सीबीआय आणि ईडीच्या गैरवापरामागे पंतप्रधान नाहीत : ममता

सीबीआय आणि ईडीच्या गैरवापरामागे पंतप्रधान नाहीत : ममता

पश्चिम बंगाल विधानसभेत केंद्रीय तपास यंत्रणांच्या जबरदस्ती विरोधात ठराव मंजूर करताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या, की भाजप नेत्यांचा एक गट स्वतःच्या हितासाठी एजन्सींचा गैरवापर करत आहे. केंद्र सरकारचे कामकाज आणि त्यांच्या पक्षाचे हितसंबंध जुळणार नाहीत याची काळजी पंतप्रधानांनी घेतली पाहिजे.

‘सीबीआयची फिर्याद म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील हल्ला’ – लॉयर्स कलेक्टिव
प. बंगाल: ८ जणांचे हत्याकांड; २१ जण आरोपी
पश्चिम बंगालमधील हिंसाचाराची सीबीआय चौकशी होणार

कोलकाता: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी सांगितले, की राज्यातील केंद्रीय एजन्सींच्या कथित अतिरेकामागे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत असे त्यांना वाटत नाही.

२०१४ पासून नरेंद्र मोदी सरकारवर तीव्र टीका करणाऱ्या बॅनर्जी यांनी आरोप केला की भारतीय जनता पार्टी (भाजप)मधील नेत्यांचा एक गट स्वतःच्या हितासाठी या एजन्सींचा गैरवापर करत आहे.

केंद्रीय तपास यंत्रणांच्या जबरदस्ती विरोधात विधानसभेत मांडलेल्या ठरावावर बोलताना बॅनर्जी यांनी केंद्र सरकारचा अजेंडा आणि त्यांच्या पक्षाचे हितसंबंध जुळणार नाहीत याची काळजी घेण्याचे आवाहन पंतप्रधानांना केले.

भाजपने या ठरावाला विरोध केला, जो नंतर विधानसभेने मंजूर केला. सीबीआय आणि ईडीविरुद्धचा असा प्रस्ताव विधानसभेच्या नियमांच्या विरोधात असल्याचे भाजपने म्हटले आहे. प्रस्तावाच्या बाजूने १८९ तर विरोधात ६९ मते पडली.

एनडीटीव्हीनुसार, तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा बॅनर्जी म्हणाल्या, “सध्याचे केंद्र सरकार हुकूमशाही पद्धतीने वागत आहे. हा ठराव कोणाच्याही विशिष्ट विरोधात नसून, केंद्रीय यंत्रणांच्या पक्षपाती कारभाराविरुद्ध आहे.”

बॅनर्जी पुढे म्हणाल्या, “ईडी आणि सीबीआयकडून त्रास होत असल्याने व्यापारी देश सोडून जात आहेत. तुमच्यापैकी बहुतेकांना माहित नसेल की आता सीबीआय पंतप्रधान कार्यालयाला रिपोर्ट करत नाही. त्याची जबाबदारी गृह मंत्रालयाची आहे. भाजपचे काही नेते डावपेच आखत अनेकदा निजाम पॅलेसमध्ये जातात.”

राज्यातील भाजप नेत्यांचा संदर्भ देत बॅनर्जी यांनी आश्चर्य व्यक्त केले की ते सीबीआय अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यालयात का भेटतात.

बॅनर्जी म्हणाल्या, “सीबीआय आणि ईडीकडून विरोधी पक्षांच्या नेत्यांना अटक करण्यासाठी भाजप नेत्यांकडून दररोज धमक्या दिल्या जात आहेत. देशात केंद्रीय यंत्रणांनी अशा प्रकारे काम करावे का? यामागे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत असे मला वाटत नाही, पण भाजपचे काही नेते आहेत जे स्वतःच्या स्वार्थासाठी सीबीआय आणि ईडीचा गैरवापर करत आहेत.”

“पंतप्रधानांनी केंद्रीय एजन्सींच्या अतिरेकाकडे लक्ष द्यावे. केंद्र सरकारचे कामकाज आणि त्यांच्या पक्षाचे हितसंबंध जुळणार नाहीत याची काळजी पंतप्रधानांनी घेतली पाहिजे.”

विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी आणि भाजपचे इतर काही केंद्रीय नेते तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांना त्रास देण्याचा कट रचत असल्याचा आरोप करत बॅनर्जी यांनी, ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, अशा या लोकांना सीबीआय किंवा ईडी कधीही समन्स का काढत नाही, असा सवाल केला.

त्या म्हणाल्या, “आम्ही निवडून आलेले सरकार आहोत. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला सपशेल अपयश आले, याचा अर्थ ते केंद्रीय एजन्सी वापरून आणि निधी रोखून आमचा छळ करत राहतील असा होत नाही.”

यापूर्वी बॅनर्जी यांनी मोदी राजकीय विरोधकांवर कारवाई करण्यासाठी सीबीआय आणि ईडीचा वापर  करत असल्याचा आरोप केला होता.

सीबीआय आणि ईडी सारख्या केंद्रीय एजन्सी राज्यातील अनेक प्रकरणांची चौकशी करत आहेत ज्यात तृणमूल काँग्रेसचे अनेक वरिष्ठ नेते आरोपी आहेत.

विरोधी पक्षांनी टीएमसीला घेरले

बॅनर्जी यांच्या विधानानंतर, काँग्रेस आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया-मार्क्सवादी यांनी आरोप केला की तृणमूल काँग्रेस आणि भाजप यांच्यात समझौता झाल्याचा आरोप केला.

बॅनर्जींच्या टीकेवर प्रतिक्रिया देताना, प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अधीर रंजन चौधरी म्हणाले, “तृणमूल काँग्रेस आणि भाजप यांच्यातील समझौता उघड आहे. ही लढाई एखाद्या व्यक्तीविरुद्ध नाही, तर विचारधारेविरुद्ध आहे. तृणमूल काँग्रेस हा स्थापनेपासूनच विरोधी छावणीतील सर्वात कमकुवत दुवा आहे.”

माकपचे राज्य सचिव मोहम्मद सलीम म्हणाले, की विरोधी छावणीत खळबळ माजवणे, ही बॅनर्जींची जुनी युक्ती आहे. ते म्हणाले, “हे काही नवीन नाही. राज्यातील डाव्या आघाडीच्या सरकारच्या काळात तृणमूल काँग्रेसने केरळ सीपीआय(एम)ला बंगाल सीपीआय(एम) पेक्षा चांगले म्हणत अशीच रणनीती अवलंबण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तृणमूल काँग्रेस आणि भाजप यांच्यातील स्पष्ट समजूतदारपणा पुढे आला आहे.”

दुसरीकडे, शुभेंदू अधिकारी यांनी दावा केला, की मुख्यमंत्री बॅनर्जी पंतप्रधानांची प्रशंसा करून आणि पक्षाच्या अन्य नेत्यांवर आरोप करून भाजपमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0