बा नारायणा..

बा नारायणा..

भाजपने सोपवलेली जबाबदारी राणे इमानेइतबारे पार पाडत आहेत, हे त्याच्या एकूण बोलण्यावरून लक्षात येते. पण आता मात्र सर्वच फासे उलटे पडल्याचे चित्र तयार झाले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील अटक झालेले पहिले मंत्री म्हणून नारायण राणे यांचे नाव आता कोरले गेले. केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेऊन केवळ ४५ दिवस कसेबसे पुरे झाले असताना राणे यांच्यावर ही आफत ओढवली.

महाराष्ट्र विशेषतः आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत सत्ताधारी शिवसेनेला ‘अरे ला कारे’ याच भाषेत उत्तर देण्याची धमक असलेला एके काळच्या शिवसैनिकाला अचानक दिलेले महत्त्व हे महागात पडू शकते याची कल्पनाच भाजपमधील चाणक्यांना लक्षात आलेली नाही. जन आशीर्वाद यात्रा हे निमित्त मात्र ठरलेल्या नारायण राणे यांच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बद्दलच्या एकेरी वक्तव्यामुळे राजकीय फासे अचानक फिरले. शिवसेनेने यावेळी रस्त्यावरील लढाईचे अस्त्र न वापरता कायदेशीर हत्यार उपसले आणि राणे यांना अटकेला सामोरे जावे लागले. बरे नारायण राणे यांच्या वक्तव्याला पाठिंबा देणे म्हणजे स्वतःहून दगडावर पाय मारून घेण्याची वेळ असल्याने यामध्ये खरी पंचाईत झाली आहे ती भाजप नेते आणि कार्यकर्त्यांची. राणेंच्या विधानावर आपण सहमत नाही पण पक्षनेते म्हणून आम्ही त्यांना पाठिंबा देऊ असे काहीसे थातूरमातूर बोलून देवेंद्र फडणवीस यांनी वेळ मारून नेली. तर अन्य नेत्यांनी केवळ आपले पक्षप्रेमच दाखवणे पसंत केले. त्यामुळेच अपवाद वगळता सर्वच ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते हे फक्त पक्षाच्या घोषणा देताना दिसत होते. नारायण राणे यांच्या नावाची घोषणा कुठेच दिसत नव्हती.

भारतीय जनता पक्षातर्फे काढलेल्या जन आशीर्वाद यात्रेने राजकीय धुरळा उडवला आहे. केंद्रात नव्याने झालेल्या मंत्र्यांनी आपापल्या परिसरात किंवा कार्यक्षेत्रात ही यात्रा काढून वातावरण निर्मितीचा प्रयत्न केला. नारायण राणे, कपिल पाटील, भागवत कराड आणि डॉ. भारती पवार यांच्या नेतृत्वाखाली या यात्रा निघाल्या. नारायण राणे यांची यात्रा मुंबईतून सुरू होणार असल्यामुळे आणि मुंबई हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्यामुळे याबाबत उत्सुकता होती. त्यातच राणे हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळी जाणार असल्याने आता राडा होणार हे अनेक माध्यमांनी गृहीत धरले होते. पण यावेळी शिवसेनेने काहीही प्रतिक्रिया न देता राणे यांना दर्शन घेऊन दिले. पण त्यानंतर समाधी स्थळ दुधाच्या अभिषेकाने पवित्र करून त्यांच्या ‘चाणक्य निती’चे अनोखे दर्शन दिले.

केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेऊन राज्यात पहिल्या वेळीच आलेल्या नारायण राणे यांच्या विमानतळावरील आगमनप्रसंगी भाजपच्यावतीने इव्हेंट करण्यात आला. सर्व वृत्तवाहिन्यांवर त्याचे लाइव्ह कव्हरेज करण्यासाठीचे नियोजन वाखाणण्याजोगे होते. नारायण राणे दिल्लीहून मुंबईत येणार हा काही लाइव्ह कव्हरेजचा विषय नव्हता, परंतु सध्या कोणतीही गोष्ट मॅनेज करता येते आणि त्यानुसार राणेंच्या स्वागताच्या इव्हेंटचे सर्व वाहिन्यांवरून लाइव्ह कव्हरेज झाले. भाजपने राणे यांना पुढे करण्याचे अनेक अर्थ काढण्यात येत आहेत. कालपर्यंत भाजपच्या नेतृत्वाच्या कोणत्याही फळीत दखलपात्र नसलेले नारायण राणे अचानक भाजपच्या नेतृत्वाच्या पहिल्या फळीत विराजमान झाल्याचे चित्र निर्माण झाले. त्यांच्या स्वागतापासून ते यात्रेला झेंडा दाखवण्यापर्यंत देवेंद्र फडणवीस यांना उपस्थित राहावे लागल्यामुळे ते चित्र अधिक ठळक बनले. मागे राणे काँग्रेसमध्ये असताना त्यांनी विधान परिषदेत फडणवीस सरकारवर टीका केल्यानंतर फडणवीस यांनी त्यांना सभागृहात जाहीरपणे, ‘तुमच्या अनेक फाईल्स आमच्याकडे असल्याची धमकी दिली होती. पुढे त्याच फाईल्स घेऊन फडणवीस दिल्लीला गेले आणि राणेंना राज्यसभा आणि नंतर केंद्रातील मंत्रिपद मिळाले हा यातील एक ठळक भाग.

तिकडे वसईमध्ये जन आशीर्वाद यात्रेत राणे यांनी आपल्या स्वभावाला अनुसरून भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांचे म्हणणे फाट्यावर मारत थेट हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतल्याने एकच गहजब माजला. वास्तविक राणे हे पहिल्यापासूनच आक्रमक आणि स्वतःला जे योग्य वाटेल तेच करायचे या स्वभावाचे आहेत. त्यामुळेच काँग्रेस संस्कृतीमध्ये ते फारसे रमले नाहीत. ‘हम करे सो’ अशी वृत्ती असल्याने कोणी नियमांचे आणि शिस्तीचे बंधन राणे यांच्यावर आणू शकत नाही. जी गत त्यांची काँग्रेसमध्ये झाली तीच भाजपमध्ये होणार असा अंदाज या आधीच व्यक्त करण्यात आला होता. आणि नेमके तेच झाले. पक्ष शिस्त आणि मर्यादित बोलणे हे राणे यांच्या सारख्या एके काळच्या शिवसैनिकाच्या पचनी पडणे अवघड आहे. या सर्वाचा परिपाक उद्धव ठाकरे यांच्या वरील एकेरी वक्तव्यामधून आला.

नारायण राणे यांचे उपद्रवमूल्य हे त्यांना केंद्रात मंत्रिपद मिळण्याचे एकमेव कारण आहे. शिवसेना आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सतत कारणाशिवाय टीका करीत राहणे ही राणे यांची ताकद आहे. मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीमध्ये शिवसेनेसमोर भाजपचे आव्हान आहेच. त्या आव्हानाला अधिक धार येण्यासाठी, कोणत्याही पातळीवर जाऊन टीका करून ठाकरे कुटुंबीयांना घायाळ करण्यासाठी राणे यांना ताकद देण्यात आली आहे. एका बाजूने राणे आणि दुस-या बाजूने राज ठाकरे यांना शिवसेनेवर सोडले की बाकी मैदानातील लढाई लढणे भाजपला सोपे जाऊ शकेल. भाजपने सोपवलेली जबाबदारी राणे इमानेइतबारे पार पाडत आहेत, हे त्याच्या एकूण बोलण्यावरून लक्षात येते. पण आता मात्र सर्वच फासे उलटे पडल्याचे चित्र तयार झाले आहे.

सध्या भाजप पक्षात नारायण राणे यांचे महत्त्व वाढत आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस, चंद्रकांतदादा पाटील यांचे भाजपमधील महत्त्व कमी होत असल्याचे निष्कर्ष काढले जात आहेत. त्यातच आशिष शेलार यांचे राज्यात दौरे वाढू लागले असून गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर भाजपमध्ये ‘सर्वांना सामावून घेणारी स्पेस’ रिकामी झाली होती ती भरून काढण्याचा प्रयत्न ते करीत आहेत. या दोन्ही गोष्टी ख-या असल्या तरी त्यामुळे फडणवीस आणि चंद्रकांतदादांचे महत्त्व कमी होईल, असे पटकन म्हणता येणार नाही. राणे यांची वादग्रस्त कारकीर्द ही पक्ष तसेच फडणवीस आणि पाटील यांच्यासाठी त्रासदायक ठरू शकते. आणि याचा फटका मुंबई महापालिका निवडणुकीमध्येही बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

अतुल माने, ज्येष्ठ पत्रकार आहेत.

COMMENTS