हुकुमशाहीच्या वाटेवरची बनावट देशभक्ती…!

हुकुमशाहीच्या वाटेवरची बनावट देशभक्ती…!

मोदी सरकार हे जाहिरातबाजीचे सरकार आहे, हे काही लपून राहिले नाही. त्यामुळे ‘हर घर तिरंगा’ उपक्रमाची जाहिरात मोठ्या धुमधडाक्यात होत आहे; परंतु देशभक्ती सिद्ध करण्याची ही पद्धत चुकीची आहे.

दिवस-रात्रीही तिरंगा फडकवण्याची परवानगी
‘घरोघरी तिरंगा’मुळे देश जात-धर्म विसरून एक झालाः मुख्यमंत्री
‘हर मन संविधान’ सर्वात महत्त्वाचे

‘हर घर तिरंगा’ हा उपक्रम स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शक्कल आहे, जिने पूर्ण व्यवस्थेला आणि व्यवस्थेतील प्रत्येक व्यक्तिला कामाला लावले आहे. शासन आणि प्रशासन एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्या तरी यात शासन सरस ठरते कारण निर्णय घेण्याची ‘पॉवर’ त्यांच्याकडे असते. प्रशासन फक्त त्या निर्णयाची अंमलबजावणी करत असतो. त्यामुळे आता शासनाचा भाग असलेले मोदी यांनी प्रत्येक घरावर आपला राष्ट्रध्वज फडकवण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्यांच्या याच निर्णयामुळे सरकारी कार्यालय, मंडळे, संस्था आदी झेंडा विक्रीचे काम करत आहेत.

आपले आपल्या देशावर खरोखर प्रेम आहे हे सिद्ध करण्याची खरंच गरज आहे का? आपण या उपक्रमात सहभागी होणे गैर नाही पण त्यामुळे पूर्ण व्यवस्थेला वेठीस धरणे योग्य नाही. काही सरकारी कार्यालयात कर्मचाऱ्यांच्या पगारातून पैसे कपात करून झेंडे खरेदी केले आहे. हे ही आपण ठीकच मानलं तरी अशी जबरदस्तीची देशभक्ती सिद्ध करून आपण कुठलाही पराक्रम करणार नाही आहोत. याउलट अशा उपक्रमाने त्या गोष्टीचे महत्त्व आपण नक्कीच कमी करणार आहोत. यात स्वातंत्र्याचे महत्त्व तिळमात्रही कमी होणार नाही परंतु झेंडा फडकवण्याचे जे नियम आहेत त्याची काटेकोर अंमलबजावणी सर्वसामान्य नागरिकाकडून होणार नाही आणि असे झाले नाही तर राष्ट्रध्वजाचा अपमान होईल.

राष्ट्रध्वजाचा अपमान म्हणजे देशाचा अपमान. ज्यांच्याकडून या चुका होतील त्या सर्वसामान्य नागरिकांचा हेतू मुळीच राष्ट्रध्वजाचा अपमान करण्याचा नसेल; परंतु अप्रत्यक्षरित्या या गोष्टी घडून येतील आणि त्याला कारणीभूत सर्वसामान्य नागरिकच ठरतील.

मोदी सरकार हे जाहिरातबाजीचे सरकार आहे, हे काही लपून राहिले नाही. त्यामुळे याही उपक्रमाची जाहिरात मोठ्या धुमधडाक्यात होत आहे; परंतु देशभक्ती सिद्ध करण्याची ही पद्धत चुकीची आहे. देशभक्ती ही देशासाठी असते. देश म्हणजे देशातील जनता आणि जनतेच्या जीवनावर प्रभाव टाकणाऱ्या आजूबाजूच्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष गोष्टी. याच देशातील जनतेसाठी मोदी सरकारने काय केले, असा प्रश्न विचारला तर ठोस असं उत्तर आपल्याला सापडणार नाही. कारण सर्वसामान्य लोकांचे प्रश्न आहे त्याच ठिकाणी आहेत‌. उलट त्यात काही अंशी वाढ झाली आहे. प्रत्येक घरावर तिरंगा फडकवण्याचा हुकूमच राजाने काढला आहे परंतु या राजाने प्रत्येकाला घर देण्याचे आश्वासन दिले होते पण ते आश्वासन फक्त दिवा स्वप्नच ठरले. मोदी सरकारने प्रधानमंत्री आवास योजना हा उपक्रम सुरू केला आणि त्यात २०२२ पर्यंत सगळ्यांना घर मिळतील असे सांगितले पण तसं होताना दिसत नाही. उलट यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो, हे उघडच आहे. जी व्यक्ती घर मिळवण्यासाठी पैसे देते अशांची नावे मंजूर होताना दिसतात. याविरुद्ध स्थानिक पातळीवर उपोषणे होतात पण त्याचा काहीच प्रभाव पडत नाही. उलट उपोषण कर्त्यालाच त्रास सहन करावा लागतो. अशा परिस्थितीत जर लोकांना घरच नसेल तर ‘हर घर तिरंगा’ हा उपक्रम राबवून काहीच फायदा होणार नाही. उलट जबरदस्ती देशभक्तीचा डोस पाजल्याचा हा प्रकार होऊन जाईल. याउलट सर्वसामान्य नागरिकांना घरे देऊन हा उपक्रम राबविला असता तर लोकांनी या उपक्रमाला स्वयंप्रेरणेतून राबविले असते आणि अभूतपूर्व असा यशस्वी करून दाखविला असता. आताही तो यशस्वी करण्यासाठी पूर्ण यंत्रणा कामाला लागली आहे पण सर्वसामान्य नागरिक यापासून अलिप्तच पाहायला मिळत आहेत.

मुख्य विषयापासून जनतेचे लक्ष भरकटविण्यासाठी असे उपक्रम पुढे केले जातात आणि यात नरेंद्र मोदी मोठे हुशार आहेत. देशप्रेम म्हणजे देशातील लोकांचे हित साधने होय परंतु मोदी हे लोकांचे हित साधण्यात सपशेल अपयशी ठरले आहेत. त्यामुळे मोदी यांची देशभक्ती बनावट आणि खोटी आहे, हे वाक्य त्यांच्या कृतीला साजेसे ठरते. मोदी सरकारने अभूतपूर्व अशी जीएसटी आकारणी केली आहे आणि करत आहेत त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसाठी वस्तू आणि सेवा बऱ्याच महाग झाल्या आहेत. महागाई मोदी सरकारच्या काळात मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. अर्थव्यवस्थेचे दिवाळे निघत आहे आणि उद्योगदंदे दिवाळखोर होत आहेत. याला कारणीभूत मोदी सरकार आणि त्यांची आर्थिक धोरणे आहेत. महागाईचा थेट फटका फक्त सर्वसामान्य नागरिकांना बसतो. याउलट शासन आणि प्रशासनात गुंतलेल्या माणसांना वाढलेल्या महागाईनुसार महागाई भत्ता मिळतो. असा महागाई भत्ता मोदी सरकार ‘सर घर’ देईल का? पेट्रोल मोठ्या प्रमाणात वाढले परंतु जनता शांतच आहे ? तेल, डाळी, इतर खाद्यपदार्थ महागले तरी जनता शांतच आहे ? जीएसटीचे दर वाढविले तरी जनता शांतच आहे ? बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे तरी जनता शांतच आहे ? त्यामुळे जनतेला हे सर्व परवडते असा समज किंवा गैरसमज मोदी सरकारने करू नये. नाहीतर नाकात तोंडात पाणी गेल्यावर आपल्या देशात सुद्धा श्रीलंकेसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते. अशी परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. ही पावले कधी उचलली जातात हे बघणे महत्त्वाचे ठरेल.

‘हर घर तिरंगा’ याआधी सर्वसामान्यांचे जगणे सुकर करणे हे सरकारचे महत्त्वाचे काम आहे आणि त्यांनी यासाठी योग्य ती कृती करायला पाहिजे. लोक जगले तर देश जगेल आणि देश जगला तेव्हाच तर आपण देशभक्ती मोठ्या थाटामाटात साजरी करू.

‘हर घर तिरंगा’ या उपक्रमातून मोदींनी सगळ्यांचे लक्ष त्यांच्यावर केंद्रित करून घेतले आहे आणि प्रत्येक व्यक्तीच्या चर्चेचा केंद्रबिंदू मोदी ठरत आहेत. कोणी त्यांच्या बाजूने तर कोणी त्यांच्या विरोधात बोलत आहे परंतु जनता त्यांच्या विषयीच बोलत आहेत. त्यामुळे जनतेचे लक्ष स्वतःकडे ओढून घेण्यात मोदी यशस्वी ठरले आहेत. त्यामुळे इतर राजकीय नेत्यांच्या तुलनेत मोदी हे उजवे ठरतात.

शेवटी…जाता जाता… जनतेला कोणत्या ना कोणत्या उपक्रमात गुंतवून ठेवले म्हणजे इतर गोष्टींकडे त्यांचे लक्ष जात नाही, जाऊ दिले जात नाही. पडद्यामागच्या महाभारताला काहीच महत्त्व नसते. पडद्यावर जे दिसते तेच जनतेला महत्त्वाचे वाटते. त्यामुळे पडद्यावर देशभक्तीसाठी ‘हर घर तिरंगा’ दाखविला जातो आणि पडद्यामागे विरोधकांना संपवण्याचा प्रयत्नपूर्वक कट शिजत राहतो. विरोधक संपले म्हणजे विरोध करायला कोणीच उरणार नाही आणि या लोकशाहीत विरोधक नसतील तेव्हा तिथे हुकूमशाहीचा उदय होत असतो. आपण हुकूमशाही तर वाटचाल करत नाही आहोत ना, या प्रश्नाचे उत्तर शोधणे गरजेचे आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0