राम मंदिर ट्रस्टची स्वतःलाच ‘क्लिन चीट’

राम मंदिर ट्रस्टची स्वतःलाच ‘क्लिन चीट’

नवी दिल्लीः अयोध्येतील राम मंदिराच्या लगतच्या जमीन खरेदी प्रकरणातल्या भ्रष्टाचार व फसवणुकीच्या आरोपातून श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने स्वतःच

तामिळनाडूत पीएम किसान योजनेत ११० कोटींचा घोटाळा
इस्रायल-पॅलेस्टाइन संघर्षः साम्राज्यवादाचे अपत्य
सीपीएम नेत्या शैलजा टीचर यांनी मॅगसेसे पुरस्कार नाकारला

नवी दिल्लीः अयोध्येतील राम मंदिराच्या लगतच्या जमीन खरेदी प्रकरणातल्या भ्रष्टाचार व फसवणुकीच्या आरोपातून श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने स्वतःच्या सदस्यांना ‘क्लिन चीट’ दिली आहे.

इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार ट्रस्टच्या सदस्यांनी जी जमीन खरेदी केली होती, त्या खरेदीच्या व्यवहारात कोणताही भ्रष्टाचार व अनियमितता दिसून आलेली नाही, असे सर्व ट्रस्ट सदस्यांचे मत बनल्याचा दावा केला.

या संदर्भात ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंद देव गिरी यांनी सांगितले की, कथित जमीन घोटाळ्यासंबंधित प्रश्नांची उत्तरे आम्हाला मीडियाला द्यायची नसून ती संबंधित सरकारी अधिकार्यांना द्यायची आहेत. या जमीन व्यवहारात संपूर्णपणे पारदर्शकता व प्रामाणिकपणा ट्रस्टने दाखवला असून गेले तीन दिवस वकील, लेखापाल व सीए यांच्या मदतीने संपूर्ण व्यवहाराची तपासणी केल्या नंतर ट्रस्टच्या लक्षात आले की, जमीन खरेदीत कोणताही आर्थिक स्वरुपाचा भ्रष्टाचार झालेला नाही. सर्व व्यवहार कायदेशीर पार पडले आहेत.

गिरी पुढे म्हणाले, जमिनीचा व्यवहार बाजारमूल्यानुसार झाला आहे. हे मूल्य ना अधिक होते ना कमी होते. जे लोक या व्यवहारावर आक्षेप घेत आहेत, त्यांना जर ही जमीन कमी पैशात विकत मिळत असेल तर ती त्यांनी घ्यावी. आणि आम्ही त्या भावाला पडेल ती जमीन त्यांच्याकडून विकत घेऊ असे गिरी यांनी सांगितले.

राम मंदिराच्या जमीन खरेदीवर जे कोणी आरोप करत आहेत, त्यांचे आरोप राजकीयदृष्ट्या प्रेरित असून ते मंदिर निर्माण कार्यात अडथळे आणत आहेत. ही मंडळी राष्ट्रभावना चिरडून टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचाही आरोप गिरी यांनी केला.

नेमके प्रकरण काय?

प्रस्तावित रामजन्मभूमीच्या जमिनीशी लगतचा एक भूखंड पुजारी हरीश पाठक व त्यांच्या पत्नीने १८ मार्च रोजी संध्याकाळी शाम सुल्तान अन्सारी व रवी मोहन या दोघांना २ कोटी रु.ना विकला. हा भूखंड त्याच दिवशी काही मिनिटांत राम मंदिर ट्रस्टचे सचिव चंपत राय यांनी ट्रस्टच्या वतीने १८ कोटी ५० लाख रु. देऊन खरेदी केला.

या तातडीने केलेल्या खरेदी-विक्री प्रकरणावर समाजवादी पार्टी व आम आदमी पार्टीने संशय व्यक्त केला होता. समाजवादी पक्षाचे एक आमदार पवन पांडेय यांनी चंपत राय यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करत कोणत्या कारणाने या भूखंडाची किंमत वाढली याचे उत्तर द्यावे असे आव्हान दिले होते. या भूखंडामध्ये सोने पिकत आहे का, असा प्रश्न करत ज्या जमिनीचा सौदा २ कोटी रु.चा झाला त्या जमिनीची किंमत केवळ १० मिनिटात १८ कोटी ५० लाख रु. कशी झाली असा सवाल त्यांनी केला होता.

आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंह यांनीही ५ मिनिटांत जमीन १६ कोटी ५० लाख रु.ने कशी वाढली, हा विश्वविक्रम असल्याचा दावा केला होता. रवि मोहन तिवारी व सुल्तान अन्सारी यांच्याकडून १८ कोटी ५० लाख रु.च्या जमिनीचा दर प्रती सेंकद ५ लाख ५० हजार रु.ने वाढला कसा, अशी वाढ भारतातच काय तर जगातही कुठे या पूर्वी दिसून आली नाही, अशीही टीका त्यांनी केली होती.

या जमीन व्यवहाराची कागदपत्रे प्रसार माध्यमांपुढे प्रसिद्ध करण्यात आली. त्यानुसार जी जमीन रवि मोहन तिवारी व सुल्तान अन्सारी यांनी पुजारी कुटुंबाकडून २ कोटी रु.ला खरेदी केली होती, त्या जमीन व्यवहारावर साक्षीदार म्हणून राम मंदिर ट्रस्टमधील एक सदस्य अनिल मिश्रा व अयोध्याचे महापौर व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडित असलेले ऋषिकेश उपाध्याय यांच्या स्वाक्षर्या आहेत. हे दोघे काही मिनिटांनी १६ कोटी ५० लाख रु.चा व्यवहार झाल्याचेही साक्षीदार आहेत.

या एकूण जमीन व्यवहारात राम जन्मभूमी ट्रस्टचे सदस्यच साक्षीदार असतील तर ते या भ्रष्टाचारात सामील आहेत, असा आरोप समाजवादी पक्षाच्या पवन पांडेय यांनी केला होता.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0