भाजप, मोदीविरोधी गाणी लिहिली म्हणून अटक

भाजप, मोदीविरोधी गाणी लिहिली म्हणून अटक

मुंबईः भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय विधानांचे वा त्यांच्या धोरणांचे विडंबन करणारी गाणी ही कबीर कला मंचाच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यामागील एक पुरावा म्हणून तो मुंबई उच्च न्यायालयात राष्ट्रीय तपास यंत्रणेचा (एनआयए) सादर केला आहे. कबीर कला मंचाचे सदस्य व कार्यकर्ते सागर गोरखे (३२), रमेश गायचोर (३८) यांच्या जामीन अर्जाला आव्हान म्हणून एनआयएने कबीर कलामंचांची गाणी ही भाजपच्या धोरणांविरोधात व मोदी विरोधात आहेत, असा युक्तिवाद केला आहे.

मराठीत असलेल्या या गाण्यांचा अनुवाद एनआयएने केला असून या गाण्यातून मोदींची टिंगल केली जात असून गोरक्षकांवर भाष्य केले जात आहे. शिवाय त्यात भाजपचा राम मंदिराचा राजकीय अजेंडा व ब्राह्मणीकरण यावर टीका केल्याचे एनआयएचे म्हणणे आहे.

‘माझे नाव भक्तेंद्र मोदी आहे. माझे भाषण साधे असते, मी साधा राहतो, माझा कोट लाखातला एक आहे, हे कोण आहे रे तिकडे? विरोधकांकडे लक्ष देऊ नका.. तर माझे भाषण साधेसुधे असते, मी साधा राहतो, पण माझ्यामागे कुणी लागले तर तो दिसणार नाही हे नक्की.. ’ असा या एका गाण्याचा अनुवाद एनआयएने केला आहे.

आणखी एका गाण्यांमध्ये मोदींच्या मन की बात या रेडिओ कार्यक्रमावर टीका आहे. यात हे कलावंत मोदींच्या पाठिराख्यांना सांगतात, ‘तहान लागल्यावर गोमूत्र प्या व भूक लागल्यावर शेण खा.. शाकाहारी राहा, शाकाहार हा उत्तम आहार आहे. अच्छे दिन तुम्हाला लवकरच दिसणार आहेत, अच्छे दिन अच्छे दिन..’ आणि हे गाणं संपते.

ही गाणी मराठीत आहेत व त्यांचे भाषांतर एनआयएने न्यायालयात सादर केले आहे  पण कबीर कला मंचांची मूळ मराठीतील गाणी व त्यांचा अर्थ एनआयएच्या भाषांतरात पुरेपुर आला आहे की नाही, याची पुष्टी ‘द वायर’ला करता आलेली नाही.

कबीर कला मंच हा सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत एक ग्रुप असून याने पूर्वी काँग्रेस सरकारच्या धोरणावरही टीका केली आहे.

या गाण्यांव्यतिरिक्त एनआयएने २०११ व २०१२ या सालांमधील काही पुरावेही न्यायालयात सादर केले आहेत. या दोन वर्षांच्या काळात कबीर कला मंचांचे कार्यकर्ते नक्षलवादी नेते मिलिंद तेलतुंबडेंच्या संपर्कात होते असा आरोप केला आहे.

वास्तविक हा आरोप गोरखे व गायचोर यांच्यावर दाखल झालेल्या आणखी एका आरोपपत्रात नमूद केला आहे.

या संदर्भातल्या खटल्यात महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने या दोघांना ताब्यात घेतले होते व हे दोघे २०१३ ते २०१७ अशी ४ वर्षे तुरुंगात होते. या खटल्याची सुनावणी अद्याप सुरू व्हायची आहे. या दोघांवर पोलिसांनी गडचिरोलीच्या जंगलात शस्त्रास्त्र प्रशिक्षण व कट रचला असे आरोप लावले होते. या आरोपाला पुरावा म्हणून पोलिसांनी एका साक्षीदाराचा जबाब न्यायालयाला सादर केला होता. गोरखे व गायचोर हे मिलिंद तेलतुंबडे यांना भेटले होते व त्यांनी नागरी भागात नक्षलवाद पसरवण्याचा कट रचला असा दावा साक्षीदाराने पोलिसांकडे केला होता.

गेल्या ७ सप्टेंबरला एल्गार परिषदेच्या प्रकरणात या दोघांना एनआयएने अटक केली. आपल्याला एनआयएकडून अटक होणार ही शक्यता व्यक्त करणारा एक व्हीडिओ या दोघांनी अगोदरच प्रसिद्ध केला होता.

या व्हीडिओत “एनआयएने दीड महिन्यांपूर्वी चौकशीला बोलावण्यात आले होते. आम्हाला जी माहिती होती, ती आम्ही दिली. तुमचे नक्षलवाद्यांशी संबंध आहेत, हे कबूल करा, तुम्हाला सोडून देऊ अन्यथा तुम्हाला अटक करू,” असे गोरखे आणि गायचोर यांनी म्हटले होते.

पण एनआयएने या व्हीडिओतील आरोप खोडून काढत आरोपींचा नेहमीचा हा दावा असल्याचा युक्तिवाद केला होता.

मूळ बातमी

COMMENTS