ओम बिर्ला नवे लोकसभा सभापती

ओम बिर्ला नवे लोकसभा सभापती

१७ व्या लोकसभेचे नवे सभापती म्हणून भाजपचे ओम बिर्ला यांनी बुधवारी सूत्रे हाती घेतली.

मी एनआरसीमध्ये नोंदणी का करणार नाही?
राज्यसभेच्या ३ जागांमुळे बदलले म. प्रदेशचे राजकारण
अभाविपने व्हॉटसअपवरून हल्ल्याचे नियोजन कसे केले?

१६ व्या लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांना भाजपने २०१९च्या लोकसभा निवडणुकांत तिकीट न दिल्याने त्यांना दुसऱ्यांदा लोकसभा सभापतीपद मिळणे अशक्य होते. त्यामुळे नवा अध्यक्ष कोण याची उत्सुकता होती. ओम बिर्ला यांचे नाव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सूचवल्याने व भाजपचे लोकसभेत पूर्ण बहुमत असल्याने या नावाला विरोध असण्याची शक्यता नव्हती. मंगळवाली भाजपने एनडीए आघाडीतील सर्व पक्षांना त्यांच्या नावाला अनुमोदन देण्यास सूचित केले होते तसेच काँग्रेस व अन्य विरोधी पक्षांनी पाठिंबा द्यावी अशीही विनंती केली होती. अखेर विरोधी पक्षांनी आपला उमेदवार उभा न करण्याचा निर्णय घेतल्याने ही निवड बिनविरोध झाली.

ओम बिर्ला हे राजस्थानमधील कोटा येथील खासदार असून ते केंद्रीय गृहमंत्री व भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या निकटचे मानले जातात.

५७ वर्षांचे ओम बिर्ला त्यांच्या शालेय जीवनापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडित आहेत. १९७९मध्ये ते विद्यार्थी संघटनेचे अध्यक्षही होते. नंतर त्यांनी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे नेतृत्व स्वीकारले होते. १९९०च्या दशकात रामजन्मभूमी आंदोलनात त्यांनी सहभाग घेतला होता. राजस्थान भाजपच्या विस्तारात ओम बिर्ला यांनी बरेच काम केले आहे. वसुंधरा राजे यांचे सरकारच्या विरोधात जेव्हा पक्षांतर्गत वातावरण होते तेव्हा पक्षात असंतोष वाढू नये याची खबरदारी बिर्ला यांनी घेतली होती.

२००३मध्ये त्यांनी कोटा येथून आमदारकीची निवडणूक लढवली होती त्यानंतर २०१४ पर्यंत ते राजस्थान विधानसभेत निवडून येत होते. २०१४मध्ये त्यांना कोटा-बुंदी लोकसभा मतदारसंघाचे तिकीट देण्यात आले होते.

कोटामध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सुरू व्हावी व चंबळ नदीचे पाणी बुंदी जिल्ह्यात यावे यासाठी बिर्ला प्रयत्नशील होते.

दोनच दिवसांपूर्वी माजी आरोग्य मंत्री जे. पी. नड्‌डा यांच्याकडे भाजपचे कार्यकारी अध्यक्षपद देण्याची घोषणा भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी केली होती. नड्‌डा जेव्हा भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष होते तेव्हा ओम बिर्ला उपाध्यक्ष म्हणून संघटना चालवत होते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0