राष्ट्रीय भ्रष्टाचार हस्तांतरण केंद्र!

राष्ट्रीय भ्रष्टाचार हस्तांतरण केंद्र!

चित्रा रामकृष्ण व हिमालयातील कोणी तरी गूढ योगीबाबा यांनी देशाचा सर्वात मेाठा शेअर बाजार म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज कसा चालविला ? याविषयी केंद्र सरकार वगळता सगळे भाष्य करीत आहेत. न्यायालय हा देशाच्या प्रतिष्ठेला लागलेला डाग आहे, असे मानत आहे. हिमालयातील योगी कोण? ही गोष्ट जितकी गूढ आहे तितकीच गूढ बाब केंद्र सरकार यावर मौन आहे तोंड उघडत नाही ही आहे. केंद्र सरकारचे हे वर्तन चिंताजनक नाही का?

जगातील सर्व शेअर बाजार जगभरच्या गुंतवणुकदारांकरिता खुले आहेत, हे आपण सारेच जाणतो. भारतात मुंबईतील बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (बीएससी) व नॅशनल स्टॉक एक्सचेंज (एनएससी) या मध्ये प्रचंड उलाढाल होते व त्यांची गणना जगांतील प्रमुख शेअर बाजारात होते.

चित्रा रामकृष्ण यांनी नॅशनल स्टॉक एक्स्चेंज या संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालक व मुख्यकार्यकारी अधिकारी पदांवर काम केले. एप्रिल २०१३ ते डिसेंबर २०१६ हा त्यांचा कालखंड. त्या डिसेंबरमध्ये राजीनामा देऊन बाहेर पडल्या. एनएससीच्या संचालक मंडळाने त्यांचा राजीनामा मंजूर केला, त्याचबरोबर त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करून त्यांना धन्यवाद दिले अशी नोंदही आहे! महत्त्वाची बाब ही की नोव्हेंबर २०१६ मध्ये वर्ल्ड फेडरेशन ऑफ एक्स्चेंजेस या संस्थेवर दोन वर्षांकरिता त्यांची अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली होती. पण, तब्बल सहा वर्षांनी म्हणजेच, २०२२ मध्ये केंद्र सरकारचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना आणि मुख्य म्हणजे पाच राज्यांत निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना ‘सिक्युरिटिज एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया’ने चित्रा रामकृष्ण यांच्याविषयी एक जबाबदार नियामक संस्था म्हणून काय पावले उचलत आहोत याचा खुलासा केला आहे!

गैरव्यवहाराची पूर्वपीठिका

चित्रा रामकृष्ण या एनएससीच्या व्यवस्थापकीय संचालक पदावरून निर्णय घेत असताना हिमालयातील एक योगी त्यांना ई मेलवरून मार्गदर्शन करीत असे. एनएससी हे आपल्या देशांतील सर्वात मोठ्या शेअर बाजारांपैकी एक. त्याचे व्यवहार आधुनिक संगणकाद्वारे होतात. अशा ठिकाणी निर्णय प्रक्रियेत हिमालयातील योगीचा संबंध येतोच कुठे? पण चित्रा रामकृष्ण या अध्यात्मावर गाढा विश्वास ठेवणाऱ्या आहेत. असो!

एनएससीच्या निर्णय प्रक्रियेत सहभागी झालेला हा दैवी दृष्टी लाभलेली हिमालयातील योगी प्रत्यक्षात कुणी पाहिला नाही. स्वतः चित्रा रामकृष्ण या योगी बाबास हरिद्वारला भेटल्या असे त्यांचे म्हणणे आहे. आता २०२२ मध्ये १९० पानांचा अहवाल तयार करून एनएससीने चित्रा रामकृष्ण यांनी केलेल्या कृत्याचा पंचनामा केला आहे.

हिमालयात बसून हा गूढ येागी ज्या ई मेल वर चित्राबाईंना सूचना व हुकूम देत असे तो इमेल [email protected] हा आहे. या ईमेलवरून सूचना व आदेश येणे व चित्रा रामकृष्णने ते अंमलात आणणे हे काय दर्शविते? देशाचा सर्वात मोठा राष्ट्रीय शेअर बाजार हिमालयातील योगी चालवत होता? 

संगनमत आणि दुर्लक्ष

या बाजारातील अद्ययावत संगणकीकरण पाहता येथील माहिती हिमालयातील योगीकडे जात असेल तर ती माहिती त्याच वेळी माहिती तंत्रज्ञान विकसित झालेल्या जगात किती ठिकाणी व कुणाकडे तसेच कशासाठी जात असेल हाही एक महत्त्वाचा प्रश्न आहे? अर्थात, खूपच बभ्रा झाला म्हटल्यावर सेबीने आज टाहो फेाडून काही माहिती माध्यमांना दिली आणि आता सीबीआय या संस्थेला तपास करण्यासाठी पाचारण केले आहे.

आता आपण काही मूलभूत प्रश्नांकडे येऊ या ?

चित्रा रामकृष्ण यांची नेमणूक एप्रिल २०१३ मध्ये एनएससीवर व्यवस्थापकीय संचालक व मुख्यकार्यकारी अधिकारी या पदांवर झाली हे अर्थातच केंद्रीय अर्थखाते व सेबी या नियामक संस्थेला माहीत आहे. या संस्थांचा व्यवहार, त्यातील कोट्यवधींची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय गुंतवणुकदार संस्थांची उलाढाल याबद्दल सर्वसामान्य गुंतवणुकदारांचा विश्वास संपादन करणे आवश्यक आहे. मुंबई शेअर बाजार अर्थात, बीएससीला आव्हान देऊन ही नवी संस्था मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथे उभी आहे. सेबी या नियामक संस्थेबाबतचा कायदा १९९२ मध्ये संसदेने मंजूर केला व त्याच वर्षी एनएससी भारतीय कंपनी कायद्याने स्थापन झाली. सेबीने त्याला १९९४ मध्ये राष्ट्रीय शेअर बाजार म्हणून मान्यता दिली. घाऊक कर्ज रोखे बाजार तसेच कॅश मार्केट विभाग चालू करणारा एनएससीचा निर्णय वित्तीय क्षेत्रात  महत्त्वाकांक्षी ठरला.

५० सर्वात मोठ्या शेअरचा निर्देशांक म्हणजे निफ्टी हा एनएससीचा महत्त्वाचा निर्देशांक जगभर ओळखला जातो.

मुळात, चित्रा रामकृष्ण यांनी उच्चपदावरून हा अत्याधुनिक शेअर बाजार सांभाळत असताना हिमालयातील येागीचे काय काय सल्ले व हुकुम पाळले?

१) संघटनात्मक रचना

२) डिव्हिडंड व्यवहार

३) आर्थिक निर्णय

४) मनुष्य बळ विकास धेारण, इत्यादी

या प्रश्नांवरील माहिती देणे व त्याला अनुसरून हुकूम पाळण्यास चित्रा रामकृष्ण यांनी त्वरित मान्यता दिली.

 मर्जीतला योगी

एनएससीच्या सर्व नियमांना बाजूला सारून स्वतः त्यांनी  आनंद सुब्रह्मण्यम या गृहस्थाची नेमणूक येागीच्या सूचनेप्रमाणे केली. वर्षांला  ४४ कोटी रुपये वेतन, जगभरात प्रथम श्रेणी विमान प्रवास व सर्व सुविधा या आनंद सुब्रह्मण्यमला उपलब्ध असत. चित्रा रामकृष्ण यांच्या शेजारची केबिन व एनएससीमध्ये सीईओनंतरचे सर्व अधिकार या व्यक्तीला बहाल करण्यात आले होते. या बाबतीत काहींनी तक्रार नोंदवली पण ती निनावी होती.

पण चित्राबाई, आनंद सुब्रह्मण्यम यांचा गुन्हा काय ?

एनएससीची माहिती देणाऱ्या सर्व्हरला प्राथमिकता देऊन काही बड्या गुंतवणुकदार कंपनीचे प्रतिनिधी व शेअर दलालांना त्यांचे सर्व्हर माहिती करिता उपलब्ध करण्यात आले हेाते. याला को-लोकेशन असे म्हणतात व हे एनएससीने परवानगी दिल्याने शक्य झाले .

हिमालयातील योगीच्या हुकूमानुसार शेअर बाजारातील माहिती ई मेलद्वारे बाहेर जाणे ही सरळ कारस्थान असावे, असा व्यवहार एका बाजूला, को-लोकेशन हा दुसरा मोठा आर्थिक घोटाळा.

आपल्या आवडत्या मोठ्या गुंतवणुकदार ग्राहकांना काही सेकंद आधी एनएससी शेअर प्राइस माहिती उपलब्ध करणे हा दैनंदिन करोडो अब्जावधीचे लाभ आपल्या हितसंबंधांतील व्यक्ती व संस्था यांना माहिती लीक करणे हा गुन्हा चित्रा आणि आनंद सुब्रह्मण्यम यांनी व हिमालयातील योगी यांनी संगनमताने केला हे यातून उघडपणे दिसते.

सेबीचे संशयास्पद व्यवहार

को-लोकेशन घोटाळ्याबरोबर शेअर प्राइस उघड करून लाखो गुंतवणुकदारांची फसवणूक व काही बड्या गुंतवणुकदारांना अफाट संपत्ती कमवण्याकरिता जाणीवपूर्वक गुन्हा करून या चित्राबाई नोव्हेंबर २०१६ मध्ये वर्ल्ड फेडरेशन ऑफ एक्स्चेंजच्या सीईओ झाल्या. हे सारे गुन्हेगारी स्वरूपाचे नाही काय?

आता सेबीने टाहो फोडला तरी एप्रिल २०१३ ते २०१६ या काळात सेबीचे एनएससीवर नियंत्रण किंवा सुपरव्हिजन नव्हतेच हे या प्रकरणावरून सिद्ध होत आहे. सेबीने आज कितीही आरडाओरड केली तरी सेबीला चित्रा रामकृष्ण व आनंद सुब्रह्मण्यम यांची माहिती नव्हतीच असे नाही. तरीही सेबीने चित्रा रामकृष्ण यांना फक्त ३ कोटी रुपये दंड करून आपली सुटका करून घेतली. यात त्यांचे लीव्ह एन्कॅशमेंटचे एक कोटी ५४ लाख नामंजूर केले. दोन कोटी ८३ लाख रुपयाचा बोनस रद्द केला!

आनंद सुब्रमण्यम हा बाहेरचा व या क्षेत्राचे ज्ञान नसणारा माणूस चित्रा रामकृष्ण आपल्या शेजारच्या केबिनमध्ये बसवून काय व्यवहार केले असतील, हे आता स्पष्ट होत आहेत. चित्रा रामकृष्ण मुंबईच्या पोदार कॉलेजमधील. त्यांनी पुढे जाऊन सीएची पदवी मिळविली. विशेष म्हणजे चित्राबाईंची सुरूवात आयडीबीआय बँकेपासून आहे. हर्षद मेहताने सेबीचा कायदा किती तकलादू आहे हे सिद्ध केलेच होते. धक्कादायक हे आहे की, चित्रा रामकृष्ण व रवी नारायण यांनी सेबी कायद्याचा मसुदा बनविण्यात हातभार लावला होता, असे ऐकिवात आहे. १९९३ मध्ये एनएससीचा मसुदा तयार करणे व नंतर सेबीने मंजुरी दिल्यानंतर १९९४ मध्ये हेच रवी नारायण एनएसएचे पहिले व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी झाले. १९९४ ते २०१३ पर्यंत सुमारे दोन दशके त्यांनी एनएससी मोठी व आधुनिक करीत असताना आपल्या सहकारी चित्रा रामकृष्ण यांच्याकडे एनएससीचे नेतृत्व यावे, हेही संशयास्पद नाही काय? रवी नारायण यांनी दुसऱ्या पदावरून चित्राबाईंची सोबत केली आहेच.

शेअर बाजारात हिमालयातील योगी कोण असतील, या चर्चेत अनेक नावे आहेत.

प्रश्न कोणते निर्माण होत आहेत ?

 एक पोपट दुसऱ्या पोपटाची चौकशी करणार

सेबीने आता सीबीआयकडे या सर्व प्रकरणातील धागेदेारे देऊन तपास करण्यास सांगितले आहे. पिंजऱ्यातील पोपटाने काम सुरू करण्यासाठी पूर्वतयारी म्हणून सेबी या अजून एका पिंजऱ्यातील पोपटाने प्रस्तावना आख्यायिका तयार केली आहे.

चित्रा रामकृष्ण यांना मोकळे कसे सोडले याबद्दल सेबीने एनएससीच्या संचालक मंडळाला जबाबदार धरले आहे. २०१६ नंतर ‘अर्न्स्ट अँड यंग’ या ऑडिट कंपनीकडून एनएससीचे सर्व व्यवहार फॉरेन्सिक ऑडिट करून घेतले. त्यांनी को-लोकेशन स्कॅम व एनएससी शेअर प्राइस लीक कसे झाले यावर अहवाल दिला. सेबीने हा अहवाल वाचून सीबीआयकडे तक्रार दिली तोपर्यंत २०१९ उजाडले ! सीबीआयने अधिक स्पष्टीकरण मागितले व आता २०२२ च्या सुरूवातीला आपण काय केले, याची माहिती देशाला दिली. या सगळ्या उफराट्या उद्योगांमुळे २०१६ ते २०२२ देशांतील सर्वात मोठ्या शेअर बाजारात होणारे हे व्यवहार जगभर हास्यास्पदच ठरले आहेत. जगभरातल्या गुंतवणूकदारांच्या मनात यामुळे संशयाची भली मोठी पाल चुकचुकली आहे.

हिमालयातील योगी व त्याचा ई मेल यावरून आजच्या आधुनिक जगात हा योगी शोधणे संबंधितांची इच्छाशक्ती असेल तर कठीण बिलकुल नाही. सेबी या नियामक संस्थेने एनएससीच्या संचालक मंडळाला दोषी ठरविले आहे. एनएससी काय किंवा सेबी यांची दक्षता व्यवस्था निद्रावस्थेत का होती व कुणी ठेवली होती? २०१४ नंतर आरबीआय व सेबी यांची स्वायत्तताही संपली होती स्पष्ट आहे.

सेबीने एनएससीच्या खराब कारभाराविरुद्ध मोहीम चालविली आहेच, पण रेग्युलेटर या भूमिकेत सेबीकडे यात अधिक दोष येतो. या कालखंडातील बाजारांतील हजारो शेल कंपन्यांची तपासणी केल्यास अर्थ व्यवस्थेतील काळा व्यवहार लख्ख दिसू लागेल.

बीएसईचा सेन्सेक्स एनएसईचा निफ्टी हे दोनही निर्देशांक भारतीय अर्थव्यवस्थेचे प्रतिबिंब दाखवितात का? त्यांच्या निर्देशांकांतील कोरोना काळात व आधी सुद्धा दिसणारी वाढ ही निकोप वाढ आहे का? की बांडगुळ स्वरूपातील सूज आहे ?

भ्रष्टाचाराचे सर्वव्यापी पर्यावरण

को-लोकेशनचा स्कॅम १९९२ च्या हर्षद मेहतापासून ते राकेश झुनझुनवालापर्यंत आपण रोज अनुभवत आहोत. काही महिन्यांपूर्वी देशाचे पंतप्रधान बिग बुल अशी उपाधी मिळालेले राकेश झुनझुनवालांसमोर उभे होते. तर हा दलाल सम्राट खुर्चीवर बसून त्यांना काही ऐकवत होता आणि ते त्याचे म्हणणे काळजीपूर्वक ऐकत होते! ६० हजाराचा निर्देशांक लाखापर्यंत जाईल ही दलाल सम्राटांची भाषा कुणाची संपत्ती वाढविण्यासाठी कोण काम करतो, हे स्पष्ट करणारी आहे !

शेअर बाजारातील आयपीओ कुणाचे धन बनवितात आणि कोण लुबाडले जात आहेत हे आपण याच सेबीच्या नेतृत्वाखाली अनुभवत नाही आहोत काय ? सुशिक्षित मध्यमवर्गीय हे साक्षर आहेत, पण त्याना हिमालयातील योगी कोण हे समजले तरी त्यांचे मूर्खासारखे वागण्याचे स्वातंत्र्य आपण नाकारू शकतो काय ?

‘अर्न्स्ट अँड यंग’ने अहवालात नमूद केले आहे की आनंद सुब्रह्मण्यम हाच तो योगी आहे. पण मग तो ई मेलवर का व्यवहार करील? तो तर चित्राबाईंच्या बरोबर तिच्या निर्णयप्रक्रियेचा भाग आहे? सेबीने जे संशेाधन त्यांच्या आनंद बारुआ यांच्या मार्फत केले आहे त्यांनी स्पष्ट निष्कर्ष नोंदविला आहे

“I find allegation that Anand Subramanyam has exploited Chitra Ramkrishna by creating another identity before her in the form of the unknown person having e mail id to guide her perform her duties according to his wish is not sustainable !

He says “Glaring breach of regulations and laws of Confidentiality “

चित्रा रामकृष्ण, रवी नारायण, आनंद सुब्रह्मण्यम ही नावं आता चर्चेत असली तरी अनेक वर्ष त्या बाईचे करियर घडविणारे अर्थ खाते हाताळणारे नोकरशहा, बँकिग व शेअर बाजारात सतत मोठ्या पदावरून काम करणारे लोक व बँकर, दलाल व बाजार सांभाळणारे लोक हिमालयातील योगीच्या अवतारात वावरत असतात. त्यांना मदत करणारी सर्व व्यावसायिक मंडळी बाजारात असतात. को लोकेशन स्कॅम, प्राइस लीक, इनसाइडर ट्रेडिंग या सर्व बाबतीत व्यवस्था काम काय करते? सेबीने आपली जबाबदारी झटकली तरी देशाचे नुकसान होते व मूठभर उद्योगपती, मूठभर राजकीय नेते व मूठभर नोकरशहा व दलालांची फौज देशाची संपत्ती रोज मूर्ख सुशिक्षितांचा वापर करून लुटत राहतात. नव्हे या घडीला लुटत आहेत. हिमालयातील अनेक योगी याच ठिकाणी आहेत. ते भ्रष्टाचाराच्या रुपाने आकारास आलेल्या हिमालयाच्या शिखरावर आहेत.

या व्यवस्थेवर हल्लाबोल झाला पाहिजे! भांडवलशाहीचा विरोध केलाच पाहिजे! पण त्या आधी ती समजून घ्यायला हवी आहे.

विश्वास उटगी,  बँकिंग क्षेत्रातील जाणकार आणि बँक कर्मचारी संघटनेचे नेते आहेत.

( १एप्रिल २०२२ ‘मुक्त-संवाद नियतकालिकामधून साभार)

COMMENTS