सर्व सामान्य लोकांना लस मिळेपर्यंत सहा महिने ते वर्षभराचा कालावधी जाऊ शकतो असे राज्य आरोग्य खात्याच्या संकेतस्थळावर स्पष्ट करण्यात आले आहे.
आता मास्क सुद्धा लावायची गरज नाही, बिनधास्त कुठेही फिरू शकतो ही लोकांची बेपर्वाई खरे तर भविष्यात धोकादायक ठरू शकते. लस आली म्हणजे कोरोना कायमस्वरूपी संपला हे लोकांचे अज्ञान खरे तर शासन आणि विविध सामाजिक संस्था, वैद्यक तज्ज्ञांनी प्राधान्याने दूर करणे गरजेचे आहे.
गेल्या वर्षी मार्च महिन्यापासून कोविड 19 या विषाणूने सर्वांना वेठीस धरले. अनेकांचे प्राण गेले. त्याच्या विळख्यात अनेक कुटुंबे उध्वस्त झाली. दिवसेंदिवस या विषाणूने त्याचे रौद्ररूप दाखवणे सुरू केले.
या विषाणूला अटकाव करण्यासाठी मग जगभरात विविध औषध कंपन्यांनी लस तयार करण्यास सुरुवात केली. आणि त्यानुसार तिसऱ्या टप्प्यावर असलेल्या दोन लशीना केंद्राने आपत्कालीन वापरास मान्यता दिली आहे.
पण विविध वृत्तवाहिन्यांनी असे काही चित्र तयार केले आहे की लस आली आणि ती सर्वाना मिळणार त्यामुळे कोरोना कायमचा नष्ट होणार. या सर्वाचा परिणाम सध्या बाहेर सर्वत्र दिसत आहे. लस आलीच या भ्रमात अनेकांनी आता मास्क वापरणे बंद केले आहे तसेच सोशल डिस्टन्स वगैरे तर कधीच कालबाह्य झाले आहे.
याबाबत राज्य कोविड टास्क दलाचे प्रमुख डॉ. संजय ओक यांनी सांगितले की, लस आली तरी २०२१मध्ये संपूर्ण वर्षभर मास्क वापरावा लागेलच आणि नियमांचे पालन सुद्धा करावे लागेल. सध्या ही लस केवळ आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्यात येणार असून मग त्यानंतर टप्याटप्याने ती सर्वाना देण्यात येईल. यामध्ये बराच कालावधी जाणार आहे. तसेच लस घेतल्यानंतर त्याचे होणारे परिणाम यासाठी आरोग्य यंत्रणा सक्षम ठेवण्यात आली आहे.
मुळातच लस आणि औषध यातील मूलभूत फरक लोकांना समजून सांगणे आवश्यक आहे. कोणत्याही रोगावर औषध हे कायमस्वरूपी प्रभावी ठरते. पण विषाणूवर लस ही एकदम प्रभावी ठरत नाही. लस घेतल्यावर कोरोना नाहीसा होणार हा लोकांमध्ये असणारा मोठा गैरसमज जनजागृतीच्या माध्यमातून काढून टाकणे या वेळी खूप आवश्यक आहे. लस ही शरीरात अँटी बॉडी तयार करण्याचे काम करून या विषाणूला अटकाव करण्याचे काम करते. असे विषाणू नष्ट होण्यास अनेक वर्षे जातात.
दरम्यान सर्व सामान्य लोकांना लस मिळेपर्यंत सहा महिने ते वर्षभराचा कालावधी जाऊ शकतो असे राज्य आरोग्य खात्याच्या संकेतस्थळावर स्पष्ट करण्यात आले आहे.
जगभरात सध्या पाऊण टक्क्यांहून अधिक देशात कोरोनाचा हाहाकार सुरू आहे. बहुतांश देशात लॉक डॉउन पुन्हा लावावा लागला आहे. या सर्व देशातही लस देण्याची प्रक्रिया सुरू असली तरी लॉक डॉउन कायम आहे. सुदैवाने भारतात अजूनही दुसरी लाट सुरू झाली असली तरी ती तीव्र झाली नाही. पण लोकांची संपूर्ण बेफिकिरी आणि बेपर्वाई ही स्थिती आणू शकते असे अनेक वैद्यक तज्ज्ञांनी स्पष्ट केले.
१९१८मध्ये आलेल्या स्पॅनिश फ्ल्यू या महामारीने तब्बल तीन वर्षे मुक्काम केला होता. कोणतीही महामारी ही दीर्घकाळ चालते. पोलिओ वर आजही लस घेणं आवश्यक आहे. त्यामुळे कोरोनावर सुरू होत असलेल्या लस देण्याची प्रक्रिया सुरू झाली तरी कोणत्याही स्थितीत नियम पाळलेच पाहिजेत. तोंडावर मास्क, सोशल डिस्टन्स, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे आणि हात धुणे ही सूत्रे यापुढे कायम ठेवणे आवश्यक आहे.
अतुल माने, मुक्त पत्रकार आहेत.
COMMENTS