‘द मिनिस्ट्री ऑफ अटमोस्ट हॅप्पीनेस’ ही अरुंधती रॉय यांची कादंबरी अलीकडेच वाचली. खरं तर प्रकाशित झाली, तेव्हापासून घेऊन ठेवली होती मात्र ती पडूनच होती.
‘द मिनिस्ट्री ऑफ अटमोस्ट हॅप्पीनेस’ ही अरुंधती रॉय यांची कादंबरी अलीकडेच वाचली. खरं तर प्रकाशित झाली, तेव्हापासून घेऊन ठेवली होती मात्र ती पडूनच होती. आता वाटतं, बरं झालं तेव्हाच न वाचता आता वाचली. कारण ५ ऑगस्ट २०१९ नंतर ती वाचल्यानं बरीच अधिक समजली.
दिल्लीतल्या एका मोहल्यात राहणाऱ्या टीन एजरला, त्याच्या लैंगिकतेबद्दल कळू लागतं आणि आपल्या स्त्री जाणिवांचा स्वीकार करत ट्रान्सवुमन (ज्याला मराठीत नेमका प्रतिशब्द नाही.) बनण्याकडे त्याचा प्रवास सुरू होतो. हा मुलगा- अंजुम नामक स्त्री अशी स्वत:ची नवीन लिंगभावी ओळख धारण करून वावरू लागतो. अंजुम एका कष्टकरी मुस्लीम कुटूंबातली असल्याने तिच्यासमोरच्या अनेकपदरी आव्हानांना सामोरी जात, ती तिचा अवकाश मिळवण्याचा प्रयत्न करते. इथपासून सुरू झालेलं कादंबरीचं कथानक इतकं फिरवून आणतं की किमान पन्नास-साठ तास तरी तुम्ही अस्वस्थ होऊ शकता. (सावधान, यातली काही चित्रं तुम्हाला त्रासदायकरित्या विचलित करू शकतात. अशा प्रकारचं डिस्क्लेमर देणं इथं खरोखरंच आवश्यक आहे.) त्यामुळे कादंबरीकर्तीला जे जे म्हणायचंय त्याच्याशी बौद्धिक, मानसिकरित्या भिडण्याची काहीएक पुर्वतयारी असल्याशिवाय कादंबरी वाचू नये.
अंजुमच्या स्त्री बनण्याच्या प्रवासापासून सुरू झालेली कथा काश्मीरमधली रोजचीच युद्धजन्य परिस्थिती, अहमदाबादमध्ये झालेली दंगल, ‘गुजरात के लल्ला’ सर्वशक्तीमानपदी विराजमान होण्यापुर्वी जंतर मंतरवर घड(व)लेलं जनआंदोलन, सैन्याचा क्रूर व्यवहार, सामान्य काश्मिरींचं जगणं, मकबूल भटच्या फाशीनंतर त्तकालीन विद्यार्थी- विद्यार्थी चळवळींत झालेली घुसळण, त्यांच्या राजकीय विचारांचा विविध ध्रुव्वांकडे कलणारा लंबक, काश्मीरसाठी लढणाऱ्या विविध फ्रंट्सचा व्यवहार, त्यातले अंतर्विरोध अशा अनेक गोष्टी कवेत घेत कादंबरी अत्यंत नाट्यमय वाटतील अशा घटना-प्रसंगांनी पुढे सरकत राहते.
काश्मीरबद्दल कादंबरीकर्तीला जे म्हणायचं आहे, (फिक्शनबाह्य मतं, धारणाही) त्याबद्दल अनेक वाद-प्रवाद असतील, नव्हे आहेतच. त्यावर अंतहीन काथ्याकूट करणं शक्य आहे आणि तो जरुर करावा, मात्र लेखकाच्या लेखनातील तपशील, कथन त्याबाबतची विश्वासार्हता वादातीत आहे. म्हणजे असं की काश्मीरातल्या छळछावण्यांमध्ये (हो! बरोबरच वाचताय) कोण-कोणत्या प्रकारची हत्यारं असतात, उदा, नखं उपटून काढण्यासाठी असलेल्या अडकित्त्यांपासून विविध कटर्स, विजेचे झटके देण्यासाठी असलेल्या ठराविक व्यासाच्या तारांपासून अनेक शस्त्रं तुमच्या डोळ्यांसमोर नाचू शकतील. त्या खोल्यांमधला कुबट, गुदमरवून टाकणारा वास वाचता वाचता झप्पकन तुमच्या नाकात शिरू शकतो.
जालीब कादरी या मानवाधिकार कार्यकर्त्या वकिलाची हत्या आणि बर्फिल्या झेलमवर तरंगणारं त्याचं शव, त्याचे काढून घेतलेले डोळे तुमची झोप उडवू शकतात किंवा नाहीही. एन्काऊंटर्स, त्याची मोडस ऑपरेंडी, पॅलेट गन्सचा मारा केलेल्या लोकांचे गेलेले डोळे यापैकी काहीही तुमचा मेंदू गोठवू शकतं. साऱ्याच घटना, प्रसंग, पात्रं, उपकथानकं, कादंबरीकाराचं निवेदन हे इतकं अस्सल राजकीय आहे, की कदाचित हे सगळंच भोवताली घडतंय, असं प्रत्येक प्रसंग वाचून वाटेल. हे तुम्हाला अतिरंजित वा खरोखरच निव्वळ फिक्शन वाटलं तर तो तुमचा दोष तरी कसा? कारण आपण फार दूरवर बसून नंदनवनातल्या वैष्णोदेवी मंदिराबद्दल, बर्फ, हाऊस बोटी, सफरचंदं, चिनार यापलीकडे काही बोलत, पाहत, ऐकत नाही. जिथे सरकारंच परदेशी राजकीय पाहुण्यांना आपल्या खर्चाने, काश्मीर (सरकारला दिसणाऱ्या) पहायला घेऊन जातं आणि तिथं सगळं सुशेगात आहे, असं सांगतं, तिथल्या नागरिकांना काय सगळं छान वाटू शकतं त्यामुळेच ‘ते’ लोक वठणीवर येतील, सीमेवरचे प्रश्नही सुटतील आणि आपण तिथे जमिनी विकत घेऊन, सुंदर काश्मिरी तरुणींशी लग्नंही करू शकतो, असं सामान्य माणसाला वाटलं तर त्यात गैर ते काय?
दोन महिन्यापूर्वी नोव्हेंबरमधली चकमकीत ४ नागरिक मारली गेल्याची घटना अशीच घडलेली.
कादंबरीबद्दल
तिलोत्तमा, अंजुम, मुसा, सद्दाम हुसैन, मेजर अमरिक सिंग, जालीब कादरी, कमांडर गुलरेज, मिस जबीन, नागा, आझाद भारतीय, निम्मो गोरखपुरी, सईदा आणि अशा कित्येक पात्रांच्या स्वतःच्या
कहाण्या इतक्या अस्सल, गुंतागुंतीच्या आणि मुख्य कथानकाशी घट्ट जोडलेल्या आहेत की रॉय यांच्या क्राफ्टचंही अमाप कौतुक वाटतं. मुख्य राजकीय मुद्दा सांगायचा झाल्यास अनेक सत्य घटना, त्यातली माणसं उदा., ‘गुजरात का लल्ला’, मकबुल भट असे अनेक उल्लेख थेटपणे केलेले आहेत.
कथानक कुठेही जराही न सैलावता, त्यात आलेले समकालीन राजकीय अंतर्विरोध, बदलत्या जातीय समीकरणांचे तपशील, सैन्याचं वास्तव चित्रण, (हा मुद्दा सापेक्ष वाटल्यास वाचकांनी अलीकडचा नागालॅंड गोळीबार, आर्म्ड फोर्सेस स्पेशल पॉवर एक्ट आणि न्यायकक्षाबाह्य मृत्यू/ एन्काऊंटर्स आणि एनसीआरबीची अद्ययावत आकडेवारी वाचावी.) हे फारच ठळक आणि बारीकसारीक तपशील असलेलं असं उतरलं आहे. इतकं की हे हस्तीदंती मनोऱ्यातलं वा काही दिवसांची काश्मीर टूर करून केलेलं लिखाण वाटत नाही. ज्या व्यक्तीने स्वत अशा धुमश्चक्रीत शिरकाव केलेला आहे, तीच कथात्म साहित्यातही इतकं सविस्तर आणि सखोल लिहू जाणे. भवतालातल्या प्रतिमांचा केलेला क्रूर वापर अंगावर येतो. उदा., चिनार वृक्षाची लालेलाल पानं आणि बर्फ, स्मशान या प्रतिमांचा केलेला वापर.
या कादंबरीतली एक गोष्ट राहून राहून आठवते. सीमेवर शहीद झालेल्या एका सैनिकाचं पार्थिव अंत्यसंस्कारासाठी त्याच्या मूळ गावी नेण्यात येतं. तर या खालच्या जातीच्या सैनिकाचं तिथं शासकीय इतमामात, फैरी झाडून, मानवंदना देऊन त्याचे अंत्यसंस्कार करताना गावातली उच्चजातीय मंडळी नाकं मुरडतात. नापसंतीने, मजबुरीनेच ते या अंत्ययात्रेत सहभागी होतात. गावातल्या मुख्य चौकातून अंत्ययात्रा नेण्यासाठी त्यांचा विरोध असतो. सरतेशेवटी मुख्य चौकात सैनिकाचा पुतळा बांधला जाण्यालाही ते विरोध करतात. तरीही पुतळा बांधलाच जातो, तर एके रात्री अतिशय घृणास्पद रीतीने त्या पुतळ्याची विटंबना केली जाते. ती कोण करतं, हे उघड आहे.
देशासाठी बलिदान दिलेल्या माणसाचीही जातीयतेच्या काचांतून सुटका नाही. असे भोग वाट्याला येणारे सैनिक असो, की काश्मीरमध्ये छळवणूक केली जाणारी माणसं, त्यांचा मृत्यू दोनदा होतो. सन्मानाने जगण्याचा नि सन्मानाने मरणंही त्यांच्या नशिबी नसतं. बर्फिल्या झेलमवर तरंगणाऱ्या जालीब कादरीचं दुर्दशा केलेलं शव तुम्ही पाहिलंत, तरी तुम्हाला त्याची कल्पना येईल आणि रॉय तुम्हाला निवांतपणे दिवाणखान्यात कादंबरी वाचत पहुडण्याची सवलत देत नाही. मती गुंग व्हायला होईल, माणूस चोवीस तासाकरता तरी बधिर होईल, याची खबरदारी लेखिकेने घेतली आहे. अर्थात तुम्ही ‘दूध मांगो खीर देंगे, काश्मीर मांगो, चीर देंगे’ पंथातले आणि व्हाट्सअप विद्यापीठाचे स्नातक असलात तर गोष्टच निराळी.
कादंबरीतली मला आवडलेली आणि जरा सुखावणारी गोष्ट म्हणजे ‘जन्नत गेस्टहाऊस’ हे तयार केलेलं विश्व. वैराण स्मशानात तयार केलेल्या कल्पनारम्य विश्वात फेरफटका मारल्यावर किंचित आश्वासक, सुखावह वाटतं, तसंच पूर्वग्रहदुषित सामाजिक धारणा कोसळून पडतात. या गेस्टहाऊसशी जोडलेल्या अंजुमच्या मातृत्वाच्या धारणांबद्दल विणलेले अनेक गोफ विचार करायला भाग पाडणारे आहेत. सर्वच स्त्री व्यक्तिरेखांना स्वत:चं ठशठशीत अस्तित्व, विचार आहेत. त्यांच्याबाबतच्या सौंदर्याच्या, जीवनाच्या आसक्तीच्या कल्पनांमध्ये वैविध्य आणि गुंतागुंत आहे. ही पात्रं सरधोपट, सरळसोट नाहीत, त्यांच्या विकसनाची लय उत्तरोत्तर रंगत वाढवणारी आहे. लिंगभावी दृष्टीकोनातून पाहिल्यासही कादंबरी उत्तम आहे. कथात्म साहित्यात या दृष्टीकोनाचं इतकं तल्लख भान ठेवून केलेलं अशा प्रकारचं, हे मी वाचलेलं पहिलंच लेखन. अर्थात ही माझी वाचनसीमा.
नमूद करावीच अशी गोष्ट म्हणजे सशस्त्र माओवादी गटांतल्या समतेचे पाईक म्हणवल्या जाणाऱ्या लोकांकडूनही स्त्रियांच्या बाबतीत काय नि कसा भेदभाव केला जातो, याचं चित्र रंगवताना रॉय यांनी काहीही हातचं राखलं नाही. लेनिन, स्टॅलिन, माओ यांनी काही चांगल्या गोष्टी केल्याही असतील, याचा अर्थ त्यांची सगळीच धोरणं, विचार, मांडणी, कृती बरोबर होती असं नाही, तर्काच्या-चिकित्सेच्या कसोटीतून यांचीही सुटका नाही, असा उद्गार रॉय यांच्या कथ्यात (नॅरेटिव्ह) दिसतो.
थोडं अवांतर – तुम्ही २०१४ मध्ये प्रदर्शित झालेला हैदर हा विशाल भारद्वाजचा सिनेमा पाहिलाय का? किंवा ५ ऑगस्ट २०१९ नंतर पाहिलाय का? नसेल पाहिला तर हा सिनेमा आणि ही कांदबरीही एकत्र वा एकापाठोपाठ एक वाचण्या-पाहण्याचा प्रयोग करा. मला तरी कादंबरी वाचताना या सिनेमातला शाहीद कपूरचा अडीच-तीन मिनिटांचा तो मोनोलॉग आठवत राहिला. हम हैं कि हम नही? असा प्रश्न विचारणारा.
पुन्हा हाही निव्वळ कल्पनारम्य सिनेमा वाटला तर ५ ऑगस्ट २०१९ च्या रात्रीपासून पुढे जवळपास वर्षभर नजरकैदेत असलेले कुलगामचे आमदार युसूफ तारिगामी यांचं हे भाषण ऐका.
‘मिनिस्ट्री ऑफ अटमोस्ट हॅप्पीनेस’चं मुख्य कथन काश्मीरबाबत आहे, असं नाही. पण कादंबरीभर बॅकड्रॉपसारखा येणारा काश्मीरही इतका दाहक, अस्वस्थ करणारा असेल, तर प्रत्यक्षात तिथं काय परिस्थिती असेल, याची कल्पनाही करवत नाही. पहिल्या कादंबरीनंतर वीस वर्षांनी प्रकाशित झालेली रॉय यांची ही दुसरी कादंबरीही तितकीच गाजली. बुकरच्या यादीत तिचा समावेश झाला. पण मराठीत फारसं त्याबद्दल लिहून आलेलं नव्हतं.
या कादंबरीचा मेहता प्रकाशनाने केलेला मराठी अनुवादही लगोलग आला, पण अगदीच नाईलाज असेल तरच तो वाचावा. इंग्रजीचा अडसर वाटलाच तर हिंदीत मंगेश डबराल यांनी केलेला अनुवाद उत्तम आहे, तो वाचता येईल.
COMMENTS