बॅ.नाथ पै: एक मनोज्ञदर्शन

बॅ.नाथ पै: एक मनोज्ञदर्शन

सामान्यांच्या यातना पर्वाचा साक्षीदार. समतावादी विचारांसाठी क्षण वेचणारा संसदपटू, अभ्यासपूर्ण वैचारिक मांडणी करणारा तत्वज्ञ आणि लोकशाहीला बहुमोल योगदान देणारा राजकारणी बॅ.नाथ पै यांच्या जन्मशताब्दीस २५ सप्टेंबर पासून प्रारंभ होत आहे त्या निमित्ताने ही स्मरण यात्रा.

दिल्ली दंगलः दोन सत्यशोधक अहवालांची समीक्षा
३७० कलम : परप्रांतीयांचा रोजगार कायमचा गेला
सिद्धार्थ वरदराजन यांना ‘डीडब्ल्यू फ्रीडम ऑफ स्पीच’ पुरस्कार

बॅ.नाथ पै यांचं नाव पहिल्यांदा कानावर पडलं ते आजोळी. बार्शीला. धाकट्या मामाच्या तोंडून. महात्मा गांधींच्या हाकेला ओ देऊन स्वातंत्र्यलढ्यात काम करणारे माझे मामा श्री दिगंबर देवधरे गोवा मुक्ती आंदोलनात  बॅ. नाथ पै यांचे भक्त झाले. मी अकरावीत असताना ते लढ्यातील गोष्टी ओघाओघाने सांगत. बॅ.नाथ पैं चा फोटो दाखवून म्हणत, ‘राजा अरे भाषण करावं ते नाथानं.’ मामा काँग्रेसचे कार्यकर्ते असले तरी त्यांची नाथ भक्ती ओसंडून, दुथडी भरून वहायची. राष्ट्रभक्ती हा दोघांमधील प्रेमाचा दुवा होता. त्यामुळे वैचारिक साखळी बंधमुक्त कशी होते ते त्यामुळं कळलं. कार्यकारणभाव आणि राष्ट्रीय विचार भिन्नभिन्न विचाराच्या माणसांना कसा एकत्र आणतो हे सत्तर साली पत्रकारितेत प्रवेश केल्यावर अधिक कळत गेलं. प्रगल्भ आणि जाज्वल्य विचाराची परंपरा काही मुद्द्यावर एकसंघ भावना निर्माण कशी होऊ शकते हे कालांतरानं लक्षात येत राहिलं. मुंबईतील एक वर्षाच्या वास्तव्यात बॅ.नाथ पै यांना एकदाच पाहिलं. अन् ऐकलं सुद्धा. आणि मामानं जी गोष्ट त्यांच्याबद्दल सांगितली होती ती स्पष्टपणे समजून घेण्याचं वय होतं. पक्षीय विचार आणि तत्त्वज्ञान समजून घेण्याचं वय नव्हतं. मग वैचारिक गट तट समजणं तर लांबची गोष्ट. पण ते एका अर्थाने बरं असतं. कुठल्याही भ्रमात न अडकता माणूस समजून घेणं सोपं जातं. तोच पवित्रा कायम ठेवला.

राजकारण काही कळत नव्हतं त्या वयात. परंतु कष्टकरी ,श्रमकरी,  गोरगरीब यांचे म्हणणे मांडणारी माणसं आवडायची. जवळची वाटायची. जॉर्ज फर्नांडिस, डांगे, शाहीर अमर शेख,  आचार्य अत्रे, अण्णाभाऊ साठे, एसेम ही त्यातली काही. पोर वयात फक्त त्यांचं भाषणच आवडायचं.  गाणं ऐकावं तसं. ओतप्रोत जिव्हाळ्यानं भरलेली वाणी काहीतरी वेगळी  वाटायची. शब्द मनात नाचायचे. कर्तव्य शब्दापासून खूप खूप दूर होतो. अगदी अर्था पासून लांब. पण ही माणसं जवळची वाटायला लागली. लोह चुंबकीय गुणाची. त्यांनी खांद्यावर घेतलेल्या विचार ध्वजाच्या वेगवेगळ्या रंगाच्या अनोळखी स्वभावातच मन रमायचं. कदाचित रक्तातच ते असावं. गल्ली बदलली की, कुणी ना कुणी भेटायचं. मेंदूला खुराक मिळायचा. बरं वाटायचं. अवघडल्यासारखं कधीच झालं नाही.

सदुसष्ट, अडुसष्ट साली बॅ.नाथ पै यांना पाहिलं. मुंबईत. गोल चेहरा, डोक्यावरती तुरळक अंतर ठेवून वास्तव्य करणारे भुरभुरे केस, रुंद जिवणी, मधाळ पण धबधबा होऊन जिभेवर वाहणारी भाषा. हे धुक्यासारखं काही तरी आठवत होतं. मनात कोरलेलं. मतं, विचार आणि धारणा पक्की होण्याच्या आधीचीच अवस्था संभ्रम निर्माण करीत नसते. कोऱ्या पाटीवरचं हे दर्शन पाहिलं म्हणून अशा पद्धतीने आठवत असावं.

मास्तरांनी त्यांच्याकडे असलेली स्फटिकाची मूर्ती दाखविली होती. स्फटिक कसं असतं ते समजावं म्हणून. त्याचं स्मरण झालं ते बॅ. नाथ पै यांच्या एकदाच झालेल्या दर्शनामुळं. खरं म्हणजे मराठवाडा दैनिकात अनंत भालेराव यांच्या हाताखाली उपसंपादक म्हणून रुजू झाल्यावर पावणे दोन वर्षाच्या आतच बॅ.नाथ पै जगाला सोडून गेले. त्यावेळी संपादक अनंत भालेराव (आम्ही त्यांना आण्णा म्हणायचो) त्यांनी लिहिलेल्या अग्रलेखामुळे बॅ. नाथ पै यांची पारदर्शकता पुन्हा लख्खपणे समोर आली. कारण चारच वर्षे त्यांच्या कार्यकर्तृत्वाविषयी वाचलं. ऐकलं. तिथेच थबकलो, थांबलो नाही. वाचत राहिलो. नकळत गात्रातून बॅ. नाथ पै पसरत राहिले. कसे? का.. कळलं नाही. एक मात्र टोचणी बोचत राहिली. हा माणसांचा माणूस इतका लवकर का गेला आपल्यातून? कार्याची ओळख व्हायच्या आधीच. कोवळ्या वयात किरणांची, कवडसांची ओळख झाली. प्रखर किरणांची व्हायला हवी होती. मळलेल्या वाटेनं कोणीही चालेल, काटेरी वाटांची ओळख करून देणा-यांनी अचानक सोडून जाणं वेदना देणारं होतं. मनाला मानवत नव्हतं. पटत नव्हतं. सत्य लपत नव्हतं. ते स्वीकारावं लागतं. मेंदू पुन्हा पुन्हा कसा रक्ताळतो हे आता पंच्याहत्तरच्या आसपास आल्यावर कळलं. तांबडं फुटायच्या आत बॅ.नाथ पै गेले एवढंच. आडवळणाने झालेल्या किंवा केलेल्या प्रवासात टप्प्यावर, वेगवेगळ्या कारणाने बॅ.नाथ पै भेटत राहतात. प्रत्यक्ष झालेला संवाद करीत राहतात. विचार प्रकटून जातात. वृक्षाची सचेतन सळसळ जाणवत राहते. खरे जिणे कळते. लयभंग झाल्याची जाणीव होत असते अधून मधून.

बॅ.नाथ पै यांचं नातं गोवा आणि कोकणाशी होतं. सत्तावन्न ते अखेरच्या श्वासापर्यंत तांबड्या मातीचं लोकसभेत प्रतिनिधित्व करीत होते. जणू राजापूरचा राजाच. खराखुरा जाणता राजा. पण शांतताप्रेमी. कोकणातील माणसांचा विचार डोक्यात ठेवणारा. नव्वदी नंतर या तांबड्या मातीवर पाऊल ठेवण्याचा योग आला. एका ठिकाणी जेवायला थांबलो होतो. लाकडाच्या भिंती असलेलं उपहारगृह. बाकड्यावर बसलेली मळकट कपड्यातील माणसं. एका लाकडी फळीवर एक समोर फोटो डकवला होता. तो होता बॅ.नाथ पै यांचा. पहिल्या दर्शनाची आठवण झाली. उपहारगृह चालकाला प्रश्न केला, फक्त नाथ पै यांचा फोटो का? तर तो म्हणाला, ‘देव माणूस होता त्यो आमचा.’ मग त्यांनी निवडणुकीतील गमतीजमती सांगितल्या. ‘मातीवर आमच्या संगट बसून बोलतो हा आमचा राजा. एकदा माझ्या या बिनभिंतीच्या हॉटेलात गाडी थांबवून चहा घेतला त्यानं.’ खूप बोलत होता. भरभरून काही सांगत होता. मन मोकळं करत होता. भरून आलेलं आकाश रिकामं होताना मी बघत होतो. माणसाच्या सुखदुःखात किती भागीदारी होती या लोकप्रतिनिधीची.

कोकणात करुलला ख्यातनाम कादंबरीकार मधु मंगेश कर्णिक यांनी त्यांच्या नावाने काढलेल्या महाविद्यालयात काव्यवाचन झालं. पुन्हा नाथ पै यांच्या स्वभावाचे अनेक पैलू कळाले. त्यांना म्हणे बा. भ. बोरकर, मंगेश पाडगावकर, वसंत बापट इत्यादींच्या कविता मुखोद्गत होत्या. भाषणात ते संयुक्तिक ठिकाणी वापरायचे. वेंगुर्ल्याचे मंगेश पाडगावकर तर त्यांचे मित्र. गोव्यात बोरीला बोरकरांना भेटलो तेव्हा ही तोच अनुभव आणि विविध भाषा ज्ञानाविषयीही ओघानं कळत गेलं. पुन्हा वाटायला लागलं, ‘जो आवडतो सर्वांना, तोचि आवडतो देवाला’ ही काव्यपंक्ती तद्दन खोटी आणि ब्रह्म निर्माण करणारी आहे. बॅ. नाथ पै अनाथांचे नाथ आणि गरिबांचे कैवारी. मग देव दिनाघरी धावला असं कसं म्हणता येईल. जिथं तिथं काहीही झालं की त्याला बंदिवान करून नको तिथं आणायचं. नसलेल्या ईश्वरावर विश्वास ठेवण्याची बॅ.नाथ पै यांना कधीही सवय नव्हती. असंच एकदा मालवणच्या समुद्राकाठी समाजवादी नेते बबन डिसोझा यांनी उभ्या केलेल्या नाथ पै संकुलात अभ्यास वर्गाच्या निमित्ताने काही दिवस मुक्कामाचा योग आला. रात्री तेथील व्यवस्थापनातील कार्यकर्त्यांशी बोलत असताना त्यांच्या अखेरच्या श्वासाचं कारण समजलं. कोकणातील पाड्यापाड्यावर जाऊन अथक भेटण्याची सवय, दौऱ्यावर दौरे, भाषणं, लोकसभेत बोटावर मोजता येतील अशा सोबत्यांना घेऊन किल्ला लढविणे. संसदेत एखादा विषय मांडताना बारा-बारा तास त्या विषयाचा अभ्यास करणं, प्रचंड गर्दीला सामोरे जाणे या सर्व सवयीमुळे आलेला ताण लक्षात न घेता त्यांच्या मृत्यूविषयी भाकितं करत राहणं बरोबर वाटत नाही. पटत नाही.

जनतेसाठी लढणारा, जनतेसाठी जगणारा माणूस लोकशाही समाजवादाच्या उत्कर्षासाठी झगडला. समाजवादी ऐक्याचा प्रयत्न फसल्यानंतरही राष्ट्रीय चळवळीत सक्रिय राहिला. हे न सांगता जो आवडतो सर्वांना असं भाकड काही सांगत राहणे म्हणजे सत्याचा अपलाप करणे नव्हे तर दुसरं काय? याचा उलगडा संत वाड्मयाचे अभ्यासक आणि गोव्याचे शिक्षण मंत्री प्राचार्य गोपाळराव मयेकर यांनी केला. तो वरील प्रमाणे. निरुपम मार्दवाची त्यांनी करून दिलेली ओळख पुन्हा ताजीतवानी झाली ते देवगड महाविद्यालयात कैलासवासी यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दीनिमित्त दिलेल्या व्याख्यानाच्या निमित्ताने. नाथ पैंच्या विचार सावलीत उभं राहून.

प्रश्न कांचनाच्या कळसाच्या चमकण्याचा नव्हता तर पायाभूत समाज निर्मितीसाठी आयुष्य खर्ची घालणाऱ्या दोन महापुरुषांचा होता. त्यांच्या कार्याचा सुगंध कोकणातील वादळवाऱ्यातही आढळला. त्याचा सूक्ष्म ओला वास निसर्ग अजून जाणवून देतो. कोंडूराच्या गर्द काळ्या पाषाणात उगवलेलं रानगवतही तेच सांगतं वारंवार. तहान भूक लागल्यावर. कभिन्न, नागवे पाषाण देखील. असं प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष जाणवत असताना मन मनाला विचारतं, वर्तमानातील लोकप्रतिनिधीकडं यांच्यातलं काय आहे? कमरेखालचं बोलण्याशिवाय. ना माणसाच्या मनात शिरणं, ना त्यांना समजून घेणं, ना निर्मळ झऱ्यासारखं वाहणं, ना चढणीवरून चढणं, ना उतरणीवरून उतरणं. फक्त त्यांच्या नावावर काय तर दुसऱ्याच्या घामात कालवलेल्या सिमेंटच्या आधारानं काँक्रीटची जंगले उभारणं आणि कौलारू घरं कुरतडणं.. दुसरं काय? न केलेल्या कामाचे छापील संकलनं वाटत फिरणाऱ्या बॅ.नाथ पै यांचं नावही आठवत नसावं.

ज्ञानाविषयी मुद्दाच उपस्थित न केलेला बरा. अनेक भाषा येणं वेगळं असतं. इंग्रजी, मराठी आणि कर्नाटकी (कन्नड) या भाषांचा सराव कसा असावा याचा ते आदर्श पाठ होते. संसद गाजवावी ती त्यांनीच. विचार आणि कृती यांच्यातील एक वाक्यता त्यांच्याकडून घ्यावी इतरांनी. तत्वनिष्ठेचे बांधकाम मूलभूत पायांवर उभे केलं ते त्यांनीच. हे सगळं तडजोड न करता त्यांना कसं जमत गेलं ते कोडंच. हे कोडं सुटावं म्हणून आजही आम्हाला प्रयत्न करावेत असं वाटत नाही. प्रत्येक जण आज गतिमान होतोय ते स्वतःसाठी. जनताजनार्दनासाठी नाही. लोक कृतीला तिलांजली देऊन.

म्हणून तर नाथ पै मोठे वाटतात. लोकशाहीच्या सशक्तीकरणासाठी अविरत झटणारे म्हणून. सत्ताधाऱ्यांच्या बोटचेपी धोरणाविरुद्ध भूमिका घेताना त्यांच्या बोलण्याने संसदेला घाम फुटायचा. हुडहुडी भरायची. आता तर अर्धे सभागृह झोपेचे सोंग घेऊन बसलेले असते. आपण आपल्या मातीसाठी झगडायचं असतं ही शिकवण आता कोणी देत नाही. केवळ जातीसाठी माती खाणाऱ्या चळवळीच्या पार्श्वभूमीवर नाथ पै यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती आंदोलन आणि त्याही पूर्वीचा भारत छोडो आंदोलनातील लेखाजोखा बघितला तर तुमची कार्यधारा वेगळी वाटते नाही का?  महात्मा गांधींच्या प्रगत विचार निष्ठा, जॉर्ज फर्नांडिस, मधू दंडवते, मधू लिमये, एस. एम. जोशी यांच्या मांदियाळीतील तुमची प्रतिमा त्यांच्या इतकीच उठून दिसते. तीसुद्धा प्रत्येक वेळी केलेल्या सिद्धांतिक मांडणीमुळं. राजकीय क्षेत्रातील आणि सामाजिक क्षेत्रातील कार्य योगदानातील साम्य स्थळामुळे.

वेगळी होती तुमची रणांगणे. वेगळी होती शस्त्रे. आणि वेगळंच होतं लढणं. शाब्दिक लढाईत जिंकायचं कसं हे नाथ पै यांनी भल्याभल्यांना शिकवलं. ते काम लोकशाहीची आधारशिलाच मानायला हवी. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे भाषिक संघर्ष तुम्ही कधी निवडणूक जिंकण्यासाठी हत्यार केला नाही किंवा त्याचे दळण दळत बसला नाहीत. संदर्भ आणि प्रश्नांच्या प्रतिमा स्पष्ट असल्याने नाथ पै नाथ पै च राहिले. सांस्कृतिक क्षितिजासह जे केलं ते सदसद्विवेकबुद्धीला स्मरुन. समकालीन व्यवहाराकडे डोळेझाक न करता.  दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर. पैशाच्या जोरावर नव्हे. राजकारण तुमच्यासारख्यांच्याच अंगी लागतं हे अनेकांना कळत नाही. अंगी भिनलेल्या सांप्रदायिक सवयीमुळे बिघडत जाणार्‍या जीवन घडीची कल्पना तुमच्या इतकी कुणालाच नव्हती.

बॅ.नाथ पै यांची आत्मनिष्ठा आणि अविरत गहिवर वंचितांसाठीच होता. राजकारणातील सोवळ्या प्रतिष्ठेला आजूबाजूला फिरकू न देणारा हा माणूस. तांबड्या मातीतील माणसाच्या ध्यानीमनी आजही आहे. भलेभले विस्मृतीत गेले. आजच्या राजकारण्यांना त्यामुळे अवघडल्या सारखं वाटतं. सोप्या प्रश्नाचे उत्तर आजच्या सत्ताधाऱ्यांकडून सोडाच, मग अवघड तर दूरच. ते फक्त थाटामाटात गुंतलेले दिसतात. मग इथे बॅ. नाथ पै यांचा नेटका आणि मर्यादित व्यवहार उठून दिसतो. सहज डोळ्यात भरतो.

बॅ.नाथ पै जेवढे समजून घेता आले, उमजले. तेवढे सांगायला आता जागाही उरली नाही. चांगल्या माणसाचं स्मरण करायला वेळ उरला नाही. तरीही मी माझ्याशीच बोलून घेतो झालं. भोवतीच्या गूढ वलयाबरोबर. स्वतःला शोधत शोधत आत्मबळ वाढवत वाढवत. एका विशिष्ट तऱ्हेनं आशय समजावून घेत घेत. तोही अत्यंत महत्त्वपूर्ण. स्मरणशक्तीला विश्वासानं वागवत वागवत. नाथ पै तुमच्या निमित्तानं एवढंच.

महावीर जोंधळे, ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0