काँग्रेसला जूनमध्ये नवा अध्यक्ष मिळणार

काँग्रेसला जूनमध्ये नवा अध्यक्ष मिळणार

नवी दिल्लीः पक्षाला कायमस्वरुपी नेतृत्व हवे अशी मागणी करणार्या काँग्रेसमधील २३ असंतुष्ट नेत्यांच्या दबावानंतर काँग्रेस कार्यकारिणी समितीने पक्षाचा नवा अध्यक्ष येत्या जूनमध्ये निवडण्यात येईल, तर पक्षांतर्गत निवडणुका मे महिन्यात होतील, अशी घोषणा शुक्रवारी केली. या कार्यकारिणीत काँग्रेसमध्ये दोन गट असल्याचे दिसून आले.

काँग्रेसचा नवा अध्यक्ष पाच राज्यातल्या विधानसभा निवडणुकांनंतर दिसणार आहे.

शुक्रवारी काँग्रेस कार्यकारिणीची बैठक सुमारे तीन तासाहून अधिक काळ सुरू होती. या बैठकीत काँग्रेसमधील दोन गट आक्रमक झालेले दिसून आले.

शुक्रवारच्या बैठकीत शेतकर्यांच्या आंदोलनावरही विचारविनिमय झाला, असे पक्षाचे सरचिटणीस (संघटन) के.सी. वेणुगोपाल यांनी सांगितले.

पक्षातील काही सूत्रांनी द वायरला सांगितले की, शुक्रवारच्या बैठकीत पक्षांतर्गत निवडणुका घेण्याचा निर्णय कार्यकारिणीच्या बैठकीत सतत लावून धरल्याने चर्चिला गेला. त्याचवेळी गांधी घराण्याशी एकनिष्ठ असलेल्या नेत्यांनी पक्षांतर्गत निवडणुकांपेक्षा आगामी विधानसभा निवडणुकांवर चर्चा असावी असा प्रयत्न करून पाहिला. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी पक्षांतर्गत निवडणुका व्हाव्यात असे मत मांडले. आता सर्वांनी पुढे जावे असे ते म्हणाल्याचे एनडीटीव्हीने आपल्या वृत्तात म्हटले आहे.

या बैठकीत गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा, मुकुल वासनिक व पी. चिदंबरम या नेत्यांनी संघटनात्मक निवडणुकांवर भर दिला. पक्षांतर्गत निवडणुका तातडीने घेतल्या जाव्यात असे मत या नेत्यांनी आग्रहाने मांडले.

पण या वेळी अशोक गेहलोत, ए.के. अँटनी, तारिक अन्वर व ओमन चंडी या गांधी घराणे समर्थकांनी पक्षांतर्गत निवडणुका पाच राज्यातल्या विधानसभा निवडणुका झाल्यानंतर मे नंतर घेतल्या जाव्यात असे मत मांडले.

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार गांधी समर्थक एका नेत्याने आपण अंतर्गत निवडणुका कोणाच्या अजेंड्यावर घेत आहोत असा प्रश्न विचारला. भाजप त्यांच्या पक्षांतर्गत निवडणुका घेत नाही व ते हा मुद्दाही मांडत नाही. आपले प्राधान्य अंतर्गत निवडणुकांपेक्षा आगामी विधानसभा निवडणुका लढवण्यावर हवे, असे मत या नेत्याने मांडले.

अखेर विधानसभा निवडणुकांवर परिणाम होऊ नये म्हणून मे अखेर पक्षांतर्गत निवडणुका घेण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.

बैठकीत कोणते मुद्दे चर्चिले गेले?

पक्ष कार्यकारिणीच्या बैठकीत शेतकरी आंदोलन आणि रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी व बार्कचे सीईओ पार्थो दासगुप्ता यांच्यातील उघडकीस आलेले व्हॉट्सअप संभाषण यावरही चर्चा झाली. या चर्चेच्या अखेरीस तीन प्रस्ताव संमत करण्यात आले.

CWC ने पारित केलेले तीन प्रस्ताव

या प्रस्तावाबाबत वेणुगोपाल म्हणाले की, मोदी सरकारने तीन शेतकरी कायदे मागे घ्यावेत म्हणून पक्षाने वरून खालीपर्यंत प्रत्यक्ष कृती कार्यक्रम आखला आहे. या कार्यक्रमांतर्गत शेतकरी संघटनांच्या नेत्यांशी चर्चा केली जाणार आहे. २८ फेब्रुवारीपर्यंत पक्षाकडून राज्य व जिल्हावार निदर्शने, आंदोलने केली जाणार आहेत. फेब्रुवारीत होणार्या संसदेच्या अधिवेशनात काँग्रेस, समविचारी पक्षांशी चर्चा करून संसदेत या कायद्यांविरोधात आवाज उठवणार आहे.

काँग्रेसने अर्णव गोस्वामी प्रकरणाचा तपास करण्यासाठी संयुक्त संसदीय समितीही नेमण्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. देशाच्या सुरक्षेसंदर्भात गोस्वामी यांचे वर्तन आक्षेपार्ह असून गोपनीय कायद्याचा भंग त्यांच्याकडून झाल्याचे या प्रस्तावात म्हटले आहे. त्यांची चौकशी झालीच पाहिजे अशी मागणी पक्षाने केली आहे.

मूळ बातमी

COMMENTS