मुंबई: एएनएम (ऑक्सिलरी नर्सिंग मिडवाइफरी) म्हणजेच सहायक नर्सिंग मिडवाइफरी आणि जीएनएम (जनरल नर्सिंग मिडवाइफरी) या अभ्यासक्रमांसाठी यंदा सीईटी (सामायिक
मुंबई: एएनएम (ऑक्सिलरी नर्सिंग मिडवाइफरी) म्हणजेच सहायक नर्सिंग मिडवाइफरी आणि जीएनएम (जनरल नर्सिंग मिडवाइफरी) या अभ्यासक्रमांसाठी यंदा सीईटी (सामायिक प्रवेश परीक्षा) घेण्यात येणार नसल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाची आढावा बैठक मंत्रालयात वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या वेळी देशमुख म्हणाले की, यापूर्वी एएनएम आणि जीएनएमच्या प्रवेशप्रक्रिया या सीईटीच्या गुणांवर आधारित करण्यात येत होत्या. मात्र या वर्षापासून या अभ्यासक्रमासाठी प्रवेशप्रक्रिया ही बारावीच्या गुणांवर आधारीत असेल. कोविडसारख्या महामारीच्या काळात देशासह राज्याला वैद्यकीय डॉक्टर यांच्याबरोबरच नर्स, पॅरामेडिकल स्टाफ, आरोग्य कर्मचारी यांचे महत्त्व दिसून आले. येणाऱ्या काळात शासकीय आणि खाजगी रुग्णालयात सेवा देणाऱ्या परिचारिकांना किमान समान वेतन मिळते आहे का याबाबतची पाहणीही महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाने करणे गरजेचे असल्याचे देशमुख यांनी सांगितले.
देशमुख पुढे म्हणाले की, किती रुग्णांमागे एक डॉक्टर असावा हे जसे निश्चित करण्यात आले आहे तसेच किती रुग्णांसाठी परिचारिका असाव्यात हे सुद्धा स्पष्ट करण्यात आले आहे. डॉक्टरांबरोबरच परिचारिका सुद्धा रुग्ण बरा होण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असतात. इतर राज्यात याबाबत काय परिस्थिती आहे अभ्यास करून याबाबतचा अहवाल तयार करावा अशा सूचनाही देशमुख यांनी यावेळी केल्या.
वैद्यकीय क्षेत्र हे असे एकमेव क्षेत्र आहे की या क्षेत्राची गरज प्रत्येक ठिकाणी लागते. कोविडनंतर आपल्या सर्वांना वैद्यकीय क्षेत्राचे महत्त्व समजून आले आहे. आज शाळांमध्ये सुद्धा परिचारिका असणे आवश्यक आहे. कारखाने, विमानतळ, सार्वजनिक वाहतूक यासारख्या ठिकाणी तत्काळ उपचारांसाठी परिचारिका असणे आवश्यक आहे. आगामी काळात परिचारिकांसाठी नवनवीन नोकरीच्या संधी कशा उपलब्ध होऊ शकेल, तसेच नवे अभ्यासक्रम याबाबतही नियोजन करण्यात यावे, अशा सूचना देशमुख यांनी दिल्या.
COMMENTS