एक नव्हे, दोन नव्हे तीनदा ‘परफेक्ट १०’

एक नव्हे, दोन नव्हे तीनदा ‘परफेक्ट १०’

मॉन्ट्रीयल ऑलिम्पिक. ४५ वर्षे लोटली. रुमानियाची नादिया कोमानिच नावाची एक छोटी, चुणचुणीत बाहुली जिम्नॅस्टिक्स कोर्टवर अवतरली होती. उंची पाच फूटही नाही.

जनतेच्या नव्हे, मोदींच्या ट्विटमुळे पुरस्काराचे नाव बदलले
महेंद्रसिंग धोनीः कल्पक कप्तान, ‘ग्रेट फिनिशर’
लॉर्डस् कसोटी: भारताचा “न भूतो न भविष्यति” विजय….

मॉन्ट्रीयल ऑलिम्पिक. ४५ वर्षे लोटली. रुमानियाची नादिया कोमानिच नावाची एक छोटी, चुणचुणीत बाहुली जिम्नॅस्टिक्स कोर्टवर अवतरली होती. उंची पाच फूटही नाही. वय वर्षे १४. ओल्गा कॉर्बुट, लुदमिला तुरेशेवा या जिम्नॅस्टिक्स कोर्टवरच्या दोन सम्राज्ञी होत्या. त्या दोघीही जिम्नॅस्टिक्सच्या परिसीमेवर उभ्या होत्या. ९.९० गुणांची लयलूट करायच्या. नादियाने त्यांचा नक्षा उतरविला. परिपूर्ण १० गुणांची सर्वप्रथम नोंद करून. त्यावेळी स्कोअरबोर्डलाही सवय नव्हती, संपूर्ण १० गुण देण्याची. त्यामुळे बोर्डवर फक्त १.०० अंकच झळकला. एकदा नोंदविलेला १० गुणांचा चमत्कार पुन्हा पुन्हा झाला आणि जिम्नॅस्टीक्स या खेळाची परिसीमा, व्याप्ती गुणांच्या बाबतीत तरी परिपूर्ण झाली.

तब्बल ४५ वर्षांनी, टोकियो ऑलिम्पिक तरण तलावावर १४ वर्षीय एक जलपरी अवतरली. महिलांच्या १० मीटर्स प्लॅटफॉर्म डायव्हिंग फायनलमध्ये तिने परफेक्ट १० गुणांची एक दोनदा नव्हे तर तब्बल तीनदा नोंद केली. पहिलीच आंतरराष्ट्रीय स्पर्धा. तरीही मातब्बर खेळाडूंसोबत स्पर्धा करत तिने सुवर्णपदक पटकाविले. क्वॉन हाँगचॅन ही एका रात्रीत प्रसिद्ध झाली. चीनच्या फू मिंगसीयाने १९९२च्या बार्सिलोना ऑलिम्पिकमध्ये याच डायव्हिंग प्रकारात सुवर्णपदक पटकाविले होते; त्यावेळी तिचे वय होते अवघे १३.

हाँगचॅनही तशीच, छोटीशी, निरागस जलपरी. वयाच्या ६व्या वर्षी आईवडिलांनी तिला तरणतलावात सोडले. चीनच्या दिग्गज महिला जलतरणपटूंसोबत वावरताना किंचितही दडपणाखाली आली नाही. आई-वडिलांनी सांगितलेली गोष्ट लक्षात ठेवली होती. तुझ्याकडून कसलीही अपेक्षा नाही. पदकांची तर नाहीच नाही. तेव्हा निश्चिंत मनाने तरण तलावावर जा आणि “डाईव्हज्” मार. मला सर्वांनी सांगितले “रिलॅक्स” हो. काळजी करू नको.

हॉगचॅन म्हणते, मी कोणत्याही दडपणाखाली नव्हती. फक्त चीनबाहेर स्पर्धेत सहभागी झाली नव्हते. तेच दडपण होते. मात्र मला सर्वजण छोटी-छोटी म्हणून उचलून घेतात, ते आवडत नाही.

हॉगचॅन अभ्यासात एकदमच कच्ची आहे. ती स्वत:चे मान्य करते. मला काहीही प्रश्न विचारले की मी निरुत्तर, निर्विकार असते. भाऊ-बहिण तिला मोटारीतून आणण्या-नेण्याचे काम करतात. छोट्या बहिणीला ऑलिम्पिक चॅम्पियन झालेले त्यांना पाहायचे होते.

२०२४च्या पॅरिस ऑलिम्पिकच्या बाबतीत विचारले असता, ती म्हणते, मला खूपच मेहनत अजून करावी लागेल. पुढील ऑलिम्पिकचा मी विचारही करत नाही.

विनायक दळवी, हे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार असून त्यांनी अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे वार्तांकन केले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0