वंशवाद आणि वंशद्वेष

वंशवाद आणि वंशद्वेष

पंधरासोळाव्या शतकातल्या अज्ञानातून जन्मलेला वंशवाद अजूनही माणसं कवटाळतात या वास्तवाचा वेध ॲडम रुदरफोर्ड प्रस्तुत पुस्तकात घेतात.

राजीव गांधींचा खून का झाला?
मुस्लीम जगाचा शोध
कापुस्किनस्की यांचं नवं पुस्तक

पंधरासोळाव्या शतकातल्या अज्ञानातून जन्मलेला वंशवाद अजूनही माणसं कवटाळतात या वास्तवाचा वेध ॲडम रुदरफोर्ड प्रस्तुत पुस्तकात घेतात.

” तुम्ही जिथून आला तिथं परत जा…आम्हाला तुम्ही अमेरिकेत नको आहात.. काळे लोक तुम्हाला शेजारी म्हणून हवेत काय.. ज्यू परके आहेत, ते आमची जागा घेऊ पहात आहेत…” असं आता अमेरिकेत जाहीरपणे बोललं जातंय. आफ्रिकन, मुसलमान, भारतीय, आशियन, मेक्सिकन असं एकाद्या समाजाचं वर्णन करून त्या समाजाला अमेरिकेत आता उघडपणे वेगळं करून हाकलून देण्याची भाषा वापरली जातेय.

वेगळी दिसणारी माणसं हे वरील विचाराचं मुख्य सूत्र आहे. युरोपियन अमेरिकन गोरी माणसं आणि इतर असे दोन गट तयार होतात,  गोरा इतर गटांना वेगळं करून देशाबाहेर हाकलून द्यायच्या गोष्टी करतो. आफ्रिकन आणि आशियन रंगानं वेगळे असतात म्हणून या विचारधारेला वर्णवाद असं म्हटलं जातं. चिनी काळे नसतात पण त्यांची चेहऱ्याची ठेवण वेगळी असल्यानं दिसण्याच्या हिशोबात वेगळेच पडतात, म्हणून त्यांनाही भायले (बाहेरचे) मानण्यात येतं.

कपाळावर कुंकू किंवा टिकली लावणाऱ्या बायका हिंदू, भारतीय असतात असं म्हणून त्यांचा एक स्वतंत्र गट करून त्यांच्यावर कधी कधी हल्ले केले जातात.

ॲडम रुदरफोर्ड आणि त्यांचे पुस्तक.

ॲडम रुदरफोर्ड आणि त्यांचे पुस्तक.

गंमत म्हणजे शिखांची. शिख दाढी वाढवत असल्यानं त्याना सर्रास अमेरिकन माणसं मुसलमान समजतात. त्यांचा फेटा मात्र अमेरिकन माणसांना गोंधळात टाकतो, फेटा तर मुसलमानांचा नाही मग हे फेटेवाले कोण असा प्रश्न अमेरिकनांना पडतो.

वंशवाद काळा माणूस, टिकलीवाली किंवा हिजाबवाली, दाढीवाला किंवा आणि फेटेवाला, धोतर टोपीवाला,  इत्यादी दृश्य कसोट्यांच्या आधारे माणसांना वेगळं करतो, ते कनिष्ठ आहेत असं ठरवतो.

कनिष्ठ ठरवल्यानंतर त्यांना कमी लेखणं, त्यांच्याकडून स्वस्तात कामं करवून घेणं, त्यांना लुटणं, त्यांना गुलाम करणं, त्यांच्यावर अत्याचार करणं, त्यांच्यावर राज्य करणं, इत्यादी शक्य होतं. कनिष्ठ असल्यानं एक प्रकारे ती माणसंच नसतात असं मानून त्यांना मानवी अधिकार आणि स्वातंत्र्य नाकारणंही ओघानंच येतं.

डच, फ्रेच, पोर्तुगीझ आणि ब्रिटीश भारतात घुसले, भारतीय माणसांचे अधिकार हिसकून घेत त्यांच्यावर राज्य केलं, त्यांचं भरपूर शोषण केलं. हे त्यांना जमलं कारण त्यांची पक्की धारणा होती की काळे-भारतीय ही कनिष्ठ मानव जात आहे आणि कनिष्ठांशी कसंही वागण्याचा अधिकार त्यांना आहे कारण ते गोरे आहेत.

पंधराव्या ते सतराव्या शतकात ब्रिटीशांनी करोडभर आफ्रिकनांना त्यांच्या त्यांच्या देशात जाऊन पकडलं, पिंजऱ्यात कोंबलं आणि अमेरिकेत नेलं. तिथं त्यांच्याकडून जबरदस्तीनं श्रम करवून घेतले आणि त्यावर शेती आणि उद्योग चालवते. वेळ पडली तेव्हां त्यांच्यावर बलात्कारही केला किवा गोडीगुलाबीनं संसारही मांडला. हे सारं ते करू शकले कारण ते श्रेष्ठ होते.

सुमारे पंधराव्या शतकाच्या सुमाराला, आपण गोरे आहोत, गोरे श्रेष्ठ असतात, काळे कनिष्ठ असतात असं युरोपियन गोऱ्यांनी आपलं आपणच ठरवलं. तिथून गोऱ्यांनी आफ्रिका-आशियात वसाहती वाढवल्या आणि तिथून गुलाम उचलायला सुरवात केली.

हेच घडत असताना समांतर पातळीवर युरोप-अमेरिकेत आधुनिक ज्ञान आणि विज्ञानाचा उदय होत होता. गुलामांचा व्यापार होत असताना आणि वसाहतवाद ऐन भरात असतांना कार्ल लिनस हा वैज्ञानिक माणूस आणि वनस्पतींचं वर्गीकरण करत होता. काळ्या रंगाची माणसं आणि गोऱ्या रंगाची माणसं असं वर्गीकरण त्यानं केलं आणि या वर्गीकरणाला वैज्ञानिक सत्य मानायला सुरवात केली.

वर्गीकरण तर बरोबर होतं. माणसं काळी होती आणि गोरी होती हे खरंच. पण लीनसनं सांगून टाकलं की काळी माणसं कमी प्रतीची असतात आणि गोरी माणसं श्रेष्ठ असतात. आर्थिकता, व्यापार, तंत्रज्ञान, जगण्याची साधनं इत्यादींच्या बाबतीत आफ्रिकेतली माणसं मागं होती, युरोपातली माणसं पुढं होती. त्यामुळं काळे म्हणजे कमी प्रतीचे आणि गोरे म्हणजे श्रेष्ठ प्रतीचे हा निष्कर्ष त्या काळात सहज मान्य झाला.गंमत म्हणजे या वर्गीकरणाला लोकं वैज्ञानिक सत्य मानू लागले.

लीनस डॉक्टर होता, वनस्पतीशास्त्रज्ञ होता म्हणून वैज्ञानिक होता. लीनसचा समकालीन वोल्तेर वैज्ञानिक नव्हता, विचारवंत होता. तो चर्चच्या विरोधात बंड करत होता पण म्हणत होता की काळे हा वंश आहे आणि तो कनिष्ठ आहे, काळ्यांच्यात वंशतः अनेक कमतरता असतात.

ते अठरावं शतक होतं. काळ पुढं सरकला; जेनेटिक्स, अनुवंशशास्त्र विकसित होत गेलं. एकविसाव्या शतकाच्या सुरवातीला डीएनए, जीन्स, क्रोमोसोम्स, त्यांची कामं, त्यांची रचना इत्यादी गोष्टी पूर्ण नाही तरी बऱ्याचशा समजल्या. माणसाच्या दिसण्यावर जाऊ नये, दिसणं आणि असणं यात खूप फरक असतो हे अनुवंशशास्त्रानं सिद्ध केलं.

निरीक्षण आणि अभ्यासाची नवनवी साधनं उपलब्ध झाल्यानंतर माणसाच्या ३ लाख वर्षाच्या इतिहासाचा पट मांडता आला. जगभरातली सर्व माणसं आफ्रिकेतल्या माणसाचेच वंशज आहेत हे सिद्ध झालं; गोरा, काळा, ज्यू, पिवळा इत्यादी गोष्टी या काळाच्या ओघात घडत गेल्या आहेत, मुळातला माणूस हा एकच आहे; हे समजलं.

रूदरफोर्ड मान्य करतात की समाजात वंशवाद शिल्लक आहे. त्यांचं म्हणणं असं की माणसा माणसात भेद असतात, माणसांच्या गटात साम्य आणि भेद असतात पण त्या भेदाला विज्ञान किंवा अनुवंशशास्त्राचा आधार देणं चूक आहे. अनुवंशशास्त्र आणि वंशवाद या दोहोंचा एकमेकाशी काहीही संबंध नाही असं रुदरफोर्ड यांचं म्हणणं आहे. आणि तसं म्हणण्याचा अधिकार त्यांना आहे कारण ते अनुवंशशास्त्रज्ञ आहेत.

अनुवंशशास्त्रातले ताजे शोध आणि संदर्भ रूदरफोर्डनी पुस्तकात दिले आहेत. उदा. मॅरेथॉन शर्यतीत केनया आणि इथियोपियातले खेळाडू नेहमी आघाडीवर असतात. पण म्हणून केनया-इथियोपिया-आफ्रिका इथल्या माणसांचं ते वंशवैशिष्ट्यं ठरत नाही.कमीत कमी प्राणवायू उपलब्ध असतांना श्रम करणं हा गुण एका विशिष्ट गुणसुत्रात असतो. ते गुणसूत्र केनया, इथियोपिया इत्यादीतल्या बहुसंख्य लोकांमधे असतं, पण सगळीच माणसं मॅरॅथॉन जिंकत नाहीत. ते गुणसूत्र जरी पेशीमधे असलं तरी त्याला प्रशिक्षण, सराव, श्रम, प्रोत्साहन यांची जोड असणं आवश्यक असतं.

वॅटसन हा नोबेल विजेता वैज्ञानिक लेखकाला एकदा म्हणाला होता की भारतीय माणसं मेहनती असतात पण त्यांच्याकडं कल्पनाशक्ती नसते. वॅटसन वंशवादी होता. त्यानं सारी भारतीय माणसं एका कल्पनाशक्तीविरहीत वर्गामधे लोटली. काळ्यानाही तो असंच कनिष्ठ ठरवत असे. लेखक पुस्तकात दाखवून देतो की कल्पना करणं इत्यादींचं गुणसूत्र सर्व व्यक्तीमधे असतं पण केवळ त्या गुणसूत्रानुसार माणसाचं व्यक्तिमत्व ठरत नाही; किती संधी मिळते, किती साधनं उपलब्ध असतात, किती प्रोत्साहन मिळतं इत्यादी गोष्टीवरून माणसाचं यश ठरतं.

लेखकाचंच सूत्र पुढं चालवून म्हणता येईल की वॅटसन यांना ते गोरे होते म्हणून नोबेल मिळालं नाही, त्यांनी केलेल्या कामामुळं मिळालं. भारतीयांना नोबेल न मिळण्याचं कारण ते काळे आहेत हे नाहीये तर नोबेल मिळण्यासाठी आवश्यक असलेल्या अनेक गोष्टी भारतीयांना मिळत नाहीत. तेच भारतीय अमेरिकेत गेले तर मात्र ते काळे असूनही नोबेल मिळवतात.

अनुवंशशास्त्र किंवा अनुवंशविज्ञान ही गोष्ट वैज्ञानिक नसलेल्या माणसाला समजायला जड जाते. लेखक ॲडम रूदरफोर्ड वंशवादाच्या संदर्भात अनुवंशशास्त्र सामान्य माणसाला समजेल अशा रीतीनं सोपं करतात आणि रंजकही करतात.

वंशवाद आणि वंशद्वेष हे माणसानं तयार केलेले लोचे आहेत. त्यात माणसांचा स्वार्थ गुंतलेला आहे. देश, धर्म, जाती, भाषक इत्यादी गटांतली माणसं आपापला स्वार्थ साधण्यासाठी इतरांना कमी लेखण्याची खटपट करतात त्यातून वंशवाद जन्माला येतो.

लेखकाचं म्हणणं असं की लेको तुम्ही तुम्हाला हवं ते करा पण कृपा करून विज्ञानाला त्यात गुंतवू नका, विज्ञानाची साक्ष काढू नका, विज्ञानाचा आधार घेऊ नका.

निळू दामले, लेखक आणि पत्रकार आहेत.

How to Argue With a Racist: History, Science, Race and Reality
Adam Rutherford
224 pages
Publisher : W&N
Kindle ; Rs. 412. Paper Back Rs.833

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0