हयात असते तर आज ८ एप्रिल रोजी पं. कुमार गंधर्वांनी वयाची ९७ वर्षे पूर्ण केली असती. अलौकिकत्वाचा स्पर्श असलेली प्रयोगोत्सुक गायनशैली हे त्यांचे एक ठळक वैशिष्ट्य होतेच, परंतु नवतेच्या अविरत शोधातून वृद्धिंगत होत गेलेली ज्ञानलालसा आणि तत्वचिंतनाला पोषक ठरणारी त्यांच्यातली झळाळती बौद्धिक प्रतिभा त्यांना श्रेष्ठत्व बहाल करत होती. अशा या एकमेवाद्वितीय गणल्या गेलेल्या कुमार गंधर्वांनी आत्मसात केलेल्या गायनपैलूंचा वेध घेत त्यांच्यामध्ये दडलेल्या तत्त्वचिंतकावर प्रकाशझोत टाकणारा हा संग्राह्य लेख...
कोट्यवधी लोक, संपूर्ण जगाला लागलेलं ‘करोना ग्रहण’ कधी सुटणार, याची वाट पाहत आहेत. संपर्ण जगच आजारपणाच्या छायेत आहे. आपल्याला घरातच बंदिवान व्हावं लागेल, अशी कल्पना कोणीही कधीही केली नसणार. सदैव ‘बाहेर’ पाहताना ‘आत’ पाहण्याची सवड नसणार्यांसाठी ही एक उत्तम संधी होती. परंतु त्यासाठी तशी ‘दृष्टी’ असावी लागते. किंबहुना, ती फार थोड्यांकडेच असते.
पं.कुमार गंधर्व यांना क्षयाची बाधा झाल्यामुळे १९४८मध्ये ते मुंबईहून देवास येथे वास्तव्यास आले. त्यांच्या गायनास डॉक्टरांनी बंदी घातली होती. त्यांची तब्येत पूर्ववत झाल्यावर १९५४ मध्ये त्यांचं गायन पुन्हा सुरू झालं. वयाची २४ ते ३० अशी ६ वर्षं ते अंथरूणावर खिळून होते. पुढे एका मुलाखतीत त्यांना विचारलं, ‘‘ऐन उमेदीतील ४ वर्षं वाया गेली नसती, तर आपलं गायन आणखीच बहरलं असतं, असं आपल्या मनात येतं का?’’ कुमारजी तत्काळ उत्तरले, ‘‘माझं गायन बंद असण्याचा मला फायदाच झाला. या काळात माळव्याचं लोकसंगीत आणि नाथपंथीयांचं संगीत माझ्या कनावर पडत गेलं. मला त्यात अधिकाधिक खोलवर जाता आलं. भारतीय संगीताचा उगम हा लोकसंगीतातून झाला आहे, हे मला समजत गेलं. नाथपंथीयांच्या निर्गुण विचारांचं आकलन करता आलं.’’ पुढे ते म्हणाले, ‘‘मी आजारीच पडलो नसतो, तर गातच राहिलो असतो. भौतिकवादी जगातच रमत गेलो असतो. ह्या आजारपणामुळे मला संगीताविषयी मूलभूत विचार करण्याची संधी मिळाली आणि अमूल्य असं ऐश्वर्य गवसत गेलं. असा ऐवज गात राहण्यानं मिळाला नसता.’’
निर्गुणी भजनाची बीजं
माळवा हा मध्य भारतातील सुपीक पठारी प्रदेश आहे. इंदूर, धार जिल्ह्यात अजूनही नित्यनेमाने घरोघरी नाथपंथी भजनं गायली जातात. नाथपंथीय शीलनाथ महाराज हे १९०१ च्या सुमारास देवास येथे वास्तव्यास होते. १९२०मध्ये त्यांचं निधन झाल्यावर तिथे धुनी पेटविण्यात आली, ती अजूनही तेवत आहे. ही कुमारजींच्या घरापासून काही अंतरावरच आहे. त्यामुळे तिकडे जाणार्या वाटसरूंची भजनं कुमारजींच्या कानी पडत. घरावरून गुणगुणत जाणार्यांचं गाणं ऐकून त्यांचं लक्ष वेधलं गेलं. ते कुणाचंही गाणं मन:पूर्वक ऐकत. त्यांनी सांगितलंय, ‘‘त्यावेळी तिथला भिकारीसुद्धा निर्गुण भजन गात असे. त्याला पूर्ण भजन येत नसलं तरी अन् अर्धवटच येत असलं तरीही ते त्याला तेवढं पुरत असे. एखादं अर्ध भजन आणि फुटकी एकतारी घेऊन तो भजन गात बसे. असंच एका भिकार्याकडून भजनाची एक ओळ ऐकून माझ्या डोक्यात रेव्होल्युशन झाली. असं का झालं? ते मला नाही सांगता येणार.’’
निर्गुणी भजनांच्या विश्वात प्रवेश केल्यानंतर कुमारजींचं त्याविषयीचं चिंतन अखंड चालू होतं. सुमारे १४ वर्षांनंतर ते निर्गुणी भजनं सादर करू लागले.
नाथपंथीयांनी कर्म, ज्ञान, भक्ती व योग ह्या मोक्षप्राप्तीच्या चार मार्गांपैकी पतंजलीप्रणित योगसाधना स्वीकारली. ‘मानवाला मुक्तिसाठी ज्ञानप्राप्ती आणि त्याकरिता गुरू आवश्यक आहे’, असं मानणारे नाथपंथीय ईश्वराला गुरूच मानतात. पंचेंद्रियांनी होणारे ज्ञान हा भ्रम असू शकतो. भौतिकतेच्या पलीकडे जाणारे ज्ञान मिळवण्याचा मार्ग गुरू दाखवू शकतात. म्हणून गुरू हाच श्रेष्ठ! (या विषयी सांगताना कुमारजी म्हणत, ‘‘खरा गुरू हा भाग्यात असेल तरच मिळतो. अन्यथा आपल्या आसपास गुरूंचे सँपल (नमुने) भेटतात. योग्य मार्ग दाखवणारा खरा गुरू मिळणे अतिशय दुर्मिळ असते.) मग कुमारजी निर्गुणी भजनं ऐकत गेले आणि त्यांच्या लक्षात आलं की, त्या भागात निर्गुणी भजनांचा समुद्र आहे!
नश्वरतेला स्पर्श करणारा सूर
गोरखनाथ हे १२व्या शतकात, तर कबीर १५व्या शतकात होऊन गेले. त्यांची भजनं मौखिक परंपरेतून पुढे चालत आली आहेत. त्या भजनांचे संग्रहदेखील छापले गेले. परंतु ते सहजपणे कुठेही उपलब्ध होत नसत. कुमारजींना एका भक्ताकडून ‘शीलनाथ शब्दामृत’ हा ५०० निर्गुणी भजनांचा संग्रह मिळाला. कुमारजी निर्गुणी भजनातील प्रत्येक शब्द, संकल्पना व त्यामागे दडलेला अर्थ यांच्या खोलात गेले आणि त्यातून त्यांनी ३० भजनं निवडली. त्यात कबीरांची २१, गोरखनाथांची ५, शिवगुरू आणि देवनाथ यांची एकेक व दोन अनामिक अशी भजनं होती.
निर्गुणी भजनांच्या स्वरातून शून्य निर्माण करण्याची शक्ती आहे, त्यानुसार कुमारजींनी भजनांची रचना केली. ते म्हणत, ‘‘निर्गुणी भजनांचे जग फार वेगळे आहे. ती स्थिती आहे, वस्तू नाही. शून्य आकाशातून निघणारे सूर म्हणजे निर्गुण! निर्गुणी स्वरात फक्कडपणा आहे. हे स्वर सहज फेकून देतात. फेकणार्यानं अगदी जोरात फेकावं पण समोरच्याला अजिबात लागू नये. उलट काय छान मारलंय असं वाटावं, अशी मौज त्या स्वर फेकण्यात आहे.’’
कुमारजींनी ‘माया महाठगनी हम जानी’ ऐकलं. परंतु त्यांना तो भाव निर्माण करणारी रचना स्वरबद्ध करण्यासाठी दोन वर्षं लागली. त्याच मायेचा खेळ दाखवणार्या ‘रमैया की दुलहन लूटा बाजार’च्या रचनेसाठीही एक वर्ष लागलं. तुम्ही कधीही ‘माया महाठगनी’ ऐका, त्या स्वरांतून कुमारजी नश्वरतेला स्पर्श करतात आणि आपल्याला तिथपर्यंत घेऊन जातात. त्यांनी नुसतं ‘माया’वा ‘अंजन सकल पसारा’ म्हटलं की आपल्या सभोवताली मांडलेला पसारा ही फसवी माया आहे, याचा साक्षात्कार होतो. कबीरांनी मायेची विविध रूपे सांगितली आहेत. ‘गोड बोलून फसवणार्या ठगासारखीच ही माया आहे. ती कधी मूर्ती होऊन भक्तांना आकर्षित करून घेते तर कधी तीर्थ होऊन लोकांना खेचून घेते. भक्तांकरिता भक्तिणी होऊन तर ब्रह्मदेवाला ब्रह्माणी होऊन मोहित करते.’ कबीरांची ही भावना कुमारजींनी पूर्णपणे समजून घेऊन स्वरांतून भिडवली आहे.
रमैया की दुलहन लूटा बाजार जी
सुरपूर लूटा नागपूर लूटा,
तीन लोक मच हाहाकार
ह्या कबीर भजनात त्याच मायेने स्वर्ग, मृत्यू व पाताळ या तिन्हीलोकांत हाहाकार माजविल्याचं वर्णन आहे. त्यातील हाहाकार ऐकल्यावर खरोखरीच हाहाकार साक्षात समोर उभा राहतो.
शून्य गढ शहर शहर धर बस्ती
कौन सूता कौन जागे है,
लाल हमरे हम लालन के
तन सोता ब्रह्मजागे है
ह्या भजनात गोरखनाथांनी ‘‘अज्ञानरूपी झोपेत राहू नका, आत्मा जागा ठेवून शरीराच्या किल्ल्याचं रक्षण करा’’ असं सांगितलं आहे. त्यातील शून्यगढ म्हणजे सहस्रदलरूपी किल्ला होय. ‘शून्य’ हा भाव स्वरांतून व्यक्त करणं हे महाकठीण काम!
ख्रिस्तपूर्व दुसर्या शतकात बौद्धांच्या महायान पंथातील पंडित नागार्जुन यांच्या मताप्रमाणे नित्यास अनुभवात येणारे जगातील सर्व पदार्थ शून्य आहेत. एक पदार्थ दुसर्यावर, दुसरा तिसर्यावर अशा रीतीने प्रत्येक पदार्थ दुसर्यावर अवलंबून असल्याने त्याला स्वरूप वा स्वभाव नाही. पदार्थाच्या ह्या स्थितीला त्याची शून्यता असं संबोधलं आहे. याचाच अर्थ बुद्धीच्या सहाय्याने ज्याचे ज्ञान होते, ते सर्व पदार्थ शून्य आहेत. त्याचे ज्ञान हा भ्रम आहे. शून्य हेच सत्य असून त्याची अनुभूती बुद्धी न येता प्रज्ञेला येते. ज्ञाता व ज्ञेय असा भेद उरत नाही, ज्याचे वर्णन करता येत नाही, अशी अवस्था म्हणजे शून्य! परंतु शून्य म्हणजे पोकळी नव्हे. शून्य म्हणजे अनादी, निराकार, निर्गुणावस्था! ही शून्य अवस्था स्वरांतून पोहोचविण्याचे अद्वितीय कार्य कुमारजींनी करून ठेवलं आहे.
‘स्व’त्त्व शोधण्यातली व्याकुळता
भजनामध्ये शांतरस व्यक्त करणारा कमालीचा साधेपणा असतो. कुमारजींनी त्या साधेपणाला अभिजाततेचा स्पर्श दिला. निर्गुणी स्वरांतून मौन, वैराग्य, एकाकीपण, आर्तता आपल्याला भिडते. हे एकाकीपण प्रत्येकाला जाणवणारं आहे. ते आत्मकेंद्रिततेतून वा संकुचित वृत्तीतून आलेलं नाही. तर ‘स्व’त्त्व शोधण्याच्या व्याकुळतेतून आलेलं आहे. त्यात सामुदायिकतेशी, ब्रह्मांडाशी जोडलं जाण्याची आस आहे. अद्वैतता, समग्रता साधण्याची ती आकांक्षा आहे. हे भाव व्यक्त करून कुमारजी आपल्याला विलक्षण वेगळ्या, अपरिचित, अव्याख्येय प्रदेशात घेऊन जातात. भीमबेटका, हंपी, बदामी, वेरूळ, अजिंठा ह्या प्राचीन शैलगृहात गेल्यावर आपलं स्थळ-काळाचं भान हरपतं. ह्या अभिजात वास्तू आपल्याला निशब्द करतात. शब्दातीत अनुभूती देतात. कुमारजींचे निर्गुणी भजन ऐकताना अगदी तसंच होतं. त्यामुळेच देशातील साहित्यिक, नर्तक, वादक, शिल्पकार, वास्तुशिल्पी असे अनेक कलावंत त्यांच्या गायनाकडे आकर्षित होत असत.
निर्गुण स्वर हे त्या पद्धतीच्या आचार-विचारातून आलेले आहेत. एकांतात व्यक्त होणारे हे स्वर समजून घेतल्याशिवाय ते स्वर निघू शकत नाहीत. ‘युगन युग हम योगी’ ह्या भजनात ‘हम सब माय, सब है हम माय, हम हैं बहुरी अकेला’ (मी सर्वांत व्यापून राहिलो आहे आणि सर्वजण माझ्यात सामावले आहेत, तरीसुद्धा मी सर्वांपासून अलिप्त आहे) हे एकाकीपण कुमारजींकडून ऐकताना कित्येक जण चरकले आहेत. तो विचार आत्मसात केलेले कुमारजी क्षणभंगुरता जाणून होते. ते म्हणत, ‘‘आता गायलेला तिलक कामोद आणि गाणारा कुमार इथेच संपला. उद्याचा तिलक कामोद वेगळा आणि कुमारही निराळा!’’
ज्ञानमार्गाची अनिवार्यता दर्शवली
सध्या सुस्थिती असणार्यांनाही असुरक्षिततेच्या भीतीनं ग्रासलं आहे. सतत मन धास्तावलेलं असतं. एकांत वा चिंतनास अजिबात सवड नसलेल्या काळाला आपण ज्ञानयुगाचं संबोधन लावलं आहे. ‘वेळ मूल्यवान’ असल्याचा अर्थ ‘केवळ संपत्ती संचयातच वेळ घालवा,’ असा करून घेतला आहे. ‘मी कोण आहे, मी कुणाचा आहे, माझ्या आयुष्याची प्रेरणा काय आहे?’ अशा त्रासदायक प्रश्नांना हात घालण्याची हिंमत होत नाही. तात्कालिक मोहाच्या सापळ्यात अडकणारे अज्ञानी हे बहुसंख्याक आहेत. असंख्य भ्रमात रममाण होणार्या मनाला त्यातून बाहेर खेचायचं असेल तर कुमारजींनी गायलेली निर्गुणी भजनं कामाला येतात. निर्गुणी भजनं कधीही ऐकली तरी ती आपल्यातील फुगून राहिलेल्या अहंकाराला टाचणी लावतात, आत्मपरीक्षणाला भाग पाडतात. ज्ञानमार्गाची अनिवार्यता सांगतात. तिथून पुढे कोणत्या दिशेला जायचं, याचा निर्णय सर्वस्वी आपला असतो. भौतिक सुखांची लक्ष्मणरेषा आपणच आखायची असते. भौतिकतेपलीकडील आनंदाची महती नाथपंथीय आणि कबीर यांनी दाखवली. त्यातील सूक्ष्म बारकाव्यांना उमजून घेण्यासाठीची द़ृष्टी कुमारजींनी दिली आहे.
कुमारजींचं वैशिष्ट्य, असं की त्यांनी सगुण व निर्गुण दोन्ही प्रकारची भजनं तेवढ्याच ताकदीनं गायली आहेत.१९६७ मध्ये कुमारजींनी सूरदास, मीरा व कबीर यांच्या पदांचा ‘त्रिवेणी’ हा कार्यक्रम सादर केला. त्यांनी ‘निर्गुण दर्शन’ घडविल्यावर जोरदार स्वागत झालं तर काहींनी ‘भिकार्यांची गाणी’ संबोधून हिणवलं. कुमारजी दोन्ही प्रकारच्या प्रतिसादाला सम पातळीवरच घेतलं. हिंदीमधील नामवंत साहित्यिक व विद्वान हजारीप्रसाद द्विवेदी यांनी म्हटलंय, ‘‘गोरखनाथ, कबीर, मीरा, तुलसीदास व सूरदास यांनी भजनं गायली असती तर ती कशी असती? याची प्रचिती कुमारजींच्या भजनांतून येते.’’
‘‘स्वरांचा आघात आधी (स्वत:च्या) आतमध्ये झाला पाहिजे. स्वर असो वा व्यंजन, त्यांची अनुभूती आत झाली तर गळ्यातून समर्पकपणे बाहेर येते” असं कुमारजी म्हणत. त्यांच्या कंठातून निघणार्या स्वरांची निघणारी कंपने त्यांना संपूर्ण शरीरभर जाणवत. कुमारजींचं गायन आणि त्यांची गानमुद्रा पाहून, सर्व स्तरांवरील (वरपांगी ऐकणार्या व खोलवर डोकावणार्या) श्रोत्यांना, ते जाणवत असे. हा आनंद घेऊन ते सर्वांगाने गात आणि ते चैतन्य पाहून श्रोते दंग होत असत. कुमारजींमुळे सभोवताल नादमय होत असे व अजूनही होतो.
सूक्ष्म निरीक्षण आणि प्रगाढ चिंतन
एकंदरीत, आजारपणातील सर्व मर्यादा असूनही कुमारजींनी आजारपणातील काळ विलक्षण प्रतिभेनं उपयोगात आणला. त्या काळातील संगीतविषयक मूलभूत चिंतनातून ‘धून उगम राग’, ‘निर्गुणी भजन’, ‘ऋतू संगीत’, ‘माळवा की लोकधुने’ या निर्मितीची बीजे पडली. ज्याचा पुढे ते विस्तार करीत गेले. त्यांनी परंपरेच्या खोल तळाशी जाऊन त्या परंपरांना आधुनिक केलं. गायन समकालीन केलं. म्हणूनच त्यांना ‘संगीतातील कबीर’, ‘क्रांतिकारक’ अशा अनेक उपाध्या बहाल होत गेल्या.
ते जीवनातील प्रत्येक क्षण सजगपणे पाहत होते. निसर्ग अनुभवण्यासाठी दूरवर जंगलात जाण्याची गरज नाही. आपल्या सभोवतालची झाडं, पक्षी, दिवसातले विविध प्रहर हे तरी आपण कुठे मनापासून अनुभवतो? आकाशातील रंगांचा खेळ पहायला आपल्याला फुरसत नसते. सहा ऋतूंचे सोहळे तरी आपण कुठे टिपतो? आसपासची झाडे व त्यावरील पक्षांच्या क्रीडा मग्न होऊन निरखत नाही. आपण काही पाहतच नाही. आपल्याला माहीत असल्याचा पूर्वग्रह घेऊन आपण नाविन्यापासून पारखे होतो, अनेक दृष्टांतांमधून याचं भान जे. कृष्णमूर्ती देतात. दुर्गाबाई भागवत आणि कुमारजींनी संजय होऊन आपल्याला ऋतुदर्शनाचा अनुभव दिला आहे. ढगांच्या आगमनापासून मेघगर्जनेपर्यंतच्या असंख्य छटा, क्षणात येऊन जाणारी सर ते सतत लागून राहिलेला पाऊस, वर्षाऋतुतील या वैविध्याची दृकश्राव्य प्रचिती कुमार देतात. (त्यांनी १९६६मध्ये ‘गीतवर्षा’ सादर केला.) पानगळ झालेल्या वृक्षांना फुटणारी कोवळी पालवी, फुललेला पळस आणि कोकिळेची साद वसंत ऋतूची चाहूल देते. (‘गीतवसंत’-१९७५) पक्षी घरटी बांधायला सज्ज होतात आणि त्याचवेळी रंगांचे सोहळे चालू होतात. कुमारजींनी ऋतुराजाची वैशिष्ट्ये उलगडून दाखवल्यानंतर, आपल्याला वसंत, हेमंत पाहण्याची नजर मिळते. निसर्ग हा ऋतुनुसार कसा बदलत जातो. तुळशीची मंजिरी वा आंब्याचा मोहोर आपल्याला दिसत नाही. कुमारजी तर कडुनिंबाचा बहरसुद्धा दाखवतात. संधीकाल दूर सारून क्षितिजावर उष:प्रभा दिसू लागते. हलके हलके किरणे अवतीर्ण होत अरुणोदय होतो. सायंकाळी अंधाराचं राज्य भेदत दिवेलागण होते. या नित्य परिचयाच्या द़ृश्यातील सौंदर्य ते दाखवतात. आपल्याला भुंग्यांचं गान व पक्ष्यांचं कूजन ऐकू येत नाही. योग्य त्या फुलातील मध मिळवणार्या मधुकरवृत्तीच्या भुंग्याचं ते इतक्या विविध पद्धतीनं वर्णन करतात, की आपण थक्क होऊन जातो. चिमण्यांचा चिवचिवाट, पावशाची हाकाटी, मोराच्या केका, बेडकाची डराव डराव यांच्यामुळे परिसर बहरतो. हे सभोवताली बरंच काही असून आपण नीट ऐकतही नाही व नीट पाहतही नाही, त्यामुळे आपल्याला सौंदर्य दिसतं नाही, हे कुमारजी सिद्ध करून दाखवतात. (ते भल्या पहाटे उठून कोकीळ व पावशा यांची पहिली साद मन लावून ऐकत.) आपल्याला ज्ञान नाही आणि ध्यानपूर्वक अभ्यासवृत्तीही नाही, याची टोचणी ते लावून जातात. त्यामुळेच आपल्यातील धृतराष्ट्राची स्पष्ट जाणीव होते. सूक्ष्म असो वा स्थूल, सृष्टीतील प्रत्येक घटनेविषयी त्यांना अपार कुतुहल होतं. (त्या उलट आपण आपल्यातील कुतूहल आणि जिज्ञासेला मारून टाकण्याची प्रक्रिया झपाट्याने पूर्णत्वास नेतो.) सूक्ष्म निरीक्षण व प्रगाढ चिंतन या मंथनातून कुमारजींनी ज्ञानाचं नवनीत आपल्या हाती ठेवलं आहे. जीवन पाहण्यास, समजून घेण्यास व बदलण्यास संगीत हे माध्यम समर्थ आहे, याची त्यांना जाणीव होती. इतर कला माध्यमांना शक्य नाही ते संगीताला शक्य आहे, हे ते उमजून होते. ‘संगीत ही कलांची कला आहे ’, हे त्यांनी वारंवार सिद्ध केलं.
निर्मितीचे नजराणे
नवतेमधील कशाचा स्वीकार करावा? परंपरा आणि आधुनिकतेचा उत्तम संगम कसा घडवावा? हे कायम आव्हान असतं. कवीवर्य विंदा करंदीकरांनी नेमक्या शब्दात म्हटलंय, “प्रतिभावंताला परंपरेत एकाच वेळी आधार आणि आव्हान दोन्ही दिसत असतात. परंपरेला सामोरे जाताना तो जो नजराणा पुढे करतो त्याचेच नाव नवता”. कुमारजी, विचारपूर्वक निर्मितीचे एकेक नजराणे आपल्या हाती ठेवत गेले. त्यांनी कबीर, मीरा, सूरदास, तुलसीदास, तुकाराम, भा. रा. तांबे यांच्या काव्याचा सखोल अभ्यास करून त्यातील मर्म सांगितलं. तसं पूर्वी कुणी सांगितलंच नव्हतं. कित्येक रागांमधील बंदिशींवर धुळीची पुटं चढली होती. त्यांचं खरं स्वरूपच दिसत नव्हतं. कुमारजींनी पुटं बाजूला करून बंदिशीमधील रत्नप्रभा दाखवून दिली आणि त्याचवेळी गरज भासल्यावर नव्या बंदिशींची रचना केली. नवीन रागांची निर्मितीही केली. ‘अनोखा लाडला खेलन को मांगे चांद’मधील लडिवाळपणा लळा लावतो. ‘सर पे धरी गंगा’ मधून विशालतेचा व आवेगाचा प्रत्यय येतो. ‘बचाले मोरी माँ’मधील बळी जाणार्या शेळीचं आक्रंदन काळीज कापत जातं.
कुमारजी म्हणत, ‘‘मी कधीही शाळेत न गेलेला एक जीव आहे. परंतु मी असं मानत आलोय की येणारा प्रत्येक क्षण, प्रत्येक अनुभव हा मला काही शिकवण्यासाठीच आला आहे.’’ शोधून व हेरून मध मिळवण्याच्या भ्रमरवृत्तीला ‘मधुकर’ आणि त्यामुळे भुंग्याला ‘विराट ज्ञानी’ असं म्हटलंय. ही वृत्ती कुमारजींनी मनोभावे जोपासली होती. त्यांच्याकडे २००० पुस्तकांचा संग्रह होता. त्यांचं वाचन दांडगं होतं. विंदा करंदीकर, दुर्गा भागवत, इरावतीबाई कर्वे यांच्या लेखनातील संदर्भ त्यांच्या संभाषणात येत. त्यांच्या आप्तवर्तुळात देशभरातील विविध भाषक साहित्यिक, चित्रकार, नाटककार, अभिनेते, अभिकल्पक, शिल्पकार पत्रकार हे होते. कुठेही नवीन काही झालं, की ते कुमारजींना सांगत व दाखवत.
संगीताचे विरहस्यीकरण
कुमारजींनी संगीताचं विरहस्यीकरण केलं. त्यांनी, ‘‘कलेचा आस्वाद घेणे संपर्कावर अवलंबून आहे. कलेचे मर्म समजणे महाकठीण आहे. संगीत व चित्रकला ही अमूर्त कला आहे. संगीतातून सर्व प्रकारचे भाव प्रकट करता येतात. म्हणून ती श्रेष्ठ कला आहे. परंतु संगीत हे परिवर्तनशील आहे व असलेच पाहिजे, याचे भान पाहिजे. आताचा राग आणि कुमार इथेच संपला.’’ असं सांगून ठेवलं आहे. त्यांनी निर्मिती प्रक्रिया समग्रपणे समजाऊन घेतली. ध्वनीचा सखोल अभ्यास केला. मेंदू आणि कंठ यातून गायन निर्मिती होते. ह्या नादातून कोणते आकार काढता येतील, याचा त्यांना अखंड ध्यास होता. त्यामुळे ते स्वरातून घंटानाद, धबधबा, वीज, मत्स्य क्रीडा आपल्यापर्यंत पोहोचवतात. सतार व तंबोर्याचे बोल कंठातून दाखवतात. ते स्वरातून चित्र साकारतात, कधी शिल्प घडवतात, तर कधी स्वरातून नर्तन सादर करतात. ‘संगीत पाहता आणि नृत्य ऐकता आले पाहिजे’ याची प्रचिती देतात. पु. ल. देशपांडे यांनी सांगून ठेवलेलंच आहे, ‘‘दोन तंबोर्यांच्यामध्ये बसून कुमार गायला लागले की त्यांचा स्वरकायाप्रवेश होत असे.’’ अनेक जणांना अनेक वेळा याची प्रचिती आली आहे.
एज ऑफ डिस्ट्रॅक्शन
एकाग्रता, शांतता व चिंतन नष्ट करणार्या ह्या काळाला ‘लक्ष विचलित करणारा काळ’ (एज ऑफ डिस्ट्रॅक्शन) असे संबोधन लाभलं आहे. विविध माध्यमांतून सुप्तपणे आपल्या नकळत आपली मते घडवली जात आहेत. आपल्याला मात्र, ती मते आपणच स्वतंत्र बुद्धीने निर्माण केल्याचा भ्रम होतो. क्षणिकतेच्या साम्राज्यात शांतता मिळवण्याचे आटोकाट प्रयत्न आपण करीत आहोत. सभोवतालचा गोंगाट, कर्कशता नष्ट करून मनाला उभारी देणार्या अवकाशाचा शोध प्रत्येक जण घेत आहे. अतीव द्रूत वेगाने धावणार्या अशांत पर्वात मनाला शांत करणारा विलंबित स्वर शोधत आहे. सोहळे, मेळावे, सहली यांतून शांतता खेचून आणण्याचा प्रयत्न करीत आहे. अरण्यात, पर्वतावर, समुद्राकाठी, थंड हवेच्या ठिकाणी जाऊनही एकांतवास लाभत नाही. आपल्याच घरामधली स्पेस खटकत राहाते व ती अर्थपूर्ण वाटत नाही. अंतर्गत सजावट वारंवार बदलून नावीन्य मिळवण्याची पराकाष्ठा केली जाते. तरीही आपल्या घरात आपणच दूरचे पाहुणे असल्यागत त्रास होत राहतो. स्वत:पासून आणि जगापासून तुटल्याची भावना आतून कुरतडत राहते. आत्मप्रेमात व आभासी वास्तवात मग्न समाजासमोर, स्वत: आणि समाज दोन्ही बदलण्याचे कडवे आव्हान आहे, याचे भान शास्त्रज्ञ आणून देत आहेत. अशा बिकट काळातही पं.कुमार गंधर्व यांची सर्जनसृष्टी वेळीच आपल्याला समृद्ध करीत राहते.
‘माझे मज कळो येती अवगुण’ ही तुकोबांची वाट धरली की मग सुरू होतो आत्मशोधाचा मार्ग! अगदी तसंच कुमारांच्या गायनातील समग्रतेमुळे आपल्या अपूर्णत्वाची जाणीव तीव्र होत जाते. आर्तता, चैतन्य, आत्मीयता, आर्जव अभिव्यक्त करणारे तत्त्वचिंतक कुमारजी आपल्याला आत्मसंवादास भाग पाडतात. त्यातून अवघड व नकोसे प्रश्न नव्याने पडू लागतात. त्यांच्या सर्जनशीलतेमुळे आपले आयुष्य उजळून निघते. कल्पकतेला स्पर्श करण्याची उर्मी येते. स्वर व शब्द, बुद्धी व भावना, निसर्ग व मानव ही सारी द्वैते कुमारांच्या गायनात मिटून जातात. आपल्याला उपलब्ध असलेले कुमारजी मन:पूर्वक ऐकले तरी घनघोर अज्ञान दूर होऊ शकते. आपल्या आत डोकावण्याची सवय लागली की बाहेरचं जग स्वच्छ दिसू लागतं आणि मग कुठल्याही विपरीत काळात वाटचाल करणं सुगम होतं. अशी आंतरयात्रा करता यावी, यासाठीच ऐकत राहावे- पुन:पुन्हा कुमार गंधर्व!
अतुल देऊळगावकर, पर्यावरणतज्ज्ञ, कला आस्वादक समाजअभ्यासक आहेत.
(१ एप्रिल २०२१ रोजीच्या ‘मुक्त संवाद’ अंकातून साभार)
COMMENTS