सुवर्णवेध

सुवर्णवेध

एकेकाळी क्रिकेट किंवा व्हॉलीबॉल खेळाकडे आकर्षित होऊ शकणार्या नीरज चोप्राच्या गुणवत्तेला लष्कराने ऑलिम्पिक सुवर्ण पदकापर्यंत पोहोचण्याइतपत सक्षम केले. भारताच्या ऑलिम्पिक इतिहासात एथलेटिक्स खेळातले हे पहिले पदक तेही सुवर्ण पदक.

पाच वर्षांपूर्वी भारताला ऑलिम्पिक एथलेटिक्समध्ये पदकाचीही आशा नव्हती. मिल्खा सिंग यांचे चौथे येणे किंवा काही शतांश सेकंदाने हुकलेले पी.टी. उषाचे पदक यांच्याच आठवणी वारंवार, प्रत्येक ऑलिम्पिक आधी उगाळल्या जायच्या. २०१६मध्ये भारतीय लष्कराने ‘मिशन ऑलिम्पिक 2020’ अभियानास सुरूवात केली. अनेक जण त्यावेळी हसले. काहींनी त्या योजनेची थट्टा केली. भारतीय लष्कराने देशातील युवा पिढीतील गुणवत्ता शोधण्यास सुरूवात केली. तळागाळातून ही गुणवत्ता शोधली. त्या मुलांना सेवेत सामावून घेतलं. त्यांना उत्तम आहार दिला. चांगले प्रशिक्षक दिले. चांगल्या सोयी-सुविधा दिल्या. मैदानातील प्रत्येत उत्तम कामगिरीला बढतीने शाबासकी मिळत गेली. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पदके मिळत गेली आणि विशीतला एक युवक सुभेदार नीरज चोप्रा बनला.

शनिवारी टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुभेदार नीरज चोप्राने भारतीय लष्कराने त्याच्यात केलेल्या गुंतवणुकीला न्याय दिला. त्याच्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवला. भारतीय लष्कराने आतापर्यंत देशवासियांना अनेक अभिमानाचे क्षण अनुभवायला दिले. शनिवारी त्या पेक्षा वेगळा आनंद, अभिमान वाटावा असं काहीतरी दिलं. एकेकाळी क्रिकेट किंवा व्हॉलीबॉल खेळाकडे आकर्षित होऊ शकणार्या नीरज चोप्राच्या गुणवत्तेला लष्कराने ऑलिम्पिक सुवर्ण पदकापर्यंत पोहोचण्याइतपत सक्षम केले. भारताच्या ऑलिम्पिक इतिहासात एथलेटिक्स खेळातले हे पहिले पदक तेही सुवर्ण पदक.

पानिपतच्या या २३ वर्षीय युवकाने या आधी भारताला राष्ट्रकुल आणि एशियाड स्पर्धांमध्येही भालाफेकीचे सुवर्ण पदक मिळवून दिले होते. २०१८ला इंडोनेशियामधील ८८.०६ मी. भालाफेकीची त्याची कामगिरी सर्वोत्कृष्ट आहे.

जाट हायस्कूल आणि चंदिगडच्या डीएव्ही कॉलेजच्या वतीने क्रिकेट आणि व्हॉलीबॉल खेळता खेळता तो एथलेटिक्सच्या प्रेमात पडला.

नीरजच्या ऑलिम्पिक पदकापर्यंतचा प्रवास सुरू असताना २०१९मध्ये माशी शिंकली. तो ज्या हाताने भाला फेकतो त्या हाताच्या कोपर्याला दुखापत झाली. शस्त्रक्रियेमुळे एक वर्ष बाद झाले. त्या आधी २०१६मध्ये पाठदुखीमुळे तो बाद झाला होता. त्या अनुभवातूनही तो बरंच काही शिकला.

हरियाणामध्ये भारताचे अनेक नामवंत भालाफेक करणारे, गोळाफेक करणारे, थाळीफेक करणारे सरावासाठी यायचे. त्यांना पाहता पाहता नीरज भालाफेक खेळाच्या प्रेमात पडला. झेकोस्लोव्हाकियाचा भाला फेकपटू जॅन झेलेनी हा त्याचा आदर्श. टोकियो ऑलिम्पिकचे सुवर्णपदक हे त्याचे एकमेव लक्ष्य होते.

महाभारतातल्या अर्जुनाचे जसे माशाच्या डोळ्यावर लक्ष्य होते तशीच एकाग्रता नीरजची होती. तो म्हणतो, जेव्हा तुम्ही तुमच्या खेळात जिंकण्यासाठी कठोर मेहनत घेता, तेव्हा आजूबाजूची प्रलोभने, अडथळे, लक्ष विचलीत करणार्या गोष्टी नगण्य ठरतात. त्यामुळे राष्ट्रीय शालेय स्पर्धेपासून नीरजचा सुरू झालेला भालाफेकीतील सुवर्णपदकांचा सिलसिला ऑलिम्पिकपर्यंत कायम राहिला.

नीरज भारताचा ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियन होता. पोलंडमध्ये २०१६मध्ये झालेल्या वर्ल्ड ज्युनियर अजिंक्यपद स्पर्धेत विजेतेपदाची त्याची सुरूवात होती. त्यानंतर त्याने भारतासाठी प्रत्येकी वेळी नवा इतिहास रचला होता.

कोण हा नीरज… कुठून आला?.. कुणी त्याला भाला फेकीसाठी तयार केले?

पानिपतच्या एका शेतकरी कुटुंबातला, हरियाणाच्या मध्य पूर्वेकडे वसलेल्या खांदरा गावचा तो रहिवासी. ८ एकर जमिनीचा हिस्सा. ४ भावांचे एकत्र कुटुंब. २ म्हशी आणि ३ गाई. दररोज ४४ लीटर दूध दररोज यायचे. १६ जणांच्या कुटुंबातील तिघेजण नोकरी करायचे. नीरज आजीचा लाडका. आजीने तूप-रोटी, चूरमा, धारोष्ण दुधावर नीरजला वाढवलं. त्यामुळे नीरजचे वजन वाढलेलं. घरच्यांनी मग त्याला वजन कमी करण्यासाठी जिममध्ये पाठवलं. २०१०च्या हिवाळ्यात नीरज जॉगिंग करत होता. त्यावेळी भालाफेकपटू जय चौधरी ऊर्फ जयवीरचे त्याच्याकडे लक्ष गेले. जयने नीरजला एकेदिवशी भाला फेकायला सांगितले. पहिल्यांदाच भाला हातात घेतलेल्या नीरजने ३५ ते ४० मीटर अंतरावर भाला फेकला. जयवीर म्हणत होता, त्याने ज्या पद्धतीने भाला उचलला व फेकला ते पाहून मलाच आश्चर्य वाटलं. नीरजचे वजन त्यावेळी अधिक होते. मात्र तरीही तो चपळ वाटला.

नीरज म्हणतो, मी जयवीरकडून भाला फेकायला शिकलो. मला तो मोठ्या भावासारखा वाटायचा.

भालाफेक खेळ दिसतो तेवढा सोपा नाही. शक्ती, चपळाई, वेग यांचे अप्रतिम मिश्रण असलेला हा खेळ. घरच्यांना जुन्या घराची डागडुजी करायची होती. पण नीरजमधील गुणवत्तेला वाव देण्यासाठी चोप्रा कुटुंबियांनी त्यासाठी साठवून ठेवलेले पैसे नीरजसाठी खर्च करण्याचे ठरवले.

सरावासाठी लागणारा भाला १५ ते २० हजार रु.ना मिळतो. आंतरराष्ट्रीय स्तरावर वापरण्यात येणार्या भाल्याला लाखभर रुपये लागतात. व्यावसायिक भालापटूला घालावे लागणारे बूट १० हजार रु.चे असतात. चोप्रा कुटुंबाने ते पैसे नीरजवर खर्च केले.

२०२२मध्ये नीरजला घेऊन जयवीर पानिपतहून पंचकुला एथलेटिक्स सेंटरमध्ये घेऊन आला. प्रशिक्षक नसीम अहमद यांनी नीरजला पाठिंबा दिला. तेथून नीरजचा आंतरराष्ट्रीय प्रवास सुरू झाला. दुखापतीने जयवीरची कारकीर्द मोठी झाली नाही पण त्याने नीरजला मोठे केले. राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदकानंतर हरियाणा सरकारने नीरजला दीड कोटी रु.चे बक्षिस दिले. नीरजने हे पैसे आपल्या घराच्या दुरुस्तीसाठी दिले. चोप्रा कुटुंबाचे दोन मजली घर त्यामुळे उभे राहिले.

वयाच्या २१ व्या वर्षी नीरज राजपुताना रायफल्समध्ये नायब सुभेदार झाला. भारताला ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता मिळाला.

विनायक दळवी, हे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार असून अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडास्पर्धांचे त्यांनी वार्तांकन केले आहे.

COMMENTS