‘पिंजरा तोड’ कार्यकर्त्या नताशा नरवालला जामीन

‘पिंजरा तोड’ कार्यकर्त्या नताशा नरवालला जामीन

नवी दिल्लीः महिला समस्यांवर लढणार्या पिंजरा तोड या संघटनेच्या कार्यकर्त्या नताशा नरवाल यांना दिल्ली दंगल प्रकरणात गुरुवारी एका खटल्यात जामीन देण्यात आला. नताशा नरवाल यांनी दिल्लीत दंगल भडकावी अशी चिथावणीखोर भाषणे केली होती. सीएएविरोधात जेथे निदर्शने सुरू होती, तेथेच नरवाल यांनी आपले ऑफिस थाटले होते व या ऑफिसमधून दंगलीचा कट रचल्याचा आरोप दिल्ली पोलिसांनी न्यायालयात केला होता. या कटात उमर खालिद, महमूद प्राचा व अमानतुल्ला खान हे सुद्धा सामील होते, असे पोलिसांचे म्हणणे होते. नरवाल यांनी आपल्या पीएचडी पदविकेचा दुरुपयोग केला, त्यांना कायद्याचे ज्ञान असूनही लोकांना भडकावण्याचे काम केले, दगडफेक केली असे आरोप दिल्ली पोलिसांचे होते. पण न्यायालयात पोलिस नरवाल यांच्याविरोधात एकही पुरावा सादर करू शकले नाहीत. त्यामुळे एका न्यायालयाने नरवाल यांना जामीन दिला.

पण नरवाल यांच्यावर दिल्ली दंगलीसंदर्भात अन्य काही आरोप असून त्यांच्यावर यूएपीए कायदा लावण्यात आला आहे. त्यामुळे यूएपीएअंतर्गत नरवाल यांना तुरुंगातच राहावे लागणार आहे.

या अगोदर पिंजरा तोड संघटनेच्या अन्य एक कार्यकर्त्या देवांगना कलिता यांना दिल्ली उच्च न्यायालयाने पुराव्या अभावी याच प्रकरणातून जामीन दिला आहे.

देवांगना व नताशा या जेएनयूच्या विद्यार्थीनी असून देवांगना सेंटर फॉर वुमेन स्टडीजमध्ये एमफिल करत आहेत तर नताशा या सेंटर फॉर हिस्टॉरिकल स्टडीजच्या पीएचडी विद्यार्थी आहेत. या दोघींनी पिंजरा तोड संघटना स्थापन केली आहे.

मूळ बातमी

COMMENTS