एका संशोधनानुसार भारतात पाच ते अकरा सिंधू नदी डॉल्फिन उरले असल्याचे आढळून आले आहे.

(पॉल सॅलोपेक यांचा हा लेख नॅशनल जिओग्राफिकच्या आउट ऑफ एडन या वेबसाईटवर प्रथम प्रकाशित करण्यात आला आहे. साभार: नॅशनल जिओग्राफिक)

अनुवाद – परीक्षित सूर्यवंशी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0