बांगलादेश-पाक मैत्री भारतासाठी त्रासदायक

बांगलादेश-पाक मैत्री भारतासाठी त्रासदायक

शेख हसिना या पाकिस्तान दौऱ्यावर जाणार यांची दखल भारतीय प्रसार माध्यमांनी फारशा गांभीर्याने घेतली नसली तरी आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक प्रमुख वृत्तपत्रात या संभाव्य भेटीची दखल घेऊन दक्षिण आशियामध्ये चीनच्या वाढत्या प्रभावाबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

‘शहांचे बांगलादेशाबद्दलचे ज्ञान मर्यादित’
भारताच्या दोन शेजाऱ्यांमधले गुफ्तगू
सत्याग्रह केल्याचे मोदींच्या दाव्याचे पुरावे पीएमओकडे नाहीत

एकेकाळचे कट्टर शत्रू असलेल्या पाकिस्तान आणि बांगलादेश दरम्यान आता सौहार्दाचे वारे वाहू लागले असून ते भविष्यात भारतासाठी डोकेदुखी ठरू शकते. पाकिस्तान आणि बांगला देश यांच्या या मिलापामध्ये अर्थातच चीनचा मोठा हस्तक्षेप आहे. बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसिना या लवकरच पाकिस्तानचा दौरा करणार असून तसे निमंत्रण त्यांनी स्वीकारले आहे. बांगलादेशमधील पाकिस्तानचे राजदूत इम्रान अहमद सिद्दिकी यांनी नुकतीच शेख हसिना यांची भेट घेऊन त्यांना पाकिस्तान भेटीचे निमंत्रण दिले आहे. गेल्या ११ महिन्यातील ही दुसरी भेट असून त्याआधी मागील वर्षी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी शेख हसिना यांना दूरध्वनी द्वारे संपर्क साधला होता. शेख हसिना यांनी सिद्दिकी यांच्या भेटी दरम्यान पाकिस्तान बरोबर मजबूत व्यापारी संबध आणि आर्थिक सहकार्य या बाबत अपेक्षा व्यक्त केली होती. त्यामुळे आता हाय प्रोफाइल भेटीचे पडसाद पुढील काही काळात भारत आणि बांगलादेश संबंधावर पडण्याची जास्त शक्यता आहे. शेख हसिना या पाकिस्तान दौऱ्यावर जाणार यांची दखल भारतीय प्रसार माध्यमांनी फारशा गांभीर्याने घेतली नसली तरी आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक प्रमुख वृत्तपत्रात या संभाव्य भेटीची दखल घेऊन दक्षिण आशियामध्ये चीनच्या वाढत्या प्रभावाबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

दुर्गा पूजेच्या निमित्ताने बांगला देशमध्ये हिंदुवर झालेल्या हल्ल्याची किनार कायम असताना शेख हसीना यांनी पाकिस्तान भेटीचे निमंत्रण स्वीकारले आहे. वास्तविक पाकिस्तानशी गेल्या अनेक वर्षांपासून शत्रुत्व असूनही शेख हसिना आता हे वैर संपविण्यासाठी पुढाकार घेत असून या मागे चीनची फूस असल्याचे मानले जात आहे. २००९ मध्ये दुसऱ्यांदा पंतप्रधान स्वीकारताच याच शेख हसिना यांनी १९७१च्या युद्धातील गुन्हेगारांच्या खटल्यांना सुरू करून गती दिली होती. बांगला देश मुक्ती संग्रामाच्या वेळी पाकिस्तानला पाठिंबा देणारे अनेक लोक पूर्व पाकिस्तानात म्हणजे आताच्या बांगलादेशात होते. त्यांच्यावर हे खटले चालविण्यात आले आणि यातील काही जणांना शिक्षाही देण्यात आली. पण १९७२ मध्ये झालेल्या अनेक मानवी हत्येबाबत बांगलादेशने अनेकदा पाकिस्तानकडे माफीची मागणी मागण्यास सांगितले आहे. त्यामुळे गेल्या १३ वर्षाहून अधिक काळ या दोन्ही देशादरम्यान कोणतेही राजनैतिक संबंध अथवा चर्चा झालेली नव्हती. त्यामुळे बंद झालेला हा संवाद पुन्हा सुरू व्हावा यासाठी दोन्ही देशाचे प्रयत्न सुरू असून त्यामध्ये चीनची भूमिका महत्त्वाची आहे.

या दोन्ही देशांना चीनकडून करोडो रुपयांची कर्जे खिरापत म्हणून दिली जात असून आता पर्यंत चीनने बांगलादेशात सुमारे २६ अब्ज  डॉलरची गुंतवणूक केली आहे. तर भविष्यात आणखी ३८ अब्ज डॉलरची गुंतवणूक अपेक्षित आहे. विशेष म्हणजे बांगला देश हा चीनकडून दरवर्षी १५ लाख कोटीहून अधिक वस्तूंची आयात करतो हे येथे दखल घेण्याजोगे आहे. चीनच्या या मदतीवर बांगला देशाची अर्थव्यवस्था निर्भर असताना त्याला पाकिस्तानच्या जवळ घेऊन जाण्यात चीनचा भारत विरोधी अजेंडा स्पष्ट होत आहे. एकाच वेळी पाकिस्तान आणि बांगलादेश हे सीमेवरील खेटून असलेल्या देशाचा उपद्रव भारताला कसा होईल हे यांमगिळ एक सूत्र आहे. भारतात सीएए म्हणजे नागरिकत्व कायद्याच्या अंमलबजावणीचे पडसाद सुद्धा यामागील एक कारण मानले जात आहे. कारण सीएएच्या विरोधात पाकिस्तान बरोबर बांगला देशने सुरात सूर मिसळला होता.

बांगलादेश-भारत संबंध आता पूर्वीसारखे राहिलेले नाही. बांगलादेशच्या सीमेवर असलेल्या या राज्यामध्ये बांगलादेशी नागरिक मोठ्या प्रमाणात बेकायदा घुसखोरी करतात, त्यामुळे हा अविश्वास दिसून येतो. आसाममध्ये राहत असलेल्या बेकायदा बांगलादेशी स्थलांतरितांची ओळख पटवण्यासाठी लागू करण्यात आलेल्या नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी यांनी त्यामध्ये तेल ओतले आहे. श्रीलंकेची चीनशी वाढती जवळीक आणि हंबनटोटा बंदर चीनला भाड्याने दिल्याबद्दल भारताच्या धोरणात्मक समुदायाला चिंता वाटत असली तरी, अजूनही श्रीलंका हा सर्वात अनुकूल शेजारी आहे. प्रामुख्याने पूर्व-पश्चिम व्यापार मार्गातील माल चढवण्याचे आणि उतरवण्याचे महत्त्वाचे बंदर म्हणून असलेले महत्त्व, वाढती बाजार अर्थव्यवस्था आणि भरभराटीचा पर्यटन उद्योग या क्षेत्रांमधील चांगल्या कामगिरीमुळे ही सकारात्मकता आहे. मात्र, लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलम (लिट्टे) आणि पाल्क सामुद्रधुनी आणि बंगालच्या उपसागरात मच्छीमारांनी सागरी सीमा ओलांडण्याच्या समस्या कायम असल्यामुळे श्रीलंका बद्दल काही शंका उपस्थित होत आहेत. तर चीन आणि भूतान यांनी अलिकडेच वर्षानुवर्षे सुरू असलेल्या सीमावादावर तोडगा काढण्यासाठी एक थ्री-स्टेप रोडमॅप नामक करारावर स्वाक्षऱ्या केल्यामुळे भारतासमोर अडचणी वाढू शकतात.

गेल्या काही काळात दक्षिण आशियातील आपले शेजारी देश, भारतातील अस्वस्थतेला कारणीभूत ठरले, तसेच काही देशांसोबत मैत्रीचे संबंध नव्याने जोडले गेले. एकीकडे सर्जिकल स्ट्राईक करण्यापासून, दुसरीकडे द्विपक्षीय सहकार्याला प्राधान्य देण्यापर्यंत आणि प्रादेशिक मंचांना ताकद देण्यापर्यंत प्रयत्न केले गेले. पण असले तरी चीनच्या या देशाबरोबरच्या वाढत्या संबंधांमुळे भारता पुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. त्यामुळे पुढील काळात भारताने आपल्या ताकदीचा योग्य पद्धतीने उपयोग करायला हवा जेणेकरून शेजारी राष्ट्रांशी संबंध अधिक सक्षम आणि सक्रिय बनतील. शेजारी असलेले अफगाणिस्तान, पाकिस्तान, नेपाळ, भूतान, बांगलादेश, श्रीलंका आणि मालदीव हे देश आणि त्यामधील चीनचा होत असलेला हस्तक्षेप हे भविष्यात त्रासदायक ठरू शकते.

परिणामी येत्या काही काळात भारताने आपल्या ताकदीचा अधिक चांगल्या पद्धतीने उपयोग करायला हवा जेणेकरून शेजारी राष्ट्रांशी अधिक सक्षम आणि सक्रिय बनवेल. कार्यदक्षतेचा अर्थ केवळ प्रकल्प लागू करणे एवढाच नाही तर डावपेचही कुशल असायला हवेत असा अपेक्षित आहे.

ओंकार माने, जागतिक घडामोडींचे अभ्यासक आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0