नवी दिल्लीः यूपीए-२ सरकारच्या कथित भ्रष्टाचाराविरोधात ‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’ (आयएसी) या संघटनेने देशभर चिथवलेले आंदोलन हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघपुर
नवी दिल्लीः यूपीए-२ सरकारच्या कथित भ्रष्टाचाराविरोधात ‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’ (आयएसी) या संघटनेने देशभर चिथवलेले आंदोलन हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघपुरस्कृत होते, असा खळबळजनक आरोप आम आदमी पार्टीच्या संस्थापक सदस्यातील व नंतर हकालपट्टी झालेले ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी केला आहे. आयएसीच्या माध्यमातून केंद्रातील यूपीए सरकार पाडण्याचा कट रचण्यात आला होता व त्यासाठी हे आंदोलन उभे करण्यात आले होते, असे भूषण म्हणाले.
एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत भूषण म्हणाले, आयएसीच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनामागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजप आहे याची मला माहिती नव्हती व या आंदोलनाला पाठिंबा देण्याचा संघपरिवाराचा खरा हेतू केंद्रातील यूपीए-२ सरकार पाडणे हा होता हे मला लक्षात आले नाही. पण आता मला यात कोणतीही शंका वाटत नाही. अण्णा हजारे यांना या आंदोलनामागे संघ होता याची कदाचित माहिती नसेल. पण अरविंद केजरीवाल यांना या आंदोलनाला संघाचा पाठिंबा आहे, हे माहिती होते. केजरीवालांचे चारित्र्यही मला पहिल्यांदा लक्षात आले नाही. पण जेव्हा लक्षात आले तेव्हा एक मोठा राक्षस जन्मालाच आला होता, असे भूषण म्हणाले.
वाचकांच्या माहितीसाठी खुद्ध प्रशांत भूषण आयएसीच्या प्रमुख समितीतील सदस्य होते. पण २०१५मध्ये त्यांची संघटनाविरोधी कारवाया केल्याच्या आरोपावरून सामाजिक कार्यकर्ते योगेंद्र यादव यांच्यासह हकालपट्टी करण्यात आली होती. या हकालपट्टीनंतर योगेंद्र यादव यांनी स्वतःची स्वराज अभियान संघटना स्थापन केली. तर अरविंद केजरीवाल यांनी आम आदमी पार्टीला दिल्ली विधानसभा निवडणुकात विजय मिळवून दिला होता.
आयएसीच्या कोर कमिटीत अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया, किरण बेदी, संतोष हेगडे, प्रशांत भूषण, योगेंद्र यादव व कुमार विश्वास ही मंडळी होती.
मूळ बातमी
COMMENTS