‘आम्री’चा प्रवास

‘आम्री’चा प्रवास

मला अमृता आताच्या काळात करावीशी वाटली याचं कारण आजची असणारी सामाजिक आणि राजकीय परिस्थिती. आजच्या काळात अमृता असती, तर ती आताच्या सत्ताधाऱ्यांना नक्कीच झेपली नसती.

४० टक्क्याहून मुस्लिम टक्केवारीचे ५ मतदारसंघ ‘आप’कडे
आंदोलनांचे वर्ष: जगभरात नागरी स्वातंत्र्य धोक्यात
३ जुलैपासून कामगार संघटनाचे असहकार आंदोलन

अमृता शेर गिल, अनेक वर्ष डोक्यात घर केलेली मनस्वी कलाकार. पुण्यातील अभिनव कला महाविद्यालयात कलेचं शिक्षण घेताना तिची प्रथम तिची तोंडओळख झाली. कॉलेजच्या ग्रंथालयात असलेली पुस्तकं तशी जास्त करून इंग्रजीत असायची…त्यामुळे तसाही हा विषय शाळेत असताना आवडीचा नसल्यानं वाचन कमीच व्हायचं. मराठीत कलाकार आणि त्यांची चरित्र कमीच असायची. माधुरी पुरंदरे यांनी पिकासो, व्हॅन गॉग यांची चरित्रे मराठीत अनुवादीत केली म्हणून मी वाचू शकलो. माझ्यासारखी मराठी माध्यमातील मुलं वाचू शकत असतील. राजा रवी वर्मा मराठीत वाचता आले. बाकी कलाकार भारतीय असो अथवा परदेशातील त्यांची चरित्रं कॉलेजच्या काळात विशेष वाचण्याचा तसा उत्साहही नसायचाच. तेंव्हा फक्त चित्र काढण्याचं वेड डोक्यात असायचं. कॉलेजला असताना चित्रकार गोपाळराव देवूस्कर यांच्या कडे राहण्याचा योग आला. त्यांनी केलेलं काम जवळून पाहता आले. त्यांना काम करताना पाहता आले. मला आठवतंय डिप्लोमा ला असताना ते मला अमृताची पेंटींग कम्पोझीशन साठी पहायला सांगायचे. ‘बापू’ म्हणजे गोपाळराव देवुस्कर. ते फर्ग्युसन कॉलेजमध्ये राहायचे. अशा मोठ्या चित्रकाराच्या सहवासात राहता आले. सुधाकर चव्हाण सरांनी मला आर्ट टीचर डिप्लोमाला असताना त्यांच्याकडं पाठवलं होत. बापूंनी ड्रॉइंग हा विषय पक्का करण्याचा सल्ला दिला आणि ते करायला लावले. असो! बापू हा एक वेगळा विषय डोक्यात आहेच.

अमृता शेर गिलची भारतीय स्त्रिया असलेली चित्रं तेव्हढी अभ्यास म्हणून शिकवली गेली आणि आम्हाला कळाली. कॉलेज नंतर चित्र काढणं कमी झालं. नाटक आणि पोटापाण्याचा प्रश्न असा नवीन शोध सुरू झाला. चित्रपटसृष्टीत काम करत असताना अमृतावर एक माहितीपट करावा असं बरीच वर्ष मनात होतं, पण मुहूर्त काही लागला नाही. ३ वर्षांपूर्वी एका पुस्तकाच्या दुकानात मंटो आणि अमृता शेर गिल ही मराठीत अनुवाद केलेली पुस्तकं हातात आली. रमेशचंद्र पाटकर सरांनी अनुवादीत केली होती. कलेचा इतिहास आणि संशोधन यात पाटकर सरांचा मोलाचा वाटा आहे.

अमृता आणि इंदिरा

अमृता आणि इंदिरा

मंटो वाचून झाला पण अमृता २ वर्षे तरी पुस्तकांच्या गठ्यातच राहिली. ऑगस्ट २०१९ ला मुहूर्त लागला. पुस्तकातील अमृताची पत्र वाचत असताना अमृता डोळ्यासमोर उभी राहायला लागली. ज्येष्ठ इतिहास संशोधक रमेशचंद्र पाटकर यांनी अमृताची काही निवडक पत्र या पुस्तकात अनुवादीत केली आहेत. ही पत्रं त्यांनी अमृताची बहिण इंदिरा हिच्या मुलाने चित्रकार वीवान सुंदरम यांनी प्रकाशित केलेल्या पुस्तकातील आहेत. या पत्रांबरोबर अमृताने लिहिलेले काही लेखही त्यांनी अनुवादीत केले आहेत. हे सर्व वाचत असताना अमृताचे विचार समजत गेले. तिच्या पत्रातून तिचा स्वभाव, तिची ठाम मतं समजायला लागली. पत्र वाचत असताना अमृताच स्वतः ती पत्र वाचू लागली तर? असे मनात आले. अमृताची पत्रं ती वाचेल आणि निवेदिका तिच्या बद्दल अधिक माहिती सांगेल आणि पत्रात असलेले संदर्भ स्पष्ट करेल असे काही मनात जुळत गेले.

सुधाकर चव्हाण सराना फोन करून माझ्या मनातील कल्पना ऐकवली. त्यांच्याकडं लेखकाचा फोन नंबर मिळेल असे वाटले. त्यांना कल्पना फारच आवडली. त्यांचा फोन ठेवल्या ठेवल्या लेखकाचा नंबर पुस्तकात मिळाला आणि अजिबात वेळ न दवडता त्यांना फोन केला. कल्पना सांगितली. अमृतासाठी कोणाचा तरी फोन आलाय याने ते खूपच खुश झाले. मी परवानगी मागण्या अगोदरच त्यांनी मला सर्व परवानगी दिली. आता विषय निर्मितीचा. मित्रांना फोन केला. बरीच वर्ष मी पुण्यातील महाराष्ट्र कल्चरल सेंटरशी बालनाट्यामुळे जोडला गेलो होतो. डोक्यात असलेला विषय, त्याचा खर्च सर्व तपशील तयार करून काही लोकांना पाठविला. एखादी निर्मिती नाट्य असो वा चित्रपट त्यासाठी एक आर्थिक बाजू असते. त्याचा शोध सुरू झाला. महाराष्ट्र कल्चरल सेंटरच्या शुभांगी दामले यांना विषय आवडला. त्यानंतर त्यांच्या कमिटीच्या सभासदांना विषय समजावून सांगितला आणि हे नाटक करायचे ठरले.

मला अमृता आताच्या काळात करावीशी वाटली याचं कारण आजची असणारी सामाजिक आणि राजकीय परिस्थिती. आजच्या काळात अमृता असती, तर ती आताच्या सत्ताधाऱ्यांना नक्कीच झेपली नसती. अमृताचे त्या काळात असलेल्या परिस्थितीवर बिनधास्त बोलणे असो अथवा समलिंगी संबंधावर बोलणे असो किंवा समकालीन चित्रकेलवर टीका करणं असो. सगळं अगदी बिनधास्त होतं. कशालाही न घाबरता ती मुक्तपणे चित्र काढत होती आणि आपली मतं ठामपणे मांडत होती. अमृता मला जी काही समजू शकली असेल, ती केवळ तिने लिहिलेल्या पत्रांमुळे. तिने लिहिलेल्या लेखांमुळे.

एका बाजूला त्याबाबत पुस्तकातील पत्र आणि माहिती यांची बांधणी सुरू केली होतीच. नेहमी दिग्दर्शन करतानाl मला कलाकाराची निवड ही महत्त्वाची बाजू वाटत आली. त्या त्या भूमिकेसाठी तसा कलाकार मुळात मिळणं आवश्यक असतं. कधी कलाकार तसा दिसतो किंवा त्याच्या कुठल्या ना कुठल्या हालचालीत तो असतो. मला अमृता शेर गिल सारखी दिसणारी २५ वर्षांची असलेली मुलगी हवी होती. दोन तीन कलाकार मनात होते पण कोणाची वेळ जुळत नव्हती, तर कोणाला याचे सादरीकरण कसे होईल याची खात्री नव्हती. हे सर्व सुरू असताना दिल्लीला विवान सुंदरम यांना जावून भेटायचे ठरले. अमृताची मॉडर्न आर्ट गॅलरीत असलेली पेंटींग हवी होती. त्याचे फोटो काढून आणायचे होते. २-३ दिवस दिल्लीत राहून तिथल्या ग्रंथालयात जाऊन रोज अभ्यास सुरू झाला. अखेर विवानने वेळ दिली, थोड्या वेळासाठी. विवानच्या मणक्याची सर्जरी होवून ३-४ महिनेच झाले होते, त्यामुळं त्यांना जास्त वेळ एका जागी बसता येत नव्हते. त्यांच्या दिल्लीतील घरी गेलो. रमेशचंद्र पाटकर यांच्या सोसायटीचे नाव शांति निकेतन, तसंच विवान यांच्या बंगल्याचे नावही शांती निकेतन. हे आणि अमृता वरचं प्रेम, हे साम्य आम्हाला जवळ आणत गेलं असावं. असो, तर भेट ठरली घर शोधत एकदाचा पोचलो…आणि दारातून आत गेल्या गेल्या समोर अमृताची मूळ चित्र भिंतीवर पाहून विवान यांना विसरून ती चित्र जवळ जाऊन पाहून घेतली. आपली आवडती गोष्ट दिसावी आणि मन भरून ती पाहून घ्यावी, साठवावी. तसे झाले. मनाच्या हार्ड डिस्कमध्ये तिला बंदिस्त करून टाकले. विवान म्हणाले, आमच्याकडे आलेल्या लोकांमध्ये तू पहिलाच आहेस जो चित्र पहायला गेला. खूप भारी वाटलं, मूळ चित्र पाहून. अमृता, चहा आणि आम्ही दोघं…अशा गप्पा होत होत २ तास ३ चहा कधी झाले कळलेच नाही. विवानकडे जायच्या आदल्या दिवशी अमृताची माहिती सांगणाऱ्या निवेदिकेची जागा प्रवासात तिच्या बहिणीने घेतली होती, हा विचार रमेशचंद्र पाटकर सराना फोन करून सांगितला, त्यांना खूपच आवडला. तशीच प्रतिक्रिया विवानकडून मिळाली. इंदिरा! अमृताची धाकटी बहीण आणि विवानची आई. आता कुठं नाटकातील पात्र ठरली.

अमृता अगोदर इंदूसाठी कलाकार मिळाली होती. अमृता पटवर्धन. अजून अमृता काही नक्की होत नव्हती. ‘जम्बा बंबा बु’ या बालनाट्यामध्ये मी ऋचा आपटेला पाहिलं होतं. ती डोळ्यासमोर आली आणि फायनल झाली. ती तशी दिसत नाही, पण काहीतरी अमृताच्या जवळ जाणारं तिच्यात दिसलं. या पत्र नाट्यात पाठांतर जरा जास्तच आहे. दोन तासात सर्व पत्रं घेणं शक्य होत नव्हत. मग काही पत्रं इच्छा नसताना गाळावी लागली. अमृता, तिचे विचार, तिची ठाम मतं आणि तिची चित्रं यात ठेवायचा प्रयत्न केला. अनेक दिवस यासाठी तासंतास तालमी केल्या. राज सांडभोरने नेपथ्य, वैशाली ओकने वेशभुषा, आशिष देशपांडेने रंगभूषा, प्रफुल्ल दीक्षितने प्रकाश योजना, चैतन्य आडकरने संगीत आणि शुभांगी दामले यांनी सूत्रधार या भूमिका चोख बजावल्या. आणि अखेर अमृता शेर गिल उभी राहिली तिच्या चित्रातून आणि तिने लिहिलेल्या पत्रातून.

अमृताच्या स्मृती दिनाच्या दिवशी ५ डिसेंबरला जे. जे. स्कूल ऑफ आर्ट मुंबई येथे पहिला शुभारंभाचा प्रयोग करायचे ठरले, हे अगदी मनात विचार आला तेंव्हाच. आणि तसे घडलेही… पहिला प्रयोग झाला आणि त्यानंतर १५ वा प्रयोग कधी झाला कळलेच नाही.

कला महाविद्यालयामधील अनेक विद्यार्थांना अमृता दाखवता आली याचा आनंद नक्कीच आहे. आता मराठीतून समोर आणलेली अमृता हिंदीत उभी करतो आहे. तिला भारतभर न्यायचं आहे. पुन्हा एकदा शोध सुरू झाला आहेच.

शेखर नाईक, हे नाट्य-चित्रपट दिग्दर्शक आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0