माझ्या हातात कागद आहेत का? – राहुल गांधी

माझ्या हातात कागद आहेत का? – राहुल गांधी

मी अर्फा खानुम शेरवानी, द वायर तर्फे, पंजाबमधील लुधियानाला निवडणुकीचा वृत्तांत द्यायला पोहोचले आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे आसपासच्या गावांमध्ये निवडणुकीच्या प्रचार सभा घेत आहेत. २०१९ची लोकसभा निवडणूक ही आतापर्यंतच्या झालेल्या निवडणुकांच्या इतिहासात सर्वात महत्त्वाची समजली जाते. राहुल गांधींनी आमच्या सोबत गप्पा मारल्या त्या अशा-

एक्झिट पोल ठरले फोल!
अटर्नी जनरल यांचे सत्तारूढ पक्षधार्जिणे युक्तिवाद
“स्टे इन युवर लेन” अर्थात उंबरठ्याच्या आतच रहा !

प्रश्न : २३ मे चा निकालाबद्दल राहुल गांधी यांच्या काय अपेक्षा आहेत?

उत्तर : काँग्रेसचा विजय अटळ आहे. लोकांचा कौल आम्ही मान्य करू.

प्रश्न : काँग्रेसचा विजय म्हणजे काँग्रेस स्वबळावर सरकार  स्थापन करेल असं तुम्हाला म्हणायचं आहे का?

उत्तर : नाही ते गठबंधन असेल. लोक भाजप आणि मोदी यांच्या विचारप्रणालीवर नाराज आहेत. निश्चलनीकरण, गब्बर सिन्ग टॅक्स, बेरोजगारी, शेतकर्‍यांची दैनावस्था, खालावलेले अर्थकारण, भ्रष्टाचार हे खरे निवडणुकीमधील मुद्दे असायला हवे. मोदींनी प्रचाराची सुरुवात “दुसरे मोदी सरकार” अशी केली होती. नंतर ते घोषवाक्य बदलून “पुन्हा एकदा मोदी सरकार” असे करण्यात आले. त्यानंतर विकास, मग राष्ट्रवाद, मग पुन्हा विकासाची भाषा, मग माझ्या कुटुंबाची अर्वाच्च भाषेत निर्भत्सना ! नरेंद्र मोदींनी जरी इकडून तिकडे उड्या मारल्या तरीसुद्धा लोकांनी आधीच निर्णय घेतला आहे. आणि त्याअर्थी निवडणूका संपल्या आहेत.

प्रश्न: तुम्ही एका नवीन पद्धतीने मुलाखती देण्याचा पायंडा पाडला आहे. अर्थात निवडणूकांआधी अशा पद्धतीने मुलाखती देण्यापेक्षा गेल्या पाच वर्षात वेगवेगळ्या वेळी त्या दिल्या गेल्या असत्या तर जास्त चांगले झाले असते. मोदींनी सुद्धा त्यांच्या पाठीराख्यांना मुलाखती देण्याचा सपाटा लावला आहे.

उत्तर : पाठीराख्यांना…. माझ्या हातात उत्तरांचे कागद दिसत आहेत का? नाही ना?

प्रश्न : आणि मलाही तुम्ही कोणते प्रश्न विचारले जावे यासाठी कोणत्याही सूचना दिलेल्या नाहीत!

उत्तर : नाही, मी कधीच अशा सूचना देणार नाही. राजकारण्यांनी अशा प्रकारचे आव्हान स्वीकारलेच पाहिजे. तुम्ही पत्रकार देशाचा आवाज असता… देशबांधवांचे प्रश्न तुम्ही विचारत असता… कधी कधी तुमच्या प्रश्नांना मी चुकीचीही उत्तरं देत असेन किंवा दिली असतील. पण म्हणून आपल्या पंतप्रधानांसारखे भिऊन टाळाटाळ करणे अयोग्य असते. माध्यमांसमोर ते कधीही तयार उत्तरांशिवाय येत नाहीत. ते पत्रकार परिषदा घेत नाहीत. त्यांच्या भीतीमागे एक प्रमुख कारण आहे ते म्हणजे राफाएल! मोदींनी अनिल अंबानींना ३० हजार कोटी रुपये देण्याची मदत केली आहे. हे वादातीत सत्य आहे. वायुसेनेतील अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला आहे – मोदींनी फ्रान्स आणि दसॉल्ट कंपनीबरोबर समांतर वाटाघाटी केल्या याचा त्यांनी पुनरुच्चार केला आहे. तत्कालीन संरक्षण मंत्री मनोहर पररीकर यांनी ‘मला ह्याबद्दल काहीच माहिती नाही.’ असे म्हणून हात वर केले होते. फ्रेंच राष्ट्राध्यक्षांनीही हेच सांगितले. त्यामुळे मोदी घाबरले आहेत हे नक्की! मी त्यांना वाद-प्रतिवाद करण्यासाठी खुल्ले आव्हान दिले होते.

प्रश्न : भ्रष्टाचाराविषयी तुम्ही मुद्दा काढला आहे – जेव्हा जेव्हा तुम्ही ‘अनिल अंबानींना कोणताही अनुभव नसताना सुद्धा अशा प्रकारचे कंत्राट दिले गेले’ त्याविरुद्ध टीका करता, तेव्हा तेव्हा रॉबर्ट वढेरांचा नामोल्लेख होतो. जेव्हा मनमोहन सिंग पंतप्रधान आणि हुडा मुख्यमंत्री होते तेव्हा वढेरा यांना झुकते माप दिले गेले होते कारण त्यांचे गांधी कुटुंबाशी असलेले नाते!

उत्तर : तुम्ही तपासा, चौकशी करा, जर गुन्हा झाला असेल तर शिक्षा द्या. रफाएलच्या बाबतीतही हेच करा. या सरकारने आजवर यापैकी काहीच केले नाही?

प्रश्न : पण त्यावेळी तुम्ही काँग्रेसवाले सत्तेत होता.

उत्तर : हो, पण राफाएल या सरकारच्या कारकिर्दीत झाले. गुन्हा झाला असला तर न्याय हा मिळालाच पाहिजे.

प्रश्न : राहुल गांधी आत्ता इथे कॅमेरॅसमोर असे म्हणत आहेत का की २०१९ मध्ये जर त्यांचे सरकार सत्तेत आले तर फक्त राफाएलच नाही तर रॉबर्ट वडेरा यांच्या संदर्भातही चौकशी होईल?

उत्तर : मी फक्त या दोघांबद्दलच बोलत नाही! जेव्हा केव्हा चूक होईल, गुन्हा घडेल, तेव्हा चौकशी झालीच पाहिजे. आणि चूक कुणाचीही असली तरी शिक्षा ही झालीच पाहिजे, न्याय हा मिळालाच पाहिजे. महत्त्वाचा मुद्दा हा आहे की मोदींच्या पाच वर्षांच्या काळामध्ये वेगवेगळ्या गोष्टींविषयी चौकशी चालू आहे. मात्र रफाएलविषयी काहीच घडत नाही. नक्कीच काहीतरी गडबड असली पाहिजे!

प्रश्न:  पण तुम्ही चौकशी करणार का?

उत्तर : मी स्वतः नाही. त्यांनी सगळे नियम धाब्यावर बसवले आहेत. त्याची चौकशी नक्की होईल.

प्रश्न :  तुम्ही अजून एक गोष्ट नव्याने रुजवली आहे. तुम्हाला पप्पू म्हटलं, तुम्ही हसण्यावारी उडवून नेले. पण बऱ्याच लोकांचे असे म्हणणे आहे की तुम्हाला शासन चालवण्याचा अनुभव नाही. तुम्ही कोणतेच मंत्रीपद निभावले नाही. सचिन पायलट किंवा इतरांप्रमाणे पहिल्यांदा मंत्रिपदाचा अनुभव घेऊन मग पंतप्रधान होणे जास्त उचित ठरणार नाही का?

उत्तर : मला भरपूर राजकीय अनुभव आहे. सगळे म्हणत होते की नरेंद्र मोदींना हरवणे शक्य नाही. ते पुढची दहा वर्षे पंतप्रधान राहतील. पण आज मोदी पुन्हा जिंकणार असे कोणीच ठामपणे म्हणत नाही. आम्ही निकराने लढलो आहोत.

प्रश्न : पण तुम्ही आधी मंत्री झाला असता तर….

उत्तर : नाही, मी मनमोहनजींना वचन दिले होते. त्याप्रमाणे ते दोन वेळेला पंतप्रधान झाले. मी त्यामध्ये कोणतीही ढवळाढवळ केली नाही. त्यांनी मला तीन वेळेला मंत्रीपद देऊ केले होते, पण मी वचन दिल्याप्रमाणे ते स्वीकारले नाही.

प्रश्न : तुम्ही जर मंत्री झाला असता तर त्यांच्यावर काही दबाव आला असता का?

उत्तर : हो. तसा मुद्दा नक्कीच उपस्थित झाला असता.

तत्कालीन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि मी काही बाबतीत मर्यादा आखून घेतल्या होत्या. पक्ष चालवणे ही एक बाब, आणि सरकार चालवणे ही दुसरी स्वतंत्र बाब!

प्रश्न : पुलवामाच्या घटनेच्या वेळी काँग्रेसला कशा प्रकारे प्रतिक्रिया द्यावी हेच लक्षात येत नव्हते.

उत्तर : असं कोण म्हणतं?

प्रश्न : जेव्हा ममता बॅनर्जींनी intelligence failure चा मुद्दा उठवला, तेव्हा तुमच्या बाजूने कोणताच प्रश्न विचारला गेला नाही.

उत्तर : मी स्वतः पत्रकार परिषद घेऊन एक गोष्ट स्पष्ट केली की काँग्रेस पुलवामा घटनेचा वापर राजकारणासाठी करणार नाही. कोणत्याही परिस्थितीत आम्ही भारत सरकारबरोबर आणि सी आर पी एफ च्या पाठीशी आहोत.

प्रश्न : सरकारच्या पाठीशी…?

उत्तर : हो, मी ठामपणे असे म्हटले होते की सेनेच्या संदर्भात कोणतेही राजकारण आम्ही करणार नाही. पण मोदींना ते पटत नाही. जेव्हा मुंबईमध्ये आतंकवादी हल्ले झाले होते तेव्हा ते ताज हॉटेल बाहेर उभे राहून पत्रकारांशी बोलत होते. तेव्हा आत हॉटेलमध्ये माणसे मरणासन्न होती. त्यांना हे सगळं राजकीय फायद्यांसाठी वापरायचे आहे.

प्रश्न : पण तुम्ही मात्र intelligence failure चा मुद्दा उचलून धरला पाहिजे होता. ४० जवान शहीद झाले… तरी सरकारला कोणीच दोषी ठरवत नाही.

उत्तर : हा त्या वेळेचा प्रश्न होता… देशाला मोठी जखम झाली होती…त्याचं गांभीर्य जपायचं होतं. आम्हाला सबुरीने घ्यायचे होते. देशाच्या सेनेचा आम्हाला आदर राखायचा होता.

प्रश्न : ….तरीसुद्धा आम्ही पत्रकार म्हणून intelligence failure बद्दल प्रश्न विचारत होतो – विरोधी पक्ष मात्र गप्प होता.

राहुल गांधी : आता जेव्हा मोदींना सर्व बाजूंनी घेरलं गेलं आहे, पत्रकारांनी त्यामध्ये काही भूमिका निभावली आहे का?

मी : अर्थात माझ्यासारख्या पत्रकारांनी प्रश्न उठवले आहेत.

गांधी : अर्थात तुमच्यासारख्या पत्रकारांनी नक्कीच आवाज उठवला आहे. परंतु देशातील बहुतांशी माध्यमांनी तसे केले नाही. जर कुठल्या एका संघटनेने लढा दिला असेल तर तो काँग्रेस पक्षानी! मोदी पत्रकारांविरुद्ध बोलत नाहीत पण ‘काँग्रेस’ने हल्लाबोल केला आहे असे म्हणतात. खरेतर आम्ही जनक्षोभाला वाचा फोडली आहे. आम्ही शेतकऱ्यांचे दुःख, बेरोजगारी, असे जनतेच्या मनातले मुद्दे उठवले आहेत. जनतेचाच आवाज असल्यामुळे आम्हाला भीती वाटत नाही.

प्रश्न : राष्ट्रवादाच्या मुद्याला धरून भाजपने बाजी मारली आहे परंतु तुम्ही मात्र दोन पाउले मागे आहात.

उत्तर : बिलकुल नाही. २३ मेला हे उघड होईल की कोणाला दोन पाउले मागे जावे लागेल. मी तुम्हाला पुन्हा सांगतो की मोदी पंतप्रधान होणार नाहीत. काँग्रेससह गठबंधन जिंकणार!

प्रश्न : १९८४ ( शीख संहार) आणि २००२ (गोध्रा हत्याकांड) यांची तुलना नेहमी होते. दोन्ही वेळेला तत्कालीन सरकार त्या दुर्घटनांना जबाबदार होते. तरी पोलीस असो वा राजकारणी कोणालाही दोषी धरले गेले नाही. तुम्ही किमान क्षमायाचना तरी केली होती/ आहे. बाकी कोणीच नाही! आत्ता तुम्ही असं आश्वासन द्याल का की तुमचे सरकार सत्तेत आले तर मोठ्या स्तरावरील जनसंहाराला जबाबदार असलेल्या राजकारण्यांना शिक्षा देणारा कायदा केला जाईल?

उत्तर : सॅम पित्रोडा यांना त्यांच्या वक्तव्यासाठी माफी मागावी लागेल असे मी त्यांना स्पष्टपणे सांगितले. ते चुकीचे बोलले होते.

प्रश्न : तुम्ही तसा कायदा कराल का?

उत्तर : हो ! आम्ही नक्कीच याचा विचार करू. एक नक्की आहे की जे कोणी कायद्याचे उल्लंघन करतील, जो कोणी हिंसेचा वापर करेल त्यांना दोषी धरले जाईल. शिक्षाही होईल.

धन्यवाद.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0