शेतकरी आंदोलनः झी, टाइम्स नाऊचे वार्तांकन चुकीचे

शेतकरी आंदोलनः झी, टाइम्स नाऊचे वार्तांकन चुकीचे

नवी दिल्लीः मोदी सरकारच्या तीन वादग्रस्त शेती कायद्यांविरोधात २६ जानेवारी २०२१ रोजी शेतकर्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीतल्या आंदोलकाकडून लाल किल्ल्याव

भागवतांची थापेबाजी
अखेर काबूलचाही पाडाव, अध्यक्ष परागंदा
इंपिरिकल डेटा तयार करण्यावर सर्वपक्षीय सहमती

नवी दिल्लीः मोदी सरकारच्या तीन वादग्रस्त शेती कायद्यांविरोधात २६ जानेवारी २०२१ रोजी शेतकर्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीतल्या आंदोलकाकडून लाल किल्ल्यावरचा तिरंगा झेंडा काढल्याचे चुकीचे वृत्तांकन करून हे आंदोलन खलिस्तानी असल्याचा आरोप करणार्या झी वृत्तवाहिनीवर द न्यूज ब्रॉडकास्टिंग अँड डिजिटल स्टँडर्ड ऑथॉरिटी (एनबीडीएसए) या संघटनेने नाराजी व्यक्त केली आहे. झी न्यूजने २६ जानेवारीच्या लाल किल्ल्यावर शेतकरी आंदोलक घुसले होते. यातील काहींनी देशाचा तिरंगा झेंडा काढल्याचे वृत्त प्रसारित केले होते. या अफवेवर विश्वास ठेवून झी न्यूजने तीन व्हीडिओ प्रसारित केले होते. या व्हीडिओमधून झी न्यूजने शेतकरी आंदोलन खलिस्तान चळवळीशी जोडले होते, हे व्हीडिओ नैतिक संहितांचे उल्लंघन असून या वृत्तवाहिनीने हे व्हीडिओ मागे घेतले पाहिजेत, असे एनबीडीएसएने या वृत्तवाहिनीला सांगितले आहे.

तसेच एनबीडीएसएने टाइम्स नाऊ या इंग्रजी वृत्तवाहिनीचे संपादक व वृत्तनिवेदिका राहुल शिवशंकर व पद्मजा जोशी यांनी दिल्ली दंगलीवर केलेल्या कार्यक्रमावरही नाराजी व्यक्त केली आहे. दिल्ली दंगलीवर सादर करण्यात आलेले या दोन पत्रकारांचे कार्यक्रम अभिनिवेशयुक्त व निःष्पक्ष नव्हते, या कार्यक्रमांनी पत्रकारितेतील ८ महत्त्वाच्या नैतिक संहितांचे सरळ सरळ उल्लंघन केले. वृत्तांमध्ये भडकपणा, अतिरंजितपणा आणणे, समाजात भय व अस्वस्थता निर्माण करण्याचा प्रयत्न या वृत्तवाहिनीकडून होता, असे एनबीडीएसएचे म्हणणे आहे.

एनबीडीएसएने सर्व वृत्तवाहिन्यांकडून वृत्तांमध्ये तथ्य, पुरावे व निःष्पक्षपणे पत्रकारिता दिसली पाहिजे, अशी अपेक्षा केली आहे. आपल्या वृत्तांकनात चूक दिसली तरी ती चूक लगेच दुरुस्त करून प्रेक्षकांना सांगितली पाहिजे. झीच्या वृत्तांकनात तसे दिसून आले नाही, अशीही टिप्पण्णी एनबीडीएसएने केली आहे.

झी वृत्तवाहिनीच्या १९, २०, २६ जानेवारीच्या शेतकरी आंदोलनाच्या वृत्तांकनाविरोधात कार्यकर्ते इंद्रजित घोरपडे यांनी एनबीडीएसएकडे तक्रार केली होती. या तक्रारीत त्यांनी झी वृत्तवाहिनीने दिल्लीत ट्रॅक्टर परेडमधील फुलांनी सजवलेले ट्रॅक्टर दाखवले होते. प्रत्यक्षात हा व्हीडिओ जर्मनीतल्या एका चॅरिटी शोचा होता. असे खोटे व्हीडिओ दाखवून समाजात तेढ तयार करत असल्याचा आरोप घोरपडे यांचा होता. ट्रॅक्टर परेडचे वृत्तांकन करताना झी न्यूजने दिलेले मथळेही भडक व दिशाभूल करणारे होते, असे घोरपडे यांचे आरोप होते.

‘प्रजासत्ताक दिनी यादवी’, ‘प्रजासत्ताकाविरोधातील षडयंत्र’, ‘आंदोलनावर दहशतवादाची छाया’, ‘शेतकर्यांचा अडेलतट्टूपणा, युद्ध पेटवणार का?’ अशा मथळ्यांच्या आधारे झी न्यूजचे वृत्तांकन सुरू होते, असे घोरपडेंचे म्हणणे होते. झी न्यूजने लाल किल्लावरचा तिरंगा शेतकर्यांनी खाली उतरवला असे खोटे वार्तांकनही केल्याचा आरोप घोरपडेंनी केला होता. शेतकरी आंदोलनाची तुलना खलिस्तान चळवळीशी सतत केली जात होती, याकडेही घोरपडेंनी आपल्या तक्रारीत लक्ष वेधले होते.

दरम्यान द क्विंटने दिलेल्या वृत्तानुसार झी वृत्तवाहिनीने त्यांच्यावर लावलेले सर्व आरोप फेटाळले आहे. आम्ही शेतकरी आंदोलनाला कलंकित केले नाही. जे व्हीडिओ प्रसारित केले त्याची सत्यता तपासलेली नाही, असाही खुलासा आम्ही केला होता. लाल किल्ल्यावरचा तिरंगा उतरवल्याचे वृत्तांकन थेट घटनास्थळावरून असल्याने नजरचुकीने झाले व त्या संदर्भातला यू ट्यूबवरचा व्हीडिओ आम्ही उतरवला आहे. घोरपडेंनी केलेले आरोप दोन धर्मांत वाद निर्माण करण्याचा प्रयत्न आहे, असाही आरोप झी न्यूजने केला आहे.

घोरपडेंनी त्यावर उत्तर देताना या वृत्तवाहिनीने चुकीच्या व खोट्या बातम्या देताना प्रेक्षकांची माफीही मागण्याची तसदी घेतली नाही, असा आरोप केला.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0