‘राईज ऑफ एम्पायर- ऑट्टोमन’

‘राईज ऑफ एम्पायर- ऑट्टोमन’

ही मालिका म्हणजे डॉक्यु-ड्रॉमा आहे. ऐतिहासिक घटनांचा सिनेपट बनवला आहे. जगाच्या इतिहासाला कलाटणी देणारा कॉन्स्टंटिनोपलचा पाडाव आजही आपल्याला इतिहासाचा नवे भान देतो.

युद्धास कारण की…
खुशियों के गुप्तचर : गीत चतुर्वेदी यांची कविता
देशभरातले टोल नाके हटवणारः गडकरी

२० मे १४९८ ला वास्को द गामाने भारतीय भूखंडावर पाऊल ठेवलं आणि त्यानंतर भारतीय उपखंडाचा इतिहास बदलला.

पण वास्को द गामाच्या आणि अन्य युरोपियनांच्या दक्षिण आशियात समुद्रामार्गे येण्यासाठी महत्त्वाचं कारण होतं २८ मे १४५३ ला झालेला कॉन्स्टंटिनोपलचा पाडाव. ५६ दिवसांच्या लढाईनंतर ऑट्टोमन तुर्कांनी बायझन्टीय साम्राज्याचा पाडाव केला. त्यावेळी युरोप आणि आशिया खंडाचा व्यापार हा खुश्कीच्या मार्गे चालायचा आणि त्याचा मध्यबिंदू होता कॉन्स्टंटिनोपल. व्यापारी मार्गांचा केंद्रबिंदू. ऑट्टोमन तुर्कांनी हा मार्ग बंद केल्यानं भारतातून युरोपात जाणारा माल बंद झाला. युरोपियनांना मसाले, कापड इत्यादी आशियाई वस्तूंची चणचण भासू लागली आणि पर्याय म्हणून समुद्री मार्गांचा शोध सुरू झाला. भारतीय उपखंडाच्या आणि एकंदरीतच जगाच्या इतिहासाला कलाटणी देणारी घटना म्हणजे कॉन्स्टंटिनोपलचा पाडाव. या एका घटनेचा सिनेमाच्या अंगाने पण तथ्यावर आधारित सविस्तर आढावा घेणारी मालिका सध्या नेटफ्लिक्सवर सुरू आहे जिचं नाव आहे ‘राईज ऑफ एम्पायर- ऑट्टोमन!’

Constantinople is not just a strategic location but a concept! असं इतिहास तज्ज्ञ म्हणतात. इसवी सनाच्या तिसऱ्या शतकात कॉन्स्टंटिनोपल पहिला यानं या शहराची निर्मिती केली. तो संपूर्ण रोमन साम्राज्याचा सम्राट होता. त्याच्या नंतर मात्र रोमन साम्राज्याचे पूर्व आणि पश्चिम असे विभाजन झाले आणि १,१०० वर्षं ती पूर्व रोमन साम्राज्याची राजधानी बनून राहिली. २३ राज्यांनी कॉन्स्टंटिनोपल जिंकण्याचा प्रयत्न केला ज्यात प्रामुख्यानं अरब साम्राज्याचा समावेश होता पण कुणालाही ते जिंकता आले नाही. त्याचं कारण होतं कॉन्स्टंटिनोपलचं मोक्याचं स्थान आणि सभोवताल पसरलेल्या दगडांच्या मोठाल्या भिंती.

कॉन्स्टंटिनोपल हे भूमध्य सागर आणि काळा समुद्र तसंच आशिया आणि युरोप खंडाला जोडणारं ठिकाण. सर्व व्यापारी मार्ग येथूनच जात. बायझन्टीयन राजांनी चोहोबाजूंनी मजबूत दगडांच्या भिंती बांधून हे शहर सुरक्षित केलं ज्याला ‘थिओडोसिअ वॉल’ (भिंती) असं म्हणतात. बाहेरच्या भिंतींआतील शहराचे क्षेत्रफळ १४ चौ.किमी होते तर सर्वांत आतल्या (constantine walls) भिंतीच्या आतील शहराचे क्षेत्रफळ साधारणतः ५ चौ.किमी होते. १४व्या शतकापर्यंत या भिंती अभेद्य होत्या. अरब जगताला कॉन्स्टंटिनोपलचं विलक्षण आकर्षण होतं हे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या तोंडून निघालेल्या वाक्यांतून लक्षात येतं. ते म्हणतात, “कॉन्स्टंटिनोपल हे अरबांचं आहे. किती महान असेल तो सम्राट जो कॉन्स्टंटिनोपल जिंकेल आणि किती महान असेल ते सैन्य!’.

पैगंबरांचं हे स्वप्न साकार करण्याचं स्वप्न पाहत होता २१ वर्षाचा महंमद दुसरा हा ऑट्टोमन राजा. ऑट्टोमन हे जमिनीवर लढाया करणारं साम्राज्य होतं. त्यामुळे त्याचं नौदल मजबूत नव्हतं. पण महंमदनं गादीवर येताच नौदल उभारायला सुरुवात केली. ज्याप्रमाणे अलेक्झांडरनं पूर्व रोम काबीज केलं तसंच महंमदला पश्चिम रोम काबीज करायचं होतं. पण ऑट्टोमन, रोमन, जिनोयीण ही सर्व व्यापार उदिमावर जगणारी राज्य असल्यानं यांच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना युद्ध नको होतं. त्यासाठी महंमदचा वजीर चांदरली पाशा आणि कॉन्स्टंटाईन (११वा)चा पंतप्रधान लॉर्ड लुकास नटूर्स हे सतत गुप्तपणे वाटाघाटी करत होते. कॉन्स्टंटाईनला युद्ध नको होतं पण न लढता आपली राजधानी गमावण्याची त्याची तयारी नव्हती. फक्त ७००० एवढं सैन्य त्याच्याजवळ होतं आणि सोबत काही भ्रष्ट तर काही इमानदार अधिकारी. पश्चिम ख्रिश्चन धर्मसंस्थेशी पूर्व ख्रिश्चन धर्मसंस्थेच्या वादामुळे इतर युरोपीय सत्ता कॉन्स्टंटाईनच्या मदतीस आल्या नाहीत. पण तेथील मोजके शौर्यवान मात्र मदतीस धावले ज्यांपैकी होते जिनोई सैनिक, इटालियन समुद्री डाकू जुस्तीनियानी. जुस्तीनियानी आणि त्याचं ४०० सैन्याचं दल युद्धात ‘भिंतींच्या शहरांची’ सुरक्षा करण्याचं काम करत होतं. त्यात त्यांचा हातखंडा होता. वेळप्रसंगी हे ४०० सैनिक १० हजार सैन्यावर मात करत असतं आणि कॉन्स्टिन्टनोपलच्या युद्धात ते शाबित झालं.

महंमदनं रोमनांशी झालेला शांतता तह मोडून रुमेली हिसारा हा किल्ला युरोपच्या बाजूनं साडेचार महिन्यांत बांधला ज्यामुळं युद्धजन्य परिस्थिती आणखी जवळ आली. या किल्ल्याला ‘थ्रोट कटर’ म्हणत असतं. कारण हा किल्ला बॉस्फरसच्या समुद्रधुनीतून कॉन्स्टिन्टनोपलच्या मदतीसाठी येणारी सगळी सागरी मदत थांबवू शकत होता. या घटनेनंतर लगेचच म्हणजे २ एप्रिल १४५३ ला ऑट्टोमनचं ५० हजारांवर सैन्य कॉन्स्टिन्टनोपलमध्ये उतरलं आणि ६ एप्रिलला त्यांनी या शहरी साम्राज्याला वेढा घालायला सुरुवात केली.

मध्ययुगात भक्कम भिंतींचा वेढा संरक्षणाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा मानला जाई आणि कॉन्स्टिन्टनोपलच्या भिंती तर अभेद्य मानल्या जात होत्या. पण ओर्बनच्या ८ मीटर बॅसिलिका तोफेनं हा समज ‘फोडून’ काढण्यास सुरूवात केली. त्या काळातली ही सर्वांत मोठी तोफ होती. पण थिओडोसिअन भिंतींचं एक वैशिष्ट्य होतं की त्या युद्धातील अल्पविरामा दरम्यान दुरुस्त करता येत होत्या. जुस्तीनियानीचं सैन्य ऑट्टोमन सैन्यावर भारी पडत होतं. ऑट्टोमन सैन्याने खोदलेल्या खंदकातच रोमनांनी स्फोट घडवून आणले. दरम्यान बॅसिलिकामध्ये स्फोट होऊन ती नष्ट झाली. ३ आठवड्यांच्या लढ्यानंतरही महंमदसाठी विजय जवळ दिसत नव्हता. याच दरम्यान पोप कॉन्स्टिन्टनोपलला मदत पाठवत असल्याच्या वावड्याही उठत होत्याच. शिवाय जिनोईज जहाजांना महंमदचं नौदल पकडू शकलं नाही. एकंदरीतच सैन्याचा उत्साह कमी झाला होता आणि नैराश्याने महंमदवर तहासाठी दडपण येऊ लागलं होतं.

पण २१ वर्षाचा महंमद माघार घ्यायला तयार नव्हता. त्याला सिकंदर बनायचं होतं. कॉन्स्टिन्टनोपलची जमिनी भिंत १४ मैल होती आणि सैन्याचा कडा पहारा तिथं होता. पण गोल्डन हॉर्नच्या बाजूची साडेतीन मैलांची भिंत त्यामानाने फारच कमकुवत होती. या भिंतीला पहारा देण्यासाठी फारसं सैन्य कॉन्स्टिन्टनोपलजवळ नव्हतं. पण या भिंतीकडून हल्ला चढवण्याआधी ऑट्टोमन नौदलाला गोल्डन हॉर्नच्या लहान खाडीत घुसणं आवश्यक होतं जे ते कोणत्याच परिस्थितीत शक्य नव्हतं. कारण कॉन्स्टिन्टनोपलपासून शेजारील गलाटा या जिओनीज कॉलनीपर्यंत समुद्रात जाड लोखंडी साखळी बांधली होती जी पार करणं कोणत्याही नौदलाला शक्य नव्हतं. ७०० वर्षांपासून कॉन्स्टिन्टनोपलच्या छोट्या नौदलाचे संरक्षण ही साखळी करत होती. पण महंमद थांबणार नव्हता. त्याने शेजारील गलाटा या राज्याच्या भोवतालात दीड मैलांचा जमिनी रस्ता तयार केला. त्यासाठी घनदाट जंगलातील झाडं कापण्यात आली. त्यांच्या खोडांना ग्रीस लावून गुळगुळीत करण्यात आलं आणि त्यावरून ओट्टोमन नौदलाचे ७६ जहाज घासत लोखंडी साखळीच्या आतील बाजूच्या खाडीत उतरवण्यात आले. ही अकल्पनिय गोष्ट महंमदने काहीच दिवसांत गुप्तपणे पार पडली. ओट्टोमन सैन्य गोल्डन हॉर्नच्या आत पाहूनच कॉन्स्टिन्टनोपलचं अवसान गळालं. कारण आता त्यांना समुद्राच्या बाजूची भिंतही लढवावी लागणार होती. तरीही जुस्तीनियानी आणि कॉन्स्टिन्टनोपल ११ वा शेवटपर्यंत लढत होते. ते जिंकतील अशी परिस्थिती निर्माण होत असतांनाच महंमदने शेवटचा पर्याय म्हणून जेनीसरी हे विशेष सैन्यदल पाठवलं, ज्यांनी अत्यंत क्रूरपणे लढून कॉन्स्टिन्टनोपलच्या आत प्रवेश केला आणि ८ एप्रिल १४५३ला कॉन्स्टिन्टनोपलचा लढा संपला. ते कायमस्वरूपी तुर्कांच्या हाती गेलं. आज हे शहर इस्तंबूल या नावानं प्रसिद्ध आहेच शिवाय युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थानांपैकी एक आहे.

जेनिसरी हे मध्ययुगीन युरोपातील एकमेव सैन्यदल होतं जे कधीही विस्कळीत झालं नाही.(first standing army in Europe) पण हे जेनिसरी कोण होते? कॉन्स्टिन्टनोपलसाठीची भविष्यवाणी काय होती? कॉन्स्टिन्टनोपलच्या कोणत्या लोकांनी महंमदला मदत केली? महंमदची सावत्र आई मारा हीची या लढाईत काय भूमिका होती? कॉन्स्टन्टीन ११वा याच्या आईचं नाव का महत्त्वाचं होतं? आगीया सोफिया काय आहे? कसं होतं ओट्टोमनचं ते विजयी सैन्य आणि कसा होता ‘महंमद द काँकरर’? या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी ‘राईज ऑफ एम्पायर- ऑट्टोमन’ ही सहा भागांची मालिका बघणं महत्त्वपूर्ण ठरतं.

ही मालिका म्हणजे डॉक्यु-ड्रॉमा आहे. ऐतिहासिक घटनांचा सिनेपट बनवला आहे आणि सत्य तज्ज्ञांच्या तोंडून ऐकवलं आहे. अनेक डॉक्यु-ड्रॉमा BBC बनवत असते पण त्यात ड्रॉमाटायझेशन कमी आणि तज्ज्ञांनी दिलेली माहिती मौखिक स्वरूपात अधिक असते. ओट्टोमन या मालिकेचं मात्र तसं नाही. इतिहासकार डॉ. मॅरिओस फिलीपेड्स, डॉ. करेन बर्कि, डॉ. मायकेल टेलबोट तसंच १४५३ या पुस्तकाचे लेखक रॉजर क्रॉली आणि ‘लॉर्डस ऑफ द होरायझन’चे लेखक जेसन गुडविन यांनी दिलेली माहिती या मालिकेत समाविष्ट आहे. पण कोणतीही मौखिक माहिती म्हणजेच तज्ज्ञांची बाईट ही एकावेळी २० ते ३० सेकंदांपेक्षा अधिक नाही. अनेक ऐतिहासिक तथ्यांचं वर्णन सुद्धा सिनेदृश्यात केलेलं आहे. त्यामुळे प्रेक्षकाला हॉलिवूड स्टाईल ऐतिहासिक सिनेमा बघण्याचं समाधान मिळतं. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे निवेदक चार्ल्स डान्स याचा आवाज प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. प्रत्येक क्षणाला होत असलेल्या अनाकलनीय आणि आश्चर्यकरक घडामोडीमुळे प्रेक्षकाला एकाच वेळी दोन ते तीन एपिसोड बघण्यासाठी दिग्दर्शक एमर साहीन भाग पडतो. इतिहासांत फारसा रस नसलेल्या प्रेक्षकांसाठी ही मालिका पर्वणी ठरते कारण ऐतिहासिक तथ्यांचा मागोवा घेतांना मनोरंजनाचा धागा दिग्दर्शक कुठेच तुटू देत नाही. सर्वच कलाकारांचे अभिनय सरस आहेत. सोप्या नकाशांचा वापर करून क्लिष्ट माहिती सुद्धा सहज सोपी करून सांगितली आहे. त्यामुळे ही मालिका बघितल्यानंतर आपण इतिहासाचा एक चांगला विद्यार्थी झाल्याचे काही प्रेक्षकांना वाटू शकते.

कॉन्स्टिन्टनोपलचा पाडाव अनेक दृष्टीनं महत्त्वपूर्ण होता. या विजयामुळं ऑट्टोमन साम्राज्याचा युरोपात आणि उत्तर आफ्रिकेत विस्तार झाला, नवे जलमार्ग शोधले गेले, अनेक इतिहास नव्यानं निर्माण केले गेले. पण सर्वांत महत्त्वाचं म्हणजे मजबूट तटबंदी-भिंती आणि तोफांच्या लढाईत तोफांचा विजय झाला. त्यामुळं पुढं जाऊन संहारक दारुगोळ्यांच्या निर्मितीसाठी सर्वत्र प्रयत्न सुरू झाले.

कॉन्स्टिन्टनोपलचा पाडाव ही एका अर्थानं आधुनिक इतिहासाची नांदी म्हणता येईल कारण या घटनेच्या काहीच वर्षानंतर भारतीय उपखंडात इंग्रज आले. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील खिलाफत चळवळ ही तुर्कस्तानशी संबंधित होती. त्यामुळेच जगाच्या इतिहासाला कलाटणी देणाऱ्या घटनेचा शोध घेणारी ही मालिका महत्त्वपूर्ण ठरते.

namratafalke20@gmail.com

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0