समाजनिष्ठ ज्ञानदूत!

समाजनिष्ठ ज्ञानदूत!

महाराष्ट्राच्या वैचारिक परंपरेला समृद्ध करणारे लेखक, भाष्यकार, विचारवंत, विचक्षण कलाअस्वादक नरहर कुरुंदकर आज ९१ वा ( १५ जुलै १९३२) जन्मदिन. भारताच्या स्वातंत्र्यानंतरच्या काळात कुरुंदकरांच्या बौद्धिक प्रतिभेने साऱ्या महाराष्ट्राला भुरळ घातली होती. गाढा व्यासंग आणि जग कवेत घेण्याची अपार क्षमता असलेली बुद्धिमत्ता लाभलेल्या कुरुंदकरांच्या प्रज्ञेला कुठलाच विषय वर्ज्य नव्हता. इतिहास, तत्वज्ञान, राजकारण, साहित्य, संगीत आणि नानाविध कलांचा अभ्यास या माणसाने आपल्या उण्यापुऱ्या ५० वर्षात केला. या प्रज्ञेची आभा आपल्याला त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांतून आणि लेखांतून प्रत्ययाला येतेच. कुठल्याही व्यक्तीचा किंवा विषयाचा भिडमुर्वत न धरता, त्या व्यक्तीची किंवा विषयाची चिकित्सा करणे, हे कुरुंदकरांच्या लिखाणाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य होते. त्यांची समाजनिष्ठा आणि ज्ञानाच्या अभिसरणासाठीची त्यांची तळमळ वादातीत होती. त्यांच्या वैशिष्ट्यांमुळे आजही त्यांच्या वैचारिक साहित्याकडे बुद्धिनिष्ठ वाचक आकर्षित होतो. वर्तमानात चिकित्सेची दृष्टी कमी होत असताना कुरुंदकरांच्या योगदानाचे स्मरण सयुक्तिक ठरावे...

गर्दीत हरवलेला गीतकार
आमार कोलकाता – भाग ४ : ८५ अँमहर्स्ट स्ट्रीट
“तो सदैव बोलतच राहिला! ” : रसेलची तत्त्वज्ञानाकडे वाटचाल

नरहर  कुरुंदकर स्वतःला ‘मी मार्क्सवादी आहे, पण कम्युनिस्ट नाही’, असे म्हणत असत. यामागील कारण कम्युनिस्ट राज्यकर्त्यांनी स्वातंत्र्याची जी गळचेपी केली, ती कारणीभूत असावी. ते स्वतःला मार्क्सवादी यामुळे म्हणत की, कार्ल मार्क्सने ज्या प्रकारची जगाला ऐतिहासिक चिकित्सेची दृष्टी दिली, ती कुरुंदकरांच्या अभ्यासाची पद्धत होती. कुरुंदकर इतिहासाला नेहमी प्रवाहाच्या संदर्भात पाहत असत, हीच मार्क्सने दिलेली दृष्टी होती. याचा प्रत्यय आपल्याला कुरुंदकरांचे इतिहासावरील लेख वाचताना येतो.

कुरुंदकरांनी रणजित देसाई यांच्या ‘श्रीमानयोगी’ कादंबरीला लिहिलेली प्रस्तावना, त्यांनी दिलेली शिवाजी महाराजांवरील भाषणे आणि त्यांनी शिवाजी महाराजांवरील लिहिलेले एक छोटेखानी पुस्तक ते ऐतिहासिक व्यक्तीकडे प्रवाहाच्या रुपात कसे पाहत होते, याचा अनुभव देणारी. शिवाजी हा हिंदू (सहिष्णू) धर्म परपरेंचा प्रतिनिधी होता, तर औरंगजेब हा मुस्लिम  परंपरेचा प्रतिनिधी होता. तो मध्ययुगीन काळ होता, ते धर्म, संपत्ती हा महत्त्वाचा घटक होता. या गोष्टी आपल्याला विसरून चालणार नाहीत. अनेकदा आपण आधुनिक मूल्यांच्या आपल्या संकल्पना ह्या ऐतिहासिक व्यक्तींवर लादत असतो, त्यामुळे त्या काळच्या गोष्टींचे आपल्याला आकलन नीट होऊ शकत नाही. कुरुंदकर ही सामाजिक – राजकीय परिस्थिती लक्षात घेत असत.

काळसुसंगत चिकित्सापद्धती

कुरुंदकरांनी शिवाजी महाराज आणि वासुदेव कृष्णाला चाणक्याच्या अर्थशास्त्राचे संदर्भ लावून पडताळून पाहिले. या प्रस्तावनेत कुरूंदकर लिहितात की, “ शिवाजीने कौटिल्य वाचला होता काय? ऐतिहासिकदृष्ट्या ह्याचे उत्तर सरळ ‘नाही’ असे आहे. पण अशी कल्पना जर केली की, त्याने कौटिल्य वाचला होता, तर कौटिल्याचा आदर्श राजा हे शिवाजीचे प्रयोजन आहे. कौटिल्य म्हणतो, प्रजेचे इहलौकिक व पारलौकिक कल्याण साधणे, हे राजाचे काम आहे”. ही त्यांच्या अभ्यासाची पद्धत होती, यात शंकाच नाही. त्यामुळे अनेक मते आपल्याला काही वेळा पचवायला जड जातात. तानाजी मालुसरेंच्या नावावरून सिंहगड हे नाव पडले नसून, त्या गडाचे नाव आधीपासूनच सिंहगड होते. शिवाजीचे मोठेपण मला त्याच्या आग्राच्या सुटकेनंतर परत एकदा फिनिक्स पक्ष्याप्रमाणे राखेतून मारलेल्या झेपेत आहे असे  वाटते. शिवाजीने मध्ययुगीन  हिंदू राजपरंपरांचा इतिहास बदलला, कारण मध्ययुगात हिंदु राजे पराभूत झाल्यानंतर पुन्हा  नव्याने सारवलेच  नाहीत. पण शिवाजीने हा इतिहास बदलून टाकला. रामदास – शिवाजी वादाबद्दल कुरुंदकरांचे भाष्य ऐकण्यासारखे. शिवाजी आणि रामदासांच्या कक्षा वेगळ्या आहेत. त्यांच्या जीवनाचे मापदंड वेगळे आहेत. आपल्यासमोर प्रश्न हवा यांनी आपल्या जीवनाच्या कक्षाचे पालन केले का? असे अनेक पदरी विश्लेषण करणे हे कुरुंदकरांचे वैशिष्ट्य होते.

आजच्या हिंदुत्ववाद्यांच्या आवडता मुद्दा म्हणजे, अखंड हिंदुस्तानच्या फाळणीला गांधी – नेहरू जबाबदार आहेत. बहुसंख्य लोकांचा या गोष्टीवर विश्वाससुद्धा आहे. पण काळाच्या प्रवाहात आपण या गोष्टी विसरून जातो की, १९०९ सालच्या मोर्ले- मिंटो सुधारणा कायद्याने मुस्लिमांना वेगळे मतदारसंघ द्यायचे मान्य केले होते. १९१६च्या लखनौ अधिवेशनात स्वतः टिळकांनी मुस्लिमांना विभक्त मतदारसंघ द्यायचे मान्य केले. यावेळेस गांधीचा उगम राष्ट्रीय पटलावर व्हायचा होता. या विभक्त मतदारसंघाने आजच्या भाषेतला शब्द वापरायचा म्हटल्यास (identity politics) निर्माण केले. जर हा धागा लांबावयचा म्हटल्यास, तो देवबंदी चळवळीपर्यंत जातो. स्वतः सर सय्यद अहमद हिंदू – मुस्लीम हे भारताचे स्वतंत्र दोन डोळे आहेत. त्यामुळे जे काही गुंतागुंतीचे identity politics निर्माण झाले होते, हा इतिहासाच्या प्रवाहाचा भाग होते, हे तर आपण मानण्यास तयार आहोत का नाही?

फक्त झाले काय तर गांधी – नेहरू या अखेरच्या टप्प्यात नेतृत्व करणारे होते, म्हणून त्यांच्यावर खापर फोडण्यास, सगळ्यांनी सोयीचे गेले. पण गांधी – नेहरू कधीच या identity politics चा भाग नव्हते, हे आपण विसरून जातो. कुरुंदकर हा धागा पकडून विश्लेषण करतात, म्हणून ते वेगळे ठरतात. प्रत्येक ऐतिहासिक टप्प्याची जी सामाजिक आणि राजकीय व्याप्ती असते, ती कुरुंदकर समजून घेतात.

इस्लामी धर्मविषयक मते

कुरुंदकरांची सेक्युलॅरिम या विषयाची मांडणी अशाच धाटणीची आहे. आधुनिक मूल्य म्हणून लक्षात घेताना, सेक्युलॅरिझमविषयी त्यांची मते, ही दूरदृष्टीची होती. हे मूल्य आत्मसात केल्याशिवाय आधुनिक जीवनाकडे आपली पाये वळणार नाहीत आणि आपण स्थिरता निर्माण करू शकत नाही, हे कुरुंदकरांचे विश्लेषण आजसुद्धा तितकेच लागू पडणारे आहे. आज सेक्युलॅरिझम हा शब्द एक शिवी वाटण्याच्या काळात, त्याचे खरेखुरे महत्त्व पटण्यास मला कुरुंदकर महत्त्वाचे वाटतात. जोपर्यंत आपण खोलात जावून विषयाचे धागेदोरे पाहणार नाहीत, तोपर्यंत सत्याचा अभासात आपण राहणार. हा अभासाचा फुगा फोडण्यासाठी कुरुंदकरांचे लिखाण उपयोगी आहे, असे मला नेहमीच वाटते. पण कुरुंदकरांची इस्लामी धर्माच्या अभ्यासाविषयाची मते, आपल्याला नवीन प्रकाशित झालेल्या माहितीमुळे बदलावी लागतील. यामध्ये टॉम हॉलंड सारख्या इतिहासकाराने इस्लामवर नवीन अभ्यासपूर्ण प्रकाश टाकला आहे. त्यामुळे काळाच्या नवीन ज्ञानात त्यांची इस्लाम विषयीची मते बदलावी लागतील. कारण कुरुंदकर (आणि सर्वचजण) त्यांच्या एका लेखात इस्लाम हा अचानक उदय पावलेला धर्म समजतात. पण जोपर्यंत आपण रोमन आणि पर्शियन साम्राज्य यांच्या अस्ताची कहाणी पाहणार नाहीत, तोपर्यंत इस्लाम धर्माचा उदय आपल्याला समजणार नाही. कुरुंदकरांनी आज जर टॉम हॉलंडचे ‘in the shadow of the sword: the birth of Arab empire’ हे पुस्तक वाचले असते, तर त्यांनी काही मांडणी मात्र नक्कीच स्वीकारली असती.

समाज आणि संस्कृतीचे अचूक विश्लेषण

अनेकदा महापुरूषांच्या मतापुढे पूर्णपणे मान तुकविण्याची आपली पद्धत असते. एकदा एका व्यक्तीला देवस्थानी बसवले की, मग चिकित्सा मरत असते. देव म्हटल्यावर, तो फक्त पुण्यच करत असतो. त्याच्यावर टीका केल्यावर मग पाप लागते. आणि आपल्याकडे प्रत्येक जातीचे स्वतंत्र देव असल्यामुळे ही चिकित्सा सध्यातरी आपल्याकडे अवघड होऊन बसली आहे. प्रत्येकाविषयी आदर असणे वेगळी गोष्ट असते आणि त्याची मते मान्य वेगळे असते. आंबेडकरांनी शूद्र कोण होते ? या आपल्या प्रसिद्ध पुस्तकात शुद्रांच्या उत्त्पतीबद्दल लिहिले आहे. यात आंबेडकर म्हणतात, की शूद्र हे पूर्वी क्षत्रिय होते. यासाठी त्यांनी राजा पैजवान याचे उदाहरण दिले आहे. महाभारतात राजा पैजवान याला शूद्र राजा होता, असं सांगितलं आहे. पण याच महाभारतात राजा सुदाम जो पैजवान याचा मुलगा होता, तो मात्र क्षत्रिय आहे, असे सांगितले आहे. महाभारतात अनेक शूद्रांना क्षत्रिय म्हणून घोषित केले आहे आणि क्षत्रियांना शूद्र. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे, महाभारत हा अखंड रचला गेले ग्रंथ आहे. तो काळानुसार बदलेलाही ग्रंथ आहे, त्यामुळे त्या ग्रंथवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होतात. त्यामुळे त्या ग्रंथाच्या आधारे शूद्र कोण होते? हे सांगणेच कठीण होऊन जाते ( पुस्तक: आकलन). कुरुंदकरांनी इरावती कर्वे यांच्या ‘संस्कृती’ नावाच्या पुस्तकाला लिहिलेली प्रस्तावना सुद्धा वाचण्याजोगी. जातव्यवस्था ही आर्यांनी लादलेली व्यवस्था नाही, ती आर्यांच्या आगमनानंतर कित्येक शतकानी नंतर तयार झालेली व्यवस्था आहे. याला कारणीभूत कौटुंबिक कट्टर व्यवस्था कारणीभूत आहे. असे कुरुंदकरांचे लिखाण दर्शवते. अलीकडे प्रकाशित झालेल्या टोनी जोसेफ यांच्या ‘अर्ली इंडियन्स’ नावाच्या पुस्तकात ही गोष्ट सिद्धरुपाने आली आहे की, आर्यांच्या आगमनानंतर कित्येक शतकांनी जाती व्यवस्था प्रस्थापित झाली होती. अर्थात ही गोष्ट इरावती कर्वे यांनीसुद्धा मांडली होती. असा प्रकारची सूक्ष्म महापुरूषांच्या लिखाणाला मतभेद दाखवत अभ्यासाची करण्याची कुरुंदकरांची पद्धत होती.

अनेकदा प्रचलित मते आणि ती जर महापुरुषांची असतील तर ती बदलणे फार अवघड जाते कारण समाजमनाच्या धारणा त्यावर तोललेल्या असतात. कुरुंदकरांचे लिखाण हे धारणा बदलण्याचे प्रयत्न करते. आचार्य विनोबा भावे आदरणीय आणि पूज्य होते, यात शंकाच नाही, पण ते भूदान आंदोलनाला कधी संघटित रूप देऊ शकले नाहीत. आणि त्यामुळेच भूदान आंदोलन यशस्वी होऊ शकले नाही. अनेक हिंदुत्ववाद्यांना वाटते की, पटेल पंतप्रधान असते तर…या फक्त त्यांच्या मनोकल्पना आहेत, कारण पटेलांना माहीत होते की गांधी नंतर या देशात लोकप्रिय नेहरू होती,त्याची जनतेत पकड होती आणि पटेल वयाने थकले होते. हे कुरुंदकर समजावून सांगतात, म्हणून ते आकर्षितही करतात. 

राष्ट्रीय तत्त्वांची उकल

अनेकदा आपण स्वातंत्र्य, न्याय, समता, बंधुता या संकल्पना मांडतो, पण त्यांचा विस्तृत अर्थ बहुतेकदा आपल्याला कमीच माहीत असतो. कुरुंदकरांचा भर होता, या संकल्पना मुळापासून समजून सांगण्याच्या. त्यांचा ‘अभयारण्य’ नावाच्या पुस्तकात त्यांनी स्वातंत्र्य नावाच्या मूलभूत तत्त्वाचा शोध जो त्यांनी घेतला आहे, तो नक्कीच वाचण्याजोगे. स्वातंत्र्य हे सांस्कृतिक मूल्य आहे, त्यासाठी माणसाला झगडावे लागले. ते नैसर्गिक मूल्य नाही. निसर्गाकडे चला ही रुसोची फक्त कवी कल्पना आहे, माणसाने स्वातंत्र्य हे माणसाशी झगडून मिळवले आहे. “स्वातंत्र्य ही कल्पनाच नैतिक आहे. ती एक सांस्कृतिक कल्पना आहे. ‘भयमुक्त समाजात भयमुक्त माणूस ‘म्हणजे स्वातंत्र्य’. यातील भय हा मुद्दा महत्त्वाचा आहे. स्वातंत्र्य हे सगळ्या विचारांचे आद्य अधिष्ठान आहे”. त्यांनी याच पुस्तकात आगामी काळात फॅसिझम कसा अवतरेल हे वर्तवलेले भाकीत आज खरे वाटू लागले आहे. याच पुस्तकात ते एका ठिकाणी लिहितात की, “फॅसिझमला फक्त टाळ्या वाजवणारे लोक आवडतात, चार विचार करणारी डोके त्यांना नकोशी वाटतात”. कलावंत मंडळी जेव्हा कलेच्या व्यक्त होण्याच्या स्वातंत्र्याचा (right to expression) उल्लेख करतात, तेव्हा ते दुसऱ्याच्या स्वातंत्र्यासाठी उभे राहतात का? शेवटी कला ज्या लोकांसाठी असते, ते जर व्यक्तीसाठी कला उभी राहत नसेल, तर त्या कलेचा उपयोग काय. हे त्यांनी मांडलेले विचार अंतर्मुख करतात.

नरहर कुरुंदकर हे आचार-विचारांनी समाजवादी होते. कार्ल मार्क्स- गांधी – नेहरू हे त्यांचे अभ्यासाचे विषय होते. पण त्यांनी कधी आपल्या विचारसरणीत असलेल्या चुकांकडे दुर्लक्ष केलं नाही. ही गोष्ट लेखक म्हणून विचारात घेण्याजोगी. कुठलाही लेखकाला राजकीय विचार असतात आणि ते असावे, पण राजकीय विचाराचे आंधळे अनुकरण वेगळे आणि चुका सांगून, ओळखून केलेले पालन वेगळे.

अर्थात, कुरुंदकरांच्या जीवनाच्या मर्यादासुद्धा आहेत आणि असतील, पण ज्ञानाचा एक मार्गदर्शक दीपस्तंभ म्हणून या पडझडीच्या काळात आपल्यासोबत ते  उभे असतील. त्यांच्यात शब्दामत सांगायचे झाले तर, “आधीच लोकशाहीला मतांची अपेक्षा असते. म्हणून राजकीय नेते दांभिकपणे सर्वांच्याच विषयी गोड बोलू लागतात. समाजाला श्रद्धस्थाने असतात, म्हणून विचारवंत एकाकी असतो. त्याने निर्भय बनले पाहिजे, हे मान्य. पण आपणही सुजाण बनले पाहिजे”.

राज बोराडे, जयपूरस्थित पत्रकारिता अभ्यासक्रमाचे विद्यार्थी आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0