रयतेचा आधारवड गेला

रयतेचा आधारवड गेला

लढाई कधीच संपत नसते कॉम्रेड! अज्ञान आणि विषमतेच्याविरोधात सत्यशोधक भुमिका आणि मार्क्सवाद ही हत्यारे सोबत ठेवावीच लागतील. आपल्या बरोबर किती लोक आहेत? याचा विचार जसा महत्वाचा आहे तसाच आपली भुमिका किती प्रामणिक आहे, हेही महत्वाचे आहे. असे ते आम्हाला सांगत रहात.

परंपरेला स्वीकार नकार, देतच आपण पुढे जात असतो : जयंत पवार (भाग – २)
मुंबईत कोरोनाच्या रुग्णात वेगाने वाढ
शाळाबाह्य बालकांसाठी जुलैमध्ये ‘मिशन झिरो ड्रॉपआऊट’

आदिवासींच्या जलजंगलजमिनीवरील अधिकारासाठी चाललेल्या चळवळींच्या बाजुने एन.डी.पाटीलसर कायम उभे राहीले. धुळे जिल्ह्यात बहुराष्ट्रीय पवन ऊर्जा कंपन्यांच्या नफ्यासाठी आदिवासींना बेदखल करण्याचे धोरण शासन-प्रशासनाने आखले. त्यासाठी कार्यकर्त्यांना हद्दपार करण्याचं, त्यांच्यावर खोट्या केसेस चालवलण्याचं कारस्थान राज्य सरकारनं चालवलं होतं. मला पाच जिल्ह्यांतून हद्दपारीची नोटीस बजावण्यात आली. या विरोधात कष्टकरी आदिवासी शेतकर्‍यांच्या हितासाठी मोठा जनसंघर्ष उभा करण्याचं काम एन.डीं.च्या नेतृत्वाखाली झालं. एन.डी.पाटीलसर होते म्हणूनच धुळे, नंदुरबार जिल्ह्यातल्या आदिवासींच्या जमिनी, पवन ऊर्जा कंपन्या व एस. ई. झेड.च्या कचाट्यातुन, पोलिसांच्या अत्याचारातून, जंगल खात्याच्या दडपशाहीतून वाचल्या.

कॉ. किशोर ढमाले आणि विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या अध्यक्षा प्रतिमा परदेशी, एन. डी. पाटील यांना महात्मा फुले पगडी देताना.

कॉ. किशोर ढमाले आणि विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या अध्यक्षा प्रतिमा परदेशी, एन. डी. पाटील यांना महात्मा फुले पगडी देताना.

साम्राज्यवादी जागतिकीकरणाच्या काळात रायगडचा आगरी शेतकरी असो, की धुळे, साक्री, नंदुरबार या भागातला आदिवासी शेतकरी ताठ मानेनं स्वतःच्या जमिनीत उभा आहे. त्याचं महत्वाचे कारण जागतिकीरणविरोधी कृती समितीतील एन.डीं.चं नेतृत्व हेच आहे. त्यांनीच ८ ऑगस्ट २००७ ला कॉ. रामसिंग गावीत यांच्या उपस्थितीत ‘एकच नारा, सात बारा!’ ही घोषणा धुळ्यातील आदिवासींच्या मनात रुजवली.

कष्टकर्‍यांनी लोकवर्गणीतून बांधलेल्या सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा व सत्यशोधक शेतकरी सभेच्या दहिवेल – साक्री, जि. धुळे व नवापूर (जि. नंदुरबार) येथील कार्यालयांचे उद्घाटन करण्यासाठी एन.डी.सर आले होते. ते सत्यशोधकांच्या हाकेला ओ देत पुन्हा पुन्हा येत राहीले. १९८८ साली सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचा नवीन शैक्षणिक धोरणविरोधी व मागासवर्गीय शिष्यवृत्ती वाढ व मंडल समर्थन लढ्याला मुंबईत कॉ. शरद पाटलांसह त्यांनीच मार्गदर्शन केले. ती त्यांची व माझी पहिली भेट! शिक्षण हक्काची लढाई असो की २००२ ला दादासाहेब गायकवाड स्मृतीशताब्दी निमित्त क्रांतिवीर नागनाथअण्णा नाईकवडी व एन.डी.सरांनी डॉ. पाटणकर, कॉ. रामसिंग गावीत यांच्यासह काढलेला अभुतपूर्व मुंबई मोर्चा असो, एन.डी.सर शोषितांना संघर्षाच्या वाटेवर घेऊन अथकपणे चालत राहीले. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली २०१२ मध्ये जीवनहक्क परिषदा धुळे जिल्ह्यात हजारोंच्या उपस्थितीत झाल्या.

आमच्या विनंतीला मान देऊन एन.डी. यांनी महान कवी तुलशी परबांच्या अध्यक्षतेखाली ७ वे विद्रोही साहित्य संमेलन वाशी येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात आयोजित करण्यास मार्गदर्शन व सहकार्य केले.

जीवनाच्या सर्व क्षेत्रात धर्म-संस्कृत-अंधश्रध्दा असो की राजकारण-समाजकारण, वर्चस्व आणि शोषणाच्या विरोधात – विषमते विरोधात लढलेच पाहीजे असे ते आम्हाला सांगत राहीले.

महाराष्ट्र राज्य दुष्काळ निवारण निर्मुलन मंडळाच्या निमित्ताने दुष्काळविरोधी धोरणांच्या अंमलबजावणीसाठी ते सतत पायाला भिंगरी लावून मराठवाडा, खान्देश ते दक्षिण महाराष्ट्रातील गावखेड्यात फिरत राहिले. पुणे जिल्ह्यात भामा-आसखेड धरणाच्या लाभक्षेत्रातील बागायती जमिनींवर येणारे विमानतळ रोखण्यासाठी मी व माणिक कदम, साळुंंखे, दळवी इ. नी स्थापन केलेल्या विमानतळाविरोधी सत्यशोधक शेतकरी कृती समितीला त्यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे शेतकरी स्त्री-पुरुष लढले व विमानतळ रद्द झाले आणि शेतकर्‍यांच्या जमिनी वाचल्या.

म.फुलेंवरील त्यांचा एक दिर्घ लेख आणि रयतमधील एक भाषण मासिक सत्यशोधक जागरतर्फे एकत्रितरित्या छापण्याची परवानगी प्रा. प्रतिमा परदेशी व मला त्यांनी मोठ्या मनाने दिली.

मला आणि भाई गणपतराव देशमुखांना महाराष्ट्र नेते कॉ. दत्ता देशमुख पुरस्कार मिळाला त्यावेळी धुळ्यात झालेल्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भाई.एन.डी.सरच होते.

या वयात तुम्ही कोणते प्रश्न घेऊन येत राहाता आणि लढत राहता? तुम्हाला हे कसं शक्य होत? असा प्रश्न या ८५ वर्ष वयाच्या आमच्या विचारवंत नेत्याला मंत्रालयासमोर एकानं विचारला. तेव्हा ते शांतपणे म्हणाले, “मी शेतकर्‍याचा पोरगा आहे आणि शेतात गलं की शेतं काम काढतचं, अशी आमच्या आईबापांची शिकवण आहे. तसं जनतेत गेलं की जनतेचं दु:ख, वेदना, प्रश्न कळतात आणि ते सोडवण्यासाठी लढावेच लागते. त्यात वयाचा काय प्रश्न?” हे एक किडनी निकामी झालेल्या, मधुमेह सोबतीला असलेल्या आणि खुब्यात एक रॉड बसवलेल्या आमच्या नेत्याचे उत्तर होते.

लढाई कधीच संपत नसते कॉम्रेड! अज्ञान आणि विषमतेच्याविरोधात सत्यशोधक भुमिका आणि मार्क्सवाद ही हत्यारे सोबत ठेवावीच लागतील. आपल्या बरोबर किती लोक आहेत? याचा विचार जसा महत्वाचा आहे तसाच आपली भुमिका किती प्रामणिक आहे, हेही महत्वाचे आहे. असे ते आम्हाला सांगत रहात.

सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मानियले नाही बहुमता, हा तुकोबारायांचा अभंग आणि सत्य सर्वांचे आदिघर-सर्वधर्मांचे माहेर, हा म. फुले यांचा अभंग एन.डी. पाटील नावाच्या अंधश्रध्दा निर्मूलनासाठी स्वकीयांशी झगडणार्‍या माणसाच्या भुमिकेचा पाया होता. आम्हाला त्यांचा आधार होता म्हणून प्रस्थापित सनातनी शक्तीविरोधातील लढाई लढू शकलो. आज त्यांच्या जाण्याने आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचा-रयतेचा आधारवड गेला आहे. आम्ही पोरके झालो आहोत! आज त्यांनी सुरू केलेला शेतमालाच्या किफायतशीर किंमतीचा लढा एमएसपी गॅरंटी कायद्यात परावर्तीत करण्याची व हुकुमशाहीवादी सनातनी केंद्र शासनाच्या विरुद्धची लढाई पुढे नेणे हीच त्यांना आदरांजली असेल!

म.फुले, शाहू, महर्षी शिंदे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, क्रांतिसिंह नाना पाटील, कर्मवीर भाऊराव पाटील, भाई उद्धवराव पाटील, भाई दाजीबा देसाई या परंपरेची एन.डी.सरांनी निष्ठेने – ठामपणे तळपत ठेवलेली विचारध्वजा पुढे नेणे हीच त्यांना आदरांजली ठरेल!

माझ्या माणसांनो,
विचारशक्तीला रजा नेऊ नका
सरकारांचे गुलाम होऊ नका
तुमच्यातील माणसाचा खून
सैतानालाच काय
पण तुमच्या देवालाही करु देऊ नका,
ही जयंत गडकरींची कविता त्यांना खूप आवडायची. ते स्वत: विचार आणि कृतीत भेद न ठेवता आयुष्यभर याच विचारांनी चालत राहीले. खाचखळग्यांच्या कमी मळलेल्या वाटेने जात राहीले आणि आमच्यासाठी विचारांची शिदोरी देऊन, हाच सत्याचा मार्ग खडतर असला तरी चालत राहा म्हणून सांगत राहीले.

सत्य की जय हो!

किशोर ढमाले, हे सत्यशोधक शेतकरी सभेचे राज्य संघटक आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0