फडणवीस यांचे ड्रग पेडलरशी संबंध – मलिक

फडणवीस यांचे ड्रग पेडलरशी संबंध – मलिक

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ड्रग पेडलरशी संबंध असल्याचा आरोप महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केला.

त्राता तेरे कई नाम
कोरोना आणि राजकारण
फडणवीस-अजित पवार शपथविधीबाबत प्रसार भारती अंधारात

नवाब मलिक यांनी आज सकाळी ट्विटरवर एक फोटो पोस्ट केला होता. त्या फोटोबद्दल त्यांनी खुलासा करताना सांगितले, की फोटोमधील व्यक्ती जयदीप राणा असून अमृता फडणवीस यांनी गायलेल्या मुंबईमधील नद्यांच्या संवर्धनासंदर्भातील गाण्याचा तो फायनान्स हेड होता. या गाण्याचा कथित ड्रग्ज पेडलर जयदीप राणाशी काय संबंध आहे याबद्दलही नवाब मलिक यांनी प्रश्न विचारले.

मलिक म्हणाले, “जयदीप राणाचा फोटो मी ट्विटरवर पोस्ट केलाय. वर्मा नावाच्या व्यक्तीने सर्व माहिती दिलीय. आम्ही देशाला सांगू इच्छितो की जयदीप राणा तुरुंगामध्ये आहे. एका सुनावणीमध्ये त्याला कोर्टात हजर करण्यात आले नाही. ‘एनसीबी’ दिल्लीने तो साबरमती तुरुंगात आहे, असे एका केसमध्ये सांगितल्याचे समजते आहे.”

देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरचा अजून एक फोटो ट्विट करत मलिक यांनी दावा केला की फडणवीस यांचे या पेडलरशी संबंध आहेत.

मलिक म्हणले, “फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, तेव्हा मुंबई नदी संरक्षणासाठी एक रिव्हर साँग तयार केलं होतं. सोनू निगम आणि अमृता यांनी ते गाणं गायलं होतं. देवेंद्र फडणवीस आणि मुनगंटीवार यांनीही अभियन केला होता. या गाण्याला संगीत सचिन जोशी यांनी दिले होते. सोनू निगम यांनी गाणे गायले होते आणि सचिन गुप्ता दिग्दर्शक होते.”

मलिक यांनी देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांच्याबरोबरचे जयदीप राणा याचे वेगवेगळे फोटो ट्विट केले.

“हे प्रकरण केवळ राणा आणि देवेंद्र फडणवीस यांच्या संबंधांबद्दल नाही, तर महाराष्ट्रातील ड्रग्जच्या उद्योगांचे आहे. निरज गुंडे या माणसाच्या माध्यमातून फडणवीस ड्रग्जच्या उद्योगात सहभागी होते फडणवीस मुख्यमंत्री होते, तेव्हा गुंडे या व्यक्तीला मुख्यमंत्री निवास, कार्यालयामध्ये, अधिकाऱ्यांच्या कार्यालयात प्रवेश होता. तो पोलिसांचे ट्रान्सफर ठरवायचा,” असा आरोप मलिक यांनी केला.

निरज गुंडे या व्यक्तीच्या घरी फडणवीस अनेकदा जायचे. देवेंद्र फडणवीस यांचे मायाजाल तिथूनच चालायचे. सरकार बदलल्यानंतर केंद्रीय संस्था ज्यामध्ये ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स, एनसीबीचा महाराष्ट्रातील वावर वाढला. या सगळ्या कार्यालयांमध्ये फडणवीसांचा प्रभाव दिसतो आहे, असे मलिक म्हणाले.

पोलिसांच्या बदलीसाठी कोट्यवधी रुपये घेतले गेल्याचा आरोप मलिक यांनी केला. “फडणवीसांनी वानखेडेंची बदली केली. ड्रग्जचा खेळ मुंबई गोव्यात सुरु राहावा असा हेतू यामागे आहे. प्रतिक गाबा, काशिफ खान यांना सोडून देण्यात आले. देवेंद्र फडणवीसांच्या इशाऱ्यावर राज्यात ड्रग्जचा खेळ सुरू आहे, असे नवाब मलिक म्हणाले.

यावर ट्विटरवर अमृता फडणवीस म्हणाल्या, “चोराच्या उल्ट्या बोंबा का असतात बुवा? कारण विनाशकाले विपरीत बुद्धी असते!”

“नवाब मलिकांनी लवंगी फटाका लावला आहे, आता दिवाळी झाल्यानंतर बॉम्ब मी फोडणार आहे. कारण मी काचेच्या घरात राहत नाही. ज्यांचे संबंध अंडरवर्ल्डसोबत आहेत अशा लोकांनी माझ्यासोबत बोलू नये. यासंदर्भातील पुरावे तुमच्या समोर मांडेन. तसेच शरद पवार यांच्याकडे नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डसोबत संबंध असलेले पुरावे पाठवणार आहे. आता त्यांनी सुरुवात केली आहे त्यामुळे त्याला आता शेवटापर्यंत न्यावे लागेल,” असे देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे.

फडणवीस म्हणाले, “दिवाळीच्या सुरुवातीला लवंगी फटाका वाजवून फार मोठा आवाज केल्याचा आव नवाब मलिक आणत आहेत. जो फोटो त्यांनी ट्विट केला आहे तो चार वर्षांपूर्वीचा आहे. रिव्हर मार्चच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला विनंती केल्यानंतर आम्ही त्या मोहिमेशी जोडले गेलो होतो. मी त्यांना मदत करत होतो. त्या गाण्याच्या शूटिंगच्या वेळी हे फोटो काढण्यात आले आहेत. नवाब मलिकांनी जाणीवपूर्वक माझ्या पत्नीसोबतचा फोटो शेअर केला याच्या पाठीमागची त्यांची मानसिकता दिसत आहे. रिव्हर मार्चने स्पष्ट केले आहे की तो भाड्याने  आणलेला माणूस आहे. त्यामुळे त्यांचा आणि आमचा काहीही संबंध नाही. ”

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0