राजकीय रंग दिलेले मुर्शिदाबाद तिहेरी हत्या प्रकरण

राजकीय रंग दिलेले मुर्शिदाबाद तिहेरी हत्या प्रकरण

या खून प्रकरणाने बंगालमध्ये राजकीय चिखलफेकीला सुरुवात झाली होती.

मंगळवारी पश्चिम बंगाल पोलिसांनी मुर्शिदाबाद तिहेरी खून प्रकरणाचा छडा लावल्याचा दावा केला. त्यांनी या प्रकरणी हत्या झालेल्या कुटुंबाला परिचित असलेल्या एका गवंडीकाम करणाऱ्या व्यक्तीला अटक केली आहे. हा खून राजकीय हेतूने करण्यात आल्याचा भाजपचा आरोप होता व त्यामुळे त्याला धार्मिक हिंसेचे वळण दिले जात होते.

३५ वर्षीय प्राथमिक शिक्षक बंधू प्रकाश पाल, त्यांची गर्भवती पत्नी ब्यूटी व आठ वर्षांचा मुलगा आंगन यांची मृत शरीरे जियागंज येथील त्यांच्या घरी रक्ताच्या थारोळ्यात आढळून आली होती. त्यानंतर एक आठवड्याने, म्हणजे सोमवारी रात्री मुर्शिदाबाद जिल्ह्यातील सागरदिघीच्या सहापूर भागातून उत्पल बेहरा याला अटक करण्यात आल्याचे पोलिस सुपरिंटेंडंट मुकेश कुमार यांनी सांगितले.

भाजप तसेच पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखर यांनी या हत्यांबद्दल ममता बॅनर्जी सरकारवर टीका केली होती. हत्या झालेला शिक्षक आपला समर्थक असल्याचा दावा आरएसएसने केला होता. यामुळे या संपूर्ण प्रकरणाला एक वेगळेच राजकीय वळण लागले होते. अर्थात पाल यांच्या कुटुंबाने त्यांचा कोणत्याही राजकीय संस्थेशी काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले होते.

कुमार म्हणाले, पाल आणि बेहरा यांच्यामधील आर्थिक व्यवहारावरून झालेला बेबनाव या हत्यांना कारणीभूत होता. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, पाल हे विमा एजन्ट म्हणूनही काम करत होते आणि २० वर्षीय बेहराने त्यांच्याकडून दोन जीवन विमा पॉलिसी खरेदी केल्या होत्या.

बेहरा यांने चौकशी अधिकाऱ्यांना सांगितले की पाल यांनी त्याला पहिल्या पॉलिसीची पावती दिली परंतु दुसरी पावती देण्याच्या बाबतीत ते टाळाटाळ करत होते.

“मागचे काही आठवडे पाल आणि बेहराची या विषयावरून भांडणे होत होती. पालने त्याचा अपमानही केला होता, ज्यामुळे बेहराने त्याला मारायचे ठरवले,” कुमार म्हणाले. पाल काही काळापासून आर्थिक विवंचनेत होता असेही त्यांनी सांगितले.

बेहरा याच्या सागरदिघी या गावामधील प्राथमिक शाळेत पाल शिक्षक होता तेव्हापासून बेहरा त्याला ओळखत होता. आधी त्यांच्यातील संबंध सामान्य होते, मात्र पालने आपला पैसा हडपला असा बेहराला संशय आल्यापासून ते बिघडले.

गुन्ह्यामध्ये वापरले गेलेले शस्त्र हस्तगत करण्यात आले आहे आणि बेहराने आपण त्यात सामील असल्याची कबुलीही दिली आहे, असा दावा मुकेश कुमार यांनी केला.

तपासाच्या वेळी जियागंज आणि सागरदिघी येथील अनेक रहिवाश्यांनी पालने आपल्याकडून पैसे घेतले परंतु विमाहप्ते भरले नाहीत अशी तक्रार केली.

द वायरने या प्रकरणाबाबत, आणि त्या अनुषंगाने चाललेल्या चिखलफेकीबाबत यापूर्वीही लिहिले होते. बंगाल पोलिसांनी पुन्हा पुन्हा त्याचा इन्कार केला असूनहीदिलीप घोष, संबित पात्रा, आणि बाबुल सुप्रियो यांच्यासह अनेक भाजप नेत्यांनी या खुनांमागे राजकीय हेतू असल्याचा दावा केला होता.

(पीटीआयच्या बातमीवरून)

मूळ लेख

COMMENTS